वॉलमार्टचे भारतात आगमन

वैभव पुराणिक
गुरुवार, 17 मे 2018

वेध
 

लमार्टने फ्लिपकार्टला तब्बल १६ अब्ज डॉलर्स (१ लाख कोटी रुपये) खर्च करून आपल्या कार्टमध्ये टाकले आहे! याआधी बाहेर पडलेल्या बातमीपेक्षा ही रक्कम तब्बल ४ अब्ज डॉलर्सनी जास्त आहे! एवढेच नव्हे तर २ अब्ज डॉलर्स जास्त द्यायला तयार असूनही ॲमेझॉनची मागणी फ्लिपकार्टने धुडकावून टाकल्याचेही बातमी आता बाहेर आली आहे!  

या व्यवहाराचे भारतावर आणि जगावर मोठे आर्थिक परिणाम होण्याची शक्‍यता आहे. या व्यवहारासाठी फ्लिपकार्टची एकूण किंमत तब्बल २०.७७ अब्ज डॉलर्स इतकी ठरवण्यात आली. मार्च २०१८ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात फ्लिपकार्टने तब्बल ७.५ अब्ज डॉलर्सची विक्री केली. म्हणजेच एकूण विक्रीच्या तिप्पट किंमत वॉलमार्टने मोजली. या व्यवहाराविषयी अमेरिकेतील प्रतिक्रिया मात्र संमिश्र आहे. काही तज्ञांच्या मते वॉलमार्टने फ्लिपकार्टसाठी गरजेपेक्षा बरेच जास्त पैसे मोजले. किंबहुना त्याच मुळे वॉलमार्टचे शेअर न्यूयॉर्क स्टॉक एक्‍सेंजवर तब्बल ४ टक्‍क्‍याने घसरले. या घसरणीमुळे वॉलमार्टचे बाजारपेठेतील भांडवल (मार्केट कॅप) तब्बल १० अब्ज डॉलर्सने घसरले!  या तज्ञांच्या मते भारतीय रिटेल क्षेत्र पाश्‍चिमात्य देशांपेक्षा खूपच लहान आहे. तसेच फ्लिपकार्टला फायदा कमवायला अजून बरीच वर्षे लागतील असेही तज्ञांचे मत आहे. सध्या १० कोटी भारतीय लोक ऑनलाइन वस्तू खरेदी करतात. २०१७ मध्ये या दहा कोटी लोकांनी ३८ अब्ज डॉलर्सच्या वस्तू ऑनलाइन खरेदी केल्या. परंतु हे प्रमाण २०२७ पर्यंत तब्बल २०० अब्ज डॉलर्सवर पोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वॉलमार्टने सध्याची परिस्थिती न पाहता भविष्यावर डोळे ठेवूनच हा व्यवहार केलेला आहे. सर्वच तज्ञांच्या मते फ्लिपकार्टच्या दृष्टीने हा सौदा अतिशय फायदेशीर आहे. मुख्य म्हणजे ॲमेझॉनबरोबरील युद्धात टिकून राहण्यासाठी फ्लिपकार्टला अधिक भांडवलाची ताबडतोब आवश्‍यकता होती. आतापर्यंत झालेल्या सर्व सौद्यात एखाद्या परदेशी कंपनीने भारतीय कंपनी विकत घेण्यासाठी दिलेली ही सर्वांत अधिक किंमत आहे. या सौद्यामुळे फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन व बिनी बन्सल यांची नावे इतिहासात कोरली जातील. मासायोशी सन यांच्या सॉफ्टबॅंक व्हीजन फंडने फ्लिपकार्टमध्ये २०१७ च्या ऑगस्टमध्ये २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यांना या सौद्यामुळे आता ४ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. म्हणजेच केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी दीड अब्ज डॉलर्सची कमाई केली. आठ वर्षापूर्वी ‘ॲक्‍सेल’ व ‘टायगर ग्लोबल’ या दोन धाडसी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी फ्लिपकार्टमध्ये ५ कोटी डॉलर्स या एकूण किमतीवर (व्हॅल्यूएशन) गुंतवणूक केली होती. आता २० अब्ज डॉलर्स किंमत ठरवल्याने त्यांना आपल्या गुंतवणुकीच्या ४०० पट पैसे परत मिळाले आहेत! 

