मेरे दुख की दवा करे कोई 

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 21 डिसेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

मीरचा समकालीन सौदा, म्हणजे मिर्ज़ा मुहम्मद रफ़ी हा शायरही नामवंत आहे. मीरपेक्षा वयानं तो दहा वर्षांनी ज्येष्ठ होता. मीरप्रमाणं त्याचाही प्रभाव पुढल्या पिढ्यांमधील शायरांवर राहिला. ज़ौक़ आणि ग़ालिब दोघांनीही सौदाची प्रशंसा केली आहे. सौदा हा ग़ज़ल आणि क़सीदा यासाठी ओळखला जातो. उर्दू समीक्षकांनी मीर आणि सौदा यांची तुलना करून, मीरची ‘आह’ आणि सौदाची ‘वाह’ कवी म्हणून संभावना केली आहे. कारण मीरच्या काव्यात वेदना आणि करुणरस अधिक आहे, तर सौदाच्या शायरीत विनोदाच्या अंगानंही लिहिलेले शेर आहेत. एका शेरमध्ये तो म्हणतो,

माँगा मैंने दिल को, तो कहा बस यही एक दिल
ऐसे तो मेरे कूचे में कितने हैं, उठा ला

सौदाचं सांगणं असं की, ‘प्रेयसीकडे मी माझ्या हृदयाची मागणी केली, तेव्हा उत्तर मिळालं की, काय तुला फक्त याच एका हृदयाची अभिलाषा आहे...माझ्या गल्लीत बघ कितीतरी हृदयं विखरून पडली आहेत, हवं ते उचल नि घेऊन जा.’ प्रेयसीची ही बेपर्वा वृत्ती आणि निर्विकारपणा ग़ालिबनंही एका शेरमध्ये नोंदवला आहे. सौदाचा शेर तसा विनोदी आहे, गंमत करणारा आहे. ग़ालिबचा शेर मात्र खोचक आहे आणि उपहासगर्भ आहे. तो म्हणतो,

तुम शहर मे हो तो हमें क्या ग़म, जब उठेंगे
ले आएँगे बाज़ार से जाकर दिल ओ जाँ और

‘तू जर शहरात असलीस तर मग हृदय आणि प्राण यांची उणीवच नाही. ज्याला हवं तो उठून बाजारात जाईल आणि हृदय व प्राण घेऊन येईल.’

सौदा एका शेरमध्ये म्हणतो, ‘मी आता तुझ्या ताब्यात आहे. मी जर वाचलो, तर त्यात विशेष काही नाही’. तुझ्या खंजिराच्या खाली येऊनही जर आराम केला, तर  मग त्यात काहीच अर्थ नाही.’ सौदा तक्रार करतो की तुझ्या खंजिराखाली आल्यानंतरही क्षणभर जरी वाचलो, तरी ते व्यर्थच...

क़ाबू में हूँ अब तेरे गो अब जिया तो फिर क्या
खंजरतले किसी ने टुक दम लिया तो क्या

याच्याशी मिळताजुळता अशा एक ग़ालिबचा शेर आहे. तो म्हणतो की, ‘तू जर आपल्या खंजिराची परीक्षा तो माझ्यावर वापरून नाही केलीस, तर मग स्वतःच्या नशिबाची परीक्षा घ्यायला मी जाऊ तरी कुठे?’ सौदाला खंजिराखाली आल्यावर क्षणभरही जिवंत राहण्यात स्वारस्य नाही. तीच त्याची शिकायत आहे. तर ग़ालिबला वाटतं की आपल्यावर जर खंजीर चालवलाच नाही, तर ते दुर्दैवच...

