पृथ्वीची फुप्फुसं काळवंडली

इरावती बारसोडे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

वेध
 

दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉनचे जंगल गेल्या अनेक दिवसांपासून पेटून उठले आहे. ही जागतिक पर्यावरणीय समस्या मानली जात आहे. या काळामध्ये तेथील हवामान उष्ण व कोरडे असल्यामुळे थोड्याबहुत प्रमाणात वणवे पेटतात. मात्र, सध्या जी आग लागली आहे; ती थांबायचे नावच घेत नाही. ब्राझीलच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्च’ या संस्थेच्या नोंदींनुसार सध्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये फक्त दोन आठड्यांमध्ये तब्बल ९,५०० वणवे पेटले आहेत.

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्च’ या संस्थेने २०१३ पासून उपग्रहाच्या माध्यमातून ब्राझीलमधील ॲमेझॉनमध्ये पेटणाऱ्या वणव्यांची नोंद ठेवायला सुरुवात केली. तेव्हापासून तब्बल ७२,८४३ वणवे या जंगलात पेटले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ४० हजार वणवे पेटल्याची नोंद आहे. यावर्षी आठ महिन्यांत त्यामध्ये ८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीपासून ७५ हजार ३०० वणवे पेटल्याचे नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे त्यातले ९,५०० वणवे साधारण १४ ऑगस्टपासून पेटल्याचे दिसते आहे. ब्राझीलमधील उत्तरेकडे असलेल्या रोरायमा, एकर, रोंडोनिया आणि ॲमेझॉन या राज्यांना वणव्यांची झळ बसली आहे. रोरायमामध्ये जंगलातील वणव्याचा धूर पोचल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. चारही राज्यांमध्ये वणव्यांचे प्रमाण गेल्या चार वर्षांमधील सरासरीपेक्षा खूप वाढल्याचे या वर्षी दिसून आले. रोरायमामध्ये १४१ टक्के, एकरमध्ये १३८ टक्के, रोंडोनियामध्ये ११५ टक्के आणि ॲमेझॉनमध्ये ८१ टक्क्यांनी आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.  

ब्रझीलचे अध्यक्ष जेअर बोल्सोनॅरो यांनी बेकायदा वृक्षतोडीला खतपाणी घातल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून नेहमी होतो. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच बेकायदा पद्धतीने आगी लावल्या जातात, असे म्हटले जाते. शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी बोल्सोनॅरो यांनी आग विझवण्यासाठी लष्कर धाडले. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लष्कराच्या ४४ हजार तुकड्या सात राज्यांमध्ये मदतकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. वॉरप्लेन्समधून पाणी टाकून आगी विझविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

जी ७ शिखर परिषदेमध्येही आगींचा सामना करण्यासाठी आर्थिक व लॉजिस्टिकल पाठिंबा देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यासाठी दोन कोटी डॉलर्सची मदतही देऊ करण्यात आली. मात्र, बोल्सोनॅरो यांनी ही मदत नाकारली. हॉलिवूड अभिनेता लिओलार्डो डिकॅप्रिओच्या ‘अर्थ अलायन्स’ या संस्थेने ५० लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. ॲमेझॉनच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक संस्थांना ही मदत दिली जाणार आहे. 

दूरदूरपर्यंत धूर...
युरोपियन युनियनच्या (ईयू) ‘अर्थ ऑब्झर्वेशन प्रोग्रॅम’चा भाग असलेल्या कोपेर्निकस ॲट्मॉसफिअर मॉनिटरिंग सर्व्हिस (कॅम्स) यांच्या म्हणण्यानुसार, ॲमेझॉनमध्ये पेटलेल्या आगीचा धूर पार अटलांटिक समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोचला. तर, ॲमेझॉनपासून ३,२०० किलोमीटर्सहून अधिक दूर असलेल्या साओ पॉलोमध्येदेखील भर दुपारी धुरामुळे आकाश काळवंडले. या धुरातून खूप मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला आहे. या वर्षात साधारण २२८ मेगाटन कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळला आहे. ॲमेझॉनचे जंगल खूप मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. मात्र, जेव्हा हीच झाडे कापली किंवा जाळली जातात, तेव्हा त्यांनी साठवलेला सगळा कार्बन बाहेर पडतो. एवढेच नव्हे, तर जंगलाची कार्बन शोषून घेण्याची क्षमताही कमी होते. 

इतर देशांमध्येही प्रमाण वाढले
ॲमेझॉनचे जंगल असलेल्या इतर देशांमध्येही या वर्षी वणवे पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. व्हेनेन्झुएलामध्ये १९ टक्के प्रमाण वाढले असून या वर्षी २६,५०० वणवे पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. बोलिव्हियामध्ये १७,२०० वणवे पेटले असून हे प्रमाण तब्बल ११४ टक्क्यांनी वाढले आहे. तर, कोलंबियामध्ये आत्तापर्यंत १४,२०० वणवे पेटले. पेरू, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गिनियामध्येही यंदा जास्त आगी लागल्या. 

