इतिहासाची पुनरावृत्ती...

मकरंद केतकर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

विश्‍वाची गाथा 
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

‘हिस्टरी रीपीट्स इटसेल्फ’ अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. इतिहासाची पुनरावृत्ती ही माणसाला कळण्याच्या खूप आधीपासून सुरू आहे. फक्त त्या त्या वेळच्या नाट्यामधली पात्रे वेगवेगळी असतात. लहानशा सरपटणाऱ्‍या प्राण्यांपासून सुरू झालेली सरीसृपांची उत्क्रांती कित्येक मीटर उंचीच्या डायनासोर्सपर्यंत पोचली. तसेच काहीसे सस्तन प्राण्यांच्या बाबतीत झालेले आढळते. सुरुवातीला जेमतेम पाचसहाशे ग्रॅम वजनाचे असलेले सस्तन प्राणी उत्क्रांतीच्या जोशात पुढच्या काही कोटी वर्षांत अवाढव्य होत गेले. मागच्या लेखात आपण पाहिले, की या उत्क्रांतीला वनस्पतींची प्रगती पूरक ठरली. सूचीपर्णी वृक्षांची जागा नंतर पानझडी आणि सपुष्प वनस्पतींनी घेतली आणि त्याला जुळवून घेण्यासाठी आवश्यक ते शारीरिक बदल सस्तन प्राण्यांमध्ये होत गेले. याच्याच जोडीला पँजिया महाखंडाची विभागणीही त्याला कारणीभूत ठरली. या महाखंडाचे अनेक तुकडे होऊन ते वेगवेगळ्या दिशांना प्रवास करू लागले होते. एका सलग मोठ्या भूभागाचे तुकडे झाल्याने वैश्विक तापमानात फरक पडत गेला व त्या बदलत्या तापमानाला जुळवून घेण्यासाठी कोणे एकेकाळी एकच पूर्वज असलेल्या एकाच प्रकारच्या जिवांची विविधता विविध खंडांवर निर्माण झाली. अगदी आपल्या परिचयाच्या उंटाचे उदाहरण घेतले तर साधारण अडीच कोटी वर्षांपूर्वी उंटाचे पूर्वज दक्षिण अमेरिकेत उत्क्रांत झाले. त्या वेळी दक्षिण आणि उत्तर अमेरिका हे खंड एका भूसेतूने तत्कालीन लॉरेशिया या उत्तर गोलार्धातील खंडाला जोडलेले होते. या भूसेतूमार्गे हे पूर्वज आशिया आणि आफ्रिकेमध्ये पोचले. जसे तिथले हवामान आणि अधिवास बदलत गेले तसे त्यांची शरीररचना, उंची वगैरेमध्ये बदल घडत गेले. जसे की उंटांच्या इतर प्रजातींच्या तुलनेत, थंड हवा आणि चरबीची अधिक साठवणूक यासाठी उत्तर गोलार्धामधील उंटांच्या पाठीवर दोन कुबड आणि भरपूर केस विकसित झाले. याचप्रमाणे हत्ती, वाघ, बिबट्या हे प्राणीसुद्धा उत्तर गोलार्धात उत्क्रांत होऊन याच पद्धतीने प्रवास करत विविध जातींमध्ये विकसित होत गेले. भारतापुरते बोलायचे तर आपला शेजारी असलेल्या श्रीलंका देशात बिबट्या आहे, परंतु वाघ नाही. याची एक शक्यता अशी वर्तवली जाते, की अन्नाच्या शोधात मार्जार कुळातील अनेक प्राणी दक्षिणेकडे पांगले. यावेळी भारताचा भूभाग टेथीस समुद्र बुजवून लॉरेशियाला धडकला होता. या नव्या भूप्रदेशात बिबट्याने आधी शिरकाव केला व दक्षिणेकडे त्याचा प्रवास श्रीलंकेपर्यंत झाला. यावेळी श्रीलंका आणि भारत यांना जोडणारा दगडी सेतू अखंड होता. मात्र पुढे समुद्राची पातळी वाढल्यावर तो पाण्याखाली गेला आणि त्याचा भारताशी असलेला कनेक्ट तुटला. यामुळे मागून आलेला वाघ श्रीलंकेत पोचू शकला नाही. मात्र उत्तर गोलार्धातून वाघ दक्षिण आशियात अनेक ठिकाणी पोचला आणि त्याच्या अनेक जाती नव्याने विकसित झाल्या. यालाच अनुसरून आशियाई हत्ती हे मॅमॉथ या उत्तर गोलार्धातील नष्ट झालेल्या महाकाय प्रागैतिहासिक केसाळ हत्तींचे थेट वंशज मानले जातात, कारण आशियाई हत्तींच्या अंगावर आफ्रिकन हत्तींच्या तुलनेत खूप केस आढळतात. पोटाला पिशवी असलेले प्राणी म्हणजेच मार्सुपियल्स यांच्यातील उत्क्रांतीही मनोरंजक आहे. मार्सुपियल्सची उत्क्रांती दक्षिण अमेरिकेमध्ये झाली. साधारण साडेतीन कोटी वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका, अंटार्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे एका भूसेतूने जोडलेले होते. तिथून या प्राण्यांनी अंटार्टिका व नंतर ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश केला. कालांतराने अमेरिका पूर्ण विलग झाली. अंटार्टिका अजून दक्षिणेला सरकून बर्फाळ प्रदेश झाली व ऑस्ट्रेलिया एकलकोंडा खंड राहिला. या दरम्यान अर्धवट विकसित पिल्लू गर्भाशयाऐवजी पोटाच्या पिशवीत वाढवता आल्याने या प्राण्यांना कठीण काळात प्रजा वाढवण्यात मदत होऊन त्याचा फायदा नव्या प्रदेशातील वातावरणाशी जुळवून घेण्यात झाला झाला असावा असा अंदाज आहे. पुढे अशीच नेत्रदीपक प्रगती कपीकुळातील प्राण्यांचीही झाली. अनेक शारीरिक वैशिष्ट्ये असलेल्या या प्राण्यांच्या जातींपैकी एका जातीने दोन पायांवर उभे राहण्यास सुरुवात केली आणि....

संबंधित बातम्या