ताऱ्यांचं वर्गीकरण 

मकरंद केतकर
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

मागच्या लेखात आपण वायुमेघ म्हणजे नेब्युले यातून निर्मिती होणाऱ्या ताऱ्यांची जन्मकहाणी वाचली. ती थोडक्यात सांगायची, तर अंतराळातील महाप्रचंड आणि अत्यंत अत्यंत विरळ अशा वायू आणि धूलिकणांच्या ढगांमध्ये गुरुत्वाकर्षणाच्या खेळानं हायड्रोजन वायूचे अणू एकत्र येऊ लागतात आणि कोट्यवधी वर्षांनी त्यांच्या अशा एकीकरणानं तयार झालेल्या महाप्रचंड दाब असलेल्या गोळ्याच्या केंद्रात अणूंचं फ्युजन होऊन ऊर्जानिर्मिती सुरू होऊन ज्वाळा फेकत तारा झळाळू लागतो. आज आपण ताऱ्यांचे विविध प्रकार पाहू. 

ताऱ्यांचं वर्गीकरण त्यांच्या तापमानावरून केलं जातं. पण कोट्यवधी प्रकाशवर्षं दूर असलेल्या ताऱ्यांचं तापमान कसं मोजलं जातं हे आधी समजून घेतलं पाहिजे. तापमान म्हणजे एखाद्या पदार्थामधील अणूंच्या हालचालीमुळं निर्माण होणारी ऊर्जा. याच प्रक्रियेत प्रकाश निर्माण होतो. ही हालचाल जितकी जास्त गतिमान तितकं तापमान अधिक व प्रकाशाचा रंग वेगळा. उदा. वेल्डिंग सुरू असताना वेल्डिंग रॉड लोखंडाला टेकवल्यावर तिथं निर्माण होणारं तापमान सहा हजार अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक असतं. इतक्या उच्च तापमानाला निर्माण होणारा प्रकाश निळसर पांढरा असतो. लोखंड वितळतं सोळाशे अंश सेल्सियसला. त्यावेळी त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचा रंग लाल असतो. ताऱ्यांचं वर्गीकरण करताना हेच तत्त्व वापरलं जातं. हबलनं घेतलेला हा फोटो आपण पाहिला तर त्यात लाल, निळे, पिवळे अशा विविध रंगांचे तारे दिसतील. हे तारे त्यांचं तापमान, तसेच आकारही सांगतात. ताऱ्याचा आकार जेवढा मोठा, तेवढं त्यामध्ये इंधन अधिक आणि तापमानही जास्त! साहजिकच त्याचा प्रकाशही जास्त तेजस्वी. ताऱ्यांच्या आकाराची तुलना सूर्याबरोबर केली जाते. याला ‘सौर वस्तुमान’ म्हणजेच ‘सोलार मास’ म्हणतात. एखादा तारा २ सोलार मास आहे, याचा अर्थ तो सूर्याच्या दुप्पट आकाराचा आहे. यानुसार खगोल शास्त्रज्ञ एक तक्ता वापरतात; ज्याला हर्ट्झस्प्रंग-रसेल डायग्राम म्हणतात. यात रेखांशावर खालून वरती चढत्या क्रमानं प्रकाशमानता (ल्युमिनॉसिटी) असते व अक्षांशावर डावीकडून उजवीकडं कमी होणारं तापमान असतं. ताऱ्यांचं वर्गीकरण सर्वांत मोठ्याकडून सर्वांत छोट्या ताऱ्याकडं O, B, A, F, G, K, M या क्रमात असतं. हे तारे मेन सिक्वेन्स स्टार्स म्हणून ओळखले जातात. कारण यांच्या अंतरंगात हायड्रोजनची अणुभट्टी सक्रिय असते. आपल्या सूर्यासह आकाशात दिसणारे ९० टक्के तारे मेन सिक्वेन्स स्टार्स आहेत. त्यांची ओळख पुढीलप्रमाणं - 

O - आकार - १५ ते ९० सोलार मास. तापमान - ३० ते ५०,००० अंश सेल्सियस. प्रकाशमानता - सूर्यापेक्षा ४०,००० ते १,००,००० पट अधिक तेजस्वी. प्रकाशाचा रंग - निळा. 

B - आकार - ७ ते १८ सोलार मास. तापमान - ११ ते ३०,००० अंश सेल्सियस. प्रकाशमानता - सूर्यापेक्षा २०,००० पट अधिक तेजस्वी. प्रकाशाचा रंग - निळा. 

A - आकार - २.५ ते ३.२ सोलार मास. तापमान ७.५ ते ११,००० अंश सेल्सियस. प्रकाशमानता - सूर्यापेक्षा ८० पट अधिक तेजस्वी. प्रकाशाचा रंग - निळा. 

F - आकार - १.३ ते १.७ सोलार मास. तापमान ६ ते ७.५ हजार अंश सेल्सियस. प्रकाशमानता- सूर्यापेक्षा ६ पट अधिक तेजस्वी. प्रकाशाचा रंग - निळसर पांढरा. 

G - आकार - सूर्याएवढा किंवा थोडा मोठा. तापमान ५ ते ६ हजार अंश सेल्सियस. प्रकाशमानता- सूर्याएवढी किंवा थोडीशीच अधिक. प्रकाशाचा रंग - पिवळट पांढरा. 

K - आकार - ०.९ किंवा ०.८ सोलार मास. तापमान ३.५ ते  ५ हजार अंश सेल्सियस. प्रकाशमानता - सूर्यापेक्षा निम्मी. प्रकाशाचा रंग - केशरट लाल. 

M - आकार - ०.४ किंवा ०.३ सोलार मास. तापमान ३.५ हजार अंश सेल्सियस किंवा कमी. प्रकाशमानता - सूर्याच्या तुलनेत ०.०४ इतकीच. प्रकाशाचा रंग - लाल. 

याशिवायही ताऱ्यांचे विविध प्रकार आहेत. त्यांची माहिती व आपल्या सूर्यमालेची ओळख पुढच्या काही लेखांतून करून घेऊ.

संबंधित बातम्या