हेगेल, मार्क्‍स आणि सावरकर

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 31 जानेवारी 2022

 विश्‍वाचे आर्त

या महाप्रचंड विश्‍वाची निर्मिती कशी झाली, त्यात आपली सूर्यमाला कशी अस्तित्वात आली, आपल्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर सजीवांची उत्पत्ती केव्हा व कशी झाली आणि याच सजीवांची उत्क्रांती होऊन मानव केव्हा अवतीर्ण झाला हे सर्वच प्रश्‍न वेधक आणि रोचक आहेत आणि त्यांची शास्त्रशुद्ध चर्चा करणाऱ्या महास्फोटापासून उत्क्रांतीपर्यंत अनेक उपपत्ती मांडण्यात आल्या आहेत. हाही एक प्रकारचा इतिहास म्हणता येईल

‘इतिहास’ हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. काळाच्या ओघात एकामागून एक घडणारा घटनाक्रम हा एक अर्थ आणि त्या घटनाक्रमाची सोपपत्तिक मांडणी व विश्‍लेषण हा दुसरा अर्थ. पहिला म्हणजे ‘इतिहास-१’ वास्तवात घडल्याशिवाय दुसरा म्हणजे ‘इतिहास-२’ लिहिणे (किंवा बोलणे) शक्‍यच नसते, हे आता वेगळे सांगायची गरज नाही. इतिहासकार इतिहास लिहितात ते दुसऱ्या म्हणजे ‘इतिहास-२’ या अर्थाने. ऐतिहासिक घटनांचे कर्ते, नायक इतिहास घडवीत असतात ते ‘इतिहास-१’ या अर्थाने. प्रस्तुतची लेखमाला ही ‘इतिहास-२’ या अर्थाने इतिहास म्हणता येईल. ही लेखमाला लिहिणे शक्‍य झाले याचे कारण ‘इतिहास-१’ या अर्थाने इतिहास घडून गेला आहे. 

या विवेचनावरून आणखी एक गोष्ट स्पष्ट व्हायला हरकत नसावी. ती म्हणजे इतिहासाचा संबंध मानवी विश्‍वाशी आहे. हे मानवी विश्‍व पृथ्वी नावाच्या सूर्यमालेतील एका ग्रहावर साकार झाले आहे. खरे तर पृथ्वीसह सूर्यमालाच काय परंतु सूर्यमालेसारख्या कितीतरी सूर्यमाला आणि अशा कितीतरी सूर्यमालांचा समावेश असलेल्या कितीतरी आकाशगंगा यांचे महाप्रचंड विश्‍व अस्तित्वात आहे. या महाप्रचंड विश्‍वाची निर्मिती कशी झाली, त्यात आपली सूर्यमाला कशी अस्तित्वात आली, आपल्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर सजीवांची उत्पत्ती केव्हा व कशी झाली आणि याच सजीवांची उत्क्रांती होऊन मानव केव्हा अवतीर्ण झाला हे सर्वच प्रश्‍न वेधक आणि रोचक आहेत आणि त्यांची शास्त्रशुद्ध चर्चा करणाऱ्या महास्फोटापासून उत्क्रांतीपर्यंत अनेक उपपत्ती मांडण्यात आल्या आहेत. हाही एक प्रकारचा इतिहास म्हणता येईल; पण आपण ज्या इतिहासाची (म्हणजे अर्थातच ‘इतिहास-२’ची) मांडणी करीत आहोत त्याचा या म्हणजे मानवपूर्व व मानवनिरपेक्ष इतिहासाशी साक्षात संबंध नाही. अर्थात अशा उपपत्तींचा किंवा त्या मांडणाऱ्या, सिद्ध किंवा असिद्ध करणाऱ्या वैज्ञानिकांचा, विज्ञानाचा इतिहास (२) लिहिता येतो. लिहिला जातोसुद्धा; पण तो त्या-त्या कल्पनांच्या (Ideas) वा संस्थांच्या (Institutions) इतिहास होईल. अशा कल्पना मांडणारे वा संस्था (उदा. रॉयल सोसायटी, नासा) उभारणारेही इतिहासाचे कर्तेच असतात. माणसेच असतात. 

पण मग इतिहासाचा विषय होणाऱ्या आपल्या मानवी विश्‍वाचा मानवपूर्व, मानवनिरपेक्ष अशा विश्‍वाशी काय संबंध आहे आणि त्याही पुढे जाऊन या मानवपूर्व विश्‍वाच्या पलीकडे त्याचे नियंत्रण करणारी, त्याला निर्माण करणारी शक्ती आहे काय, असेही प्रश्‍न उपस्थित होतात. मानवी विश्‍वाचा इतिहास लिहिणारे अनेक वेळा या प्रश्‍नांची होकारार्थी उत्तरे गृहित धरून इतिहास लिहीत असतात. काहींना हे प्रश्‍न निरर्थक किंवा अनावश्‍यक किंवा ज्यांची उत्तरे  सापडणार नाहीत असे अज्ञेयउत्तरी वाटतात. बहुतेक सर्व धर्मांनी या प्रश्‍नांची अर्थपूर्णता गृहित धरली आहे व त्यांची उत्तरे देण्याचे प्रयत्नही केले आहेत हे वेगळे सांगायला नको. 

