रहने दो अभी साग़र-ओ-मीना मेरे आगे

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 27 एप्रिल 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

शराब आणि तिची नशा यांना एका वेगळ्या संदर्भात ग़ालिब शब्दबद्ध करत होता. कधी सूफ़ी तत्त्वज्ञान, कधी जीवनातला आनंद तर कधी ऐहिक सुखांची मानवाला असलेली आसक्ती अशा व इतर अनेक अर्थवलयांच्या पावलाचे ठसे त्याच्या शायरीत सापडतात. माणसाची जीवनातल्या हर एक बाबतीतली अमिट तृष्णा त्याच्या शायरीत वेगवेगळी रूपं घेऊन अवतरली. धर्ममार्तंडाचा खोटा अभिनिवेश आणि ढोंग यावरही तो नेहमी बोट ठेवत असे. तर कधी मद्यपानाच्या संदर्भात मित्रमंडळींमध्ये आणि शिष्यपरिवाबरोबर गमतीनं, विनोदाच्या अंगानंही शेरेबाजी करत असे. शराब हा त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला होता. त्यामुळं त्याच्या शायरीतही स्वाभाविकपणे शराबचा भरपूर शिडकावा दिसतो...

धर्माचा मद्यपानाला विरोध असला, तरी ग़ालिबला त्याची पर्वा नव्हती. धर्माचं अवडंबर करणाऱ्यांबाबत तो नेहमीच उपरोधपूर्ण टिप्पणी करत असे. टिंगलही करत असे. त्याच्या शायरीतही अशी शेरेबाजी सापडते. ‘दारू पिऊ नका,’ असा संदेश देणारा धर्मोपदेशक आणि मयख़ाना, म्हणजे मधुशाला यांची सांगड कशी बसावी? पण ग़ालिबनं तीही अनेकदा घातली आणि अशा मंडळीची टोपी उडवली...खिल्ली उडवली...
कहाँ मयख़ाने का दरवाज़ा ‘ग़ालिब’ और कहाँ वाइज़
पर इतना जानते हैं कल वो जाता था कि हम निकले

या ओळींमधला अर्थ तसा स्पष्ट आहे आणि तरीही त्याला वेगवेगळ्या छटाही आहेत. ‘मयख़ान्याचा दरवाजा आणि वाइज़, म्हणजे धर्मोपदेशक हे एकत्र येणं अशक्य. पण काल मात्र मी तिथून बाहेर येत होतो तेव्हा वाइज़ आत जात होता,’ असं सांगून ग़ालिब बरंच काही सुचवतो. कोणता अर्थ घ्यायचा ते वाचणाऱ्यावर सोपवतो. सरळ अर्थ असा की दुसऱ्यांना मद्यपान करू नका, असे उपदेशाचे डोस पाजणारा स्वतः मात्र हा नियम पाळत नाही. म्हणजे तो ढोंगी आहे. याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो, ‘धर्मोपदेशक मयख़ान्यात शिरला ते मी पाहिलं खरं. पण तो मद्य पिऊ नका, असं सांगायला गेला, की स्वतःच त्याचा आस्वाद घेण्याकरिता गेला, ते मला माहीत नाही. कारण कहाँ मयख़ाने का दरवाज़ा और कहाँ वाइज़...’ खोडकर टिप्पणी करण्याचा स्वभाव असलेल्या ग़ालिबला कदाचित असंही म्हणायचं असू शकेल, ‘वाइज़ मयख़ान्याच्या आत शिरत होता, ते मी पाहिलं आणि बाहेर पडलो. याही ठिकाणी त्याची कटकट कशाला ऐकून घ्यायची? त्यापेक्षा त्याच्या जवळपासही न राहिलेलं बरं. याचा उपदेश ऐकण्यापेक्षा मधुशालेचा त्याग केलेला बरा’...अर्थाचे निरनिराळे पदर यात आहेत. अर्थांच्या अशा वाटा खुल्या ठेवून ग़ालिबनं हा शेर लिहिला आहे. त्याचा मिस्किलपणा यातून स्पष्ट होतो. 

