मौत का एक दिन मुअय्यन है

नंदिनी आत्मसिद्ध 
बुधवार, 24 जून 2020

अन्दाज़-ए-बयाँ 

वेदनेतून माणसाची सुटका करणारा मृत्यू ग़ालिबच्या काव्यात सातत्यानं डोकावत राहिला. त्याला मरणाची भीती होती की नाही? तर बहुधा ती नसावी. तसंही मरणाला घाबरून राहिलं, तर ते येणार नाही असं थोडंच असतं? तरीही माणसं उगाच मरणाची भीती बाळगतात आणि त्यापायी जगण्याचंच विसरून जातात. एक मात्र आहे, हताश मनाला केव्हा ना केव्हा मरणाची ओढ वाटते. आकर्षण वाटतं. ते एकदा आलं, की सध्याच्या संकटांमधून तरी सुटका होईल, अशी त्याची भावना होते. अशा मंडळींना ग़ालिब सांगतो, की काहीच आशा उरली नाही, कुणीच नजरेसमोर नाही अशी अवस्था आली, तरी मृत्यू येणार तेव्हाच येणार आहे. त्याची चिंता करून रात्र निद्रेविना तळमळून काढू नका...

कोई उम्मीद बर नही आती कोई सूरत नज़र नहीं आती
मौत का एक दिन मुअय्यन है नींद क्यूँ रातभर नहीं आती

आपल्या मरणानं कोणाला काय वाटेल, असं माणसाच्या मनात येणं हेही स्वाभाविकच. पण जगात आपल्यावाचून कोणाचं काही अडत नाही, हेही आपण प्रत्येकजण जाणून असतो. आपल्या मरणानंतर कुणी विलाप कशासाठी करावा, असं ग़ालिबनंच लिहिलं आहे...

‘ग़ालिब’-ए-ख़स्ता के बग़ैर कौन से काम बंद हैं
रोइये ज़ार ज़ार क्या कीजिये हाय-हाय क्यूँ

‘दुर्बल अशा ग़ालिबविना अशी कोणती कामं थांबून राहिलीत? अशा स्थितीत मृत्यू आला, तर त्याच्यासाठी रडत बसणं आणि हाय हाय कशासाठी, असा शोक करत राहणं हे व्यर्थच...’ असं म्हणणारा ग़ालिब जगाचा हा न्याय स्पष्ट शब्दांमध्ये मांडतो. ही दुनिया, तिची गती जशी चालत आहे, तशीच चालत राहणार आहे. कुणी मरण पावलं, म्हणून यात काहीही फरक पडणार नाही. मग एखाद्याच्या जाण्याचा शोक कशाला करायचा? तो करूच नये...

आपल्या मरणाचा उल्लेख वारंवार करणारा ग़ालिब, माझ्या नशिबी प्रेमरूपी मद्य पिण्यानंच मरणं लिहिलं होत, असं म्हणतो आणि लेखणी निकामी झाल्या कारणानं विधात्याला हा ललाटलेख लिहिता आला नाही, अशी कारणमीमांसा देतो. हरतऱ्हेनं सगळीकडं आपला पराभव, आपला मृत्यू हा ठरलेलाच आहे, असं सुचवतो...

क़ज़ा ने था मुझे चाहा ‘ख़राब-ए-वादा-ए-उल्फ़त’
फ़क़त ‘ख़राब’ लिखा बस न चल सका क़लम आगे

‘मृत्युदेवतेची तर अशीही इच्छा होती, की प्रेमरूपी शराब पिऊन माझा विनाश व्हावा. पण या संदर्भातला आदेश काढताना, नष्ट (ख़राब), हा केवळ एक शब्द लिहिल्यानंतर मत्युदेवतेची लेखणीच चालेना...’ (अर्थात यामुळं माझ्या विनाशाचं कारण लिहिलंच गेलं नाही.) 

प्रेम आणि मरण यावर अनेकांनी काव्यं लिहिली आहेत. ग़ालिबचाही एक शेर आहे, ज्यात तो प्रेमिकाचं मरण कसं असतं, त्याचं वर्णन करतो. तो म्हणतो, की ज्योत जळते, तसं प्रेमिकाचं हृदय जळत असतं... ज्योत विझली, की धूर निघतो. माझ्या मृत्यूनंतर प्रेमाची ज्योतही अशीच काळवंडून गेली...

शमअ बुझती है तो उस में से एक धुआँ निकलता है
शोल-ए-अिश्क़ सियाहपोश हुआ मेरे बाद

प्रेमिकाचं मरण आणि मेणबत्तीच्या ज्योतीचं मरण यांच्यातली ही तुलना आहे. ज्योत जळून मेणबत्तीचं अस्तित्व संपवते आणि ती विझली की फक्त धूर शिल्लक राहतो. तसंच प्रेमाची ज्योत प्रेमिकाला आतून जाळत असते. प्रेमिकाचं जिणं किती दाहक असतं, हे यातून ग़ालिब सुचवतो. 

