महाश्‍वेता

मकरंद केतकर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

विश्‍वाची गाथा    
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

पृथ्वीला आपण स्त्रीरूपात पाहतो व स्त्रीसुलभ स्वभावानुसार तिला रंगांची आवड असणं अगदी ओघानं आलंच, नाही का? सुरुवातीला तप्त लाव्हामुळं धगधगता नारिंगी रंग ल्यालेली धरणी, नंतर बेसॉल्टच्या कृष्ण रंगात रंगली. पुढं जमिनीखाली तयार झालेल्या ‘ग्रॅनाईट’ या राखाडी रंगाच्या अग्निजन्य खडकाच्या पृष्ठभागावर येण्यानं काहीशी राखाडीसुद्धा झाली. हळूहळू पृथ्वीवर पाणी स्थिरावलं व पृथ्वी निळी दिसू लागली. यानंतर सुरू झाला ‘ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट’, ज्या काळात पृथ्वी चक्क मंगळासारखी लालसर रंगाची दिसू लागली.    

शास्त्रज्ञ ज्यांना ‘गेमचेंजर’ म्हणतात, त्या सायनोबॅक्टेरिया नामक एकपेशीय जीवांमार्फत पृथ्वीवर जवळजवळ एक अब्ज वर्ष मुक्त स्वरूपातील प्राणवायूची निर्मिती सुरू होती. जे काम आजच्या वनस्पती करतात, तेच काम हे अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे जीव करत होते. कार्बन डायऑक्साईड घेणं आणि प्रकाशसंस्लेषणाच्या प्रक्रियेतून ऑक्सिजन मुक्त करणं ही प्रोसेस इतकी सेट झाली, की पृथ्वीच्या पाण्यात भरमसाठ प्रमाणात प्राणवायू मिसळला जाऊ लागला. पाण्यात विरघळलेल्या लोखंडाची प्राणवायूबरोबर संयुगं तयार होऊ लागली व लालसर रंगाचे गंजलेल्या लोखंडाचे थर समुद्राच्या तळाशी साठू लागले, ज्याला आपण ‘बँडेड आयर्न फॉर्मेशन्स’ म्हणतो. यामुळं पृथ्वीचा रंग लाल झाला. परंतु एकपेशीय जीवांद्वारे प्राणवायूची निर्मिती सुरूच होती. हळूहळू हा प्राणवायू पृथ्वीच्या वातावरणात मिसळला जाऊ लागला. आपल्याला कदाचित माहिती असेल, की कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे ‘ग्रीन हाऊस’ गॅसेस आहेत. म्हणजे पृथ्वीमधून वातावरणात परावर्तित होणाऱ्‍या उष्णतेला अडवून ठेवण्याचं काम हे वायू करतात. मात्र कार्बन डायऑक्साईड जसा संपुष्टात येऊ लागला, तसतसं पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण घसरू लागलं व त्याबरोबर तापमानही खाली येऊ लागलं. 

वातावरणात मुक्त होत असलेल्या ऑक्सिजननं हळूहळू मिथेनची ताकदही कमी करून टाकली व त्यामुळं तापमान घसरण्याचा वेग वाढला. याच ऑक्सिजनपासून कालांतरानं वातावरणात ओझोन वायू तयार झाला. या वायूनं सूर्याच्या अतिनील किरणांना प्रतिबंध केल्यानं तापमान खालावण्याच्या प्रक्रियेत अजूनच भर पडली. त्यातून त्या काळात तरुण वयाच्या सूर्याचं तापमानही आजच्यापेक्षा ३० टक्के कमी होतं. अशा पद्धतीनं एका घटनेतून दुसऱ्‍या घटनेला चालना देणारी ‘चेन रिअ‍ॅक्शन’ सुरू झाली आणि अखेर एक काळ असा आला, की पृथ्वीवर सर्वत्र बर्फाचं साम्राज्य पसरलं. पृथ्वीची ‘महाश्‍वेता’ झाली. ज्या जीवांनी निरुपयोगी पदार्थ म्हणून वातावरणात ऑक्सिजन मुक्त केला, त्यांच्यासाठी आता तोच ऑक्सिजन काळ होऊन आला होता. समुद्रात सुखेनैव नांदणाऱ्‍या या जीवांचा वातावरणाशी असलेला संपर्क तुटला व कार्बन डायऑक्साईडच्या तुटवड्यामुळं त्यांचा महाविनाश होऊन पृथ्वीवर पहिला महाजीवसंहार घडून आला. ‘आपुलेचि मरण पाहिले म्या डोळा’ असा हा काळ होता. याचा अर्थ सर्वच्या सर्व जीव नष्ट झाले असं नाही, परंतु किमान ८० टक्के जीव तरी नष्ट झाले असावेत. या एकूण प्रक्रियेचा कालावधी साधारण चारशे कोटी वर्षं तरी असावा असा अंदाज आहे. मात्र चिवटपणा हा जीवसृष्टीचा गुणधर्म आहे आणि या काळातच ऑक्सिजनचा वापर श्‍वसनासाठी करणाऱ्‍या जीवांची उत्क्रांती झाली असावी. 

सायनोबॅक्टेरियांच्या महाविनाशानंतर वातावरणात मिसळणाऱ्‍या ऑक्सिजनचं प्रमाण मंदावलं. दुसरीकडं विषारी वायू वातावरणात सोडणारी ज्वालामुखीची धुरांडी विविध विषारी वायू वातावरणात सोडतच होती. ती जशी जमिनीवर होती तशीच समुद्राच्या तळाशीही होती. सूर्यही पूर्वीपेक्षा जास्त उष्णता फेकत होता. यामुळं हळूहळू तापमान परत वाढू लागलं व त्यामुळं बर्फाळ प्रदेश अक्रसू लागले. आता अधिकाधिक प्रदेश नव्या जीवांना त्यांच्या प्रगतीसाठी उपलब्ध होऊ लागला. अर्थात भविष्यात अशी अनेक हिमयुगं आली, ज्यातलं पंचाहत्तर कोटी वर्षांपूर्वी आलेलं ‘क्रायोजेनियन’ नामक हिमयुग दहा कोटी वर्षं टिकलं. पण तरी खमक्या सजीवांनी उत्क्रांती सोडली नाही. सायनोबॅक्टेरियांपासून पुढं सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली, याबद्दल अधिक माहिती पुढच्या काही लेखांमधून जाणून घेऊ.

संबंधित बातम्या