असुरक्षित समाजमाध्यमे

वैभव पुराणिक
गुरुवार, 5 एप्रिल 2018

वेध

फेसबुक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘केंब्रिज ॲनालिटिका’ या ब्रिटिश कंपनीने ट्रम्प यांच्या प्रचारासाठी फेसबुकच्या ५ ते ६ कोटी सभासदांची माहिती फेसबुकच्या आणि त्या सभासदांच्या परवानगीवाचून वापरल्याचे बाहेर आले आहे. त्यावरून पाश्‍चिमात्य देशात गदारोळ उडाला आहे. अमेरिकन व ब्रिटनमधील सरकारी संस्थांनी फेसबुकची चौकशी सुरू केली आहे. नासडॅक स्टॉक एक्‍स्चेंजवरील फेसबुकच्या शेअरची किंमतही तब्बल १७ टक्‍क्‍यांनी खाली आली आहे. 

नक्की काय घडलं?
हे सर्व प्रकरण उजेडात आले ते ख्रिस्तोफर वायली या कॅनेडियन शास्त्रज्ञामुळे. ख्रिस्तोफर वायली ब्रिटनमधील केंब्रिज ॲनालिटिका या कंपनीत काम करत होता. या कंपनीचे नाव प्रथम एस सी एल ग्रुप असे होते. वायली या कंपनीत २०१३ पासून काम करत होता. या कंपनीला गुंतवणुकीची आवश्‍यकता होती. ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव बॅनन यांनी या कंपनीचा मुख्य अलेक्‍झांडर निक्‍स याची अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती रॉबर्ट मर्सर यांच्याशी ओळख करून दिली. बॅनन अमेरिकन लोकांची राजकीय मते बदलू शकेल अशा कंपनीच्या शोधात होते. एस सी एल ग्रुप ते करू शकेल असा बॅनन यांना विश्वास वाटला. आणि म्हणूनच बॅनन यांच्या शिफारशीवरून रॉबर्ट मर्सर यांनी एस सी एल ग्रुपमध्ये दीड कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली. यातून तयार झालेल्या नवीन कंपनीला केंब्रिज ॲनालिटिका असे नाव देण्यात आले. पैसे तर मिळाले पण अमेरिकन लोकांची राजकीय मते नक्की कशी बदलायची याचा त्यांनी पूर्ण विचार केलेला नव्हता. यासाठी सल्ला घ्यावा म्हणून केंब्रिज ॲनालिटिकाचे शास्त्रज्ञ ख्रिस्तोफर वायला यांनी केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापकांचा सल्ला विचारला. त्यातील एक मानसशास्त्रज्ञ व प्राध्यापक डॉ. अलेक्‍झांडर कोगन यांनी त्यांना एक अभिनव उपाय सुचवला. डॉ. कोगन यांनी ‘धिसइजयुवरडिजीटललाइफ’ (thisisyourdigitallife) नावाचे एक ॲप तयार केले. हे ॲप मानसशास्त्रीय अभ्यासासाठी वापरले जाणार होते. हे ॲप अनेक लोकांनी आपल्या मोबाईल फोनवर डाउनडोड केले. त्यात तुमच्या खासगी आयुष्याविषयी काही प्रश्न विचारले गेले होते. अशी अनेक ॲप बाजारात उपलब्ध आहेत. ही ॲप तुम्हाला काही प्रश्न विचारून तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्हाला सल्ला देतात. परंतु हे ॲप वापरण्यासाठी तुम्हाला फेसबुकचे लॉगिन व पासवर्ड वापरावा लागत असे. आणि तसे करताना हे ॲप तुमच्या प्रोफाइल आणि मित्रांविषयीची माहिती वापरण्याची परवानगी मागत असे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्यासाठी त्याची आवश्‍यकता आहे असे भासवल्याने अनेक लोकांनी अशी परवानगी दिली. सुमारे २.७ लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले व आपली माहिती वापरण्याची परवानगी फेसुबककरवी या ॲपला दिली. २०१४ मध्ये अशा प्रकारची माहिती वापरण्याविषयीचे फेसबुकचे नियम ढिसाळ होते. तुम्ही तुमची माहिती वापरण्याची परवानगी दिलीत की तुमच्या मित्रांची माहिती वापरण्याची परवानगीही अशा ॲपना आपोआपच मिळत असे! म्हणजे २.७ लाख लोक व त्यांच्या सर्व मित्रांची माहिती या डॉ. कोगन यांना मिळाली. फेसबुकवर सरासरी २०० मित्र म्हटले तर अशा प्रकारे अंदाजे ५ ते ६ कोटी अमेरिकन लोकांची फेसबुकवर असलेली सर्व माहिती - त्यांच्या आवडी निवडी, त्यांनी कुठल्या पोस्टला लाइक केले आहे आणि कुठल्या पोस्टला नाही, डॉ. कोगन यांनी जमा केली. आणि ही माहिती त्यांनी केंब्रिज ॲनालिटिकाला उपलब्ध करून दिली! त्यावेळच्या फेसबुकच्या नियमानुसार मित्रांची माहिती गोळा करणे बरोबर असले तरीही अशा प्रकारची माहिती दुसऱ्या कंपनीला देणे मात्र फेसबुकच्या नियमाबाहेरचे होते. ते नियम धाब्यावर बसवून डॉ. कोगन यांनी ही माहिती केंब्रिज ॲनालिटिकाला दिली.