मानवनिरपेक्ष वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करायच्या विश्‍वाच्या पद्धतीला शंकराचार्य अध्यात्मशास्त्रात ‘वस्तुतंत्र’ असे म्हणतात. मानवसापेक्ष पद्धतीने विचार करणे ही पुरुषतंत्र पद्धती होय. अर्थात पुरुषाचे व्यवहार समजून घेताना वस्तूविचाराला (शंकराचार्यांसाठी ती वस्तू म्हणजे अर्थातच ब्रह्म) पूर्णपणे वळसा घालून चालणार नाही हे उघड आहे. 

मानवी विश्‍वासह एकूणच विश्‍वाचे त्याच्या मागे असलेल्या अज्ञेय शक्तीविषयीचे चिंतन फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेले आहे. वेदांमध्ये नासदीय सूक्तासारख्या कृती या संदर्भात महत्त्वाच्या आहेत. मध्यंतरी ज्या बद्दल काही वाद उत्पन्न झाले होते त्या पुरुषसूक्ताचाही उल्लेख करायला हवा. 

या संदर्भातील पाश्‍चात्त्य विचारांची चर्चा करण्यापूर्वी महाराष्ट्रातील एका कवीच्या कवितेचा निर्देश करायला हवा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘जगन्नाथाचा रथोत्सव’ या कवितेचा हा संदर्भ आहे. 

महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी वेगळ्या कारणास्तव सावरकरांच्या कवितेविषयी काही महत्त्वाची माहिती ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात दिली आहे. यशवंतराव अगदी तरुण वयात महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून येरवडा तुरुंगात डांबले. तुरुंगात गांधीवाद व इतरही राजकीय संप्रदायांचे चांगले ज्ञान असलेली ज्येष्ठ नेतेमंडळी होती. ती आपल्या सहबंद्यांसाठी बौद्धिक वर्ग चालवीत. विनायकराव भुस्कुटे मार्क्‍सवादाचे विवेचन करीत. गांधीवादाचे प्रवक्ते होते आचार्य सखाराम जगन्नाथ भागवत. एक गांधीवादी विचारवंत म्हणून भागवत सावरकरांचे कट्टर राजकीय विरोधक होते. त्यामुळे ते सावरकरांच्या राजकीय विचारांवर कडक टीका करीत असत. तथापि, जेव्हा ‘कवी’ सावरकरांचा विषय निघाला तेव्हा भागवत एकदम भावुक झाले व सावरकरांच्या प्रतिभेचे गुणगान करू लागले. त्यांनी सावरकरांच्या ‘गोमंतक’ आणि ‘कमला’ या खंडकाव्यांचे वर्गच घेतले. थोडक्‍यात त्यांनी राजकारणी सावरकर आणि कवी सावरकर यांच्यात भेद केला. सावरकरांचे राजकारण त्यांना मान्य नसले तरी ती गोष्ट त्यांनी सावरकरांच्या कवितेच्या रसग्रहणाच्या आड येऊ दिली नाही, हे यशवंतराव आवर्जून निदर्शनास आणतात. हेही सांगणे अस्थानी होणार नाही, की अश्लीलतेच्या खटल्यातून कविवर्य बा. सी. मर्ढेकर दोषमुक्त झाले ते गांधीवादी आचार्य जावडेकरांच्या साक्षीमुळे! 

ग्रह-नक्षत्रांसह सर्व विश्‍वच जगन्नाथाचा, एका अलौकिक शक्तीचा जणू रथ असून, त्याची उत्सवी आगेकूच चालू आहे असे सावरकर या कवितेतून सांगतात. 

‘‘ऐश्‍वर्ये भारी । या अशा । ऐश्‍वर्ये भारी ।। महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी’’ हे या कवितेचे धृपद आहे. ‘‘मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी ।। दुज्या कुण्या द्वारी । किंवा केवल मिरवत येई परत निजागारी ।।’’

या मिरवणुकीत काही जीव सामील होऊन रथ ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘‘जीवाचीच किती । कथा या । जीवाचीच किती ।। रथासी जगन्नाथ तुझ्या ओढू जे झटती ।। ज्वालामुखि पंक्ती । 

पासुनी । ज्वालामुखि पंक्ती । - मज्जापिंडापर्यंत प्रस्फुटिता जी जगती ।। उंच निंच पाठी ।  पुढति वा । उंच निंच पाठी ।’’

हे जीव रथ ओढताना दिसत असले तरी रथाचे लगाम मात्र त्यांच्या हाती नसून जगन्नाथाच्या हातात आहेत. तोच जगन्नाथ आपल्या इच्छेनुसार रथ चालवीत आहे. ‘‘या भूतमात्र वेगांच्या । ओवूनि लगामा तुझ्या परम-इच्छेच्या । त्या अतुट उतरणीवरति अहो काळाच्या । खेळत हा अतली । रथोत्सव । खेळत हा अतली ।’’ हा रथ काळाच्या (अ)तलावरून चालणारा आहे, हा उल्लेख इतिहासाचे सूचन करतो. 

