एक मर्ग-ए-नागहानी और है...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 15 जून 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

आयुष्यातल्या दुःखदायक घटनांनी आणि क्लेशकारक अडचणींनी त्रस्त झालेला ग़ालिब नेहमीच आपल्या वेदनेला मुखरित करत आला. त्यातून जन्मलेली त्याची कविता आजही या वेदनेची सल जाणवून देत असते. दुःख, वेदना यांची चरमसीमा म्हणजे मृत्यू. तो तर प्रत्येकालाच अटळ असा. पण त्याची चाहूल लागूनही एक चलबिचल कायम राहते. कारण त्याचं आगमन हे निश्चित असलं, तरी त्याची वेळ तशी अनिश्चितच असते. तो नेमका कधी येणार, कसा, कुठं भेटणार हे प्रश्न अनुत्तरित राहतात. हे उत्तर मिळतं, तेव्हा मग प्रश्न विचारणारा जीवनाच्या पल्याड गेलेला असतो. माणसाचा जिवंतपणा, जीवनाची त्याला असलेली ओढ ग़ालिबनं हरतऱ्हेनं काव्यातून मांडली. तशीच मृत्यूची प्रतीक्षा, त्याच्यातच सर्व दुःखांचा दिसणारा अंत याबद्दलही त्यानं वारंवार लिहिलं. ‘मानवी दुःखांचा अंत म्हणजे मृत्यू,’ हे तर त्याचं अतिशय आवडतं वचनच होतं... अनेकदा त्यानं मरणाची वाट पाहिली, त्याला साद घातली. पण ते असं सांगून थोडंच येत असतं? ग़ालिबच्या मृत्यूबद्दलच्या जाणिवा आणि धारणा त्याच्या कवितेत या ना त्या रूपात उतरत गेल्या. एका शेरमध्ये तो म्हणतो, ‘तो इतका जिद्दी आहे, की आज काही यायचा नाही. पण केव्हा तरी आल्याशिवाय राहायचाही नाही. मृत्यूविषयीची माझी ही मोठीच तक्रार आहे, त्याविषयी काय सांगू?’
ये ज़िद कि आज न आवे और आए बिन न रहे
क़ज़ा से शिकवा हमें किस क़दर है क्या कहिए

प्रेम असो की विरह; दोन्ही वेदनाच देतात. त्यातून जन्मलेलं दुःख हे जणू मरणप्रायच असतं. म्हणूनच प्रेमाविषयी बोलताना, प्रेयसीचं मिलन नसलेलं प्रेम मरणाची आठवण करून देतं - ‘माझ्या नशिबातच प्रेयसीचं मिलन नाही. आता आणखी जगलो वाचलो, तरी आमच्या नशिबी राहणार ती केवळ प्रतीक्षाच...’
ये न थी हमारी क़िस्मत कि विसाल-ए-यार होता
अगर और जीते रहते यही इन्तज़ार होता

पण वचन देऊनही न भेटणाऱ्या प्रेयसीला उद्देशून, आपण अजून मरणाच्या दाढेत जाऊन पोचलो नाही, याचा खुलासाही ग़ालिब करतो, तोही आपल्या खास शैलीत. तो म्हणतो, ‘तू दिलेल्या भेटीच्या आश्वासनावर विश्वास ठेवल्यामुळं मी अजून जिता आहे, असं मानू नकोस. कारण तसं जर असतं, तुझ्या बोलण्यावर जर माझा विश्वास असता, तर तुझ्या प्रत्यक्ष भेटीच्या कल्पनेनं आनंद होऊन याआधीच माझा मृत्यूच ओढवला नसता का?’
तिरे वादे पे जिये हम तो ये जान झूट जाना
कि ख़ुशी से मर न जाते अगर एतबार होता

याच ग़ज़लमध्ये ग़ालिबनं एक अत्यंत सुंदर शेर लिहिला आहे, ज्याची आजही खूप चर्चा केली जाते. त्याच्या उत्कृष्ट रचनांपैकी असलेला हा शेर आहे. जिच्यावर प्रेम केलं, तिनं अद्याप पुरतं जायबंदी केलेलं नाही. नजरेचा तीर अर्धवट खेचून सोडला आहे. तुझ्या या कमजोर तीरंदाजीमुळं तो तीर हृदयात खोल रुतून बसला, तो आरपार गेलाच नाही, असा आशय असलेला हा शेर मोठा अर्थपूर्ण आहे...
कोई मेरे दिल से पूछे तेरे तीर-ए-नीम-कश को
ये ख़लिश कहाँ से होती जो जिगर के पार होता

