कुछ हमारी ख़बर नहीं आती...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 7 डिसेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

मीरनं ग़ालिबच्या कवित्वाबद्दल सूचक आणि आश्वासक, पण इशारावजा मत व्यक्त केलं आणि नंतरच्या काळात ग़ालिबनं मीरचा आदरपूर्वक उल्लेख अनेकदा केल्याचं दिसून येतं. या दोघांची, त्यांच्या कवितेची तुलनाही बरेचदा केली जाते. काव्याच्या संदर्भात बघितलं, तर मीरशी एक नातं जोडूनच गालिबची कविता स्वतःच्या वाटेवर रूळलेली दिसते. तसंच त्यांच्या जीवनात साम्यस्थळंही बरीच आहेत. अन् याची सुरुवात त्यांच्या जन्मस्थळापासूनच होते. दोघांचा जन्म अकबराबाद म्हणजे आग्रा इथं झाला. दोघांचंही ख़ानदान नामवंत होतं. ग़ालिबचं घराणं सैनिकी पेशाशी संबंधित होतं. घरातले सगळेच, म्हणजे आजोबा, वडील आणि काका याच पेशातले. तर मीरचे वडील आग्र्याला मनसबदार होते. ते सत्प्रवृत्त, संतवृत्तीचे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे बरेच अनुयायी होते. वडिलांच्या निधनानंतर, वयाच्या अकराव्या वर्षीच मीर आग्रा सोडून, शिक्षण घेण्यासाठी आणि आश्रयदाता शोधण्यासाठी दिल्लीला गेला. ग़ालिबलाही पितृछत्र फार दिवस लाभलं नाही. वडिलांच्या मागे त्याचे पालनकर्ते असलेले काकाही लवकर मरण पावले. तोही वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षीच दिल्लीला गेला. पण मीरनं दिल्लीही लवकरच सोडली आणि तो तिथून लखनौला गेला. तिथंच तो स्थायिकही झाला. ग़ालिबलाही दिल्लीनं तसं निराशच केलं. पण मनात असूनही दिल्ली सोडून जाणं मात्र त्याला शक्य झालं नाही. दिल्लीचा कोपरा न कोपरा त्याला माहीत होता. तिथल्या गल्लीबोळांमधून तो हिंडत असे आणि तिथल्या रहिवाशांना ग़ालिब परिचयाचा झाला होता...

मीरला वडिलांनी अखेरच्या दिवसांत आपल्या या मुलाला असा उपदेश केला होता, ‘बेटा, अिश्क़ अख़्तियार करो. बेअिश्क़ की ज़िन्दगानी वबाल और अिश्क़ में खोना असल कमाल है। हालांकि इस राह में बहुत उतार-चढाव है, लेकिन दुनिया मे जो कुछ भी होता है वह अिश्क़ का ही परिणाम है।’ वडिलांच्या या उपदेशाची झलक मीरच्या काव्यात ठायी ठायी दिसून येते. मीरचे वडील बऱ्याचदा उन्मनी अवस्थेत जात. त्यांच्याबद्दलच्या मीरच्या लिखाणातूनच हे जाणवतं. स्वतः मीरही तरल, उत्कट व नाजूक मनोवृत्तीचा होता. त्याला काही काळ वेडानंही पछाडलं होतं. स्वतःच्या या उन्मादी अवस्थेबाबतही मीरनं लिहिलं आहे. आपली मानसिक अवस्था कशी होती, कसले कसले आभास आपल्याला होत असत, याचं वर्णन त्याने केलं आहे. ग़ालिबविषयी या तऱ्हेचं घडलं नाही. पण तोही कातर अशा मनोवस्थेतून बरेचदा गेला असावा, असं त्याच्या काव्यातून आणि ‘दस्तंबो’सारख्या आठवणीपर लिखाणातून तसंच आपल्या  

मित्रांना व शिष्यांना लिहिलेल्या पत्रांमधूनही जाणवतं. 

दोघांच्या वयातलं बरंच अंतर होतं. काही पिढ्यांचंच म्हणायला हवं. मीरचा जन्म १७२३चा, तर ग़ालिबचा १७९७ सालातला. मीरनं दिल्लीतला अस्थिर सत्तांचा काळ पाहिला. तर ग़ालिबनं दुबळी होत गेलेली बादशाहीची वाटचाल अनुभवली. या देशाबाहेरून आलेले गोरे शिरजोर होताना तो पाहत होता आणि मोठा वारसा असलेल्या मुग़ल सत्तेचं पतनही बघणं त्याच्या वाट्याला आलं. या सगळ्या गोष्टींचा पुन्हा त्याच्या स्वतःच्या जगण्यावर, अस्तित्वावर परिणाम होत होता; म्हणून हे संक्रमण आणि समाजात होणारे बदल त्याच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचे होते. मीरनं उर्दू भाषेला वेगळीच नज़ाकत दिली आणि लोकांची बोली कवितेत किती साजरी दिसते, याचा प्रत्ययच रसिकांना जाणवून दिला. त्याची शैली आजही जुनाट वाटत नाही. ग़ालिबच्या बाबतीतही हे घडलं, पण जरा नंतरच्या टप्प्यावर. आधी त्याला असलेला फ़ारसीचा अभिमान व ओढ त्याच्या कवितेत उमटत असे. मीर आणि ग़ालिब दोघेही फ़ारसीतही रचना करणारे, हेही आणखीन एक साम्य त्यांच्यात होतंच. ग़ालिबप्रमाणं मीरचाही एक दीवान फ़ारसी भाषेत प्रकाशित झाला होता. 