हम कहाँ क़िस्मत आज़माने जाएँ
तू ही जब ख़ंजर-आज़माँ न हुआ

मीर आणि सौदा हे तसे मागच्या काळातले. तर ज़ौक़ हा ग़ालिबपेक्षा वयानं ज्येष्ठ, तरी त्याचा समकालीनच. बहादूरशाहच्या दरबारतला राजकवी ज़ौक़ हा ग़ालिबचा प्रतिस्पर्धीच होता. बादशाहचा मर्जीतला कवी आणि काव्यक्षेत्रातला उस्ताद होता तो. बादशाहच्या रचना दुरुस्त करण्यात त्याचा बराच वेळ जात असे. ज़ौक़ भाषेविषयी खूप जागरूक असे. पण भाषेवरच अधिक लक्ष असल्यामुळं रचनेतल्या भावना आणि कल्पनेकडं तो जरा दुर्लक्षच करत असे. मात्र त्याच्या रचना बांधीव असत. ज़ौक़ असेपर्यंत ग़ालिबला दरबारी कवी म्हणून स्थान मिळालं नाही. त्याच्या मृत्यूनंतरच तो त्या पदापर्यंत पोहोचू शकला. ज़ौक़ शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध होता. क़सीदा आणि ग़ज़ल लिहिण्यात तो तरबेज होता. पण त्याची ग़ज़ल मीर किंवा ग़ालिबइतकी प्रभावी नव्हती. त्याच्या भाषेचं सौष्ठव आणि माधुर्य अपूर्व असं होतं. पण ग़ालिबशी तुलना केल्यास, त्याची प्रतिभा तशी तोकडीच म्हणावी लागेल. तरीही शेख़ इब्राहीम ‘ज़ौक़’ हा त्या काळातला एक महत्त्वाचा शायर होता आणि समकालीन कवींमध्ये ग़ालिबच असा होता, ज्याच्याशी त्याची तुलना होऊ शकते...

ग़ालिब आणि ज़ौक़ यांच्यातली स्पर्धा उघड होती. त्यांच्यातल्या तणातणीचे अनेक किस्से प्रचलित आहेत. त्यापैकी काहींचा उल्लेख पूर्वी येऊन गेलाच आहे. एका राजपुत्राच्या विवाहप्रसंगी ग़ालिबनं ‘सेहरा’ लिहिला होता. सेहरा म्हणजे लग्नप्रसंगी गावयाचं गीत. त्यात ग़ालिबनं लिहिलं की, ‘मी काव्याचा जाणकार आहे. मी काही ग़ालिबचा पक्षपाती नाही. पण, या सेहऱ्याहून अधिक चांगला सेहरा कुणी लिहिला, तरच मी मानेन.’

हम सुख़नफ़हम हैं, ‘ग़ालिब’ के तरफ़दार नहीं
देखें, इस सेहरे से कह दे कोई बेहतर सेहरा

यात ज़ौक़ला उद्देशून टोमणा होता, हे बादशाहच्या लक्षात आलं आणि त्यानं ज़ौक़ला उत्तरादाखल एखादा नवीन सेहरा रचण्यास सांगितलं. हे सगळं पाहून ग़ालिबनं बादशाहसमोर आपली बाजू मांडून स्पष्टीकरण देणारा एक शेर पेश केला, ज्यात तो म्हणतो की, ‘बादशाहच्या उस्तादाशी भांडण करण्याचा माझा अजिबात विचार नाही. इतकं धाडस आणि सामर्थ्य माझ्यात नाही.’

उस्ताद-ए-शाह से हो मुझे पुरख़ाश का ख़याल
ये ताब ये मज़ाल ये ताक़त नहीं मुझमें

ज़ौक़शी असलेलं ग़ालिबचं नातं हे तणावाचंच होतं. तसे ते समकालीन, एकाच शहरातले. म्हणूनच त्यांच्या काव्यातली साम्यस्थळं शोधणंही रंजक ठरतं. मृत्यूसंबंधीचे त्यांचे काही शेर सांगता येतील. ज़ौक़चा एक लोकप्रिय आणि साधा सरळ शेर आहे-