याचा अर्थही वेगवेगळ्या प्रकारे लावला जातो. काहीजण जसा शब्दांमधून समोर येतो, तसा अर्थ लावतात. त्यांच्या मते, ‘हा तीर आरपार गेला असता, तर बरं झालं असतं. म्हणजे मग ही ख़लिश, ही टोचणी सहन करावी लागली नसती. कारण मग मी जिवंतच राहिलो नसतो,’ असं कवीला म्हणायचं आहे. हा तसा सरळ अर्थ झाला. पण दुसरा अर्थ असा होतो, ‘तुझ्या नजरेचा कमजोर तीर कुठं आहे, ते फक्त मलाच माहीत आहे. तो माझ्या हृदयात रुतून बसल्यामुळं त्याची वेदना मला सतत जाणवत असते. तो जर आरपार गेला असता, तर मग या व्यथेचा अनुभव मला कुठून मिळता?’ जणू ग़ालिबला ही वेदना, हवीहवीशी वाटत आहे. ‘यह ख़लिश कहाँ से होती,’ असं तो कृतज्ञतेनं म्हणतो आहे आणि म्हणूनच ‘कोई मेरे दिल से पूछे’ असा उद्‍गारही तो अभिमानानं आणि खात्रीपूर्वक काढतो आहे... 
या ग़ज़लमध्ये त्यानं लिहिलेले अनेक शेर मरणाच्या जवळ जाण्याचा अनुभव चित्रित करणारे आहेत. जगताना येणारा मरणप्राय असा अनुभव प्रत्यक्ष मृत्यूपेक्षाही क्लेशदायक. एका जीवनात मरायचं तरी कितीदा, असा प्रश्न गालिब उपस्थित करतो आणि असं मरण्यापेक्षा आपण सागरात बुडून मरण पावलो असतो, तर बरं झालं असतं. कारण मग ना आपली प्रेतयात्रा निघाली असती, ना कुठं आपली कबर बांधली गेली असती, असा विलाप करतो. आयुष्यात आलेल्या अवमानकारक, दुःखदायी आणि मरणप्राय घटनांना व अनुभवांना सामोरं जातानाचा आलेखच यात तो मांडतो...
कहूँ किससे मैं कि क्या है शब-ए-ग़म बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता
हुए मर के हम भी रुस्वा हुए क्यूँ न ग़र्क-ए-दरिया
न कभी जनाज़ा उठता न कहीँ मज़ार होता

जगताना मरण बरं, असं वाटायला लावणारे दिवस वाट्याला आल्यावर, मरणाची वाट बघणं एवढंच हाती उरतं. जगतानाचा हा काळ म्हणजे पुन्हा मृत्यूची वाट पाहण्याची धडपडच. अशा वेळी येतं तेही एक प्रकारचं मरणच. पण तरीही खरा मृत्यू भेटत नाही तो नाहीच, अशा तऱ्हेचा अनुभवही ग़ालिबनं चित्रित केला-
मरते हैं आरज़ू में मरने की
मौत आती है पर नहीं आती

प्रेम ही तशी मनाला आश्वस्त करणारी भावना खरी. पण प्रेमात जीवन आणि मरण दोन्हींत अंतर उरतच नाही. प्रेम जर जाळत जाणारं असेल, तर मग तेही मरणाचाच अनुभव देतं. ग़ालिबला प्रेमातही वेदनाच मिळाली, म्हणून तो म्हणतो, ‘प्रेमात जीवन आणि मरण यात फरकच उरत नाही. जिच्यासाठी जीव तडफडतो, तिच्याकडं बघूनच तर जगत रहावं लागतं...’
मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का
उसीको देख कर जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले

मरण या गोष्टीबद्दल थेट बोलायला माणूस तयार नसतो. पण ग़ालिब आपल्या काव्यातून मृत्यूच्या अनेक रूपांबद्दल, अवतारांबद्दल मोकळेपणानं लिहीत आला. ते नेहमीच थेट नव्हतं. कधी सूचकपणे, कधी उपमा किंवा रूपकांच्या परिवेशात तो मृत्यूची संकल्पना मांडत राहिला. बरेचदा मृत्यू हा शब्द न उच्चारता, तो माणसाच्या जीवनसमाप्तीची चर्चा करत आला. मरणाचं नावही घ्यायचं नाही, असा एक संकेत अनेक समाजांमध्ये असतो. तो एक सांस्कृतिक आणि धार्मिक संकेतही आहे. भारतीय समाजातही अर्थातच तो आहे आणि एकूणच आशियाई संस्कृतीत. मृत्यूची भीतीही मनुष्याला वाटते. आपल्या प्रियजनांपासून कायमसाठी दूर जाण्याची धास्ती व दुःखही त्याला वाटत असतं. मरणाबाबतच्या प्रश्नचिन्हामुळं मनुष्य जीवनाबद्दल अधिक चिंतनशील होतो, आत्ममग्न होतो. तसंच मरणानंतर काय, हा विचारही त्याला सतावत असतो. मरणानंतर जीवन असतं का? भूतपिशाच्च वगैरे खरंच असतात का? असे अगणित सवाल त्याच्यापुढं असतात.

