आपुलेची मरण पाहिले म्या डोळा

मकरंद केतकर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

मकरंद केतकरसाडेतीन अब्ज वर्षांपूर्वी, समुद्रतळ किंवा समुद्राकाठचं तळं यापैकी कुठंतरी जीवनाचा पाया असलेले घटक एकत्र आले आणि ऊर्जानिर्मिती करणाऱ्‍या कुठल्यातरी अज्ञात घटकामुळं ते सजीव आणि सक्रिय झाले. सक्रिय याचा अर्थ स्व-प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता, जी ठळकपणे सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक स्पष्ट करते. 

या एकपेशीय जीवांना सायनोबॅक्टेरिया असं नाव दिलं आहे. सोप्या भाषेत नील-हरीत शैवाल (ब्ल्यू ग्रीन अल्गी), जे आजही पृथ्वीवर सहज आढळतात. यांना शैवाल जरी म्हणत असले तरी खरं तर हे शैवाल नसून यांना प्रोकॅरियोट्स म्हणतात. म्हणजे काय, तर यांच्या पेशीच्या आवरणाच्या आत केंद्रक, तसंच आधुनिक पेशीत आढळणारे इतर घटक नसतात. अगदी साधी सरळ रचना. शंभर वर्षांपूर्वीची मोटारगाडी आणि आजची आधुनिक कार यांच्यात फरक आहे तसंच. पृथ्वीवरील तत्कालीन भयकारी वातावरण पाहता असं स्ट्रक्चर टिकलं व स्वतःची पुनर्निमिती करू शकलं हीच फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. सूर्यप्रकाशाची ऊर्जा, पाण्यात विरघळलेली खनिजं (सल्फेट्स) आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्यानं हे जीव आता पुढची कोट्यवधी वर्षं, ‘ठेवीले अनंते तैसेची राहावे,’ या स्थितीत जगणार होते. मात्र त्यांच्या या स्थितप्रज्ञ अवस्थेतून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडत होती; ऑक्सिजनची निर्मिती. पृथ्वीवर तत्कालीन परिस्थितीत मुक्तावस्थेतील ऑक्सिजन जवळपास शून्य होता. याचा पुरावा म्हणजे ऑक्सिजनमुळं घडणारी धातूंची संयुगं इतक्या जुन्या काळात आढळत नाहीत. साधारण तीन अब्ज वर्षांपासून ही संयुगं आढळू लागतात. उदा. बँडेड आयर्न. या काळाला ‘ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट’ असं म्हणतात. ऑक्सिजनशी संपर्क आल्यावर लोखंडामधील अणूंचं त्याच्याबरोबर संयुग तयार होतं, ज्याला आपण गंज म्हणतो. अडीच ते तीन अब्ज वर्षांपूर्वी समुद्रातील लोखंडाशी पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा संपर्क येऊन त्याचे एकावर एक थर तयार झाले, ज्याला बँडेड आयर्न म्हणतात. कधी दिल्लीला गेलात तर इंदिरा गांधी यांच्या समाधीवरील दगड पाहा. हा अडीच अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेला बँडेड आयर्नचा तुकडा आहे.

पृथ्वीवर जवळजवळ दीड अब्ज वर्ष फक्त एकपेशीय जीव होते, जे त्यांच्या दृष्टीनं निरुपयोगी बायप्रॉडक्ट म्हणून मुक्त ऑक्सिजन निर्माण करत होते. सोप्या भाषेत फोटोसिंथेसिस, जे आजच्या वनस्पती करतात. इतक्या मोठ्या काळात या बॅक्टेरियांमध्येही सूक्ष्म प्रमाणात काही बदल निश्चितच घडत असावेत. जसं की दोन किंवा अधिक पेशींनी एकत्र चिकटणं व माळ करणं, जे आज आढळणाऱ्‍या सायनोबॅक्टेरियांमध्ये आढळतं. अगदी आपल्या शरीरात आढळतात तशा क्लिष्ट पेशीरचना निश्चितच नाही, पण ‘बहुपेशीय’ म्हणता येऊ शकेल असा जीव. एवढंच नव्हे तर सूर्यप्रकाशाचा ओव्हरडोस होऊ नये म्हणून ते आडव्याचे उभेही होतात जेणेकरून कमीत कमी पृष्ठभाग सूर्यप्रकाशासमोर राहील. यावरून आपण अंदाज बांधू शकतो, की जीवनाच्या उगमावस्थेतसुद्धा हे प्रयोग निश्चित घडले असणार. या रचनेचा आणखी एक फायदा म्हणजे पृष्ठभागाला चिकटून राहणं अधिक सोपं होतं. आयुष्यात स्थैर्य आलं, की इतर महत्त्वाच्या गोष्टींकडं लक्ष देणं सोपं होतं हे आपण सगळे जाणतोच. बॅक्टेरियांचंही काही वेगळं नसावं. या रचनेमुळं त्यांना हालचाल करणंही सोपं जातं. आज हे सगळं आपल्या नजरेतून अगदी बावळट आणि किरकोळ दिसतं, पण असं घडायला कमीत कमी एक अब्ज वर्षं गेली आहेत. आयुष्य सोपं नाही. अगदी या बॅक्टेरियांनाही टक्केटोणपे खात टिकून राहावं लागलं आहे, असो. सुरुवातीला त्यांनी निर्माण केलेला बराचसा ऑक्सिजन लोखंडाबरोबर लग्न करून मातीत जात होता. काही प्रमाणात तो वातावरणातील इतर वायू गिळून टाकत होता. पण तरी हळूहळू वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढू लागलं. इतकं, की त्यांना स्वतःला जगण्यासाठी आवश्यक असलेला कार्बन डायऑक्साईड कमी पडू लागला आणि मग परिस्थिती कठीण होत होत हे सारे जीवकण ‘आपुलेची मरण पाहिले म्या डोळा’ या अवस्थेला येऊन पोचले.     

संबंधित बातम्या