दिल ही तो है...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 14 डिसेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

शोधायचंच झालं, तर मीर आणि ग़ालिब यांच्या काव्यात साम्यस्थळं अनेक सापडतील. मीरची ताकद खरीच अनोखी. त्याचं स्वतःचं काव्यशैलीतलं नावीन्य आणि शब्दांच्या माध्यमातून चित्र उभं करण्याचं कौशल्य नक्कीच खास होतं. इतरांपेक्षा वेगळी वाट त्यानं पकडली होती. मात्र मीरच्या एकूण वैचारिक बैठकीत परंपरेशी जोडलं गेल्याचं सूत्र होतं. परंपरेला नव्या रंगात पेश करण्याची किमया मीरनं साधली. तर ग़ालिबची विचार करण्याची दिशा आणि क्षमताच नावीन्यपूर्ण होती. जुन्या संकल्पना, मान्यता आणि परंपरांना नवं वैचारिक रूप देण्याची हातोटी त्याच्याकडे होती. त्यानं आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि प्रतिभेच्या बळावर एक नवी वैचारिक दुनियाच उभारली. 

उर्दू कवितेचा मुख्य विषय असलेल्या प्रेमाच्या जाणिवेकडंच नजर टाकू. प्रेमाची विविध रूपं दोघांच्याही काव्यात आहेत. प्रेमाचा विविधांगी आविष्कार त्यात प्रतिबिंबित झालेला दिसतो. मीर चित्रमय वर्णन करण्यात माहीर होता. प्रेमाविषयीची आपली उत्कट भावना त्यानं बरेचदा व्यक्त केली. त्याची रचना मुख्यतः अल्पाक्षरी होती. तिचं सौंदर्य त्यामुळं छोट्याशा गवतफुलाप्रमाणं खुलत असे. प्रेयसीच्या सुंदर केशकलापाबद्दल मीरनं लिहिलेला हा शेर असाच त्याच्या रचनेचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे-

हम हुए, तुम हुए कि ‘मीर’ हुए
उनकी ज़ुल्फ़ों के सब असीर हुए

म्हणजे, ‘आम्ही आणि तुम्ही अर्थात सर्वचजण. कोणीही का असेना, आपापल्या प्रेयसीच्या केशकलापाचे बंदी आहोत. कैदी आहोत.’ ग़ालिबची याला समांतर रचना प्रेयसीच्या केशसंभाराचं माहात्म्य वर्णन करते आणि ‘ज्याच्या बाहूंवर हा केशसंभार पसरला, त्याला लाभलेली निद्रा, अभिमान, रात्री सारंच वास्तविक, खरंखुरं मिळालं,’ असं सांगते.... 

नींद उसकी है दिमाग़ उसका है 
रातें उसकी हैं
तेरी ज़ुल्फ़ें जिसके बाज़ू पर 
परीशाँ हो गईं

प्रेयसीचा केशसंभार ज्याला सन्निध लाभला त्याला सर्वस्वच मिळालं, असं सांगून ग़ालिबनं एक वेगळं वळण देऊन, प्रेमाची ताकद अधोरेखित केली आहे. तसंच या तऱ्हेचं जीव शांतावणारं प्रेम त्याला स्वतःला मिळालं नव्हतं, हेही इथं अर्थातच आठवतं...
मीरचा गुलाब पाकळीसारख्या ओठांचं वर्णन करणारा शेर प्रसिद्धच आहे. ‘तिच्या ओठाच्या कोमलतेबद्दल काय सांगावं? तो तर गुलाबाच्या पाकळीसारखाच आहे...’ कोमल ओठांची गुलाबपाकळीशी तुलना इथं नाही, तर ओठ गुलाबाच्या पाकळीसारखा आहे, असं मीर म्हणतो. ओठ म्हणजे जणू गुलाबपाकळीच आहे, असं तो म्हणत नाही. तर तो गुलाबपाकळीसारखा आहे, असं वर्णन तो करतो. दोन्हींत फरक आहे...ओठाचा नाजूकपणा सांगणारा हा शेरच मुळात अतिशय कोमल आहे-

नाज़ुकी उसके लब की क्या कहिए
पंखुड़ी एक गुलाब की सी है

ग़ालिबनं एका रचनेमध्ये ओठाच्या कोमलतेवर एक तऱ्हेचं व्यंग्य करून वेगळाच परिणाम साधला आहे. मीरचा शेर जो परिणाम साधतो, तसाच हाही शेर. अर्थातच नेहमीप्रमाणं सरळ आपलं म्हणणं न मांडता, आडवळणं घेत तो ते व्यक्त करतो-

