हाथ हमारे क़लम हुए

नंदिनी आत्मसिद्ध -
सोमवार, 28 डिसेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

आजही ग़ालिब विस्मृतीत गेलेला नाही. किंबहुना जीवनाच्या पावलापावलावर तो आवर्जून आठवतो. दोनशे वर्षांनंतरही त्याचं काव्य माणसाला स्वतःच्या जगण्याबद्दल बरंच काही सांगून जातं. ही किमया ग़ालिबच्या अर्थगर्भ रचनांची. त्यातील जीवनविषयक चिंतनाची आणि मानवी जीवनाचं सार पकडणाऱ्या त्याच्या कल्पनाशक्तीची, प्रतिभेची! पण त्याच्या स्वतःच्या काळात ग़ालिब इतका मोठा होता का? त्यावेळचे लोक त्याला समजू शकत होते का? या प्रश्नाचं उत्तर हेच की, ग़ालिब त्याही काळात एक मोठा आणि महत्त्वाचा शायर म्हणून ओळखला जात होता. मात्र आजच्या इतकी प्रतिष्ठा, प्रतिभावान कवी म्हणून गणना हे सारं तेव्हा त्याला लाभलं नाही, हे दुर्दैवानं खरं आहे. त्याची काहीशी उपेक्षा झाली. बदनामी तर खूपच झाली. मान्यवरांनी त्याची प्रशंसा करूनही, एका वर्तुळापलीकडं त्याची कविता खऱ्या अर्थानं पोहोचलीच नाही. व्हायला हवी तेवढी त्याची ख्याती झाली नाही. आज ग़ालिबचं जे नाव आहे, ते पाहता, असं म्हणणं एखाद्याला पटणारही नाही. पण असं म्हणायला वाव नक्कीच आहे...

या संदर्भात त्याच्या आयुष्यातल्या काही प्रसंगाकडे निर्देश करता येईल. वयाच्या तिशीत ग़ालिब आपल्या पेन्शनच्या निमित्तानं (त्यावेळच्या) कलकत्त्याला गेला होता. जाताना तो वेगवेगळ्या ठिकाणी थांबला. तो लखनौला काही दिवस राहिला होता. त्यावेळी त्याला तिथल्या शाहची किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्याची भेट घ्यायची होती. पण ती होऊ शकली नाही. त्यानं प्रयत्न करूनही त्याला भेटीची वेळ मिळू शकली नाही. याचा अर्थ ग़ालिबचं नाव तेव्हा इतकं मोठं झालं नसावं. अन्यथा असं झालं नसतं. दुसरी एक घटना सांगता येईल. ही घटना त्याची ती कलकत्ता वारी अयशस्वी ठरल्यानंतरची आहे. त्याची दुरवस्था बघून नासिख़ या शायरानं पत्र लिहून ग़ालिबला सुचवलं होतं की, त्यानं दक्षिणेकडं हैदराबादला जावं. तिथं त्याला नक्कीच काहीतरी पद, सन्मान वगैरे मिळेल. त्या पत्राच्या उत्तरादाखल ग़ालिबनं जे लिहिलं होतं, त्यावरून त्याला स्वतःलाही आपलं नाव दक्षिणेपर्यंत पोहोचलं आहे की नाही, याविषयी खात्री नव्हती असं दिसतं. उगीच दक्षिणेत जाऊन नशीब अजमावण्यात काय अर्थ, असं त्याला वाटत होतं. ग़ालिब नासिख़ला लिहितो, ‘दक्षिणेपर्यंत माझ्या काव्यशैलीचं वारंही गेलं नसेल आणि तिथल्या लोकांचे कानही माझ्या कवितेशी परिचित नाहीत.’ 

तिसरं उदाहरण आहे, ते सेहरावरून घडलेल्या प्रसंगाचं. या प्रसंगाचा उल्लेख गेल्या लेखात आला आहे. ग़ालिबनं ज़ौक़ला आव्हान दिल्याचं बादशाहच्या लक्षात येताच त्यानं ज़ौक़ला उत्तरादाखल नवा सेहरा रचण्यास सांगितलं होतं. ज़ौक़नं तो लिहिलाही आणि त्यात ग़ालिबला उद्देशून टोमणा मारला. यावरून  

असं दिसतं की, ग़ालिबला बादशाह किंवा ज़ौक़ ‘विशेष’ सन्मान देत नव्हते. लौकिक यश तर ग़ालिबला फारसं मिळालं नाहीच. बहादूरशाह त्याला नेहमीच लाल किल्ल्यातल्या काव्य संमेलनांकरिता आमंत्रण देत असे. त्याला बादशाहनं सन्मानाची उपाधीही बहाल केला होती. हे सारं खरं असलं, तरी विशेष कवी म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात नव्हतं...

