पर तबीयत उधर नहीं आती... 

नंदिनी आत्मसिद्ध 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

ग़ालिबची विनोदबुद्धी किती टोकदार होती, याचे अनेक दाखले त्याच्या पत्रांमधून आणि त्याच्याबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणींमधून मिळतात. त्याची तिरकस शैली तर त्याच्या शायरीतूनही प्रत्ययास येते. ग़ालिबनं प्रतिकूल परिस्थितीतही आपली विनोदबुद्धी सोडली नाही. आयुष्यातल्या अडचणींवर हसत, त्यानं जगणं साजरं केलं. त्याच्याबद्दलचे किस्से वाचताना एक वेगळीच गंमत येते. कधी स्वतःच्या दारिद्र्यावर, अभावांवर तर कधी इतरांच्या त्रुटी हेरून तो मल्लिनाथी करे आणि उपरोध, शाब्दिक कोटी अशा स्वरूपात त्या प्रसंगातून विनोद निर्माण होत असे. ग़ालिबनं मागं ठेवलेलं हे हास्याचं भांडार त्याच्या शैलीचा खास पैलू दाखवणारं आहे... 

एकदा एका ज्येष्ठ सय्यद साहेबांनी ग़ालिबला पत्र लिहिलं. त्यांचं अक्षर फारच वाईट आणि बेढब होतं. ते वाचणं म्हणजे फारच डोळेफोड करावी लागली असती. ग़ालिबनं त्यांना उत्तरादाखल लिहिलं, ‘पीर-ओ-मुर्शिद, (सूफ़ी किंवा संतांना आदरपूर्वक हे संबोधन वापरतात) ख़त मिला। चूमा-चाटा, आँखों से लगाया, आँखें फूटें जो एक हर्फ़ भी पढ़ा हो। तावीज़ बनाकर तकिये में रख लिया।’
तर जेवत असताना एक दिवस ग़ालिबला टपालानं पत्र आलं. त्याचं एकूण रूपरंग बघून ग़ालिबच्या लक्षात आलं की, हे निनावी पत्र शिवीगाळ आणि टीका करणारं असणार. जवळ बसलेल्या आपल्या शिष्याला ते पत्र उघडून त्यानं वाचायला सांगितलं. त्यानं ते फोडलं आणि त्यावर नजर टाकू लागला. तो काही बोलेना, कारण ते पत्र अश्लील आणि अवमानकारक शिव्यांनी भरलेलं होतं. तेव्हा ग़ालिबनं विचारलं, ‘कोणाचं आहे पत्र? आणि एवढं लिहिलं तरी काय आहे त्यात?’ शिष्य वाचताना जरा चाचरत होता. ग़ालिबनं मग पत्र त्याच्या हातातून खेचून घेतलं आणि वाचू लागला. त्यात एक आईवरून दिलेली शिवी पत्र पाठवणाऱ्यानं लिहिली होती. वाचून ग़ालिब हसला आणि आपल्या शिष्याला म्हणाला, ‘मूर्खाला शिवीही नीट देता येत नाही. म्हाताऱ्या किंवा प्रौढ माणसाला आईवरून नव्हे, तर मुलीवरून शिवी देतात ज्यामुळं त्याला अपमान वाटावा. तरुण माणसाला पत्नीवरून शिवी देतात, कारण पत्नीशी त्याचा जास्त जवळचा संबंध असतो. लहान मुलाला आईवरून शिवी देतात कारण त्याला आईबद्दल सर्वाधिक प्रेम असतं. हा जो कोणी या बहात्तर वर्षांच्या म्हाताऱ्याला आईवरून शिवी देतोय, त्याच्या तोडीचा दुसरा मूर्ख कोण सापडेल?’ 