लायी हयात आए क़ज़ा ले चली चले
न अपनी ख़ुशी आए न अपनी ख़ुशी चले

अर्थात, ‘जीवन घेऊन आलं म्हणून आम्ही या जगात आलो. मृत्यू घेऊन गेला, तसे इथून निघूनही गेलो. स्वतःच्या इच्छेनं इथं आलो नाही की स्वतःच्या इच्छेनुसार या जगातून जाणार नाही,’ अशा प्रकारे ज़ौक़नं जीवन आणि मरण यासंदर्भातली माणसाची असहायता प्रकट केली आहे. माणसाच्या हातात काहीच नाही, हा विचार तो खूप सहजभावानं मांडतो. ग़ालिबचा मृत्यूबाबतचा हा शेरही तितकाच प्रसिद्ध आहे. ज्यात त्याला तेच अभिप्रेत आहे. तो लिहितो की, ‘मानवी दुःखाचं बंधन आणि जीवनरूपी तुरुंग हे मुळात एकच तर आहेत. यामुळंच मरणापूर्वी माणसाची दुःखापासून सुटका कशी ती नाहीच.’ ज़ौक़ साध्या शब्दांत सांगून जातो, तर ग़ालिब चिंतनाची डूब देऊन आपला विचार मांडतो. अर्थातच हे दोन्ही शेर तितकेच सुंदर आहेत.  

कैद-ए-हयात ओ बन्द-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी ग़म से निजात पाये क्यों

इथं ज़ौक़चा आणखी एक शेर आठवतो, ज्यात त्यानं सहजच एक विचार मांडला. मात्र तो कुणाला खुळेपणाचाही वाटेल...

अब तो घबराके ये कहते हैं कि मर जाएँगे
मरके भी चैन न पाया तो किधर जाएँगे

शराब आणि शायरी यांचं नातंही अतूटच. ज़ौक़ आणि ग़ालिब दोघांनीही या विषयाभोवती अनेकवार लिहिलं आहे. एका शेरमध्ये जौक़ म्हणतो की, ‘अरे ज़ौक़, या द्राक्षकन्येला तोंडही लावू नकोस. कारण तिची चव एकदा घेतली, की तिच्यापासून सुटका कशी ती नाहीच...’

ऐ ‘ज़ौक़’ देख, न दुख्तर-ए-रज़ को मुँह लगा
छुटती नहीं है मुँह से ये काफ़िर लगी हुई

समाजात मद्यप्राशन हा दुर्गुण समजला जातो आणि तिला एकदा जवळ केलं, की मग तिच्यापासून दूर जाताच येत नाही, असा ज़ौक़चा आशय. ग़ालिबनंही शराबला समोर ठेवून अनेकदा लिहिलं आहे. तिचं गुणगानही केलं आहे आणि कधी टीकाही केली आहे. शराबचा आध्यात्मिक अंगानंही केलेला विचार त्याच्या शायरीत दिसतो. शराबची उपयुक्तता पटवणारा त्याचा एक शेर आहे. त्यात तो लिहितो की, ‘चांदण्या रात्री तुला मिळेल तितकं मद्य तू पी. या शांत स्वभावाला उष्णताच आवश्यक आहे.’ 

पी जिस क़दर मिले शब-ए-महताब में शराब
इस बलग़मी मिज़ाज को गरमी ही रास है

‘बलग़मी मिज़ाज’ या शब्दात साधलेला श्लेष यात आहे. कफयुक्त प्रकृती आणि शांत, सुस्त स्वभाव असे त्याचे दोन अर्थ होतात...एका वेगळ्याच वळणावर ग़ालिबनं हा विषय नेला आहे. असे अनेक शेर पाहिल्यावर लक्षात येतं की, बहिर्मुख स्वभावाचा ज़ौक़ जे समोर दिसतं त्यावर भाष्य करतो आणि ग़ालिब अंतर्मुख होऊन कवितेच्या विषयाला विशिष्ट वळण देऊन काही सांगतो. 