कितने शीरीं हैं तेरे लब कि रक़ीब
गालियाँ खा के भी बेमज़ा न हुआ

‘तुझे ओठ इतके मधुर आहेत, की त्यातून निघालेले अपशब्द ऐकल्यावरही (माझा) प्रतिस्पर्धी तुझ्या प्रति उदास-स्वारस्यहीन झाला नाही.’ इथं ग़ालिब ओठाची मधुरता अन् तिची परिणामकारकता सांगतो. इतक्या मधुर ओठांमधून बाहेर आलेले शिव्याशापही मग तसे उग्र ठरत नाहीत. कितीही फटकारलं, तरी आपला स्पर्धक काही ते मनावर घेत नाही, असं ग़ालिब म्हणतो. शिवाय या सुंदरीचे अपशब्द स्पर्धकासाठी आहेत, आपल्यासाठी नव्हे (निदान त्याला ते तसं वाटतंय) हेही त्यानं आडून सुचवलं आहेच... हा शेर खुमासदार असा आहे.  

विभिन्न हृदयांच्या गोष्टी अशा अनेकदा परस्परांशी नातं सांगणाऱ्या ठरतात. प्रेयसीच्या गल्लीत मला माझं हृदय घेऊन गेलं आणि मी मातीलाच मिळालो, असं मीर एका शेरमध्ये लिहितो-

दिल मुझे उस गली में ले जा कर
और भी ख़ाक में मिला लाया

ग़ालिबचा विचार आणखीच वेगळा. त्याला स्वत्व प्रिय. तर तो लिहून गेला, ‘ज्याला आपला धर्म आणि दिल प्रिय आहे, त्यानं तिच्या गल्लीत फिरकावंच काय म्हणून?’ मीरला तिच्या गल्लीत जाण्याचा परिणाम नेमका ठाऊक नाही. तर आपला धर्म, ईमान आणि दिल दोन्हींना तिकडं गेल्यावर मुकावं लागणार. म्हणून मग तिथं न जाणंच शहाणपणाचं... हे ग़ालिब ओळखून आहे.

प्रेयसीच्या गल्लीतून हाकललं गेल्यावर होणारी अवस्था या दोघांनी टिपली आहे, तिचा ख़ुमारही निराळाच. मीर म्हणतो, तिच्या गल्लीतून निघालो ते अशा प्रकारे, जसा कुणी एखादा या दुनियेतूनच निघून जातो...

यूँ उठे आह, उस गली से हम
जैसे कोई जहाँ से उठा है

ग़ालिबचा या धर्तीवरचा एक शेर सुप्रसिद्धच आहे. तो लिहितो, ‘आदमला स्वर्गातून ख़ुदाने हाकलून दिलं, असं ऐकलं होतं. आम्हीही तुझ्या गल्लीतून अपमानित होऊनच निघालो...’ 

निकलना ख़ुल्द से आदम का 
सुनते आए थे लेकिन
बहुत बेआबरू होकर तेरे कूचे 
से हम निकले

वर उल्लेखलेला मीरचा शेरही अगदी अर्थपूर्ण असा आहे. अपमानित होण्याची तीव्रता त्यातूनही जाणवते. पण ग़ालिबचा अंदाज आणखीच निराळा आहे. स्वतःचा अपमान अनुभवताना, थेट ईश्वराकडून आदम अपमानित झाल्याचा ऐकीव दाखलाच त्याला आठवला. त्यापेक्षा माझा प्रत्यक्षातला अनुभव अधिक तीव्र आहे, असं त्यानं यात सुचवलं आहे... 

मीलनातही चेहऱ्याचा रंग फिक्कट होतो, कारण लगेच मनात येतं, की वियोगाचा सामना आपण कसा करणार, असं मीर म्हणतो. तेही खास ढंगात. ‘वियोगाला माझं तोंड कसं दाखवू आता’, असं म्हणत...

वस्ल में रंग उड़ गया मेरा
क्या जुदाई को मुँह दिखाऊँगा

मीलनात वियोगाची आठवण येण्याची कल्पना अनेकांनी वापरली आहे. जीवन आणि मृत्यूप्रमाणंच ही मीलन-वियोगाची विरोधी जोडी कवींना अस्वस्थ करून जाणारी. ग़ालिबनंही मीलनामुळं चेहऱ्यावरचा रंग उडून जाण्याची कल्पना एका शेरमध्ये वापरली आहे. ‘मीलनात आनंद होतो, पण याप्रकारं कुणी मरत नाही की कोमेजत नाही. पण करणार काय, कारण वियोगाच्या रात्रीची इच्छाच मनात जागी झाली आणि म्हणूनच माझी अशी अवस्था झाली.’ 

