मार्क्‍सवादाचे अन्वयार्थ...

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

विश्‍वाचे आर्त

हेगेलने आपल्या इतिहासमीमांसेत द्वंद्वात्मक पद्धतीचा अवलंब केला. कोणताही विकास द्वंद्वात्मकरीत्याच होतो. मुळात हेगेल चित्स्वरूपवादी असल्याने व जाणणे, विचार करणे ही चित्स्वरूपाची निजखूण असल्याने मूळ तत्त्ववस्तूचा विकाससुद्धा वैचारिक पद्धतीने होतो. सिद्धांत मांडणे ही पहिली पायरी. त्या सिद्धांताचा प्रतिवाद करून प्रतिसिद्धांत मांडणे ही दुसरी पायरी आणि प्रतिवादप्रक्रियेत सिद्धांतातील ग्राह्यांश ग्रहण करून समन्वय साधणे ही तिसरी पायरी होय. थिसिस, अॅन्टीथिसिस आणि सिंथेसिस अशी ही तत्त्ववस्तूची त्रिपदी होय.

हेगेलच्या चिद्वादी अध्यात्मिक स्वरूपाच्या इतिहासमीमांसेमध्ये इतिहासाच्या पलीकडील कोणत्या तरी अस्तित्वाला गृहीत धरून विचार करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर अस्तित्व चैतन्यरूप असून ज्ञानात्मक आहे, स्व-जाणीव हे त्याचे वैशिष्ट्य आहे असेही मानण्यात आले होते. मुळात अशा अस्तित्वाने इतिहासासारख्या क्‍लेशकारक प्रक्रियेतून जावेच का? असे कोणी विचारले तर ‘आत्मप्रत्ययासाठी’ हे उत्तर आहे. हे मूलतत्त्व एकमेवाद्वितीय आहे; पण प्रत्ययासाठी मात्र दुसऱ्या कोणाची तरी आवश्‍यकता असते. हा विचार उपनिषदांमध्येही सापडतो. ज्ञानेश्‍वर, तुकारामादि संतांच्या साहित्यातही आढळतो. अर्थात या विचारांवर आधारित इतिहासमीमांसा करायचा प्रयत्न येथे कोणी केलेला दिसत नाही; तो हेगेलने केला. 

हेगेलने आपल्या इतिहासमीमांसेत द्वंद्वात्मक पद्धतीचा अवलंब केला. कोणताही विकास द्वंद्वात्मकरीत्याच (Dialectical) होतो. मुळात हेगेल चित्स्वरूपवादी असल्याने; व जाणणे, विचार करणे ही चित्स्वरूपाची निजखूण असल्याने मूळ तत्त्ववस्तूचा विकाससुद्धा वैचारिक पद्धतीने होतो. सिद्धांत मांडणे ही पहिली पायरी. त्या सिद्धांताचा प्रतिवाद करून प्रतिसिद्धांत मांडणे ही दुसरी पायरी आणि प्रतिवादप्रक्रियेत सिद्धांतातील ग्राह्यांश ग्रहण करून समन्वय साधणे ही तिसरी पायरी होय. थिसिस (Thesis), अॅन्टीथिसिस (Antithesis)  आणि सिंथेसिस (Synthesis) अशी ही तत्त्ववस्तूची त्रिपदी होय. पुढील टप्प्यावर तिसऱ्या पायरीला म्हणजे समन्वयालाच सिद्धांत करून त्याचा प्रतिवाद करीत त्याला नाकारले जाते. तो नवा प्रतिसिद्धांत झाला. त्यानंतर अर्थातच त्यालाही नाकारताना, तो ज्याचा नकार होता त्या (समन्वयात्मक मूळ) सिद्धांताबरोबर त्याचा समन्वय घडवून तिसऱ्या पायरीचा (नवा) समन्वय अस्तित्वात येतो. विचाराच्या क्षेत्रात ही प्रक्रिया अंतिमतः ज्याचा प्रतिवाद करता येत नाही अशा महासिद्धांतापर्यंत पोचते हे सर्वमान्य आहे. इतिहासात ही प्रक्रिया जाणीवरूप शुद्ध चैतन्यवस्तूला आत्मप्रत्यय येईपर्यंत सुरू राहते. दरम्यानच्या काळात सिद्धांतरूप शुद्ध चैतन्याचा नकार किंवा प्रतिवाद म्हणून जडस्वरूप निसर्ग अस्तित्वात आलेला असतो. वस्तुतः जड (Material) भासणारा हा निसर्ग चिद्वस्तूचेच दुसरे स्वरूप, तिचीच वेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती असते. ते या वस्तूचे स्वतःचेच स्वतःला परंतु वेगळ्या स्वरूपात दुसरे होऊन सन्मुख होणे, सामोरे जाणे असते. मात्र या प्रक्रियेत मुळातले अद्वैत जणू भंगल्यासारखे होऊन चिद्वस्तूमध्ये एक प्रकारची परात्मतेची, दुरीकरणाची (Alienation) जाणीव उत्पन्न होते; ती संपुष्टात आणून म्हणजेच तिच्यावर मात करून चिद्वस्तूने मूळ रूपात परत येऊन आत्मप्रत्यय घेणे यासाठी इतिहासाचा हा प्रचंड प्रपंच मांडला जातो. वरकरणी भौतिक वाटणारी प्रक्रिया ही खरे तर आंतरिक वैचारिक असते. आत्मभान असलेले मानवी मन हा या महानाट्याचा रंगमंच आहे. मानवी मनोव्यापारांच्या माध्यमातून स्वतः परतत्त्वाला झालेली ही स्वतःचीच प्रत्यभिज्ञा आहे. मानवी ज्ञात्याच्या (Subject) अभिज्ञेच्या (Cognition) मधून विश्‍वचैतन्याची ही प्रत्यभिज्ञ (Re-cognition) होय. काही प्रमाणात शांकराद्वैताच्या व त्याहीपेक्षा काश्‍मीर शैव दर्शनाच्या अंगाने जाणारे हे हेगेलकृत इतिहासदर्शन आहे. हेगेलचा भौतिक इतिहासाचा भाग वगळून जे काही शुद्ध तात्त्विक पातळीवर उरेल ते म्हणजे ज्ञानेश्‍वरांचा ‘अमृतानुभव’ होय. हेगेलच्या विचारात जी परात्मता (Alienation) येते ती मात्र शांकर वेदांताच्या जवळ जाणारी आहे. (कारण त्यात जीवत्व हे आत्मलोपात्मक जाणिवेशी निगडित केले गेले आहे.) काश्‍मीर शैव तत्त्वज्ञान व ज्ञानेश्‍वर त्याकडे त्या परमचैतन्यतत्त्वाची, शिवाची क्रीडा म्हणून बघतात. 

