नव्या पर्वाची सुरुवात

मकरंद केतकर
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

विश्‍वाची गाथा  : एंटरटेनमेंट
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

मंडळी, बदल हा या विश्वातील प्रत्येक अवस्थेचा स्थायीभाव आहे. मग आपली सजीवसृष्टी तरी कशी त्याला अपवाद असेल? इतके दिवस समुद्रालाच सासर-माहेर मानणारी ही अद्‍भुत दुनिया आता नवीन अधिवासात पाऊल टाकणार होती. भक्ष भक्षकांची जी साखळी पाण्यात विकसित झाली होती, ती आता जमिनीवर होणार होती. पाण्यातल्या जीवांसारख्याच जमिनीवरील जीवांच्याही असंख्य शाखा निर्माण होणार होत्या. चिमुकल्या मुंगीपासून तब्बल साठ फूट उंचीच्या अवाढव्य टायटॅनोसोरपर्यंत त्यात वैविध्य दिसणार होतं. 

कोरड्या जमिनीवर आधी कोणी पाऊल ठेवलं याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काही संशोधकांच्या मते आधी चिखलातल्या वनस्पती आणि मग शेवाळासारख्या वनस्पतींनी जमिनीला आपलंसं केलं. तिथून पुढं अनेक कोटी वर्षांत वनस्पतींची सपुष्प प्रकारापर्यंत प्रगती झाली. काही संशोधकांच्या मते वनस्पतींच्या किमान वीस कोटी वर्षं अगोदर स्पंजसारख्या मृदुकाय जीवांनी जमिनीवर आपलं बिऱ्‍हाड हलवलं असावं. खडकांमध्ये सापडलेल्या प्रथिनांचा अत्यंत क्लिष्ट अभ्यास करून त्यांनी हे मत मांडलं आहे. काही संशोधकांच्या मते गोम, खेकडे, कोळी अशा संधीपाद जीवांनी सर्वप्रथम जमिनीवर, पण पाण्याच्या स्रोताच्या आसपासच वावरण्यास सुरुवात केली. आजसुद्धा खेकडे पाण्याच्या जवळपास राहतात. तर काहींच्या मते उभयचर जीव पाण्याच्या काठावर राहायला लागले व नंतर कोरड्या जमिनीवर त्यांनी घरोबा केला. हा सगळा अभ्यास अत्यंत तुटपुंज्या आणि अर्धवट उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे होत असल्यानं यात सतत नवनवीन शोध लागत असतात. त्यातून सतत नवनवीन जीवाश्म सापडत असल्यानं चाळीस पन्नास कोटी वर्षं जुन्या कोड्याचे तुकडे जुळवणं हे भयंकर क्लिष्ट काम आहे व विज्ञान त्यातूनच पुढं जात असतं. जे काय असेल ते, पण या सगळ्याची सुरुवात नेहमीप्रमाणेच अगदी प्राथमिक झाली. अगदी आजही तुम्ही खाडीकिनारी गेलात, तर ओहोटीच्या वेळी तुम्हाला मडस्किपर नावाचे मासे चिखलात सरपटताना दिसतील. हे मडस्कीपर मासे पाण्याबाहेर तोंडानं श्वास घेऊ शकतात, तसंच भरतीच्या वेळी पाण्यात कल्ल्यांच्या मदतीनं विरघळलेला प्राणवायूही वापरू शकतात. मत्स्यावताराचं महत्त्व मी मागच्या लेखात सांगितलं आहेच. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या जमिनीवर स्थलांतर करण्याच्या अनुषंगानं माशांचं खूप महत्त्व आहे.

वर म्हटल्याप्रमाणे ‘पहिला नंबर कोणाचा?’ या वादात न शिरता, आपण तिथून थोडं पुढं येऊन जमिनीवर निर्माण झालेल्या एका नव्या व्यवस्थेचं विहंगावलोकन करू. साधारणपणे बेचाळीस कोटी ते तीस कोटी वर्षे या  कालखंडात वनस्पतींनी बऱ्‍यापैकी जम बसवला होता. यामध्ये शाखाधारी वनस्पती, शेवाळं, तसंच नेचे असे विविध प्रकार होते. वरती उल्लेख केल्याप्रमाणे उभयचर माशांपासून सुरुवात होऊन त्यातून विकसित झालेल्या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शाखा गोड्या पाण्यात राहात होत्या. तसंच जमिनीवरही काही काळ हिंडत होत्या. यामध्ये आपण बेडकांच्या पूर्वजांचा समावेश करू शकतो. कारण बेडकांना प्रजननासाठी आजही गोड्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. उभयचरांच्या या शाखेतून पुढं विकसित झालेले पालीसारखे काही प्राणी आता पाण्यावरचं अवलंबित्व संपवून वनस्पतींच्या आश्रयानं राहू लागले होते. याच वनांमध्ये कीटकांचेही पूर्वज राहत होते. हे पालीसारखे नवे पृष्ठवंशीय जीव या कीटकांचे भक्षण करीत असावेत. टेरेस्ट्रीयल म्हणजे भूचर सजीवांमध्ये संधीपाद जीव ही सर्वांत वैविध्यपूर्ण शाखा असल्याचं जीवाश्मांवरून आढळून येतं. अगदी आजही त्यांच्यात सर्वांत जास्त वैविध्य आहे. शरीरात अस्थी नसल्यामुळं हलकं असलेलं शरीर, लहान आकार, कठीण कवचाचं संरक्षण, अनेक प्रजातींमध्ये पंख असल्यामुळं कमी वेळेत मोठा परिसर हिंडण्याची क्षमता, आकर्षक रंग, संयुक्त डोळे अशी त्यांची साधी सोपी रचना आजही बदललेली नाही. आकारात मात्र फरक पडलेला आहे. इकोसिस्टीममधला त्यांचा वाटा आज जसा निर्विवाद अत्यंत महत्त्वाचा आहे, तसाच त्या काळातही तो होताच. जमिनीवरील जीवसृष्टीच्या नाट्याचा नवा अंक रचला जात होता. त्याबद्दल अधिक माहिती पुढच्या लेखात पाहू.   

संबंधित बातम्या