ग़ालिबची विनोदबुद्धी आणि इतरांना अचानक चातुर्यानं स्तिमित करून टाकण्याची हातोटी विलक्षण होती. या संदर्भातले वेगवेगळे किस्से आपण पाहिलेच आहेत. मद्यपानाच्या संदर्भातही तो आपल्या शेरेबाजीनं इतरांवर मात देत असे. एकदा ग़ालिब आणि प्रागतिक मुस्लिम नेते सर सैयद अहमद ख़ान यांच्या भेटीत असाच एक किस्सा घडला होता. गोष्ट तशी ग़ालिबच्या उत्तरायुष्यातली आहे. १८६० मधली. त्यावेळी रामपूरचे नवाब यूसुफ़ अली ख़ान यांच्या आमंत्रणावरून ग़ालिब तिथं गेला होता. तिथून परतताना त्याची भेट मोरादाबाद इथं सर सैयद यांच्याशी झाली. ते तेव्हा तिथं कलेक्टर होते. सर सैयद यांनी वेशीवर जाऊन ग़ालिबचं स्वागत केल आणि त्याला सन्मानपूर्वक आपल्या बंगल्यावर आणलं. तिथं बैठकीच्या खोलीत मधोमध असलेल्या टेबलवर ग़ालिबनं आपल्याकडली वर्तमानपत्रात गुंडाळलेली वाइनची बाटली ठेवली. थोड्या वेळानं त्याच्या लक्षात आलं की ती बाटली तिथं नाही. त्यानं काळजी वाटून सर सैयदना विचारलं, ‘मी इथं ठेवलेली बाटली गेली तरी कुठं?’ तेव्हा त्यांनी ग़ालिबला आतल्या छोट्या खोलीत नेलं आणि तिथं ठेवलेली बाटली त्याला दाखवली. त्यांना व ग़ालिबला भेटायला येणाऱ्या धार्मिक मंडळींना ती दिसू नये म्हणून त्यांनी ती आत ठेवली होती. ग़ालिबनं ती उचलून हातात धरली आणि एक नजर टाकत म्हणाला, ‘मला जरा वेगळाच वास येतोय इथं. यातला घुटका कोणी बरं घेतला असेल?’ त्यावर काहीच न बोलता सर सैयद नुसतेच हसले. त्यानंतर ग़ालिबनं त्यांना ख्यातनाम कवी हाफ़िज़चा फ़ारसीतला एक शेर ऐकवला. त्याचा थोडक्यात आशय असा, ‘धर्मोपदेशक घुमटाखालच्या व्यासपीठावरून उच्च कोटीच्या गोष्टी करतात आणि एकांतात मात्र ते वेगळेच प्रकार करत असतात.’ दोघेही यावर हसले आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. या प्रसंगामुळं दोघांमधला तणाव निवळून गेला. 