असं असलं, तरी जगण्यातही आनंद आहेच आणि मरणामुळं या आनंदाची रुची आणखीच वेगळी ठरते. मृत्यू आहे, म्हणूनच तर आयुष्यातला प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. तो भरभरून जगणं हे आनंदाचं ठरतं... असं सांगून ग़ालिब एका शेरमध्ये लिहितो, की मृत्यू नसता, तर जीवनात गंमत उरलीच नसती. हे लिहिताना, मरण जगण्यातलं दुःख संपवतं, हेही त्याच्या मनात असणारच...

हवस को है निशात-ए-कार क्या क्या
न हो मरना तो जीने का मज़ा क्या

मात्र जगताना मनुष्य जर असहाय झाला, तर त्याला मृत्यूची आठवण येते. कारण त्याची आशाच संपलेली असते. अशा मनोवस्थेचं वर्णन करताना ग़ालिब एका शेरमध्ये म्हणतो, की मरण आलं की आहे ती दुःखद अवस्था उरणार नाही, असं हताश माणसाला वाटतं. ज्याची आशाच मुळात मरणात आहे, त्याची निराशा कशी असेल, बघा तरी...

मुन्हसिर मरने पे हो जिसकी उम्मीद
ना-उम्मीदी उसकी देखा चाहिए

मरणच आपली या जंजाळातून सुटका करणार आहे, असं म्हणणारा ग़ालिब स्वतःच्या मृत्यूवरून विनोदही करत असे. त्याचा एक चरित्रकार अल्ताफ़ हुसैन हाली यानं एक प्रसंग दिला आहे. प्रत्यक्षातल्या मृत्यूपूर्वी आठएक वर्षं आधी ग़ालिबनं आपल्या मृत्यूचं एक भाकीत केलं होतं. इस्लामी दिनदर्शिकेनुसार १२७७ मध्ये आपण अल्लाघरी जाणार, असं हे भविष्य होतं. योगायोगानं त्याच वर्षी दिल्लीत आलेल्या महामारीच्या साथीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ग़ालिब मात्र सुरक्षित राहिला. याचा संदर्भ घेऊन एका पत्रात ग़ालिबनं लिहिलं होतं, ‘मी १२७७ मध्ये मरणार, हे जे म्हटलं होतं, ते चूक नव्हतं. मला त्याच वर्षी मरण येणं अपेक्षित होतं. पण साथीमुळं मरणं, हे मला कमीपणाचं वाटलं, म्हणून नाही मेलो...’ याकडं विनोद म्हणून पाहिलं, तरी जगण्याला कंटाळलेल्या ग़ालिबची मानसिक स्थिती यावरून समजून येते... 

खरंच आहे, की बरेचदा माणूस जगताना थकून जातो. ग़ालिबचं तसंच झालं होतं. उत्पन्नाचे अनेक दरवाजे बंद झाल्यानंतरही त्यानं आपल्या परीनं काही उपाय करण्याचे प्रयत्न केले, याबद्दल याआधीच चर्चा केली आहे. कसंबसं भागत होतं, अशा त्या काळात वय वाढल्यामुळं शारीरिक व्याधींमुळं तो त्रस्त झाला होता. १८६६ च्या आसपास प्रवास करताना तो पुराच्या तडाख्यात सापडल्यामुळं आजारी पडला होता. तोवर त्याची तब्येत जरा खालावलेलीच होती. या आजारानं त्याला अधिक थकवा आणला. दिल्लीत घरी परतल्यावर इतर व्याधींचा जोर वाढला आणि ग़ालिबचा पैलथडीचा प्रवास सुरू झाला. तब्येत बिघडत गेली. तरीही त्याचं काम सुरू होतं. तो अनेकांना पत्रं लिही आणि आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर देणं त्याला आपलं कर्तव्य वाटत असे. त्याचं नाव झालं असल्यानं देशाच्या विविध भागांमधून त्याला पत्रं येत. शिवाय नवे व होतकरू शायर आपलं काव्य त्यानं वाचावं आणि आपली प्रतिक्रिया द्यावी, यासाठी पत्रव्यवहार करत. प्रकृती बिघडत गेली, तेव्हा मग तो तोंडी पत्राचा मजकूर सांगे व कोणीतरी तो लिहून घेत असे. पण अशीही वेळ आली, जेव्हा त्याला हाही खटाटोप त्रासदायक झाला. मग त्यानं वर्तमानपत्रांमधून जाहीर केलं, ‘माझी अवस्था ठीक नसल्यानं कोणाला माझं पत्रोत्तर विलंबानं पोचलं, किंवा मिळालंच नाही, तर त्यांनी कृपया तक्रार करू नये. आजवर मी याबाबत चालढकल केली नाही. पण आता मी निकामी झालो आहे. माझ्यात शक्ती उरलेली नाही. मग मी करणार तरी काय? माझ्यामुळं कुणाला क्लेश झाले, तर त्यांनी मला क्षमा करावी.’ 