मीर मनानं अभिमानी आणि अहंकारीही होता. तो स्वतःच्या मस्तीत जगला. गरिबीचे चटके त्याने सोसले, अगदी भुकेचेही. ग़ालिब आणि मीर दोघांच्याही विषयी अनेक किस्से प्रसिद्ध आहेत आणि त्यामधून त्यांच्या मनस्वी, ताठ स्वभावाची झलक दिसते. तसंच, स्वतःच्या काव्याचा सार्थ अभिमान दोघांनाही होता आणि आपल्या अंगच्या गुणांची व प्रतिभेची कदर न झाल्याची खंतही...या दोघांच्या मनातली खळबळ आणि तिचा आविष्कार यांचा पोत मात्र निराळा होता. मीर अधिक संवेदनशील, हळुवार स्वभावाचा वाटतो. तर ग़ालिबच्या संवेदनशीलतेची पातळी बौद्धिकतेकडं जास्त झुकलेली दिसते. तत्त्वचिंतनाचा एक वेगळाच आविष्कार त्याच्या काव्यात झालेला आढळतो. पण मीरच्या काव्याची ताकद आणि बलस्थानं तो ओळखून होता. म्हणूनच मीरचं मोठेपण त्याला सहजमान्य होतं. मीरचं मानसिक शिष्यत्व त्यानं स्वतःहून पत्करलं होतं. मीरच्या लेखणीचा अंदाज आत्मसात करणं हे कठीण आहे, हेही त्याला स्वीकारार्ह होतं.

आपल्या वडिलांप्रमाणं मीरही उन्मनी अवस्थेचा अनुभव घेत असे, हे त्यानं स्वतःच आपल्या ‘ज़िक़्र-ए-मीर’ या फ़ारसी भाषेतील आठवणीपर पुस्तकात लिहिलं आहे. ग़ालिब या तऱ्हेनं जाणीवांच्या हिंदोळ्यांवर कधी गेला नाही. पण त्याच्या आयुष्यातील अनेक अनुभव आणि अडचणींमुळं त्याची दोलायमान विमनस्कता त्याला खूपदा मानसिक अस्थिरतेचा अनुभव नक्कीच देत असावी...स्वतःच्या मनातील सारी खळबळ आणि भावनांचे कंगोरे शब्दबद्ध करण्याची किमया मात्र ग़ालिबला हासिल झाली होती आणि यामुळंच तो विपरीत परिस्थितीतही चिवटपणं जगू शकला. भौतिक आणि व्यावहारिक गोष्टींचा प्रतिकूल परिणाम स्वतःच्या काव्यावर त्यानं कधी होऊ दिला नाही. उलट या अनुभवांच्या धाग्यांचा वापर त्यानं आपल्या कवितेला ताकद आणि वेगळा सूर देण्यासाठी केला. 

मीर आणि ग़ालिब यांच्या कवितेत उमटणारे विचार आणि संवेदना बरेचदा थोड्याफार मिळत्याजुळत्या असल्याचं दिसून येतं. जीवनाकडं बघताना आणि त्याचा अनुभव घेताना मनात आलेलं काहीबाही मांडताना मीर लिहून गेला,

‘होता है जहाँ में हर रोज़-ओ-शब तमाशा

देखो जो ख़ूब तो है दुनिया अजब तमाशा’

तर याच धर्तीवर लिहिताना ग़ालिब म्हणून गेला,

‘बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे

होता है शब-ओ-रोज़ तमाशा मेरे आगे’

स्वतःचं एकाकीपण आणि विचारांत हरवून जाणं दोघांनाही पेचात पाडणारं होतं. स्वतःची ही अवस्था बेख़ुदी टिपताना मीर लिहितो,

‘बेख़ुदी ले गयी कहाँ हमको

देर से इन्तज़ार है अपना’

तर ग़ालिब आपल्या अशाच अवस्थेविषयी म्हणाला होता, 

‘हम वहाँ हैं जहाँ से हमें भी

कुछ हमारी ख़बर नहीं आती’

प्रेम हा तर साऱ्याच कवींचा जिव्हाळ्याचा विषय. ईश्वराची भक्ती हाही प्रेमाचाच एक आविष्कार. त्यात उर्दू काव्यात प्रेमाची अनेक रूपं सापडतात. मीरनं प्रेमाचा कठीण मार्ग, दुःख आणि प्रेमामुळं अखेरीस डोळ्यांतून येणारे अश्रू हाच अिश्क़ाचा परिपाक मानला. प्रेमाच्या आरंभीच दुःख व्यक्त करणाऱ्याला मीर म्हणतो,

