राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 10 जानेवारी 2022

विश्‍वाचे आर्त

युरोपातील प्रबोधनातून झालेल्या वैज्ञानिक क्रांतीतून आणि औद्योगिक क्रांतीतून भांडवलशाही नावाच्या वेगळ्या अर्थव्यवस्थेचा जन्म झाला. या भांडवलशाहीशी सुसंगत राज्यव्यवस्था म्हणजे व्यक्तिवादी, उदारमतवादी लोकशाही होय. भांडवलशाही ही अर्थव्यवस्था आणि लोकशाही ही राज्यव्यवस्था या एकमेकांना पूरक आहेत, इतकेच नव्हे तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

लोकशाहीचा पाळणा इंग्लंडमध्ये पहिल्यांदा हलला असे म्हटले जाते, त्याचा अर्थ आधुनिक काळात लोकशाही व्यवस्था प्रथम इंग्लंडमध्ये विकसित झाली, असा घ्यायचा असतो. लोकशाही व्यवस्थेला मोठा इतिहास असून, ती उत्क्रांत झालेली व्यवस्था आहे. इसवी सनाच्याही अगोदर ग्रीक लोकांची जी नगरराज्ये (City states) होती, ती एक प्रकारच्या लोकशाही व्यवस्थेचीच होती. या व्यवस्थेसह अन्य राज्यव्यवस्थांची चर्चा ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञाने ‘पॉलिटिक्‍स’ या ग्रंथात केलेली आहे. ॲरिस्टॉटलची मते बऱ्यापैकी तटस्थ आहेत. तथापि, ॲरिस्टॉटलचा गुरू प्लेटो मात्र लोकशाहीला अनुकूल नव्हता. त्याला स्वतःला अभिप्रेत असलेल्या आदर्श राज्यव्यवस्थेचे वर्णन त्याने ‘रिपब्लिक’ या ग्रंथात केलेले आहे. खुद्द प्लेटोचा गुरू सॉक्रेटिस हा ज्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता होता व ज्याच्यासाठी त्याने मृत्युदंडाची शिक्षा पत्करली, त्याला प्लेटोच्या राज्यात मुळीच वाव मिळणार नाही हे उघड आहे. त्याचे राज्य एक प्रकारची तज्ज्ञसत्ता आहे, असे म्हणता येईल. 

ग्रीकांच्या नगरराज्यांचा कारभार, नागरिक एकमेकांशी मुक्त चर्चेच्या माध्यमातून करीत असल्यामुळे तेथे वक्तृत्वकलेला (Rhetoric) विलक्षण महत्त्व आले होते. ‘सोफिस्ट’ या नावाने ओळखले जाणारे विद्वान शुल्क घेऊन वक्तृत्वशास्त्राचे वर्ग चालवीत असत. आयसोक्रिटस या विद्वानाने लिहिलेल्या ‘पेडिया’ नामक ग्रंथामधून तेव्हाच्या शिक्षणपद्धतीत वक्तृत्वाला किती महत्त्व होते हे समजून येते. श्रोत्यांच्या मनावर छाप पाडून त्यांना आपल्या मताशी अनुकूल करून घेणे, या कलेत ग्रीक मंडळी वाकबगार होती. वक्तृत्व चांगले असेल तर लोकशाहीत यशस्वी होता येते, हा अनुभव आपणही घेत असतोच. अर्थात येनकेनप्रकारेण, ऐकणाऱ्याच्या गळी आपला मुद्दा उतरवायचा असे उद्दिष्ट असणारे सोफिस्ट अनेकदा युक्तिवादात जाणूनबुजून हेत्वाभास करत असत. आपल्या प्राचीन न्यायदर्शनातही अशा हेत्वाभासांचा (fallacies) यथायोग्य परामर्श घेतला असल्याचे आढळते. अशा प्रकारच्या विजिगिषू वादांसाठी ‘छल’, ‘वितंड’, ‘जल्प’ असे शब्द न्यायशास्त्रात प्रचलित आहेत आणि तरीही डाळ शिजत नसेल तर ‘शेषं कोपेन पूरयेत्‌’ होतेच. 