बरं गंमत म्हणजे हे २०१५ मध्येच बाहेर पडले होते! गार्डियन आणि न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रांना हे माहीत होते व त्यांनी याविषयी फेसबुककडे विचारणाही केली होती. फेसबुकने त्यासंदर्भात डॉ. कोगन व केंब्रिज ॲनालिटिकाकडे विचारणाही केली होती. फेसबुकने केंब्रिज ॲनालिटिकाला मिळालेली माहिती ताबडतोब डिलीट करावी अशी नोटीसही पाठवली. केंब्रिज ॲनालिटिकाने तसे केले असल्याचे फेसबुकला कळवले! परंतु प्रत्यक्षात त्यांनी तसे केलेले नव्हते. फेसबुकने ते तपासून पाहिले नाही ही फेसबुकची चूक झाली असे मार्क झकरबर्ग यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. केंब्रिज ॲनालिटिकाने ही माहिती वापरून ‘सायकोग्राफिक प्रोफाइल’ तयार केल्या. सायकोग्राफिक प्रोफाइल म्हणजे एखादी व्यक्ती कुठल्या प्रकारची आहे आणि अशा व्यक्तीचे मत बदलण्यासाठी नक्की काय करावे लागेल याचा अभ्यास. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती पंतप्रधान मोदी यांची चाहती आहे. परंतु ही व्यक्ती केरळमधील असून ती शशी थरुर यांची ऑनलाइन लेखही नेमाने वाचते. ही व्यक्ती मोहनलाल यांचीही चाहती आहे. मग अशा व्यक्तीपुढे शशी थरुर यांचा मोदींवर टीका केलेला लेख ठेवला तर? मोहनलाल यांनी बीजेपीवर टीका केलेली एखादी मुलाखत या व्यक्तीच्या पुढे फेसबुकवर आणून ठेवली तर? तर कदाचित या व्यक्तीचे मोदींविषयीचे मत बदलू शकेल. बरं एवढंच नव्हे पण अशा व्यक्तीचे मत बदलण्यासाठी मोहनलाल किंवा थरुर यांनी मोदींवर टीका केल्याची खोटीच बातमी एखाद्या खोट्या वेबसाइटवर टाकून ही वेबसाइट या व्यक्तीपुढे आणून ठेवली तर?  (हे एक खोटे उदाहरण आहे, अमेरिकन संदर्भातल्या ऐवजी भारतीय संदर्भ वाचकांना पटकन कळतील म्हणून ते तसे दिले आहे). अशा प्रकारे माहितीचा वापर करून लोकांचे काही गटात विभाजन करून प्रत्येक गटाच्या लोकांना फेसबुकमध्ये वेगळ्या जाहिराती दाखवायच्या. या जाहिरातीमध्ये इतर कुठल्यातरी वेबसाइटच्या लिंक अथवा खोट्या बातम्या असायच्या. मग ही व्यक्ती त्या जाहिरातींना नक्की कशी प्रतिसाद देते याचाही अभ्यास करायचा. जर या व्यक्तीने या जाहिरातीमधील लेखांवर क्‍लिक केले नाही तर अजून वेगळ्या जाहिराती दाखवायच्या. आणि ती व्यक्ती तुमच्या अपप्रचाराला बळी पडेपर्यंत असे करत राहायचे! फेसबुकची माहिती वापरून फेसबुकवरच जाहिराती दाखवून लोकांचे मत एखाद्या राजकीय मुद्याविषयी अथवा राजकीय व्यक्तीविषयी बदलायचे! हा केंब्रिज ॲनालिटिकाचा मुख्य व्यवसाय होता व तो त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांचा प्रचार करण्यासाठी वापरला. ट्रम्प यांनी प्रचार करताना जे मुद्दे आपल्या भाषणातून मांडले त्यांची चाचणी अशा प्रकारे घेतली होती. मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्याची कल्पना लोकांना आवडेल असे अशा प्रकारच्या अभ्यासातून स्पष्ट झाले असे ख्रिस्तोफर वायली यांनी गार्डीयनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