गोष्ट अशी होती, की सर सैयद आणि ग़ालिब यांच्यात काही मतभेद होते. ग़ालिबचा परखडपणा आणि स्वतःची मतं न संकोचता मांडण्यामुळं त्यांच्यातले संबंध जरा ताणलेले होते. १८५५ मध्ये सर सैयद यांनी अबुल फ़ज़लकृत ‘आईन-ए-अकबरी’ या ग्रंथाचं संपादन करून, त्याचा वेध घेणारं लेखनही त्यात केलं. या पुस्तकाला ग़ालिबनं प्रस्तावना लिहावी, अशी त्यांची इच्छा होती. कारण ग़ालिब हा फ़ारसीचा उत्तम जाणकार होता आणि इतिहासाचाही त्याचा अभ्यास होता. ग़ालिब आपल्या या प्रयत्नाची वाखाणणी करेल, असं त्यांना वाटत होतं. त्यानं पुस्तकाबद्दल फ़ारसीत एक कविताच लिहिली. मात्र सर सैयद यांच्या पुस्तकावर त्यानं टीकाच केली होती. मुळात ‘आईन-ए-अकबरी’ या ग्रंथावरच ग़ालिबनं झोड उठवली आणि एका साम्राज्याची प्रशंसा व मुग़लांच्या इतिहासाची माहिती पुरवणारं लेखन यापलीकडं त्याचं महत्त्व उरलेलं नाही, असंही ग़ालिबनं म्हटलं. असा ग्रंथ नव्यानं समाजापुढं आणण्याचं प्रयोजन उरलेलं नाही, असं मतही त्यानं मांडलं. हा खटाटोप करून सर सैयद यांनी आपला वेळ व बुद्धिमत्ता वाया घालवली आहे, असंही वर या प्रस्तावनेत सांगून टाकलं. शिवाय इंग्रजांच्या राज्याशी त्यावेळच्या कारभाराची तुलनाच होऊ शकत नाही, असा सूर लावला. ग़ालिबची अशी प्रतिक्रिया सर सैयद यांना अर्थातच अपेक्षित नव्हती. त्यांना हा धक्काच होता. पण एका बाजूनं त्यांना ग़ालिबचं मत पटलंही असावं. कारण बदलत्या काळाचं त्यानं केलेलं मूल्यमापन योग्यच होतं. स्वतः सर सैयद हेही इंग्रजी राज्यातले फायदे जाणून होते आणि इंग्रजी भाषा व कारभार याची त्यांना जाण असल्यानं ग़ालिबच्या प्रतिपादनातला सत्यांश त्यांच्याही लक्षात आला असणार. त्यांनी त्यानंतर ‘आईन-ए-अकबरी’ची प्रशंसा केली नाही. मात्र ग़ालिबच्या या टीकेमुळं सर सैयद नाराज नक्कीच झाले होते. वर उल्लेख केलेल्या प्रसंगानंतर त्यांच्यातला तणाव निवळला. 

थोडं विषयांतर. ग़ालिबला नव्या जगाची चाहूल लागली होती आणि इंग्रजी राज्यकारभाराचं, त्यांनी आणलेल्या नव्या गोष्टींचं त्याला कौतुकही होतं. त्यानं कलकत्ता शहरही पाहिलं होतं आणि त्याकाळी कलकत्ता हे दिल्लीच्या खूपच पुढं होतं. इंगजांनी आणलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचं आणि बदलाचं ग़ालिबला आकलन झालं होतं. हे नवे वारे दिल्लीलाही येऊन पोचणार, याची त्याला खात्री होती. इंग्रजांनी आणलेले उद्योग, आगपेटी, तारायंत्र, वीज, वाफेवर चालणारी इंजिनं आणि रेल्वेगाड्या या शोधांबद्दल त्याला कौतुक वाटत असे. रेल्वेची मालवाहतूक भारतात १८३२ नंतर सुरू झाली आणि पहिली प्रवासी रेल्वे गाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईतलं बोरीबंदर स्टेशन व ठाणं या दरम्यान धावली. ग़ालिबला रेल्वे गाडी अर्थातच माहीत होती. १८५७ नंतर झपाट्यानं बदलत जाणाऱ्या काळाची कल्पना त्याला आली होती. पारतंत्र्याचे तोटे आणि दोष तर होतेच. पण इंग्रजांमुळं एक नवं वळण जीवनाला आणि समाजाला लागत आहे, याची कल्पना ग़ालिबला आली होती. जुन्या पिढीतले अनेक जण १९व्या व विसाव्या शतकातलेही अनेक जण इंग्रजी राज्याची स्तुती करत, कारण एक नवी व्यवस्था त्यांना अनुभवायला मिळत होती. तशीही राजेशाही इथं बऱ्याच शतकांपासून असल्यामुळं, राजा बदलला तरी फरक पडत नाही, असं समीकरण रुजलेलं होतंच. पण इंग्रजी राजवटीत बऱ्याच निराळ्या गोष्टी घडत होत्या आणि म्हणूनच ग़ालिबसारखा मनुष्य इंग्रजांनी आणलेल्या नवीन गोष्टींची प्रशंसा करत. १८१८ मध्ये पेशवाई बुडाल्यापासून ते १८५७च्या क्रांतिकारी वळणापर्यंतचा काळ ग़ालिबनं समजत्या वयात पाहिला होता. तो कलकत्त्याला गेला, त्यावर्षी म्हणजे १८२८ मध्ये महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म झाला. फुले, दादाभाई नौरोज़ी, यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा हा सारा कालखंड होता. राजा राममोहन रॉय जरा आधीच्या पिढीतले. ते १८३३ मध्ये गेले. पण त्यांचं कर्तृत्व देशभर गेलं होतं. देशभरात चाहते व शिष्यांशी पत्रव्यवहार असलेल्या ग़ालिबला समकालीन घडामोडींची कल्पना व जाण असणारच. पण त्याच्या शायरीत या साऱ्याचं प्रतिबिंब व्यापक प्रमाणात दिसत नाही. काही संदर्भ नक्कीच येतात. उदा. ‘क़ाबा मेरे पीछे है कलीसा मेरे आगे’ वगैरे... त्याच्या पत्रांमधून काही गोष्टींची चर्चा जरूर आढळते. तसंही जुन्या नवाबी वातावरणात तो वाढला होता आणि शाही दरबार हे त्याचं आश्रयस्थान होतं आणि त्याची ताकद जगण्याशी निगडित पेन्शनसारख्या प्रश्नांमध्येच खर्ची पडत होती...