ग़ालिबच्या काव्याचा चाहतावर्ग तेव्हाही होता, पण त्याच्या काव्यातली चिंतनशीलता या वर्गापर्यंत गेली नव्हती. ग़ालिबची प्रेमविषयक कविताच जास्त लोकप्रिय होती. आजही काही प्रमाणात तीच अधिक लोकप्रिय आहे. तसंच मद्यासक्तीसाठी ग़ालिबची प्रसिद्धी तेव्हा झाली आणि आताही त्यासाठी तो जास्त ओळखला जातो. पण आता ग़ालिबकडं एक चिंतनशील आणि मानवी जीवनावर भाष्य करणारा भाष्यकार म्हणूनही पाहिलं जातं. त्याच्या विचारांची उंची ओळखण्याचा मर्मग्राही दृष्टिकोन त्या काळात मात्र फार जणांकडं नव्हता. समकालीन कवींच्या समोर ग़ालिबची कविता वेगळी होती, पण ती समजून घेण्याची क्षमता सार्वत्रिक नव्हती. यामुळंच समकालीन शायरांच्या जोडीनं ग़ालिबचं नाव घेतलं गेलं. पण त्याची उंची वेगळी आहे, हे त्याच्या हयातीत कमी लोकांना समजलं. हे तो स्वतःही जाणून असावा. एका शेरमध्ये तो लिहितो की, ‘स्वतःच्या असमान असण्यामुळं मी लज्जित झालो. मी जितका पुढे गेलो, तितकाच मागे राहिलो.’ समकालीनांच्या तुलनेत मी असमान ठरलो, हे म्हणताना आपण खरं तर त्यांच्या पुढे होतो, असंच त्याला सुचवायचं आहे...

बे-एतदालियों से सुबुक सब में हम हुए

जितने ज़ियादा हो गये उतने ही कम हुए

याच ग़ज़लचा आणखी एक शेर असा-

लिखते रहे जुनूँ की हिकायात-ए-ख़ूँचका

हरचन्द उसमें हाथ हमारे क़लम हुए

‘उन्मादाच्या रक्तरंजित कहाण्या मी कायम लिहीत आलो, पण असं केल्यामुळे माझे हात नेहमीच कापले गेले.’ आयुष्यात जे पाहिलं, जी विवशता अनुभवली, त्या साऱ्याचं अप्रतिम चित्रण ग़ालिबनं यात केलं आहे...

मृत्यूनंतरही ग़ालिबला विशेष अशी प्रसिद्धी लगेच मिळाली नाही. त्याच्या मित्रांपैकी बरेचजण त्याच्या मृत्युसमयी दिल्लीत नव्हते. ते दुसऱ्या शहरांमध्ये स्थायिक झाले होते. आपल्या मित्रांचं नाव गुंफून ग़ालिबनं लिहिलेला एक शेर इथं आठवतो. त्यात त्यानं स्वतःचा मृत्यू झाला असं घोषित केलं होतं आणि आता वहशत, शेफ़्ता हे बहुतेक ग़ालिबवर शोकगीत लिहितील, असंही म्हटलं होतं...

