अंतहीन आणि अर्थहीन प्रतीक्षा 

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

ग़ालिबच्या या संपूर्ण लेखनातून तत्कालीन दिल्ली शहराचं आणि तिथल्या विस्कळित जगण्याचं चित्र बघायला मिळतं. आपण हे प्रत्यक्ष निरीक्षण व अनुभवातून लिहीत आहोत; किंवा विश्वासार्ह व्यक्तीकडून ऐकलेलं नोंदवत आहोत, यात कोणतीही अफवा येणार नाही याची काळजी घेत आहोत, असं लिहून एक विश्वास देण्याचाही ग़ालिबचा प्रयत्न दिसतो. दिल्लीवर ताबा मिळवून बादशाह आणि त्याचे पुत्र यांचं नशीबच एकप्रकारे नव्यानं लिहिलं गेलं होतं. आपण यापासूनच सुरुवात करायला हवी होती, असंही ग़ालिब लिहिण्याच्या ओघात एके ठिकाणी लिहितो आणि या स्थानबद्धतेनंतर जेव्हा सारं काही खुलं होईल, तेव्हा त्याबद्दलची माहिती मिळवून, तेही लिहीन असं म्हणतो. बादशाह व त्याच्या मुलांचं काय झालं, ते अद्याप मला माहीत नाही, मी त्यांच्याबद्दल काहीच ऐकलेलंही नाही; तर मी काय लिहिणार, हा त्याचा सवाल आहे. नऊ ऑक्टोबरला ग़ालिबला भावाच्या दुर्दैवी मृत्यूची वार्ता समजली, त्याबद्दल लिहिताना, ‘सोमवार, नऊ ऑक्टोबरचा दिवस दिनदर्शिकेतून खोडूनच काढला पाहिजे,’ अशी अतिशय दुःखार्त भावना तो व्यक्त करतो. भावाच्या शवाला मूठमाती देण्यासाठी घराबाहेर कसं पडायचं? कुठल्या कबरस्तानात त्याला घेऊन जायचं? त्याच्या कफनासाठी कपडा कुठून आणायचा? असे अनेक प्रश्न त्याला भेडसावत होते. शहरात मजूर आणि थडगी खणणारे जणू नाहीतच, असं वाटायला लावणारं वातावरण होतं. या विषयी हताशपणे ग़ालिब म्हणतो, ‘हिंदू लोक आपल्या माणसाचं मृत शरीर नदीवर घेऊन जाऊन ते जाळू शकतात, पण मुसलमानांमध्ये बाहेर पडण्याचं धाडसच नाही. दोघा-तिघांच्या गटानं बाहेर पडले, तरी शहरातून प्रेतं वाहून आणणं कसं शक्य होणार?’ 

अखेरीस ग़ालिबला शेजाऱ्यांनी मदत केली. दोन नोकरांसह ते ग़ालिबला घेऊन गेले आणि आंघोळ घालून त्याच्या भावाचं शरीर ग़ालिबनं दिलेल्या सफेद चादरीत गुंडाळून घराशेजारच्या मशिदीपाशी ते पुरलं. आपल्या भावाला साठ वर्षांच्या आयुष्यात तीसेक वर्षं काय तो आनंद मिळाला, पण त्याची तीस वर्षं फार वाईट व दुःखमय गेली, असं ग़ालिब लिहितो. त्याशिवाय, वेगवेगळ्या जहागीरदार, नवाब व राजांच्या करुण अंताविषयी, त्यांना सैनिकांकडून मिळालेल्या वागणुकीविषयी लिहिताना माझी लेखणी अर्धमेल्या मुंगीच्या वेगानं चालतेय, असं तो म्हणतो. मुग़ल राजकुमारांपैकी काहींना गोळ्या घालण्यात आल्या आणि काहींना फासावर लटकावण्यात आल्याचा तपशील तो देतो. तर, जे दुर्दैवी होते त्यांना अटक करण्यात येऊन तुरुंगात टाकण्यात आलं, अशी टिप्पणीही तो त्यात करतो...