या कवितेवर भाष्य करताना भारती बिर्जे-डिग्गीकर म्हणतात, ‘जगन्नाथाच्या रथाची’ ही गती अशी सजीव भूतमात्रांच्या मनःपूत स्वैर इच्छांमधून प्रकट होते, तेव्हा त्या गतीरूप अश्‍वांना जुंपलेला रथ उधळून कसा जात नाही? या जीवमात्रांच्या इच्छा तर स्वतंत्र, परस्परविरोधी दिशांना वाऱ्यासारख्या धावणाऱ्या आहेत. पण सावरकर सांगताहेत, की तसे होत नाही; कारण या इच्छारूप अश्‍वांच्या नाकात परमेश्‍वराच्या परम-इच्छेची वेसण-लगाम आहे. हा अस्ताव्यस्त अनियंत्रित वाटणारा खेळ कुणाच्या तरी नियंत्रणाखाली आहे.’’ 

सावरकरांचे उपरोक्त तत्त्वज्ञान वेगळ्या सांस्कृतिक चौकटीत जर्मन चिद्वादी तत्त्वज्ञ हेगेलचे इतिहासाचे तत्त्वज्ञान सूत्ररूपाने व्यक्त करते. विश्‍वाचा इतिहास हा विश्‍वचैतन्याच्या (Idea, Spirit) प्रकटीकरणाचा प्रवास आहे, असे हेगेल सांगतो. ज्यांना आपण इतिहास घडवणारे महामानव वगैरे (उदा. नेपोलियन) म्हणतो ते या प्रवासात साधनमात्र (Instrumental) असतात. त्यांना स्वतःला ज्ञात नसणाऱ्या उद्दिष्टांसाठी इतिहास त्यांना जणू वापरून घेतो, हेच ते ‘Cunning of History’ होय. इतिहासात वाईटातून चांगले कसे निष्पन्न होते याचे हे स्पष्टीकरणच आहे. या प्रकारच्या सिद्धांताचे सूचन जर्मन तत्त्ववेत्ता ऑगस्ट कांट याने आधीच केले होते. फार काय ॲडम स्मिथसारखा अर्थशास्त्रज्ञ मुक्त बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचे स्पष्टीकरण करताना, ती सरकार वगैरे बाह्य हस्तक्षेपाशिवाय व्यवस्थितरीत्या कशी चालू शकते हे सांगताना ‘अदृश्‍य हाताचा’ (Invisible Hand) उल्लेख करतो. मुक्त बाजारपेठेची अर्थव्यवस्था चांगली की वाईट हा मुद्दा वेगळा; पण अशा व्यवस्थेच्या मागे कोणती तरी अदृश्‍य शक्ती कार्यरत आहे हा विश्‍वास/ श्रद्धा/ अंधश्रद्धा नजरेआड करण्यासारखी गोष्ट नाही. 

विश्‍व हे अशा प्रकारे चित्शक्तीचा विलास आहे, हे मत आपल्याकडे काश्‍मीर शैव अथवा प्रत्यभिज्ञा दर्शनाने मांडले. संत ज्ञानेश्‍वरांनी ‘अनुभवामृत’ ग्रंथात मांडलेला चिद्विलासवाद या मताशी जवळिकीचे नाते सांगणारा आहे. उत्क्रांतीला पूर्वनियोजित आराखड्याचा भाग मानायचे की आंधळ्या जडशक्तींच्या परस्परसंघर्षातून उद्‌भवणारा अपघात मानायचे, हा महत्त्वाचा तात्त्विक प्रश्‍न आहे. इतिहास लिहिणाऱ्यांना त्याचाही विचार करावाच लागतो. ‘इतिहास-१’ला स्वतःचे असे काही प्रयोजन व दिशा असते का व त्याचे स्पष्टीकरण करणे ‘इतिहास-२’ला होणे शक्‍य आहे का? हेगेल आणि मार्क्‍स यांनी दिलेले या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी आहे; पण त्यांच्यात महत्त्वाचा भेदही आहे. हेगेलचे उत्तर चिद्वादी (Idealist) आहे, तर मार्क्‍सचे उत्तर भौतिकवादी (Materialist) आहे, तर सावरकर अज्ञेयवादी असल्याचे मानले जाते.

 

संबंधित बातम्या