‘मद्यपानाची सवय ही जणू काही फक्त मलाच आहे, अशातला भाग नाही. केवळ मला दोष लावून चालणार नाही, कारण शराब पिणं अगदी जमशेद बादशाहपासून चालत आलं आहे,’ असंही ग़ालिब एके ठिकाणी म्हणतो-
सल्तनत, दस्त-ब-दस्त आयी है
जाम-ए-मय, ख़ातिम-ए-जमशेद नहीं

‘शासन आणि राजवटी या परंपरेनं सुरू राहतात. तसंच जामे जमशेदचं आहे, तो काही केवळ जमशेद बादशहापुरता नव्हता,’ म्हणजे तो आजही आहे. सगळेच जण त्याचा आस्वाद घेतात, पण बोल मात्र फक्त मलाच लावतात, असं ग़ालिबला म्हणायचं आहे. मद्यपान करणं ही तर आम बाब आहे, असंच तो म्हणतो. ते खरंही आहे. मानवी इतिहासात मद्यपानाचे अनेक दाखले मिळतात. ग़ालिबनं उल्लेख कला, तो ‘जामे जमशेद’ इराणच्या इतिहासातला एक निराळा संदर्भ घेऊन येतो...

एकूणच, जगणं कितीही कष्टप्रद असलं, तरी आयुष्यात माणसाला जगण्यातला आनंद, ऐहिक-भौतिक सुखं यांचं आकर्षण असतं. प्रत्यक्षात ती मिळोत वा न मिळोत. अन् कितीही सुखोपभोग घेतला, तरी ‘आता पुरे,’ असं माणसाला कधीच वाटत नाही. तसंच जगण्याची आसक्तीच इतकी चिवट आणि जिवट असते, की कुठल्याही परिस्थितीत असलेला मनुष्य जीवनाचे रंग अनुभवण्यातच रमलेला असतो. स्वतःला सगळी सुखं उपभोगता आली नाहीत, तरी इतरांच्या जगण्यातला आनंद व जोश निरखत माणूस जीवनाचे रंग अनुभवत असतो. माणसाच्या या जीवनलालसेशी शराबला जोडून, ग़ालिबनं म्हटलं होतं, ‘माझ्या हातांना हालचालही करता येत नाही, पण माझ्या डोळ्यांमध्ये अद्याप पुरेपूर क्षमता आहे. मद्याचा पेला आणि सुरई माझ्या समोरच राहू द्या.’ 
गो हाथ को जुंबिश नहीं आँखों में तो दम है
रहने दो अभी साग़र-ओ-मीना मेरे आगे

संबंधित बातम्या