 दिल्ली शहर असं भीतीच्या वातावरणात आणि कडेकोट बंदोबस्तात असताना नंतर जानेवारी १८५८ मध्ये हिंदूंना स्वातंत्र्य मिळाल्याचं घोषित केलं गेलं आणि ते शहरात येऊन राहू लागले. बाहेर पळालेलेही परतले. पण मुसलमानांवर बंधनं होती, त्यामुळं बाहेर गेलेले येऊ शकत नव्हते. त्यांची घरं ओसाड पडली होती आणि त्यांच्या भिंतीवर शेवाळ व गवत वाढू लागलं होतं. ‘या गवताचं प्रत्येक पातं सांगतंय, की मुसलमानाचं हे घर अजूनही रिकामंच आहे,’ हे या अवस्थेचं ग़ालिबनं केलेलं वर्णन काळजात कळ उमटवणारं आहे...

सामान्य आणि राज्यकर्त्या मुसलमानांचा बंडात जास्त सहभाग असल्यामुळं, दिल्लीत मुसलमानांचे हाल जास्त झाले होते आणि बरेचजण शहर सोडून गेले होते. ग़ालिब या संदर्भात लिहितो, ‘संपूर्ण दिल्ली शहरात, एक हजाराहून जास्त मुसलमान सापडणं मुश्किल आहे; आणि मी अशांपैकी एक आहे. काहीजण तर शहरापासून इतके दूर गेले आहेत, की वाटतं, ते कधी दिल्लीचे रहिवासी नव्हतेच जणू. अनेक महत्त्वाची माणसं शहराबाहेर दोन-चार कोस अंतरावर खंदकात किंवा मातीच्या झोपड्यांमध्ये राहत आहेत, जणू त्यांची नशिबं डोळे झाकून झोपी गेलीत.’ अशी सारी स्थिती दिल्लीत होती. बाहेर गेलेल्यांना परत यायचं होतं. त्यापैकी अनेकजण कैदेत असलेल्यांचे नातेवाईक होते, तर काहीजण ‘भिकेवर’, म्हणजे पेन्शनवर जगणारे होते, हे ग़ालिबचं लिहिणं विषण्ण करणारं आहे. तुरुंगातून सोडावं यासाठी दोन ते तीन हजारांवर अर्ज कोर्टाकडे आले होते, अशीही माहिती मिळते. ग़ालिबच्या अर्जविनंत्याही दरबारी पडून होत्या. त्याला आपल्या पेन्शन प्रकरणाचा निकाल हवा होता. पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालाच नाही. मार्च महिन्यात येणारा पारसी नववर्षदिन ग़ालिबसाठी आनंद घेऊन आलाच नाही...