ग्रीकांच्या नगरराज्यांशी सदृश असणारी अशी गणराज्ये किंवा जनपदे प्राचीन म्हणजे मौर्यपूर्व भारतात होती. बौद्ध साहित्यात अशा जनपदांची व महाजनपदांची माहिती मिळते. जनपदांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालत असला तरी या प्रकारच्या लोकशाही व्यवस्थेला सार्वत्रिकता नव्हती. ती विशिष्ट गणापुरती म्हणजे महाकुलापुरती मर्यादित असे. बुद्ध व महावीर या महान तत्त्ववेत्त्यांचा उदयही अशा गणराज्यांमधून झाला होता. स्वतः कृष्ण यादवांच्या गणराज्यातील होता. यादव या एका विस्तारित कुळाच्या (मूळ पुरुष चांद्रवंशीय राजा यदू) शाखोपशाखा असलेल्या उपकुलांतून यादवांचे गणराज्य सरकार झाले होते. मथुरा हा त्याचा प्रदेश. या गणराज्यातील एक गणप्रमुख उग्रसेन याचा पुत्र कंसाने ते नष्ट करून आपल्या स्वतःची एकाधिकारशाही स्थापन करण्याचा घाट घातला होता. त्याला या कामात त्याचा सासरा मगधाधिपती जरासंध याचे साहाय्य होते. स्वतः जरासंधाला तर तत्कालीन सर्वच गणराज्यांचा ग्रास घेऊन मगधाचे साम्राज्य उभारायचे होते. यादव गणातील वसुदेव-देवकीचा पुत्र कृष्णाने कंसाला ठार करून सरळसरळ जरासंधालाच आव्हान दिले. जरासंधाने समविचारी सत्ताधीशांशी हातमिळवणी करून मथुरेवर अठरा वेळा आक्रमण केले. शेवटी कृष्णाने आपले राज्य मथुरेहून पश्‍चिम किनाऱ्यावरील द्वारका येथे स्थलांतरित करून जरासंधाची आक्रमणे थांबवली. काही वर्षांनंतर पांडवांना हाताशी धरून भीमाकरवी जरासंधाचाही मृत्यू घडवून आणला. जरासंधाचे अपूर्ण राहिलेले एकछत्री साम्राज्यनिर्मितीचे काम पुढे नंद आणि मौर्य या वंशांनी पूर्ण करून मगधाचे साम्राज्य उभारले. तिकडे ग्रीस देशात अशा प्रकारचे कार्य ॲलेक्‍झांडरने केले.  मथुरा गणराज्यातील कारभार गणाच्या सभासदांच्या विचारविनिमयातून चालत असे. यादवांच्या राजसभेच्या इमारतीचे नाव ‘सुधर्मा’ असे होते. अर्जुनाने (कृष्णाच्याच सल्ल्याने) सुभद्रेला पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला. हा प्रकार मान्य नसलेल्या बलरामाने लगेचच यादवांना ‘सुधर्मा’त पाचारण करून त्यावर चर्चा घडवून आणली. चर्चेत कृष्णाने या विवाहाचे समर्थन करीत संभाव्य संघर्ष टाळला.

युरोपात ग्रीकांनी चालविलेली व्यवस्था नंतर रोमन लोकांनी अंगीकारली. वस्तुतः ग्रीकांची नगरराज्ये आकाराने लहान असल्यामुळे त्यांना लोकशाहीचे व्यवस्थापन करणे अवघड नव्हते. रोमचे राज्य विस्तारत साम्राज्य झाले. तेथे हा प्रकार सोपा नव्हता; पण त्यांनी प्रयत्न केला. कालौघात रोमन साम्राज्याचे विघटन होऊन युरोप खंडात अनेक राज्ये निर्माण झाली. तथापि रोमन लोकशाहीच्या स्मृती बुजल्या नाहीत. त्यामुळेच कदाचित अगोदर राजसत्ताक असलेल्या या राष्ट्रांनी लोकशाहीचा अंगीकार केला असणार. रोमन राज्य हे लोकप्रतिनिधींनी चालवलेले कायद्याचे राज्य होते. लोकप्रतिनिधींना ‘सिनेटर’ म्हटले जाई. हे सिनेटर ‘सुधर्मा’सारख्या सभागृहात एकत्र येऊन कारभाराची चर्चा करीत असत. महाराष्ट्रातील पैठणच्या परिसरात विणलेल्या वस्त्रांनी रोमन ललनांना इतके मोहून टाकले होते, की त्यांच्या हट्टापायी रोमचे कितीतरी चलन महाराष्ट्रात जाई. हे कसे थांबवता येईल याची चर्चा रोमन सिनेटरांनी सिनेटमध्ये घडवून आणली होती. रोमन साम्राज्याचे विघटन मध्यआशियातील टोळ्यांनी घडवून आणल्यानंतरचा काही काळ अराजकात गेला. त्यानंतर युरोपियन राष्ट्रांचा उदय झाला. त्यांची उत्क्रांती राष्ट्र-राज्यांमध्ये (Nation States) झाली. 