‘इब्तिदा-ए-अिश्क़ है रोता है क्या

आगे आगे देखिये होता है क्या’

मीरचा हा छोटासा शेर खूप लोकप्रिय आहे आणि अगदी एखादा वाक्प्रचार असावा, त्याप्रमाणं  सर्वसामान्य माणसालाही तो माहीत असतो. प्रेमाचं नेमकं आणि मार्मिक वर्णन मीरनं यात केलं आहे. प्रेमाची सुरुवात अशी आहे, तर त्याचा शेवट कसा असेल, याबद्दल मीरनं लिहिलंय की, प्रेमाची मंज़िल काय याविषयी बोलायलाच नको. कारण सुरुवातीलाच लोक थकून जातात. मग शेवटाची गोष्ट काय करू? 

‘इब्तिदा ही में मर गये सब यार

कौन अिश्क़ की इन्तिहा लाया’

ग़ालिबच्या काव्यातल्या प्रेमाच्या विविध छटा आपण पाहिल्याच आहेत. प्रेम हे जसं दुःखकर आहे, तसंच त्यामुळं जगण्याला एक रंगत येते, असं ग़ालिब म्हणतो. प्रेमामुळं दुःख वाट्याला येतं खरं, पण या दुःखावरचं औषधही प्रेमच आहे, असं तो एका शेरमध्ये लिहितो,

‘अिश्क़ से तबीअत ने ज़ीस्त का मज़ा पाया

दर्द की दवा पायी दर्द बेदवा पाया’

प्रेम कधी कधी विनाशकही ठरतं आणि ज्याच्याविषयी प्रेम वाटतं, त्यालाच प्रेम संपवूनही टाकतं असं मीर एके ठिकाणी म्हणतो,

‘मार रहता है उसको आख़िरकार

अिश्क़ को जिससे प्यार होता है’ 

मीर प्रेमातील धोक्याकडं निर्देश करतो. लोकांना सावध करू पाहतो. तर ग़ालिबनं प्रेमाची ताकद वेगळ्या प्रकारे मांडली आहे. प्रेमापासून बचाव करण्याचा हा विचार बहुधा त्याला मान्य नसावा. तो म्हणतो की प्रेम करणं वा न करणं ही मनुष्याच्या अधीन अशी गोष्टच नाही. माणसाच्या कह्याबाहेरची ही बाब आहे, प्रेम त्याला वश होऊ शकत नाही.

‘अिश्क़ पर ज़ोर नहीं, है ये वो आतश ‘ग़ालिब’

कि लगाये न लगे और बुझाये न बने’ 

प्रेमात सारं काही गमावून बसण्याची तयारी ठेवावी लागते. तशी नाही ठेवली तरी सर्वस्व गमावावं लागतंच. सकाळी की संध्याकाळी, एवढाच सवाल उरतो. याप्रकारचा सूर लावताना मीर लिहितो,

‘अिश्क़ बुरे ख़्याल पड़ा है, चैन गया, आराम गया

जी का जाना ठैर गया है, सुबह गया या शाम गया’

प्रेमाचं विनाशक रूप मीर समोर ठेवतो, तर ग़ालिब प्रेमाविषयी म्हणतो की, प्रेम हा एक मानसिक भ्रमच आहे. मनाचा आजारच आहे...‘बुलबुलांचे प्रेमालाप पाहून फुलं हसून थट्टा करत म्हणाली की ज्याला प्रेम म्हणतात तो तर मस्तिष्काचा आजारच आहे...’ 

‘बुलबुल के कारोबार पै, हैं ख़न्दहा-ए-गुल

कहते हैं कि जिसको अिश्क़ ख़लल है दिमाग़ का’

प्रेम हा आजार आहे आणि म्हणूनच प्रेमानं ज्यांना कवटाळलं, त्यांना लवकर मरण येतं. त्यांच्या अंताविषयी मीर सांगतो आणि म्हणतो की, माझ्या सोबतचे बहुतेक प्रेमी मरून गेले...

‘जिन जिन को था ये अिश्क़ का आज़ार मर गये

अक्सर हमारे साथ के बीमार मर गये’

पण ग़ालिब मात्र प्रेम आणि मरण याबद्दल वेगळ्या प्रकारे लिहितो. प्रेमात जगणं आणि मरणं दोन्ही सारखंच, असा त्याचा अभिप्राय होता. याविषयीचा त्याचा हा शेर प्रसिद्धच आहे...

‘मुहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का

उसीको देखकर जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले’

मीर आणि ग़ालिब यांच्या काव्यातील अशा लोभस वाटा आणखीही अनेक आहेत. त्यांच्या विचारांमधलं साम्य आणि विभिन्नत्व, दोन्ही एक निराळाच आनंद ओंजळीत टाकतात. वेगवेगळ्या भाववृत्ती, जीवनाविषयीची भूमिका आणि अनुभवातून मिळालेलं विचारांचं संचित या संदर्भात या दोघांना पडताळून पाहणं म्हणूनच खूर रोचक ठरतं...

संबंधित बातम्या