‘वहशत’ ओ ‘शेफ़्ता’ अब मर्सिया कहवें शायद

मर गया ‘ग़ालिब’-ए-आशूफ़्ता-नवा कहते हैं

परिस्थितीनं गांजलेला ग़ालिब अनेकदा स्वतःच्या बरबादीविषयी आणि मरणाविषयी काव्यात उल्लेख करत असे. या शेरमध्येही तसाच तो आहे. वहशत आणि शेफ़्ता हे त्याचे कविमित्र होते. ग़ालिबला तुरुंगवास झाला, तेव्हा शेफ़्तानं त्याला बरीच मदत केली होती. आपण गेल्यावर हे दोघे बहुधा आपल्यावर लिहितील, असं ग़ालिब म्हणतो. यातला ‘बहुतेक’ हा शब्द महत्त्वाचा. त्याला स्वतःलाही तशी खात्री नसावी, की हे दोघेजण तरी लिहितील, असंच यातून सूचित होतं...अन् तसंच घडलं. या दोघांनी ग़ालिबवर त्याच्या मृत्यूनंतर शोकगीत लिहिलं नाही. ते तर केव्हाच दिल्ली सोडून गेले होते. ग़ालिबच्या काही शिष्यांनी मात्र त्याच्या स्मरणार्थ काव्य लिहिलं. मीर मेहदी ‘मजरूह’, अल्ताफ़ हुसैन हा‘ली’ आणि ग़ालिबचा आडता शिष्य तफ़्ता यांनी त्याच्य्वर लिहिलं. हा‘ली’नं तर पुढं जाऊन ‘यादगार-ए-ग़ालिब’ हे चरित्रच लिहिलं. हा‘ली’नं ग़ालिबचं वर्णन ‘बुलबुल-ए-हिन्द’ अशा शब्दांत केलं आहे. 

आपल्या हयातीत लोकांच्या टिकेचं, टिंगलीचं लक्ष्य ठरलेला ग़ालिब बदनाम खूप झाला होता. यामुळं मृत्यूनंतरही वेगळं काही होईल, अशी अपेक्षा त्याला नव्हती. त्याचा एक शेर या संदर्भातली भविष्यवाणी करून जाणारा आहे-

पस अज़ मुर्दन भी दीवाना जियारतगाह-ए-तिफ़्लाँ है

शरार-ए-संग ने तुरबत पे मेरी गुलफ़िशानी की

‘मृत्यूनंतरही मी बालिश लोकांकरिता तीर्थस्थान बनून गेलो आहे. या मूर्खांनी फेकलेल्या दगडांमधून निघालेल्या ठिणग्या माझ्या कबरीवर आजही पुष्पवृष्टी करत आहेत.’ या शेरमधून एकूण तत्कालीन परिस्थिती काय होती, याची कल्पना करता येते. ग़ालिबला कशा तऱ्हेच्या टीकेला आणि निंदेला सामोरं जावं लागत असेल, हेही लक्षात येतं. 

आपल्याला लोक बदनाम करतात, आपल्याला भलंबुरं म्हणतात याची कैफ़ियतही ग़ालिबनं कवितेतून अनेकदा मांडली. एका शेर मध्ये तो लिहितो, की ‘ग़ालिब माझा सहकारी, सहधर्मा आणि माझी गुपितं जाणणारा मित्र आहे. त्याला माझ्यासमोर वाईट का म्हणता?’ 

हमपेशा ओ हम मशरब ओ हमराज़ है मेरा

‘ग़ालिब’ को बुरा क्यूँ कहो अच्छा मेरे आगे

तर आणखी एका शेरमध्ये त्यानं आपल्याला नावं ठेवणाऱ्यांना निराशावादी म्हटलं आहे. मला वाईट ठरवताय हे तुम्ही चांगलं करत नाही, असं तो लिहितो-

ये बाइस-ए-नाउम्मीदी-ए-अरबाब-ए-हवस है

‘ग़ालिब’ को बुरा कहते हो अच्छा नहीं करते

मात्र काहीही असलं, तरी त्या काळातले काही जाणकार मान्यवर ग़ालिबचं महत्त्व ओळखून होते. त्याचे शिष्यही त्याची थोरवी जपणारे होते. सर सैयद अहमद यांनी ग़ालिबच्या काव्याची प्रशंसा केली होती आणि त्याला ‘कविराज’ असं गौरवानं म्हटलं होतं. ग़ालिबच्या काव्यातील उंची, त्याची शब्दकळा आणि अनुभवांना चित्रित करण्याची त्याची हातोटी याविषयीही सर सैयद यांनी भरभरून लिहिलं होतं. ‘उद्यानातील बुलबुल’ अशी उपाधी त्यांनी ग़ालिबला बहाल केली होती. ‘ग़ालिबची स्तुती करण्यास आपली लेखणी असमर्थ आहे’, असंही त्यांनी म्हटलं होतं. 