लोकशाहीविषयीची ही चर्चा राज्यव्यवस्थेबद्दलची, राज्यशास्त्रीय (Political) होती. राजेशाही, लोकशाही, तज्ज्ञशाही या राजकीय बाबी होत. पण राज्य चालते ते मुख्यतः त्याला कराच्या वगैरे स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या महसुलातून. म्हणजेच राज्याची उत्पादनव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थाही तेवढीच महत्त्वाची असते. मार्क्‍सवादी विचारवंतांनी केलेल्या मांडणीनुसार ग्रीक नगरराज्यांच्या काळातील अर्थव्यवस्था ही दासप्रथाक (Slavery) होती. मध्ययुगीन रोमन व्यवस्थेत गुलाम असले तरी ही व्यवस्था ‘Patrician’ आणि ‘Plebeian’ या वर्गांवर आधारित होती. पहिला वर्ग राज्यकारभार करणाऱ्या उच्चभ्रूंचा, तर दुसरा उत्पादक सर्वसामान्य बहुजनांचा. रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेल्या लहानमोठ्या राज्यांमध्येही भेदाभेदभाव शिल्लक होतेच.  या राज्यांमध्ये आपापसांत स्पर्धा आणि चुरस होतीच. आपला भूप्रदेश वाढावा असे कोणाला वाटणार नाही? तथापि ही स्पर्धा युरोपपुरती मर्यादित न राहता बाहेरील भूप्रदेश जिंकून तेथे आपल्या वसाहती स्थापन करण्याचीही चुरस सुरू झाली. या चुरशीत अगोदर पुढे असलेल्या स्पेन आणि पोर्तुगाल यांना मागे टाकून इंग्लंड पुढे गेले. 

मात्र हे पुढे जाणे केवळ राजकीय स्वरूपाचे नव्हते. त्यामागे आर्थिक बदलांचाही वाटा होता. नव्याने उदयाला येत असलेली व्यवस्था ग्रीक गुलामगिरी किंवा मध्ययुगीन सरंजामी भूदासप्रथा यांच्यापेक्षा वेगळी होती. युरोपातील प्रबोधनातून निष्पन्न झालेल्या वैज्ञानिक क्रांतीतून आणि औद्योगिक क्रांतीतून भांडवलशाही नावाच्या वेगळ्या अर्थव्यवस्थेचा जन्म झाला. या भांडवलशाहीशी सुसंगत राज्यव्यवस्था म्हणजे व्यक्तिवादी, उदारमतवादी लोकशाही होय. भांडवलशाहीप्रमाणे या व्यवस्थेचा विकासही आधी इंग्लंडमध्ये झाला. भांडवलशाही ही अर्थव्यवस्था आणि लोकशाही ही राज्यव्यवस्था या एकमेकांना पूरक आहेत इतकेच नव्हे, तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या दोन्ही एकाच ‘पॅकेज’चा भाग आहेत. 

भारतात इंग्रजांची सत्ता आली तेव्हा तेथे ना लोकशाही होती ना भांडवलशाही. लोकहितवादींनी लोकशाहीची स्वप्ने पाहिली; पण भांडवलशाहीविषयी त्यांनी काहीच विचार केला नव्हता का?

संबंधित बातम्या