अमेरिकेतील राजकीय गोंधळ

वैभव पुराणिक
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

विशेष
 

अमेरिकन राजकीय व्यवस्थेत गेल्या दोन वर्षापासून अध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे एक प्रकारचा गोंधळ चालू आहे. गेल्या दोन वर्षापासून दर आठवड्याला काही न काही नवीन घडामोडी घडत आहेत. आताशा अमेरिकन लोकांनी राजकीय बातम्या वाचायच्याच सोडून दिल्या आहेत. परंतु अधून मधून अशा गोंधळातूनही उठून दिसणाऱ्या, लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या घटना घडतात. गेल्या एक-दोन आठवड्यातील दोन घटना अशाच प्रकारच्या आहेत. त्यांनी अमेरिकन लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्यातील पहिली घटना म्हणजे नुकतेच बाजारात आलेले बॉब वुडवर्ड यांचे पुस्तक ‘फिअर’! ट्रम्प यांच्या व्हाइट हाउसमधील गोंधळ जगापुढे जाहीर करणारी अनेक पुस्तके बाजारात आली आहेत. मायकल वुल्फ यांचे ‘फायर अँड फ्युरी’ हे पुस्तक अमेरिकेत फारच गाजले. इतरही अनेक पुस्तके २०१८ मध्ये बाजारात आली, पण हे पुस्तके लिहिणाऱ्यांची प्रतिष्ठा बॉब वुडवर्ड यांच्या इतकी नव्हती. त्यामुळे फायर अँड फ्युरीमध्ये कितपत सत्य आहे यावर अनेकांनी शंका व्यक्त केली. परंतु बॉब वुडवर्ड हे जागतिक कीर्तीचे पत्रकार आहेत. बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टीन या दोन पत्रकारांनी १९७२ मध्ये वॉटरगेट प्रकरण जगापुढे फोडून अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी जवळजवळ प्रत्येक अध्यक्षांवर एक तरी पुस्तक लिहिले आहे. आणि या सर्वच पुस्तकांना जनतेची व प्रसारमाध्यमांची मान्यता मिळाली आहे. बॉब वुडवर्डने एखादी गोष्ट सांगितली तर ती १०० टक्के खरी असणार अशी त्यांची प्रतिष्ठा आहे. आणि त्यामुळेच या पुस्तकाचे महत्त्व इतर पुस्तकांच्या तुलनेने जास्त आहे. 

बॉब वुडवर्डनी या पुस्तकात अनेक धक्कादायक अशा वाटणाऱ्या घटना कथन केल्या आहेत. अशा एका घटनेमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दक्षिण कोरियाबरोबर असलेला व्यापारविषयक करार रद्द करायचा ठरवला. परंतु हा निर्णय त्यांनी कोणाही महत्त्वाच्या व्यक्तीला विचारून घेतला नव्हता व या निर्णयामुळे अमेरिकेचेच नुकसान झाले असते! त्यामुळे अध्यक्षांचे अर्थविषयक सल्लागार गॅरी कोहन व व्हाइट हाउस स्टाफ सेक्रेटरी रॉब पोर्टर यांनी त्याविषयीचे कागदपत्र ट्रम्प यांच्या टेबलावरून पळवून नेले! या कागदपत्रावर ट्रम्प यांनी सही केली असती तर करार रद्द झाला असता! आणि त्यानंतर ट्रम्पही त्याविषयी विसरले आणि त्यामुळे हा करार जसा होता तसाच राहिला! अध्यक्ष ट्रम्प यांना अशा प्रकारची अनेक कागदपत्रे नाहीशी झाल्याचे कधीच कळले नाही! आणि एखादवेळा जेव्हा कळले तेव्हा त्यांनी आरडा ओरडा करून काही कागदपत्र मागवून घेतले असे या पुस्तकात बॉब वुडवर्ड यांनी म्हटले आहे. या पुस्तकानुसार गॅरी कोहन व अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस हे ट्रम्प यांना अर्थव्यवस्था, सेना व जागतिक संबंध याविषयी काहीच कसे कळत नाही याची चर्चा करत असत! एवढेच नव्हे तर एकदा ट्रम्प यांनी सुरक्षाविषयक अधिकाऱ्यांना अफगाणिस्तानाविषयी बोलताना म्हटले - ‘तुमचे काम लोकांना मारण्याचे आहे. त्यासाठी तुम्हाला धोरण कशाला पाहिजे?’ 