मीरला, आपण वियोगाचा सामना कसा करणार, याची काळजी लागून राहिली आहे, तर ग़ालिब म्हणतो की वियोगानं माझी अशी अवस्था आताच करून टाकली आहे...  

ख़ूश होते हैं पर वस्ल मे
यूँ मर नहीं जाते
आयी शब-ए-हिजराँ की 
तमन्ना मेरे आगे

ज्यातून दोघांच्या भूमिकांचा आणि अंतरंगांचा एकत्रित ठाव घेणं आनंददायी ठरतं असे मीर आणि ग़ालिबचे इतरही अनेक शेर असतील व आहेत. अगदी निवडक आणि उत्कृष्ट असे शेर उद्धृत करून दोघांमधला धागा शोधण्याचा प्रयत्न इथं केला आहे. शेवटी हे दोघेही मान्यवर कवी होते. आपापल्या जागी त्यांचं मोठेपण आहेच. एक प्रकारे तुलना केली, तरी हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ असं ठरवणं हा हेतू यामागं नाहीच... 

समान विषय किंवा कल्पना असलेले शेर समोर ठेवले, की त्यांचं सौंदर्य वेगळ्याच पद्धतीनं प्रतीत होतं. जास्त खुलतंही. तसंच या कवींची बलस्थानं आणि वैशिष्ट्यंही विशेषत्वानं जाणवतात. मीरची चित्र रंगवण्याची हातोटी खरोखरच अपूर्व होती. त्याच्या भाषेची नज़ाकत, कोमलता दुसऱ्या कोणापाशी नाही. भाषेचं सौंदर्य अनुभवावं, ते मीरच्या शायरीत. ग़ालिबचा पोत निराळा होता. सतत नावीन्यपूर्ण आणि चमत्कृतीचा प्रत्यय देणाऱ्या कल्पना त्याच्या शायरीत अधिक आहेत. तत्त्वज्ञानाची चर्चा, ईश्वराविषयीचं चिंतन आणि बुद्धीला चालना देणारे विचार हे गालिबचं वैशिष्ट्यं होतं. आपले सूक्ष्म अनुभव आणि जाणिवा शब्दबद्ध करण्याची किमया त्याला साधली होती. मीरनं आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपल्या चित्रमय, वर्णनपर काव्यात एक जान ओतली. सामान्य जनांची भाषा त्यानं मशिदीच्या दारात बसून, बाजारात फिरून टिपली होती. ती बोली त्यानं कवितेत योजली. तर ग़ालिब आपल्या चिंतनाच्या मंथनातून जे हाती लागलं, ते कधी थेटपणं तर कधी गूढ भाषेत मांडू लागला. वाचकाच्या बुद्धीला आणि मनाला प्रेरणा देणारं असं त्याचं काव्य आहे. आपला काव्यविषय समर्थपणं समोर ठेवण्यात दोघेही अत्यंत यशस्वी ठरले, यात शंकाच नाही. दोघांचा लिहिण्याचा ढंग पुन्हा वेगळा होता. मीर साध्या आणि थेट भाषेत लिहीत असे. तर ग़ालिब आडवळणानं लिही आणि नावीन्यपूर्ण असं काही तरी देण्याचा प्रयत्न करे. विषयाच्या मांडणीचे, विचार व्यक्त करण्याच्या नवीन वाटा शोधून काढे. आपल्या चिंतनाच्या बळावर त्यानं एक कल्पनासृष्टीच स्वतःच्या अंतरंगात उभी केली होती. तीत तो दंग असे. भाषेवरची ग़ालिबची हुकमत आणि त्याची शब्दकळा अपूर्व अशीच होती. आपल्या भावना आणि वैचारिक भूमिका यांना सजवून पेश करणं हा त्याचा छंदच होता. मीर परंपरा फारशी सोडत नसे. ग़ालिब सगळ्याच परंपरेला आव्हान देणाराच होता. तरीपण ग़ालिबलाही आपल्या हृदयाची चिंता होतीच. दुःखानं तोही बेजार होत असे आणि म्हणत असे की माझं हृदय हे अखेर हृदय आहे; वीट वा दगड नव्हे...

दिल ही तो है न संग-ओ-ख़िश्त 
दर्द से भर न आये क्यूँ
रोयेंगे हम हज़ार बार कोई 
हमें सताये क्यूँ          

संबंधित बातम्या