इथे एक गोष्ट समजून घेणे आवश्‍यक आहे. सर्वप्रथम जाहिराती दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या माहितीचा वापर सर्वच राजकीय पक्ष अमेरिकेत करतात. भारतातही त्याची सुरवात झाली आहे, परंतु अमेरिकेच्या मानाने डिजिटल ॲडव्हर्टायझिंग क्षेत्र भारतात बाल्यावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. मी स्वतः गेली दहा वर्षे डिजिटल जाहिरातीच्या क्षेत्रात अमेरिकेत काम करत आहे. जाहिराती दाखवण्यासाठी अचूक व्यक्ती निवडणे हे एक मोठे क्षेत्र आहे व त्यात अक्षरशः लाखो लोक काम करतात. माझ्या कंपनीतील शास्त्रज्ञही अशाच प्रकारचे काम करतात. परंतु आम्ही व इतर बहुतेक कंपन्या परवानगीशिवाय जमा केलेली माहिती वापरत नाहीत. आमच्याकडे फेसबुकची इतक्‍या प्रमाणात माहिती उपलब्धच नसते. फेसबुकचे नियम आता बऱ्यापैकी कडक आहेत. आम्ही इन्स्टाग्राम आणि ट्‌विटरची माहिती वापरतो. परंतु आमच्याकडील बहुतेक माहिती ही ॲनानिमस म्हणजेच अनामिक असते. एखाद्या व्यक्तीला काय आवडते याचा अंदाज आम्ही लावला तरी त्या व्यक्तीचे नाव काय हे आम्हाला माहीत नसते. परंतु फेसबुक आणि गुगल यांना मात्र अशा व्यक्ती नक्की कोण आहेत हे त्यांच्या ॲपना लॉगिन केल्यामुळे माहीत असते. फेसबुक व गुगलही अशा प्रकारचा अभ्यास स्वतः करतात व ज्यांना फेसबुकवर जाहिरात करायची आहे त्यांना जाहिरात करताना लोक निवडायची संधी देतात. यालाच जाहिरातीच्या क्षेत्रात ‘ऑडियन्स टारगेटींग’ असे म्हणतात. परंतु अशी संधी देताना फेसबुक ती व्यक्ती नक्की कोण आहे हे जाहिरातदारांना सांगत नाही. उदाहरणार्थ एखाद्या चॉकलेट विकणाऱ्या कंपनीला गोड आवडणाऱ्या लोकांना आपल्या जाहिराती दाखवायच्या आहेत. फेसबुकच्या जाहिराती देण्याच्या सॉफ्टवेअरमधून तुम्ही गोड आवडणारे लोक निवडू शकता. पण इथे फेसबुक फक्त तुम्हाला अंदाजे किती लोकांना गोड आवडते एवढेच सांगते, ते नक्की कोण लोक आहेत हे मात्र सांगत नाही. तुमची जाहिरात तुम्ही पैसे दिल्यावर फेसबुक गोड आवडणाऱ्या लोकांना बरोबर दाखवेल आणि त्यावर किती लोकांनी क्‍लिक केले हे ही तुम्हाला सांगेल. पण नक्की कोणी क्‍लिक केले हे मात्र सांगणार नाही. केंब्रिज ॲनालिटिकाकडे मात्र लोकांची नुसती अनामिक माहिती नव्हती, तर नावासकट माहिती होती. आणि ही माहिती फेसबुकचे नियम धुडकावून गोळा केलेली होती हे अधिक महत्त्वाचे आहे. आणि फेसबुकने अशा प्रकारची माहिती बाहेरील लोकांच्या हाती पडू नये म्हणून पुरेशी काळजी घेतली होती का ? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच अमेरिकन सरकारचे फेडरल ट्रेड कमिशन फेसबुकची तपासणी करत आहे. ब्रिटनमध्येही काही सरकारी संस्था फेसबुक व केंब्रिज ॲनालिटिकाची तपासणी करत आहेत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा प्रकारचे ‘टारगेटींग’ नक्की किती परिणामकारक असते? त्यामुळे प्रत्यक्ष लोक आपली मते बदलतात का? केंब्रिज ॲनालिटिका जेव्हा राजकीय पक्षांना आपली सेवा विकते तेव्हा अशा प्रकारचे टारगेटींग परिणामकारक असल्याचे सांगते. परंतु प्रत्यक्षात ते तेवढा फरक पाडू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे अनेक लोक जाहिरातींकडे साफ दुर्लक्ष करतात. अर्थात केंब्रिज ॲनालिटिकासारख्या कंपन्या आपल्या जाहिराती, जाहिराती नाहीच असे भासवतात आणि त्याला अनेक लोक बळी पडतात. परंतु आजकाल लोक तेही ओळखायला लागले आहेत. तसेच फारच कमी लोक आपल्या फेसबुक फिडमधून राजकीय लिंकवर क्‍लिक करून पुढे वाचत राहतात. सर्वसाधारण लोकांना फीड पटकन पाहायचा असतो. त्यातही आपल्या खास मित्रांनी शेअर केलेल्या गोष्टीच त्यांना पाहायच्या असतात. परंतु काही लोक मात्र या खोट्या बातम्यांच्या लिंक शेअर करतात व त्यामुळे या लिंकना एक प्रकारचे वजन प्राप्त होते. 