अमेरिकेत ‘व्हाइट हाउस चीफ ऑफ स्टाफ’ हा अतिशय महत्त्वाचा हुद्दा आहे. त्याचे महत्त्व उपाध्यक्षापेक्षाही जास्त असते. उपाध्यक्षानंतर सरकारमधील हा सर्वांत मोठा अधिकारी मानला जातो. माजी जनरल जॉन केली हे ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ आहेत. परंतु त्यांनाही ट्रम्प यांच्याविषयी आदर नाही. या पुस्तकानुसार एका मिटींगमध्ये त्यांनी म्हटले आहे - ‘तो(ट्रम्प) इडियट आहे. त्याला काहीही सांगून फायदा नाही. त्याची गाडी रुळावरून उतरली आहे. आपण सर्व वेड्यांच्या बाजारात आहोत!’ अध्यक्ष ट्रम्प यांचा निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या संस्थांची सध्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) चौकशी चालू आहे. या प्रचार करणाऱ्या लोकांचे रशियाबरोबर संबंध होते का? हे एक विशेष तपास अधिकारी तपासून पहात आहे. अमेरिकेत विशेष तपास अधिकाऱ्याकरवी अध्यक्षांचीही चौकशी होऊ शकते! हे विशेष तपास अधिकारी रॉबर्ट म्युलर ट्रम्प यांना चौकशीसाठी बोलावतील का यावर सध्या चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या प्रचार संस्थांतील दोन लोकांना न्यायालयाने विविध कारणास्तव दोषी ठरवले आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांच्या वैयक्तिक वकिलालाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे! या पुस्तकानुसार जॉन दाऊद - ट्रम्प यांचे माजी वकील यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितले होते -  ‘तुम्ही या प्रकरणात साक्ष देऊ नका, साक्ष दिलीत किंवा तुमची रॉबर्ट म्युलरने उलटतपासणी घेतली तर तुम्हाला शिक्षा होईल!‘ एवढेच नव्हे तर जॉन दाऊद यांच्या मते ट्रम्प यांची अशा प्रकारच्या उलटतपासणीला तोंड देण्याची क्षमताच नाही!  तसेच ट्रम्प अशा उलटतपासणीत खोटे बोलतील व ते बाहेर येऊन न्यायालय त्यांना शपथेवर खोटे बोलल्याबद्दलही शिक्षा करू शकते असे मत दाऊद यांनी व्यक्त केले आहे. खुद्द बॉब वुडवर्ड यांनी आपण पुस्तकात दिलेल्या अनेक गोष्टी  व्हाइट हाउसच्या आजी व माजी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे म्हटले आहे. तसेच या लोकांच्या मुलाखती आपल्याकडे ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

या पुस्तकात काही मजेशीर गोष्टीही आहेत. एक मजेशीर गोष्ट म्हणजे ट्रम्प हे आपली लोकप्रिय ट्‌विट आपल्या सेक्रेटरीकडून प्रिंट करून घेतात. का - तर त्याचा अभ्यास करण्यासाठी! ट्रम्प हे सकाळी आपल्या बेडरुम व बाथरुममधून ट्‌विट करतात. या पुस्तकानुसार ट्रम्प यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ रायन्स प्रीबस ज्या बेडरुममधून ट्रम्प ट्‌विट करतात त्याला ‘सैतानाची कार्यशाळा’ असे म्हणत असत! आणि ट्रम्प जेव्हा सकाळी किंवा रात्री ट्‌विट करतात त्या वेळेला प्रीबस ’विचिंग हवर’ (जादूटोण्याचा तास) असे म्हणत असत! एवढंच नव्हे तर रायन्स प्रीबस यानी व्हाइट हाउसच्या त्यावेळच्या परिस्थितीचे मजेशीर वर्णनही केले आहे - तुम्ही एखाद्या प्राणिसंग्रहालयात जर एका सापाला, ससाण्याला, सशाला, शार्कला आणि सीलला कुठल्याही भिंतीशिवाय एकत्र ठेवलेत तर रक्त सांडणार नाही का? आमचे व्हाइट हाउस असे आहे!