या प्रकारचं निवेदन प्रकाशित झाल्यानंतरही ग़ालिबच्या भोवतीची माणसांची गर्दी कमी होत नव्हती. पत्रांचा ओघ सुरूच राहिला आणि परिष्करणासाठी शिष्यांकडून येणाऱ्या ग़ज़लाही येतच होत्या. मात्र आता एक महान कवी अखेरच्या प्रवासाला निघाला होता. १८६९ वर्ष उजाडलं, तेव्हा ग़ालिबची तब्येत बरीच ढासळली होती. त्याची इहयात्रा अंतिम टप्प्यात होती. शेवटच्या दिवसांमध्ये त्याची शुद्ध अधून मधून हरपत असे. मधेच तो भानावर येई.  खाणंपिणंही कमी होत जाऊन हळूहळू बंद झाल्यागत झालं होतं. १४ फेब्रुवारी १८६९ या दिवशी त्यानं आपल्या नातसुनेजवळ तिच्या मुलीला पाहण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘ती झोपली आहे. उठली की घेऊन येते,’ असं नातसुनेनं सांगितल्यावर, ‘ठीक आहे,’ एवढं बोलून ग़ालिबनं उशीवर डोकं टेकलं. त्यानंतर त्याची शुद्ध हरपली. दुसऱ्या दिवशी, १५ फेब्रुवारीला दुपारी त्याची, तो वाट पाहत असलेल्या मृत्यूशी भेट झाली. त्यानं तेव्हा वयाची ७१ वर्षं पार केली होती. ‘क़ज़ा से शिकवा हमें किस क़दर है, क्या कहिए,’ ही ग़ालिबची तक्रार आता संपली होती...

सकाळपासूनच त्याच्या घरी शेकडो चाहते आणि शिष्य जमा झाले होते. मित्रांच्या सहवासाची आणि संवादाची ओढ असलेला ग़ालिब अखेरच्या प्रवासाला निघाला, त्यावेळी एकटा अजिबात नव्हता. चाहत्यांच्या गराड्यात होता. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा दफनविधी निज़ामुद्दीन इथल्या दफनभूमीत पार पडला. 

ग़ालिब हा शिया मुसलमान होता. पण धार्मिक बाबतीत कसलेच भेद पाळणारा नव्हता. उदारमतवादी होता. आपण सुन्नी असल्याचंही तो कधी म्हणत असे. तो स्वतः या संदर्भात धार्मिक नव्हता, त्यामुळं मनाला येईल तसं वक्तव्य तो करून जाई आणि त्या त्या प्रसंगाला साजेसा युक्तिवाद करे. ग़ालिब गेल्यानंतर त्याच्या मित्र व चाहत्यांमध्ये यावरून मतभेद झाला, की त्याच्यावर शिया पद्धतीनं अंत्यसंस्कार करायचे की सुन्नी पद्धतीनं. तो शिया होता, याबबात कोणताही संदेह नव्हता. तरीही त्याचे अंत्यविधी मात्र सुन्नी रीतीनुसारच झाले. त्याचा संबंध ज्या लोहारूच्या नवाब घराण्याशी होता, त्या घराण्यातील नवाब ज़ियाउद्दीन यानं हे अंतिम क्रियाकर्म केलं आणि मोठ्या सन्मानानं दिल्लीजवळच्या हज़रत निज़ामुद्दीन इथल्या आपल्या वंशाच्या कब्रस्तानात ग़ालिबच्या शवाला चिरविश्रांती दिली. याच लोहारू घराण्यानं एकेकाळी, म्हणजे १८४७ मध्ये वर्तमानपत्रांतून छापून आणलं होतं, की ग़ालिबचा आमच्या घराण्याशी असलाच तर खूप दूरचा संबंध आहे...

ज़ख़ीरा बालगोविन्द या आग्रा इथल्या पत्रिकेत मार्चमध्ये त्याच्यावर एक लेख छापून आला होता. तो त्याच्यावरचा कदाचित पहिला लेख असेल... ग़ालिबच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अनेकांनी मरसिये म्हणजे शोककविता लिहिल्या. त्यापैकी अल्ताफ़ हुसैन हाली, मिर्ज़ा मजरूह यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. त्याच्या समाधीवर मजरूहरचित काव्याच्या ओळी कोरलेल्या आहेत. त्यात तो म्हणतो,

रश्क-ए-उर्फ़ी व फ़ख़्र-ए-तालिब मुर्द
असदुल्लाहख़ान ग़ालिब मुर्द

अर्थ असा, ‘उर्फ़ीसारख्या कविवरानं ज्याचा हेवा करावा आणि तालिबसारख्या कविश्रेष्ठानं ज्याचा अभिमान बाळगावा, अशा असदुल्लाहख़ान ग़ालिबची चिरविश्रांती.’

ग़ालिबनंच म्हटल्यानुसार, जीवनातल्या दुःखांवरचा इलाज, म्हणजे मृत्यू त्याला अखेर भेटला होता. त्याच्या आयुष्याची ज्योत अखेरपर्यंत जळत राहिली होती... 

ग़म-ए-हस्ती का ‘असद’ किससे हो जुज़ मर्ग इलाज
शमअ हर रंग में जलती है सहर होने तक     

संबंधित बातम्या