वॉलमार्टने एवढे पैसे खर्च करून नक्की काय मिळवले या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. मुख्य म्हणजे ॲमेझॉनची जगभर चाललेली घौडदौड भारतामध्ये थांबवण्यासाठी वॉलमार्टने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. या व्यवहारामुळे वॉलमार्ट भारतीय इ-कॉमर्स बाजारपेठेत ॲमेझॉनच्या पुढे जाऊन क्रमांक १ ची कंपनी बनली आहे. भारतामध्ये मल्टीब्रॅंड रिटेल क्षेत्रात परदेशी कंपन्यांना प्रत्यक्ष स्टोअर विकत घेण्यावर बंधने आहेत. इ-कॉमर्स वेबसाइट विकत घेऊन, वॉलमार्टने भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उतरण्याची एक प्रकारे वाट शोधून काढली आहे. वॉलमार्टची वाढ गेल्या काही वर्षात जवळजवळ थांबली होती. स्टॅटीस्टा डॉट कॉमवरील आकड्यानुसार २०१५, २०१६ आणि २०१७ या वर्षात वॉलमार्टची विक्री वाढलीच नाही तर किंचितशी कमीच झाली. फ्लिपकार्टसारख्या जोमाने वाढणारी इ-कॉमर्स वेबसाइट विकत घेऊन वॉलमार्टने आपली विक्री पुन्हा एकदा वाढेल याची एक प्रकारे हमीच शेअरधारकांना दिली आहे.

वॉलमार्टचा या नवीन कंपनीचे समभाग भारतीय स्टॉक एक्‍सेंजवर विकण्याचाही बेत आहे. व्यवहारातील शर्तीप्रमाणे १४ टक्के समभागाची मालकी असणारे शेअरधारक वॉलमार्टला तसे करण्यास ४ वर्षांनी भाग पाडू शकतात. २३ टक्के समभाग वॉलमार्टव्यतिरीक्त इतर शेअरधारकांकडे असल्याने ही शक्‍यता मोठी असल्याचे ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या २३ टक्के समभागधारकात मायक्रोसॉफ्ट, चीनची टेनसेंट, अमेरिकेतील टायगर ग्लोबल मॅनेजमेंट आणि संस्थापक बिन्नी बन्सल यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टचे दुसरे संस्थापक सचिन बन्सल यांनी आपले सर्व समभाग या व्यवहारात विकून टाकले आहेत आणि त्यामुळे त्यांची फ्लिपकार्टच्या भविष्यात काहीही भूमिका असणार नाही. वॉलमार्टशी झालेल्या करारानुसार पुढील १८ महिन्यात सचिन बन्सल यांना फ्लिपकार्टशी स्पर्धा करणारी नवीन कंपनी काढता येणार नाही. तसेच पुढील ३६ महिन्यात फ्लिपकार्टशी स्पर्धा करणाऱ्या कंपनीत मॅनेजमेंट जागेवर रुजू होता येणार नाही. फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती व फ्लिपकार्टसकट इतर सर्व कंपन्यांच्या ग्रुपचे सीईओ बिन्नी बन्सल आपल्या जागा कायम ठेवणार आहेत. इथे वाचकांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्‍यक आहे, फ्लिपकार्टमध्ये फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाइट व्यतिरिक्त इतरही काही ब्रॅंड आहेत. ‘मिंत्रा’ व ‘जबाँग’ या फॅशन वेबसाइट, फोन-पे ही ऑनलाइन पेमेंट घेणारी कंपनी, इकार्ट आणि ‘जीव्हस डॉट को डॉट इन’ हे या ग्रुपमधील इतर ब्रॅंड आहेत.  