यामुळंच मरणाच्या गूढाबद्दल एक सुप्त आकर्षणही माणसाच्या मनात असतं. या जाणिवांच्या वेगवेगळ्या छटा ग़ालिबच्या काव्यात दिसतात. मृत्यू म्हणजे जीवनाच्या त्रासांपासून सुटका, मृत्यू म्हणजे जीवानपेक्षा सुंदर असं ठिकाण, तेच तर अंतिम गंतव्य, मुळात जगणं हाच एक जगाचा निरोप घेण्याचा प्रवास आहे, अशा विविध दृष्टिकोनांतून मृत्यूकडे बघत ग़ालिबनं काव्य लिहिलं. मृत्यूत हरपलेपण असलं, तरी तो अखेरीस दिलासादायकच असतो, हेही त्यानं आवर्जून सांगितलं. 
शिवाय काव्यात कोणत्याही गोष्टीबद्दल थेट शब्दात बोलण्यापेक्षा, रूपकाच्या किंवा व्यंजनेच्या मिषानं बोललं तर ते प्रभावी ठरतं. ग़ालिबनं बरेचदा हा मार्गही अनुसरला. पण त्यानं कधी मृत्यू या शब्दाचा बाऊही केला नाही. मरण हे जीवनाबरोबरच जन्म घेतं, हे तो जाणून होता. मृत्यू हे जीवनाचं अंतिम ईप्सितस्थळ आहे, हेही तात्त्विक पातळीवर त्यानं स्वीकारलं होतंच. 
जगातला प्रत्येकजण मर्त्य आहे, असं म्हणणारा ग़ालिब कधी आपल्या अस्तित्वाबद्दल वेगळं काही लिहून जातो. आपण कोणी ऐरेगैरे नाही, की कुणीही यावं आणि आपल्याला संपवून टाकावं, अशी भावना तो व्यक्त करतो. कवी म्हणून मी टिकून राहणार आहे, पण तरीसुद्धा मला काही जण सुखानं जगू देत नाहीत, असंही उपरोधानं त्यानं म्हटलं. हा शेरच बघा, ज्यात तो म्हणतो, ‘मला संपवण्यासाठी ही दुनिया इतकी का प्रयत्नशील आहे? मी थोडाच लोखंडी पट्टीवरचा एकदा पुसून लिहिला गेलेला असा एखादा शब्द आहे?’ 
या रब, ज़माना मुझको मिटाता है किसलिए
लौह-ए-जहाँ पै मुकर्रर हर्फ़ नहीं हूँ मैं 

हा शेर जरी त्यानं स्वतःविषयी, स्वतःच्या कर्तृत्वाविषयी लिहिला असला, तरी तो एकूणच मानवजातीला लागू होतो. माणसाचं अस्तित्व मर्यादित असलं, तरी ते तथ्यहीन, निरर्थक नाही, असंही त्याला सुचवायचं आहे. जीवन हे क्लेशकारक असलं, तरी ते निरर्थक नाही, हा यातला विचार महत्त्वाचा आहे. काहीसा आशा जागवणारा, जीवनाची अर्थपूर्णता अधोरेखित करणारा... 

पण तरीही जगण्याच्या व्यापातून सुटका करणारा मृत्यू हे अंतिम सत्य म्हणून उरतंच. म्हणूनच आपल्या वेदनांचा वारंवार उच्चार करणारा ग़ालिब एकूणच मानवी दुःख कशी अनंत आहेत, हे सांगत राहतो आणि मृत्यूच त्यावरचा इलाज आहे, हेही. पण दरवेळी नव्या रीतीनं तो आपला हा विचार बोलून दाखवत असल्यानं, त्यातून प्रतीत होणारा अर्थ आणि जाणीव वाचणाऱ्याला आतून हलवून सोडते. ‘कोई दिन गर ज़िन्दगानी और है’ या ग़जलमधल्या एका हीच भावना तीव्रपणे व्यक्त झाली आहे. यात तो म्हणतो, ‘‘ग़ालिब’, आता सगळी दुःखं, संकटं संपली. पण आहे, अजून एक बाकी आहे. ते म्हणजे अचानक येणारा मृत्यू.’ मृत्यूशी असलेलं ग़ालिबचं नातं इथं जार रोमँटिक होऊन जातं. इतकी दुःखं सोसली, आता एकच तर उरलं, त्यालाही सामोरं जायचंय... मात्र मरण कधी येणार, हे खरंच माहीत नाही. ते अचानक आणि नकळत येणार आहे. पण नक्की येणार आहे....
हो चुकीं ग़ालिब बलाएँ सब तमाम 
एक मर्ग-ए-नागहानी और है

संबंधित बातम्या