मोमिन हा ग़ालिबहून वयानं थोडा लहान असलेला त्याचा समकालीन कवी. ग़ालिबचा तो आवडता शायरमित्र होता. फारसी भाषेवर दोघाचंही प्रभुत्व होतं. एक तऱ्हेचा मोकळेपणा आणि मिस्किलपणा मोमिनमध्येही होता. विचारांचं गांभीर्य आणि कल्पनाशक्तीची झेप याबाबत ग़ालिब व मोमिन यांच्यात एक तऱ्हेची समानता दिसते. मोमिनचा हा शेर मोठा मिस्कील आहे-

अुम्र सारी तो कटी बुतों में ‘मोमिन’
आख़री वक़्त में क्या ख़ाक मुसलमाँ होंगे

तो म्हणतो, ‘सारं जीवन सुंदर स्त्रियांच्या (बुत-मूर्ती) प्रेमात घालवलं. आता अखेरचा काळ आल्यावर कसले मुसलमान होणार आहोत?’ ग़ालिबचा एक शेर अशाच ‘मूर्तिपूजे’चा पुरस्कार करणारा. तो लिहितो, ‘मी त्या काफ़िराच्या मूर्तीची पूजा करतच राहणार, भलेही सारं जग मला काफ़िर म्हणून हाक मारो.’

छोड़ूँगा मैं न उस बुत-ए-काफ़िर का पूजना
छोड़े न ख़ल्क़ गो मुझे काफ़िर कहे बग़ैर

प्रेयसीचा वियोग, विरह या संदर्भातला मोमिनचा शेर-
बहरे अयादत आए वो लेकिन क़ज़ा के साथ
दम ही निकल गया मेरा आवाज़ें पाके साथ

‘माझी विचारपूस करायला ती आली खरी, पण मृत्यूला सोबत घेऊन. तिच्या पावलांची चाहूल लागताच माझे मला प्राण सोडून गेले.’ ग़ालिबचाही एक शेर असाच प्रेयसीची भेट अखेरच्या क्षणी होण्याची शक्यता असतानाच डोळे मिटल्याचं वास्तव पेश करतो. तो लिहितो-

मुन्द गईं खोलते ही खोलते आँखें ‘ग़ालिब’
यार लाये मेरी बाली पै उसे पर किस वक़्त

आयुष्यातल्या वेदनेवरचा उपचार या विषयी लिहिलेला मोमिनचा शेर थेट येशू ख्रिस्ताची आठवण जागवतो. येशूनं मेलेल्याला जिवंत केलं होतं असं म्हटलं जातं, त्याकडं यात निर्देश आहे.

मरज़ अपना नहीं अच्छा हुआ
तमामी अुम्र ईसा ने दवा की

‘येशूनं औषधोपचार करूनही माझा रोग मात्र आय़ुष्यभरात बरा झालाच नाही.’ येशूनं प्रयत्न करूनही बरा न होणारा आजार आपल्याला झाला आहे, असं सांगून दुःखाची तीव्रता मोमिन अधोरेखित करू पाहतो. ग़ालिबनंही येशूचं स्मरण केलं आहे, पण वेगळ्या ढंगात. तो म्हणतो, ‘कोणी मरयमचा पुत्र (येशू) असेल, पण माझ्या दुःखावर इलाज करणारा कुणी हवा आहे.’

इब्न-ए-मरयम हुआ करे कोई
मेरे दुख की दवा करे कोई

वेगवेगळ्या शायर आणि ग़ालिब यांच्यामध्ये असणारे हे काही धागे. यावर आणखीही खूप काही लिहिण्यासारखं आहे. ग़ालिबचं स्मरण करताना इतर कवींचीही आठवण काढावीशई वाटली. हृदयाची वेदना कवितेत विझवण्याचा प्रयत्न करणारा ग़ालिबसारखा शायर...त्याच्या दुःखावर इलाज मात्र नव्हता. ‘दर्द मिन्नत कशे दवा न हुआ’ हे त्याच्या जगण्यातलं वास्तव कधीच बदललं नाही...

संबंधित बातम्या