या व्यवहाराचे भारतीय बाजारपेठेवर व अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होऊ शकतात. या व्यवहारामुळे सचिन व बिन्नी बन्सल डॉलर्समधील अब्जाधीश बनले आहेत! त्यांच्या व्यतिरिक्तही फ्लिपकार्टमधील अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. हे पैसे पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत गुंतवले जातील यात मला अजिबात शंका नाही. या भांडवलातून अनेक नवीन कंपन्यांचा जन्म होईल. अनेक धाडसी गुंतवणुका होतील. नवीन कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी भांडवल उपलब्ध होईल. आणि त्यातील कुठलीतरी कल्पना भविष्यात एवढीच मोठी होऊन पुन्हा एकदा असाच एखादा मोठा व्यवहारही होऊ शकेल. या व्यवहारामुळे एक प्रकारे बाजारपेठेत साखळी अभिक्रियाच (चेन रिॲक्‍शन) तयार होईल. आणि म्हणूनच या व्यवहाराचे महत्त्व २० अब्ज डॉलर्सपेक्षा बरेच मोठे आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवहारामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची पत पुन्हा एकदा वाढेल. वॉलमार्टसारखी कंपनी जेव्हा भारतामध्ये १६ अब्ज डॉलर्स घालते त्याचा अर्थ भारतीय बाजारपेठेकडे ते पैसे अनेक पटींनी परत करण्याची क्षमता आहे असाच होतो. अनेक इतर कंपन्या त्यामुळे भारतीय कंपन्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतील. या व्यवहारामुळे फ्लिपकार्टशी स्पर्धा करण्यासाठी ॲमेझॉनही भारतीय बाजारपेठेत आपली गुंतवणूक वाढवेल अशी तज्ञांची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना वस्तू ऑनलाइन अधिक स्वस्तात उपलब्ध होतील. वॉलमार्टची भारतीय वस्तू इतर जागतिक बाजारपेठेत विकायचीही महत्त्वाकांक्षा आहे. म्हणजेच भारतात बनवलेल्या वस्तू वॉलमार्ट डॉट कॉमवर व वॉलमार्टच्या दगडमातीच्या स्टोअरमध्ये आता जगभरात मिळू शकतील. एकप्रकारे भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठ सुलभरीत्या उपलब्ध होईल. 

याचे महत्त्व समजण्यासाठी आपण गेल्या वर्षीच्या वॉलमार्टच्या विक्रीची ॲमेझॉनच्या विक्रीशी तुलना करुया. गेल्या वर्षी वॉलमार्टने तब्बल ४९६ अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकल्या तर ॲमेझॉनने तब्बल १७७ अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकल्या. आणि ॲमेझॉनच्या या विक्रीत त्यांच्या क्‍लाऊड कॉम्प्युटिंग व्यवसायाचीही विक्री आहे. वॉलमार्ट ही विक्रीच्या दृष्टीने ॲमेझॉनपेक्षा दुपटीहूनही मोठी कंपनी आहे! एवढी मोठी कंपनी जर भारतीय वस्तू जगभरात विकू लागली तर त्याचा भारतीय व्यावसायिकांना किती फायदा होईल याची आपल्याला सहज कल्पना करता येणार नाही. या व्यवहाराचा अजून एक फायदा म्हणजे ॲमेझॉन व वॉलमार्ट या दोन्हीही कंपन्या आपले तंत्रज्ञान भारतात अधिक प्रमाणात आणतील व त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्राचीही भारतात प्रगती होईल. उदाहरणार्थ अमेरिकेत ॲमेझॉनने रोबो वापरून अतिशय किफायतीशीरपणे चालणारी गोडाऊन बनवली आहेत. यात ग्राहकांनी ऑर्डर केल्यावर वस्तू रोबोच्या साहाय्याने पॅक होऊन रोबोच्याच साहाय्याने कुरिअर केली जाते. तसेच ॲमेझॉन व वॉलमार्टच्या ऑनलाइन विक्रीमुळे अमेरिकन पोस्टल सेवेलाही गेल्या काही वर्षात मोठा फायदा झाला आहे. ॲमेझॉन बहुतेक वेळा कुरिअर कंपन्या वापरत असली तरीही अमेरिकेतील काही गावात आजही पोस्टाचीच सेवा उपलब्ध आहे. तसेच पोस्टल सेवेचे दर कमी असल्याने अनेक वेळा पोस्टल सेवा वापरणेच ॲमेझॉनसाठी फायदेशीर ठरते. भारतातही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे वॉलमार्ट आणि ॲमेझॉनच्या अधिक गुंतवणुकीमुळे भारतीय पोस्टल सेवेलाही फायदा होण्याची शक्‍यता आहे. या कंपन्यांनी केलेल्या जाहिरातींमुळे व मार्केटींगमुळे अधिकाधिक लोक ऑनलाइन वस्तू खरेदी करतील. आणि त्यामुळे अधिकाधिक पैसे ऑनलाइन सेवा वापरून दिले जातील. त्यामुळे भारतातील ऑनलाइन पेमेंटच्या प्रमाणातही वाढ होईल. भारतीय सरकारच्या काळ्या पैशाला आळा घालण्याच्या मोहिमेला एक प्रकारे अधिक चालना मिळेल.

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहार हा भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल. माझ्या मते एकप्रकारे भारतीय बाजारपेठ वयात आल्याचा हा पुरावा आहे. या व्यवहाराचा भारताला मोठ्या प्रमाणावर फायदाच होईल.

संबंधित बातम्या