ॲमेझॉन... पृथ्वीची फुप्फुसे!
दक्षिण आफ्रिकेतल्या ब्राझील, पेरू, कोलंबिया, व्हेनेन्झुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, गुयाना, सुरिनाम आणि फ्रान्स (फ्रेंच गिनिया) या नऊ देशांमध्ये ॲमेझॉनचे जंगल पसरलेले आहे. मात्र, त्याचा जवळपास ६० टक्के भाग ब्राझीलमध्ये येतो. ॲमेझॉन हे जगातील सर्वांत मोठे सदाहरित वन असून तब्बल साडेपाच मिलियन चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. एवढ्या मोठ्या भूभागावर असलेले हे जंगल साहजिकच जैवविविधतेसाठी ‘हॉट स्पॉट’ मानले जाते. साधारण ३० लाख वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचा हा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामध्ये जवळपास ४० हजार वनस्पतींच्या प्रजाती, तीन हजार गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती, ३७० हून अधिक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. तसेच स्थानिक लोकांच्या सुमारे ३५० जमाती जगण्यासाठी या जंगलावर अवलंबून आहेत. 

या जंगलामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात वनस्पती आहेत, की भरपूर प्राणवायू उत्सर्जित केला जातो. ॲमेझॉनचे जंगल संपूर्ण पृथ्वीवरील २० टक्के प्राणवायू उत्सर्जित करते, असे म्हटले जाते. परंतु, त्यात फारसे तथ्य नसावे. हा आकडा जेमतेम सहा टक्के असावा, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ॲमेझॉनचे जंगल पृथ्वीवरील सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता असलेला भूभाग आहे. म्हणूनच त्याला ‘कार्बन सिंक’ म्हणतात. हे कार्बन सिंक नष्ट झाले, तर आधीच जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावणाऱ्या आपल्या पृथ्वीवरील तापमानवाढ नियंत्रित करणे केवळ अशक्य होईल.

मोठ्या प्रमाणात आगी का?
जुलै ते ऑक्टोबर या काळात या भागात उन्हाळा असतो. या दरम्यान कोरडे हवामान आणि उष्णतेमुळे ॲमेझॉनमध्ये वणवे पेटणे, ही खरेतर नेहमीचीच गोष्ट आहे. मात्र, यंदा ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणामध्ये वणवे पेटले; ते खरोखरच धक्कादायक आहे. अलास्का आणि सैबेरियामधील जंगलांमध्येही नुकतेच वणवे पेटले होते. मात्र, हे वणवे विजा पडल्यामुळे पेटले. तशी इथे सुतराम शक्यता नाही. ॲमेझॉनमध्ये पेटणाऱ्या बहुतांश आगींना माणूसच जबाबदार आहे. 

गेल्या ४० वर्षांमध्ये ॲमेझॉनच्या जंगलाची बेसुमार कत्तल झाली आहे. १९६० च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने वृक्षतोडीला सुरुवात झाली. शेतीसाठी झाडे कापून जमीन स्वच्छ केली गेली. वृक्षतोड केलेली जमीन, शेतीसाठी काही काळच उपयुक्त ठरली. त्यामुळे आधीची जमीन नापिक झाली, की जंगलाचा नवीन भूभाग निवडून, झाडे छाटून शेतकऱ्यांनी तिथे शेती करण्यास सुरुवात केली. गुराढोरांसाठी आणि सोयाबीन लागवडीसाठी ९० च्या दशकामध्ये सर्वाधिक जंगल कापले गेले. कालांतराने वृक्षतोडीचे प्रमाण कमी झाले. २००४ मध्ये ब्राझीलियन सरकारने जंगलामध्ये भूभाग सुरक्षित केले, काही क्षेत्र स्थानिक लोकांसाठी आरक्षित केले. बेकायदा उद्योग करणाऱ्यांना दंड ठोठावला, अटकही केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून २०११-२०१२ मध्ये वृक्षतोड ७५ टक्क्यांनी घटली. 

मात्र, मे महिन्यापासून वृक्षतोडीमध्ये पुन्हा अफाट वाढ झाली. जेअर बोल्सोनॅरो यांची अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर हे प्रमाण वाढल्याचे म्हटले जाते. अनेक ठिकाणी कापणीनंतर शेत पेटवून दिले जाते. तसेच शेतजमिनीचा भूखंड वाढविण्यासाठीही आगी लावल्या जातात. बेकायदा हस्तगत केलेल्या जमिनीच्या किमती वाढविण्यासाठीही आगी लावल्या जातात. मोठाली उभी झाडे आडवी करण्यासाठी चक्क बुलडोझर आणि ट्रॅक्टर्सचा वापर केला जातो. नंतर काही महिन्यांनी शिल्लक राहिलेल्या खोडांना आग लावली जाते. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या वृक्षतोडीमध्ये जुलै २०१९ मध्ये २७८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले. 

संबंधित बातम्या