बरं या पुस्तकाविषयीची प्रसारमाध्यमातील चर्चा पुरेशी नव्हती म्हणून की काय सप्टेंबर ५ रोजी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक निनावी लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखाचे शीर्षक होते - मी ट्रम्प यांच्या सरकारमध्ये राहून त्यांचा विरोध करीत आहे! या लेखाचा लेखक ट्रम्प सरकारमधील उच्च पदावरील मंत्री अथवा अधिकारी आहे असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. या लेखात लेखकाने आपण स्वतः व इतर अनेक अधिकारी ट्रम्प यांच्यापासून अमेरिकेचे रक्षण करायचा प्रयत्न करत आहेत असे म्हटले आहे! या लेखकाच्या मते अध्यक्ष ट्रम्प यांच्या लहरींमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा झटक्‍यामध्ये ते अनेक वेळा देशाचे नुकसान करण्याचा निर्णय घेतात आणि मी व इतर अनेक मंत्री, सल्लागार व अधिकारी त्यांनी घेतलेले असे निर्णय अमलात आणले जाऊ नयेत म्हणून अनेक क्‍लृप्त्या लढवतात असे म्हटले आहे. या लेखामध्ये ट्रम्प यांच्या अशा निर्णयांची उदाहरणेही दिलेली आहेत. या लेखानुसार ट्रम्प यांच्या सरकारने एकही चांगले काम केले असे नाही, त्यांनी काही कामे चांगली केली आहेत पण ती ट्रम्प यांच्यामुळे घडली नसून ती त्यांना न जुमानता घडली आहेत. एवढेच नव्हे तर या लेखात ट्रम्प यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी घटनेतील  २५व्या दुरुस्तीचा वापर करण्याचाही विचार काही लोकांनी केला परंतु त्यासाठी लागणारी प्रक्रिया कठीण असल्याने त्याचा वापर करण्याचा विचार सोडून देण्यात आला असेही म्हटले आहे. अमेरिकन घटनेतील २५ व्या दुरुस्तीमध्ये अध्यक्षांचा मृत्यू झाला अथवा अध्यक्षांकडे आपले कर्तव्य बजावण्याची क्षमता नसेल तर उपाध्यक्षांना अध्यक्षपदी नियुक्त केले जाईल असे म्हटले आहे. याचाच अर्थ ट्रम्प यांची अमेरिकन अध्यक्षाचे कर्तव्य बजावण्याच्या क्षमता नाही असे या लेखकांनी स्पष्टपणे म्हटले आहे. 

या लेखामुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्या रागाचा पारा वर चढला आहे. आपल्या विरुद्ध आपलेच मंत्री व अधिकारी काम करत असल्याचे आता त्यांना स्पष्टपणे कळले आहे. हा लेख नक्की कोणी लिहिला असावा याबद्दल भाकिते वर्तवली जात आहेत. या लेखातील ‘लोडस्टर’ हा शब्द अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स नेहमी आपल्या भाषणात वापरत असल्याने तो लेख त्यांनी लिहिला असावा असे काही लोक म्हणत आहेत. परंतु उपाध्यक्ष पेन्स यांनी याचा साफ इन्कार केला आहे. ट्रम्प यांचे परराष्ट्रमंत्री पोम्पेओ हे हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा भारतात होते. त्यांनीही वृत्तपत्रांना दिलेल्या विधानात आपण हा लेख लिहिला नसल्याचे म्हटले आहे. ट्रम्प सरकारमधील अनेक प्रसिद्ध अधिकाऱ्यांनी हा लेख लिहिल्याच इन्कार केला आहे. परंतु या लेखामुळे बॉब वुडवर्ड यांच्या पुस्तकातील विचित्र व धक्कादायक गोष्टी खऱ्याच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

इकडे अध्यक्ष ट्रम्प यांनी आपला राग अनेक वेळा ट्‌विटरवरून व्यक्त केला आहे. त्यांनी या लेखाला ‘डरपोक माणसाचे काम’ असे म्हटले आहे. तसेच एका ट्‌विटमध्ये असा लेख लिहीणारी व्यक्ती बहुधा अस्तित्वात नसावी आणि असलीच तर न्यूयॉर्क टाइम्सने त्या व्यक्तीला ताबडतोब सरकारच्या हवाली करावे असे म्हटले आहे! आपण इतर कुठल्याही अध्यक्षापेक्षा दोन वर्षात बरेच काही साध्य केले आहे असा दावाही त्यांनी केला आहे. बॉब वुडवर्ड यांचे पुस्तक हे एक स्कॅम असून त्यातील सर्व गोष्टी खोट्या आहेत असेही त्यांनी ट्‌विटरवरून म्हटले आहे. त्यात वर्णन केल्याप्रमाणे आपण बोलत नाही आणि बोललो असतो तर आपण अध्यक्ष म्हणून निवडून आलो नसतो असेही त्यांनी म्हटले आहे. 

अध्यक्ष ट्रम्प यांची घटका भरली आहे. त्यांचा कार्यकाल अजून दोन वर्षे बाकी आहे. २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकन संसदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत संसदेतील मताधिक्‍य फिरले तर कदाचित अध्यक्ष ट्रम्प यांना पदच्युत करण्याची प्रक्रिया सुरूही होईल. सध्या त्यांच्या पक्षाला मताधिक्‍य असल्याने ही प्रक्रिया करणे विरोधी पक्षाला शक्‍य नाही. पण आता अध्यक्षांच्या मंत्रिमंडळातील लोकच जर त्यांच्याविरुद्ध कारस्थान करत असतील तर मात्र ट्रम्प आपला कार्यकाल पूर्ण करतील याची शाश्वती देता येत नाही.

फोटो फीचर

संबंधित बातम्या