आपल्या मित्राने शेअर केलेली गोष्ट अथवा लेख खराच असला पाहिजे असा ठाम विश्वास असणारे लोक मी सर्वत्र पाहिले आहेत. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर असलेल्या गोष्टींवर न तपासता विश्वास आपण सर्वच ठेवत असतो. व्हॉट्‌स ॲपमधून दररोज कोट्यवधी ग्रुपमधून अशा प्रकारचे अनेक राजकीय मेसेजेस पास होत असतात. आपण ते खरे आहेत की नाही याची शहानिशा न करता ते एकमेकांना फॉरवर्ड करत राहतो आणि केंब्रिज ॲनालिटिकासारख्या कंपन्यांचे खिसे भरत राहतो. मी स्वतः माझ्या नातेवाइकांनी व्हॉटसॲपवर पाठवलेले कित्येक लेख खरे नाहीत हे ओळखून त्यांना दाखवून दिले आहेत. परंतु ते त्यातून शिकत नाहीत. आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या मार्केटींगचा परिणाम होतो असे माझे मत बनले आहे. तो प्रत्यक्ष एखाद्या निवडणुकीचा निकाल बदलण्याइतपत आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. 

फेसबुकने या सर्व प्रकाराबद्दल लोकांची विनाशर्त माफी मागितली असून अशा प्रकारचा विनापरवानगी माहितीचा वापर रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. फेसबुक आता ज्या कंपन्यांना व ॲपना अशाप्रकारे लोकांच्या फेसबुक अकाउंटमधील माहिती वापरण्याची परवानगी आहे त्यांची कसून तपासणी करणार आहे. त्यातील संशयित ॲपची परवानगी काढून घेण्यात येईल. अशा प्रकारचे एखादे ॲप जर अकाउंट धारकाने तीन महिने वापरले नसेल तर त्यांचा माहितीचा वापर करण्याची परवानगी काढून घेतली जाईल. तसेच फेसबुकने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित अनेक वेगवेगळे सॉफ्टवेअर बनवले असून राजकीय जाहिराती करणाऱ्यांवर या सॉफ्टवेअरकरवी नजर ठेवली जाणार आहे. एवढेच नव्हे तर मार्क झकरबर्गने फेसबुकवर सरकारने निर्बंध घातले तर ते मानायचीही तयारी दर्शवली आहे. ॲड ट्रान्स्परन्सी बिल - जाहिरातदारांची यादी लोकांच्या माहितीसाठी जाहीर करण्यासाठीचे अनेक कायद्यांचा मसुदा अमेरिकन संसदेपुढे पडून आहे. अशा प्रकारच्या कायद्यालाही मार्क झकरबर्गने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे कोण जाहिरातदार कशा जाहिरातींवर करत आहेत ही माहिती सर्व लोकांना उपलब्ध करून दिली जाईल. एवढेच नव्हे तर भविष्यात अशा प्रकारचे माहिती चोरीला गेल्यास ज्यांची माहिती चोरीस गेली आहे त्यांना त्याविषयी कळवले जाईल असेही फेसबुकने म्हटले आहे. काही लोकांच्या मते फेसबुकला उशिरा जाग आली आहे. फेसबुकने अशा प्रकारची पावले २०१५ मध्येच उचलायला हवी होती. तसेच इंटरनेटवर अनेकांनी ‘डिलीट फेसबुक’ मोहीम सुरू केल्यानंतर मार्क झकरबर्ग यांनी या प्रकरणावर आपले तोंड उघडले आहे असा आरोपही काही लोकांनी इंटरनेटवर केला आहे.   

या सर्व वादात आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. जी माहिती आपण इंटरनेटवर शेअर करतो ती जाहिरातदारांच्याही हाती लागणारच. म्हणूनच आपली महत्त्वाची माहिती फेसबुक, ट्‌विटर अथवा इन्स्टाग्रामकरवी कधीही शेअर करू नये. फेसबुकसारख्या साइटचा जन्मच  माहिती लोकांपुढे आणण्यासाठी झाला आहे. माहितीचा असा वापर संपूर्णपणे थांबवण्याचा एकच उपाय आहे - तो म्हणजे फेसबुकचा वापर करणे पूर्ण बंद करणे.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या