मद्यपानाच्या संदर्भात तर ग़ालिबच्या शायरीत अनेकदा खोचकपणा आणि उपरोधाच्या रूपात हास्यनिर्मिती होते. प्रत्यक्षातही ग़ालिब स्वतःच्या या व्यसनावर मार्मिक टिप्पणी करत असे. एक दिवस ग़ालिबला शराब मिळाली नाही. तो मग नमाज़ पढण्यासाठी मशिदीत गेला. इतक्यात त्याचा एक शिष्य आग्र्याहून त्याला भेटायला आला. त्याला समजलं की ग़ालिबला शराब हवी होती. या शिष्यानं मग तिची सोय केली आणि मशिदीच्या समोर गेला. तिथूनच हातातली बाटली आत गेलेल्या ग़ालिबचं लक्ष वेधून त्याला दाखवू लागला. ती पाहताच ग़ालिब वज़ू क्लायवर, म्हणजे हातपाय धुतल्यावर लगेच मशिदीच्या बाहेर पडू लागला. ते पाहून कुणीतरी विचारलं, ‘हे काय, नमाज़ न पढताच निघालात?’ त्यावर ग़ालिब उत्तरला, ‘ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची होती, ती तर मला आधीच मिळून गेली.’ 

ग़ालिबला भेटायला एक महाशय संध्याकाळच्या वेळी आले. ते निघेस्तोवर सूर्यास्त झाला होता. ग़ालिब स्वतः मेणबत्ती घेऊन बाहेर आले, जेणेकरून पाहुण्यांना काढून ठेवलेले जोडे नीट दिसावेत आणि घालता यावेत. ते ग़ालिबला म्हणाले, ‘अरे तुम्ही का तसदी घेताय? मला येतील घालता जोडे.’ त्यावर ग़ालिब मिस्कीलपणं त्यांना म्हणाला, ‘मी तुम्हाला जोडे दाखवण्यासाठी ही शमा घेऊन नाही आलो काही. यासाठी आलो म्हटलं, नाहीतर एखादवेळेस माझे जोडे घालून तुम्ही जाल.’ 

दिल्लीतल्या एका मुशायऱ्याला गेलेला ग़ालिब रात्रीच्या वेळी मौलाना फ़ैज़ उल-हसन फ़ैज़ सहारनपुरी यांच्याबरोबर परत येत होता. वाटेत एक अरुंद गल्ली लागली.. आणि रस्त्यातच एक गाढव उभं होतं. ते पाहून मौलानांनी प्रश्न केला, ‘दिल्लीत गाढवं बरीच आहेत वाटतं...’ त्यावर ग़ालिब पटकन त्यांना म्हणाला, ‘नाही हो, बाहेरून येतात.’ ऐकल्यावर मौलाना गडबडले आणि एकदम गप्पच झाले. 

ग़ालिबला आंबे खूप आवडत आणि तो आंब्यांचा मनमुराद आस्वाद घेत असे. त्याचा एक दोस्त हकीम रज़ी उद्दीन ख़ान म्हणून होता, ज्याला आंबे अजिबात आवडत नसत. तर हा मित्र एकदा ग़ालिबच्या घरी आला असताना, बाहेरून एक कुंभार आपलं सामान एका गाढवावर लादून तिथून चालला होता. जवळच जमिनीवर आंब्याची सालं आणि कोयी पडल्या होत्या. गाढवानं नाक लावून हुंगलं आणि तसंच सोडून पुढं निघून गेला. हा दोस्त ग़ालिबला म्हणाला, ‘पाहा! आंबा अशी गोष्ट आहे जी गाढवंही खात नाहीत.’ ग़ालिब पटकन बोलला, ‘अगदी बरोबर, गाढवंच खात नाहीत.’ 

ग़ालिबला एकदा घर बदलायचं होतं. बरीच घरं त्यानं पाहिली आणि एक त्याला पसंत पडलं. पण तिथला जनानख़ाना त्याला बघता आला नाही. घरी येऊन त्यानं आपल्या पत्नीला जनानख़ाना बघून यायला सांगितलं. ती बघून परत आली आणि म्हणाली, ‘उस मकान में बला बताते हैं।’ (त्या घराला काही भूतप्रेताची बाधा आहे असं म्हणतात) त्यावर चेष्टा करत ग़ालिब तिला म्हणाला, ‘क्या आपसे बढ़कर भी कोई बला है।’ 