देशात जसा शिक्षणाचा प्रसार होत गेला, सामान्य जनतेला एकूण साहित्याची जागरूकता आली. उर्दू काव्याच्या चाहत्यांना ग़ालिबचं काव्य नव्यानं आकळत गेलं. त्यांची साहित्यविषयक दृष्टी व्यापक बनत गेली आणि ग़ालिबच्या शायरीत लपलेलं सखोल चिंतन त्यांना जाणवू लागलं. ग़ालिबचं असलेलं वेगळेपण, त्याच्या रचनेचं अनोखेपण त्यांना भावू लागलं. १९व्या शतकातले मान्यवर उर्दू व फ़ारसीतले कवी इक़बाल यांनाही ग़ालिबनं प्रभावित केलं होतं. ग़ालिबविषयी कविता लिहिताना, ‘कल्पनारूपी पक्ष्याची झेप कुठपर्यंत जाऊ शकते, हे तुझ्या अस्तित्वामुळं मनुष्याच्या बुद्धीला स्पष्ट झालं...’ असं त्यांनी म्हटलं आहे. इक़बाल यांचा शेर असा-

फ़िक़्र-ए-इन्सान पर तेरी हस्ती से ये रोशन हुआ

है पर-ए-मुर्ग़-ए-तख़य्युल की रेसाई ता कुजा

ग़ालिबचा याहून उत्तम गौरव तो काय असू शकतो? ही संपूर्ण कविताच उत्कृष्ट आहे. ग़ालिबवर नंतरच्या काळात अनेकांनी लिहिलं. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. ग़ालिबनं केवळ साहित्यिक आघाडीवरच आपला वारसा मागे ठेवलेला नाही. तर उत्तम अशा गद्य आणि पद्य लेखनासोबतच त्याचा सामाजिक दृष्टिकोन, धार्मिक उदारता आणि माणूसपणाला ग़ालिबनं दिलेलं महत्त्व हे सारं अभूतपूर्व आहे. नव्या जगाशी नातं जोडणारं असं बरंच काही ग़ालिबच्या कर्तृत्वात सामावलेलं आहे. धर्म आणि कर्मकांडं यांच्या संदर्भातही त्याच्या अशा धारणा होत्या. खरा धर्म हा चौकटबद्ध असू शकत नाही, असं त्याला अभिप्रेत होतं. म्हणूनच तो लिहून गेला, ‘विभिन्न श्रद्धा व धर्म जेव्हा पुसले जातात, तेव्हा ते अधिक व्यापक श्रद्धेचा हिस्सा बनतात...’

मिल्लतें जब मिट गईं अजज़ा-ए-ईमाँ हो गईं

ग़ालिबच्या व्यक्तित्वाचे आणि काव्याचे असे अनेकानेक पैलू आहेत. त्याच्याबद्दलच्या बदनामीकारक कहाण्याही तेवढ्याच आहेत. ग़ालिबला समजून घेणं सोपं नाही. कारण त्याचा ‘अंदाज़-ए-बयाँ’ खरोखरच इतरांपेक्षा वेगळा असाच आहे. तो तुम्हाला प्रेमाची रूपं दाखवतो, दुःखाची परिसीमा काय ते सांगतो. कधी तो घायाळ करतो. तर कधी जीवनाची रहस्यं गूढ भाषेत समोर मांडतो. मानवी जीवनाची विवशता त्याच्याइतकी दुसऱ्या कुणीच स्पष्ट केली नाही. मात्र बुद्धीच्या मर्यादांसह माणूस किती उंच झेप घेऊ शकतो, हेही ग़ालिब वाचतानाच उमगतं. जितकं आत शिरावं, तितकं खोलवर नेणारं हे ग़ालिबच्या काव्याचं गारूड आहे. ग़ालिबनं काव्य समोर आणतच राहावं आणि आपण त्याचा स्वाद घेत जावं, त्यात रंगून जावं, अशी ग़ालिबच्या चाहत्यांची भावना राहिली आहे. तीच जणू एका शेरमध्ये ग़ालिबनं बोलून दाखवली आहे. ‘कुठली तरी कविता म्हणा ना. लोक म्हणत आहेत, की ग़ालिबनं कोणतीच कविता नाही ऐकवली आज...’

कुछ तो कहिये कि लोग कहते हैं

आज ‘ग़ालिब’ ग़ज़लसरा न हुआ

संबंधित बातम्या