कलेचा असाही एक उपयोग...

अश्‍विनी जाधव-केदारी
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

विशेष
 

प्रत्येक माणसात काही कलागुण असतात. या कलागुणांना वाव देत अनेकजण विविध छंद जोपासतात. आपल्या कलेचा उपयोग कोणाला कसा होईल हे काही सांगता येत नाही. पुण्यातील सासवड भागातील एक अवलिया अनेक प्राणी पक्षांच्या आवाजाची नक्कल करतो. त्याच्या याच कलेमुळे त्याला चक्क दशक्रिया विधीच्या वेळी कावळ्यांना बोलावण्यासाठी आमंत्रणे मिळत आहेत. 

पन्नासपेक्षा अधिक प्राणी पक्ष्यांचा आवाज काढणाऱ्या या अवलियाचे नाव आहे सुमेधबोधी वाघमारे. सुमेध हा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील कलागाव या गावचा आहे. शिक्षणानिमित्त तो पुण्यामध्ये आला. सासवडमधील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयात तो शिकतो. त्याला विविध पाळीव प्राणी आणि पक्षांचे आवाज काढता येतात. आश्‍चर्य म्हणजे सुमेध या पशू पक्ष्यांचे इतके हुबेहूब आवाज काढतो, की त्याने काढलेल्या आवाजाला प्राणी पक्षी प्रतिसादही देतात.

सासवडच्या संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी तळावर तो रोज सकाळी व्यायामासाठी जातो. आजूबाजूच्या लोकांना त्याचे हे कसब माहिती झाल्याने ते त्याला पक्ष्यांचा आवाज काढण्याचा आग्रह करतात. त्यांच्या आग्रहाखातर सुमेधही कावळा, पोपट, चिमणी, खंड्या पक्षी, मोर या सर्व पक्षांचा हुबेहूब आवाज काढतो. त्याच्या आवाजाला पक्षांनी दिलेला प्रतिसाद पाहून सर्वांचे मनोरंजन होते. एक दिवस कावळ्याचा आवाज काढल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील कावळे जमा झाले आणि त्याला प्रतिसाद देऊ लागले. त्यावेळी उपस्थित असलेला एक जण सहजच म्हणाला, ‘सुमेध आमच्या गावात दशक्रिया विधीला काकस्पर्श लवकर होत नाही, लोक कंटाळून जातात, तू येशील का कावळ्यांना बोलायला?’ संबंधित व्यक्तींच्या निमंत्रणाला मान देऊन सुमेध त्या गावाला गेला आणि त्याने काढलेल्या आवाजामुळे खरोखर कावळे जमले. काही दिवसातच सुमेधला अनेक ठिकाणांहून आमंत्रणे येऊ लागली. आतापर्यंत चक्क दहा ते बारा दशक्रिया विधीची आमंत्रणे त्याला मिळाली आहे आणि या कार्यक्रमांचे मानधनसुद्धा. सुमेधच्या या कलेचा असाही उपयोग झाल्याने तोही आश्‍चर्य व्यक्त करतो.

मुळातच सुमेधला प्राणी आणि पक्षांची आवड आहे. सासवड परिसरातील वाघडोंगर आणि जवळपासच्या टेकड्यांवर, महाविद्यालयाच्या झाडांवर मातीची भांडी पाण्याने भरून ठेवतो, तसेच पक्षांना दाणेही ठेवतो. साहजिकच त्याच्या या पक्षीप्रेमामुळे पक्षीही त्याला तत्काळ प्रतिसाद देतात, विविध प्राणीपक्ष्यांचे आवाज काढण्याची कला त्याने लहानपणापासूनच आत्मसात केली आहे. शेळ्या-मेंढ्यांचा, त्यांच्या पिल्लांचा कावळ्याचा, सुतार पक्षाचा, मोराचा असे अनेक पक्ष्यांचे आवाज सुमेध लीलया काढतो.

बरं पक्षांमधील नर आणि मादीचा वेगवेगळा आवाज काढण्यातही हा पठ्ठ्या पटाईत आहे त्यामुळे कोकीळ आणि कोकिळा, 
मोर आणि लांडोर असा वेगवेगळा आवाजही तो काढतो. खंड्या अर्थात किंगफिशरचा आवाज, चिमणीचा आवाजही हुबेहूब 
काढतो. कोंबड्यांचा  आवाज तर विचारायलाच नको, पाळीव प्राणी पक्षांव्यतिरिक्त गाड्यांचे, वेगवेगळ्या कार्टून्समधील पात्रांची तसेच काही अभिनेत्यांचे, लहान बाळाचा हसण्याचा, रडण्याचा सगळे आवाज सुमेध हुबेहूब काढतो.

सुमेधची घरची परिस्थिती तशी जेमतेम आहे, शाळांमध्ये तो कार्यक्रम घेतो आणि मिळालेल्या मानधनातून त्याच्या शिक्षणाला हातभार लावतो. अशा परिस्थितीतही प्राणीपक्षांसाठी असलेला जिव्हाळा त्याच्या वागण्यातून दिसतो, त्याच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेवटी काय निसर्गावर आपण प्रेम केले तर निसर्गातील प्रत्येक घटक तुम्हाला आपलंसं करतो हे नक्की...  
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या