वाढता वाढता वाढे

मकरंद केतकर
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

विश्‍वाची गाथा 
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

आज आपल्याला परिचित असलेला डायनासोर्स हा विषय जगभर कुतूहलाचा झाला तो तीन दशकांपूर्वी आलेल्या ‘ज्युरासिक पार्क’ या हॉलिवूडपटामुळे. अत्यंत वास्तववादी आणि रोमांचक कथा असलेल्या या चित्रपटात दाखवलेले डायनासोर्स आजही शत-प्रतिशत खरे वाटतात ते निर्मात्यांनी बाळगलेल्या विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे. साधारण बावीस-तेवीस कोटी वर्षांपूर्वी ट्रायासिक युग सुरू झाले आणि महाविनाशाच्या जबड्यातून निसटलेल्या सजीवांची उत्क्रांती सुरू झाली. या नव्या जीवांनी ट्रायासिक आणि ज्युरासिक अशी दोन्ही युगे मिळून पंधरा कोटींहून अधिक वर्षे पृथ्वीवर अक्षरशः अधिराज्य गाजवले.

सुमारे पंचवीस कोटी वर्षांपूर्वी विविध कारणांमुळे रचनाबदल होत गेलेल्या जल, वायू आणि जमिनीमुळे साधारण दहा लाख वर्षांच्या कालावधीत बऱ्‍यापैकी प्रजातींनी पृथ्वीला रामराम ठोकला. यामध्ये बहुसंख्य प्रजाती सस्तन प्राणी सदृश जीवांच्या होत्या. या सुमारास सस्तन प्राण्यांच्या पूर्वजांची उत्क्रांती खंडीत झाल्याचे त्यांच्या जीवाश्मांवरून आढळून येते. त्यामागची कारणे अजून अज्ञात असली तरी इथून पुढे डायनासोर्सच्या उत्क्रांतीची आणि त्यांनी अवाढव्य आकार धारण करण्यापर्यंतची प्रगती दिसून येते. चित्रपटात दाखवलेल्या डायनासोर्सशी साधर्म्य दाखवणाऱ्‍या ‘न्यासासोरस’ नावाचे, मोठ्या कुत्र्याच्या आकाराचे प्राणी बावीस कोटी वर्षांपूर्वी हिंडत होते. शास्त्रज्ञांच्या मते ही प्रजाती टिकण्याची दोन संभाव्य कारणे म्हणजे, हे दोन पायांवर पळणारे वेगवान जीव असावेत ज्यामुळे ते विविध आपत्तींमधून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले असावेत आणि दुसरे म्हणजे बहुधा ते सस्तन प्राण्यांप्रमाणे उष्ण रक्ताचे जीव असावेत, ज्यामुळे त्यांना बदलत्या तापमानाला तोंड देणे शक्य झाले असावे. याशिवाय अजून एक शक्यता अशी वर्तवली जाते, की या जीवांची श्वसन यंत्रणा अधिक प्रगत असावी, ज्यामुळे त्यांना घटलेल्या ऑक्सिजनशी जुळवून घेणे शक्य झाले असावे. याच काळात होऊन गेलेल्या काही विचित्र शरीररचना असलेल्या प्राण्यांचे जीवाश्म सापडतात. पैकी, काहींच्या शेपटीवर नखे होती, काहींच्या हाताला दोन खूप मोठी पण चिमट्यासारखी बोटे होती, तर काहींचे तोंड चोचीसारखे होते.  

ज्युरासिक काळात महाप्रचंड झालेल्या प्राण्यांशी साधर्म्य दाखवणारे जेमतेम सहा सात इंच उंचीचे ‘कोंगोनाफोन’ नामक डायनासोर्सही सुरुवातीच्या काळात पृथ्वीवर हिंडत होते, ज्यांचे जीवाश्म मादागास्करमध्ये मिळाले आहेत. लहान आकारामुळे त्यांचे अन्न छोटे कीटक असावेत, ज्यांना पकडण्यासाठी या प्राण्यांना सतत तुरुतुरु पळावे लागत असावे. या चपळतेच्या गुणाचा उपयोग पुढे आकाराने वाढलेल्या शिकारी प्रजातींना झाला असावा. उत्क्रांतीच्या प्रवासात यशस्वी झालेला प्रत्येक जीव पूर्वजांनी कमवलेल्या गुणांमध्ये नवीन भर घालून अधिक विकसित झालेला दिसतो. उदा. मांसाहारी प्राण्यांमध्ये शिकारीसाठी दातांच्या आणि जबड्यांच्या रचनेत बदल होत गेले. त्यांच्या दातांची वक्रता आणि जबड्याच्या स्नायूंची ताकद वाढली. शिकार आणि शिकारी दोघांमध्येही एकमेकांचे वार झेलण्यासाठी जाड त्वचा व वार करण्यासाठी शिंगे आणि नखे विकसित झाली. दुसरीकडे वनस्पतींनीही स्वतःच्या संरक्षणासाठी नवीन उपाययोजना केल्या आणि त्यामुळे शाकाहारी प्राण्यांच्या दातांची रचना व पचनसंस्थेची ताकद बदलली. वनस्पतींमधल्या स्पर्धेमुळे त्यांच्यातल्या अनेक प्रजातींची उंची वाढली. या स्पर्धेला अनुसरून शाकाहारी जीवांमध्ये उंचावरील पाने खाण्याची स्पर्धा सुरू झाली, ज्यातून ‘टायटॅनोसोर’सारखे तब्बल सत्तर टन वजनाचे जीव प्रगत झाले. मोठे शाकाहारी प्राणी खाण्यासाठी ‘टी-रेक्स’सारखे मोठे मांसाहारी जीव विकसित झाले आणि ज्यांचा आकार लहान होता, त्या वेगवान ‘व्हेलॉसीरॅप्टर्स’नी कळपाने शिकार करायची युक्ती अमलात आणली. मग शाकाहारीसुद्धा कळपाने राहून स्वत:चा बचाव करू लागले जसे की ‘सेराटोपसीयन्स’. ‘टेरॉसोर्स’सारख्या काही प्राण्यांनी झाडांवरून झेपा घेण्याच्या कलेत अधिकाधिक प्रगती करत हवेत उड्डाण करण्यापर्यंत मजल मारली. आजच्या पक्ष्यांचे हे पूर्वज. अशाप्रकारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी एकपेशीय जीवांपासून सुरू झालेला जीवसृष्टीचा प्रवास डायनासोर्सनी अभूतपूर्व उंचीवर नेला. पण मग सरीसृपांच्या शाखा विकसित होत असताना सस्तन प्राण्यांनी आशा सोडली होती का? त्यांच्या उत्क्रांतीचे पुढे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे पुढच्या लेखात.

संबंधित बातम्या