आपल्या बायकोची मस्करी ग़ालिब नेहमी करायचा. एक दिवस त्याची पत्नी आजारी  
पडली. तिला भेटायला, विचारपूस करायला ग़ालिब गेला. तिला विचारलं, ‘कशी आहे तब्येत?’ ती म्हणाली, ‘मरणारे आता मी. डोक्यावर कर्ज आहे, त्याची चिंता आहे.’ त्यावर ग़ालिब तिला म्हणतो कसा, ‘यात काय काळजी आहे करण्यासारखं! ईश्वरापाशी असा कोण मुफ़्ती सदर उद्दीन ख़ाँ बसला आहे, जो आदेश जारी करून तुला पकडून बोलावून घेईल?’ परिस्थितीवर व्यंग्यात्मक भाष्य करून वातावरण हलकं फुलकं करण्याचा ग़ालिबचा स्वभाव होता. 

असे अनेक प्रसंग आणि किस्से सांगितले जातात. स्वतःवर हसत, स्वतःच्या अवस्थेची टिंगल करत ग़ालिब शेरेबाजी करत असे... 
एकदा दिल्ली शहरात महामारी पसरली. त्यावेळी ग़ालिबचा शिष्य मीर मेहदी मजरूह यानं पत्र लिहून विचारलं, ‘शहरात पसरलेली महामारीची साथ अजूनही आहे का?’ उत्तरादाखल ग़ालिबनं कळवलं, ‘भई, कसली साथ? जेव्हा माझ्यासारख्या सहासष्ट वर्षांच्या म्हाताऱ्याला आणि चौसष्ट वर्षांच्या या म्हातारीला (ग़ालिबची पत्नी) काही ती मारू शकली नाही. तुफ़ बर ईन वबा!’ (या फ़ारसी वाक्याचा अर्थ आहे, ‘या महामारीचा धिक्कार असो.’) 

दिल्लीची हालत १८५७ नंतर वाईट झाली. ग़ालिबची आर्थिक स्थिती आधीच सामान्य होती, ती आणखीच खालावली. दोन वर्षांनी कधीतरी त्याला रामपूरच्या नवाबानं, यूसुफ़ अली ख़ाननं दरमहा शंभर रुपयांचं तहहयात पेन्शन मंजूर केलं. त्याचा वारसदार असलेल्या नवाब कल्बे ख़ाननंही हे पेन्शन चालू ठेवलं होतं. नवाब अलीच्या निधनानंतर लेफ्टनंट गव्हर्नरला भेटायला म्हणून निघाला आणि जाताना ग़ालिबला म्हणाला, ‘ख़ुदा के सपुर्द।’ त्यावर ग़ालिबनं हसून म्हटलं, ‘हज़रत! ख़ुदा ने मुझे आपके सपुर्द किया है। आप फिर उल्टा मुझको ख़ुदा के सपुर्द कर रहे हैं।’ 

ग़ालिबचा आवडता हरगोपाल तफ़्ता याचा दोस्त उमराव सिंह जौहर याची दुसरी पत्नी वारल्याचं तफ्तानं ग़ालिबला पत्रात लिहून कळवलं. या पत्राचं उत्तर देताना ग़ालिबनं तफ्ताला लिहिलं, ‘उमराव सिंह के हाल पर उसके वास्ते मुझको रहम और अपने वास्ते रश्क आता है। अल्लाह! अल्लाह! एक वो हैं कि दोबार उनकी बेड़ियाँ कट चुकी हैं और एक हम हैं कि पच्चास बरस से ऊपर फाँसी का फंदा गले में पड़ा है, न फंदा ही टूटता है न दम ही निकलता है।’ 

