असं निपजतं तेज 

मकरंद केतकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

तुम्हाला आठवत असेल, आपल्या सगळ्यांनाच शाळेत ऑक्सिजनचे अस्तित्व दाखवणारा एक प्रयोग करायला लावायचे. झाकलेल्या ग्लासमधील पेटलेली मेणबत्ती ऑक्सिजन संपेपर्यंत जळते आणि विझून जाते. हे पाहून माझ्यासारख्याच अनेकांना हा प्रश्न कधीतरी नक्कीच पडला असेल, की जर ऑक्सिजन संपल्यावर मेणबत्ती विझते तर अंतराळात ऑक्सिजन नसतानाही सूर्य कसा काय पेटलेला असतो? इसका राज हम अभी तुमको बताता! 

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणं अंतराळात असलेले महाप्रचंड वायुमेघ म्हणजेच नेब्युले, हे ताऱ्यांचं मॅटर्निटी होम आहे. त्यांची निर्मिती ताऱ्यांच्या मृत्यूनंतर होते, तसंच त्यातूनच तारे जन्मही घेतात. आपल्या पृथ्वीवरील वायुच्या घनतेशी जर नेब्युलामधील मॅटरच्या घनतेची तुलना केली, तर एक क्युबिक सेंटीमीटर या आकारात जर पृथ्वीवरील हवेचे ३०,०००,०००,०००,०००,०००,००० इतके कण मावत असतील तर तेवढ्याच जागेत नेब्युलामधील वायुचे फक्त ३०० कण बसतात. पण इतकी विरलता असूनही त्यातील हायड्रोजनच्या अणूंमधील गुरुत्वाकर्षण तेवढंच असतं. ताऱ्यांच्या जन्माची प्रक्रिया कोट्यवधी वर्षं चालते. याचा एक प्रकार आहे ज्यात एखाद्या नेब्युलामध्ये तुलनेनं धूळ आणि गॅस यांचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यातील ग्रॅव्हिटीसुद्धा तुलनेनं जास्त असते. त्यामुळं त्यातील अणू एकमेकांकडं आकर्षिले जाऊन ताऱ्याच्या निर्मितीची सुरुवात होते. दुसऱ्या प्रकारात एखाद्या वायुमेघाला कुठल्यातरी बाह्य बलानं धक्का बसतो. हा धक्का सुपरनोव्हा म्हणजे जवळपासच्या एखाद्या महाताऱ्याच्या विलयानंतर होणाऱ्या महास्फोटातून निघणाऱ्या ज्या शॉकवेव्हज असतात त्यातून मिळतो. या धक्क्यामुळं वायुमेघातील हायड्रोजनचे अणू एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. प्रकार कुठलाही असला, तरी नेब्युलामधील वायुकण मुक्त स्वरूपात असल्यानं ढग त्याच्या गुणधर्मानुसार पसरू पाहतो. मात्र हायड्रोजनच्या अणूंचं गुरुत्वीय बल एकमेकांवर प्रभाव टाकून ते अणूंना एकमेकांकडं ओढून घेऊ लागतं. इथं गुरुत्वाकर्षण जिंकतं. हळूहळू उष्णता वाढू लागते व वायुमेघाचा तो भाग तप्त होऊ लागतो. या भागात अणूंचं केंद्रीकरण झाल्यामुळं तेथील दाब वाढत जातो आणि वायुमेघाच्या त्या भागाला चपट्या तबकडीसारखं रूप येऊ लागतं. ही तबकडी गोल फिरू लागते व आजूबाजूच्या वायुला आपल्याकडं खेचून घेऊ लागते. हे असतं अगणित अणूंच्या एकीचं बळ. शेवटी शेवटी हे अणू त्या दाबामुळं इतके एकत्र येतात, की त्या प्रेशरने ते ‘फ्युज’ होऊ लागतात, म्हणजे एकत्र चिकटू लागतात. अणूंच्या एकमेकांवर आदळण्यानं आणि फ्युज होण्यानं ऊर्जेची निर्मिती होऊ लागते. इंधनाचं कॉन्सन्ट्रेशन ताऱ्याच्या गर्भात सगळ्यात जास्त असतं आणि ही ऊर्जा उष्णता व प्रकाशाच्या स्वरूपात प्रचंड दाबानं आतून बाहेर पडू लागते. हा बाहेर पडणारा दाब ताऱ्यातील वस्तुमानाला फोडू पाहतो. मात्र अणूंचं गुरुत्वीय बल इतकं ताकदवान असतं, की ते त्या गोळ्याला एकत्र बांधून ठेवतं. याचं सोपं उदाहरण पाहायचं असेल, तर तुम्ही एखादा फुगा डोळ्यासमोर आणा. जोपर्यंत फुग्याच्या रबरामधील अणूंचं गुरुत्वीय बल आतून बाहेर पडू पाहणाऱ्या हवेच्या अणूंच्या दाबाला मुहतोड जवाब देतंय, तोपर्यंत फुगवत असताना फुगा फुटत नाही. मात्र क्षमतेपेक्षा जास्त हवा भरली, की अणूंचे एकमेकांमधील बंध तुटतात आणि फुगा फुटतो. नवजात ताऱ्यामध्ये जितक्या जास्त प्रमाणात हायड्रोजनचं प्रमाण असेल तितकी ही धक्काबुक्की जास्त असते. तसंच त्यावरून त्या ताऱ्याचं आयुष्यही ठरतं. अशाप्रकारे हळू हळू एकदा का दोन शक्तींच्या ढकलाढकलीत स्थैर्य आलं, की ताऱ्यामध्ये असलेलं हायड्रोजननामक इंधन अधिक सक्रिय होऊ लागतं आणि अखेर अब्जावधी अंश सेल्सियस तापमानाला पोचल्यावर ताऱ्याच्या केंद्रामध्ये फ्युजनची परिसीमा होऊन ज्वाळा फेकत तारा झळाळू लागतो. ही एकप्रकारची अणूभट्टीच असते. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, की ऑक्सिजनशिवाय सूर्य कसा तेवता राहतो. ताऱ्यांचे प्रकार आणि इतर माहिती पुढील भागात.

संबंधित बातम्या