अशाही वातावरणात जनतेला त्रासापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे लोक प्रशासनात होतेच. त्यातलं एक नाव महेश दास. ग़ालिब त्याच्याबद्दल प्रशंसापर लिहितो. त्याच्यासारखे लोक प्रशासनात होते, म्हणूनच लोकांचा त्रास काही अंशांनी तरी कमी झाला, असं म्हणतो. शिवाय ग़ालिबला हा मनुष्य उच्च दर्जाची मदिरा पाठवी, त्यामुळं ग़ालिबला थोडं सुख लाभल्याचं समाधानही मिळालं... महेश दासनं मुसलमानांना शहराबाहेरून दिल्लीत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यात त्याला यश आलं नाही. ग़ालिबचा महेश दासशी फार निकटचा परिचय नव्हता, पण तरीही ग़ालिबचं महत्त्व महेश दास ओळखून होता आणि त्याला जमेल तशी मदत तो पुरवत होता. ग़ालिबला महेश दासप्रमाणंच आपल्या काही शिष्यांचंही साह्य लाभत होतं. त्यांच्याबद्दलही तो विशेष उल्लेखांसह लिहितो. यात बरेच हिंदू होते. यापैकीच एक होता हीरा सिंग. तो ग़ालिबला अधून मधून येऊन भेटे आणि त्याची व्यथा कमी करण्यास यामुळं मदतच होई. दुसरा शिवाजी राम ब्राह्मण, जो ग़ालिबला दैनंदिन गोष्टींबाबत मदत करेच, पण त्याला हवं नको ते सर्व पाही. त्याचा मुलगा बाल मुकुंद याचीही ग़ालिब खूप स्तुती व कौतुक करताना दिसतो. हर गोपाल ‘तफ़्ता’ तर ग़ालिबचा मित्रच. पण तो दिल्लीपासून लांबच्या अंतरावर राहत होता. त्याच्याविषयी ग़ालिब अतिशय आत्मीयतेनं लिहितो आणि तो आपल्या अंतरात्म्याचाच कसा हिस्सा आहे, अशी भावनाही व्यक्त करतो. ‘तफ़्तानं मला हुंडी पाठवली आहे आणि तो मेरठहून नेहमी पत्रं व ग़ज़ल धाडत असतो. या गोष्टी काही लिहायलाच हव्यात अशा नाहीत. पण या मंडळीनी दाखवलेल्या औदार्याबद्दल आणि प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मी हे नोंदवतो आहे,’ असंही ग़ालिब म्हणतो. त्यांना दिल्ली शहराची खबर मिळावी आणि स्वतःबद्दलही कळावं, असाही हेतू यामागे आहे, असंही तो म्हणतो- ‘शिवाय माझ्या या नोंदी जेव्हा त्यांच्यापर्यंत जातील, तेव्हा त्यांना कळावं, की हे शहर मुसलमानांनी रिकामंच केलं आहे -त्यांच्या घरात रात्री दिवा लागत नाही आणि दिवसा त्यांच्या चिमण्यांमधून धूर येत नाही आणि ग़ालिब, ज्याचे या शहरात हजारो मित्र आहेत आणि प्रत्येक घरात परिचित आहेत, त्याच्याशी बोलायला आता कुणीच नाही, त्याची लेखणी सोडून आणि एकही सोबती नाही, त्याची सावली सोडून.’ यानंतर त्यानं एक फ़ारसी शेर लिहिला आहे, त्याचा आशय असा- ‘माझा चेहरा रक्ताच्या अश्रूंनी हजारवेळा धुतल्याविना माझ्या गालांवर जराही चमक येत नाही. माझ्या शरीरात दुःख आणि वेदना हे माझं हृदय अन् आत्मा बनले आहेत आणि माझी शय्या काट्यांनी विणली आहे.’ वाट्याला आलेल्या दुःखाचं आणि एकाकीपणाचं ग़ालिबनं केलेलं हे वर्णन निःशब्द करून जाणारं आहे...

साऱ्या लुटालुटीत माझं घर तेवढं वाचलं, असं लिहून ग़ालिब म्हणतो, की तरीही या घरात बिछाना आणि माझे कपडे याशिवाय काहीच उरलेलं नाही. ग़ालिबच्या पत्नीनं गडबड सुरू झाल्यावर सुरुवातीच्याच काळात होते नव्हते ते स्वतःकडील दागिने आणि मूल्यवान चीजवस्तू काले साहेब या संतपुरुषाच्या घरी नेऊन ठेवल्या होत्या. ते घर सुरक्षित होतं आणि बाहेरूनही ते मातीच्या लेपानं पक्कं बंद करण्यात आलं होतं. ही गुप्त माहिती पत्नीनं मला ब्रिटिशांनी शहर ताब्यात घेतल्यानंतर दिली, असं ग़ालिबनं लिहिलं आहे. पण तोवर आपल्या वस्तू सुरक्षित आहेत का, हे बघण्यासाठी उशीर झाला होता. हा ऐवज आपल्या घरातून गेला नाही, यावरच ग़ालिब समाधान मानताना दिसतो. जगण्यासाठी स्वतःकडील कपडे विकून त्याला गुजराण करावी लागत होती. ‘लोक रोटी खातात, तसे मी कपडे खातो. माझ्याकडचे सगळे कपडे संपतील, तेव्हा मी विवस्त्र, उपाशी पोटी मरणार आहे,’ असं खेदानं तो लिहून जातो.