राजमहालात एखादी खास पाककृती केली असेल, तर ती दरबारातल्या मानकऱ्यांना पाठवली जाई. यात अर्थातच ग़ालिबचाही समावेश होताच. या पदार्थाची स्तुती करणारं काव्य लिहून ग़ालिब बादशाहचे आभार मानत असे. एकदा बेसनपासून बनवलेला पदार्थ त्याला पाठवण्यात आल तेव्हा ग़ालिबनं या पुढील ओळी रचून पाठवल्या होत्या - 
न पूछ इसकी हक़ीक़त, हुज़ूर-ए-वाला ने 
मुझे जो भेजी है बेसन की रोग़नी रोटी 
ना खाते गेहूँ निकलते ना ख़ुल्द से बाहर 
जो खाते हज़रत-ए-आदम ये बेसनी रोटी 
अर्थ असा - ‘हुजुरांनी पाठवलेल्या या बेसनच्या तुपानं माखलेल्या रोटीची अस्सल चव कशी, ते मला विचारू नकोस. आदमनं जर ही बेसनाची रोटी खाल्ली असती, तर त्यानं गहू खाल्ला नसता आणि स्वर्गातून त्याला बाहेर पडावं लागलं नसतं.’ (ॲडमनं निषिद्ध झाडाचं फळ, म्हणजे सफरचंद खाल्लं आणि ईश्वरानं त्याला स्वर्गातून हाकलून दिलं अशी कथा आहे. तसाच त्यानं गहू खाल्ल्यामुळं हे घडल्याचा संदर्भही काही ठिकाणी आहे.) 

स्वतःच्या दारिद्र्याचं आणि खंक अवस्थेचं वर्णन करताना ग़ालिब तिरकस विनोदाचा वापर अधिकच करत असे. एका शेरमध्ये त्यानं असाच औपरोधिक सूर लावला आहे. त्यात तो म्हणतो, की माझ्या आक्रंदनामुळं माझं घर खराब होऊ लागलं आहे. दरवाजा आणि भिंती यावरून उजाडपण टपकू लागलं आहे. यातलं ‘रुदनामुळं उजाडपणाचं टपकणं’ यातला विरोधाभास अप्रतिम असा आहे - 
गिरया चाहे है ख़राबी मेरे काशाने की 
दर-ओ-दीवार से टपके है बयाबाँ होना 
तर कधी स्वतःच्या निरीश्वरवादी भूमिकेकडं निर्देश करून म्हणतो, की प्रार्थना आणि नियंत्रण यामुळं मला लाभ होईल, हे मला माहीत आहे. पण माझा स्वभाव त्या बाजूला यायला तयार नाही - 
जानता हूँ सवाब-ए-ताअत-ओ-ज़ुहद 
पर तबीयत उधर नहीं आती 
आपला लाडका शिष्य तफ़्ता याच्या एका काव्यसंग्रहाला ग़ालिबनं प्रस्तावना लिहिली होती. त्याचा दुसरा संग्रहही आला, तेव्हाही ग़ालिबनं प्रस्तावना लिहावी, अशी विनंती तफ़्ताच्या वतीनं मुन्शी नबी बख़्श हकीरनं केली. ग़ालिबनं लिहायला टाळाटाळ करून नकार दिला. तरी हकीर त्याच्या मागं लागला, तेव्हा ग़ालिबनं त्याला कळवलं, ‘शपथपूर्वक सांगतो की तफ़्ता मला मुलासारखा आहे आणि मला अभिमान वाटतो की, ईश्वरानं मला त्याच्या रूपानं असा गुणी पुत्र दिला. प्रस्तावनेबद्दल मला तुला सांगायचं आहे की, तुला माझी अवस्था माहीत नाही. मी अगदी मरायला टेकलो आहे. विश्वास ठेव, तो आणि तू माझी विनंती मान्य कराल आणि मला माफ कराल, तर बरं. ईश्वरानं तर माझी उपवास आणि प्रार्थना यातून सुटका माफ केलेलीच आहे. तू आणि तफ़्ता या एका प्रस्तावनेतून माझी सुटका करणार नाही का?’ 

ग़ालिबच्या काव्यात विनोद, उपरोध आणि खमंगपणा असा अनेकदा हातात हात घालून येताना दिसतो. त्याच्या रचनांची ख़ुमारी यामुळं अधिकच वाढते. त्याच्या उर्दू पत्रांमधूनही हा मामला सर्रास आढळतो, हे आपण पाहिलंच आहे. ग़ालिब आधी फ़ारसी भाषेतूनही पत्रं लिहीत असे. त्याही पत्रांमध्ये त्याच्या तिरकस, गमतीशीर स्वभावाचे अनेक नमुने विखुरलेले आहेत...

संबंधित बातम्या