या कफल्लक अवस्थेतही ग़ालिबला त्याचे दोन जुने सेवक सोडून गेले नव्हते. त्यांना पोसणं भाग होतं. शिवाय काही लोक नेहमीच त्याच्याकडे मदतीसाठी आशेनं बघत. त्यांची सहाय्यासाठीची हाक ऐकताना त्याचं मन त्याला खात असे. अशा प्रकारे प्रत्यक्षातल्या दुःखानं पछाडल्यावर देह आणि मन दोन्ही मोडून पडले असताना, ग़ालिबला वाटे की, यापुढं शब्दांशी आपण असे किती दिवस खेळू शकणार आहोत? अखेरीस या सगळ्याचा शेवट हा मृत्यूत किंवा भिकेला लागण्यात होणार आहे, असे त्याच्या मनात येई. आपलं हे मनोगत नोंदवून तो लिहितो, ‘पहिली गोष्ट घडली, तर माझी कहाणी अपूर्ण राहण्यास पर्याय उरणार नाही आणि माझे वाचक नाराज होतील. दुसऱ्या गोष्टीबाबत, या कहाणीचा शेवटच नसेल, फक्त ग़ालिबला या गल्लीतून बाहेर काढलं जाईल आणि त्या तिकडच्या दरवाजात त्याला रोटीचे तुकडे घातले जातील. मग अशी गोष्ट कशी सांगायची आणि किती काळ त्याला लज्जित करत राहायचं! जरी आता मला पेन्शनची बाकी मिळाली, तरी कर्जामुळं मला झालेल्या दुःखाची छाया काही माझ्या हृदयावरून पुसली जाणार नाही. मात्र, जर मला पेन्शनची बाकी मिळालीच नाही, तर एखाद्या दगडाने आरसा चूर चूर व्हावा, तद्वत् माझं हृदय विदीर्ण होईल. सर्वनाश हा अटळ आहेच. जोडीला दिल्ली या दुखण्यासाठी हितकर नसल्यानं एकतर मला हे शहर सोडावं लागेल आणि दुसरीकडे जाऊन राहावं लागेल’. 

ग़ालिबनं हा वृत्तांत मे १८५७ ते जुलै १८५८ या दरम्यानचाच लिहिला आहे. एक ऑगस्टला आपण लेखणी खाली ठेवत आहोत, असं तो लिहितो. हे पुस्तक त्याला छापून आणण्याची निकड होती, याचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. त्यानंतर आपण पेन्शनच्या निकालाची प्रतीक्षा करत राहणार आहोत, असं तो लिहितो. पुढील साधारण दोन पानांचा भाग त्यानं इंग्लंडच्या राणीची भरपूर प्रशंसा करण्यावर खर्ची घातला आहे. 

‘दस्तंबू’ला एक ऐतिहासिक स्थान निश्चितच आहे. पण त्यामधून समोर 

येणारं ग़ालिबचं रूप आणि त्यातून उलगडणारं त्याचं अंतरंग याला एक निराळं महत्त्व आहे. त्यातले बारकावे आणि इतर तपशील तत्कालीन जीवनाविषयी थेट बोलणारे आहेत. दिल्ली शहर आणि त्याच्या मानसिक घडणीबद्दलही ते बरंच काही सांगतं... या लेखनानंतर ग़ालिब जवळपास अकरा वर्षं जगला. त्याचा पेन्शनचा प्रश्न त्याच्या मनासारखा तडीला गेला नाही. त्याची प्रतीक्षा अंतहीनच ठरली. अर्थहीनही. काही अंशी त्याला अर्थसाह्य मिळालं. पण बदलत्या काळात ते पुरेसं नव्हतंच. ‘दस्तंबू’ मधून जाणवणारी, ग़ालिबला झालेली स्वतःच्या उतरत्या काळाची, त्रासदायक ठरत जाणाऱ्या अटळ वृद्धत्वाची आणि डोकावू लागलेल्या मृत्यूच्या छायेची चाहूल पीडा देणारी आहे. पण ग़ालिब समजून घेताना मनाला होणारा त्रास आणि येणारी अस्वस्थतता ही अटळच असणार. 

संबंधित बातम्या