प्रा. दि. के. बेडेकर यांचा ‘हेगेलः जीवन आणि तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ या संदर्भात वाचनीय आहे. दि.कें.चे वडील केशवराव ज्ञानेश्‍वरांचे अभ्यासक होते. त्यांनी ‘अमृतानुभवा’वर पुस्तकही लिहिले होते. तेही काश्‍मीर शैव तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात. का कोणास ठाऊक ही बाब दि.कें.च्या ध्यानातून निसटली खरी! 

इतिहासावर लिहायचे झाले तर हेगेलला टाळून पुढे जाता येत नाही म्हणून हे सर्व लिहावे लागले. सॉक्रेटिसपूर्व ग्रीक तत्त्वज्ञानापासून इमॅन्युअल कांटपर्यंतच्या पाश्चात्त्य विचारपरंपरेचा हेगेल हा जणू अर्कच आहे. 

आपल्या पूर्ववयात कार्ल मार्क्‍स हेगेलच्या तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट झाला होता. तरुण हेगेलवादी (Young Hegelians) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनौपचारिक गटाचा तो सदस्यच होता. त्याचे अगोदरच्या काळातील लेखन हेगेलने प्रभावित आहे. ‘इकॉनॉमिक अॅण्ड पोलिटिकल मॅन्युस्क्रिप्टस’ (किंवा ‘पॅरिस मॅन्युस्क्रिप्टस’) हे त्याचे पुस्तक याचा निर्णायक पुरावा मानला जातो. उत्तरकाळात हेगेलच्या विचारातील चिद्वादी सत्ताशास्त्र धार्मिक अंश व विशेषतः गूढतेची छटा त्याला जाणवू लागली. या घटकांचा त्याग करताना त्याने हेगेलची द्वंद्वात्मक पद्धती मात्र सोडली नाही. नंतर मार्क्‍सवाद्यांमध्येच मार्क्‍सच्या विचारांच्या विकासाची कल्पना रूढ झाली. काहींनी हेगेलप्रभावीत पूर्ववयातील चिद्वादी अवैज्ञानिक अपरिपक्व मार्क्‍स नाकारला. त्यांच्या मते, उत्तरकालीन मार्क्‍स हा पूर्णपणे जडवादी व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणारा होता. या भूमिकेप्रमाणे मार्क्‍सला मानवतावादी वगैरे म्हणण्याची गरजच नाही. 

मार्क्‍सच्या या वैज्ञानिक भूमिकेची संरचनावादी (Structuralist) मांडणी फ्रेंच विचारवंत लुई अल्युझर यांनी केली. मार्क्‍सवादी वर्तुळात ती लोकप्रिय व प्रभावी ठरली. 

मात्र काही अभ्यासकांच्या मते अपरिपक्व पूर्वमार्क्‍स आणि परिपक्व वैज्ञानिक उत्तरमार्क्‍स असा खंडित विचार करायची गरज नसून या प्रक्रियेकडेही द्वंद्वात्मक विकास पद्धतीने पाहिले तर तिच्यात सातत्य दिसून येते. पूर्वकालीन मार्क्‍सच्या विचारातील हेगेलियन वाटणाऱ्या काही संकल्पना रूपांतरित होऊन उत्तरकालीन, ‘कॅपिटल’ लिहिणाऱ्या मार्क्‍समध्ये अवतरल्या आहेत. 

लेनिन, स्टॅलिन आणि रशियन कम्युनिस्ट हे मार्क्‍सवादाला विज्ञान मानणारे असल्यामुळे त्यांनी तत्त्वज्ञ, नीतिवेत्त्या मार्क्‍सला प्रायः नाकारल्यातच जमा आहे. तथापि अगदी लेनिनसुद्धा, मार्क्‍स समजायचा असेल तर हेगेल समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही, याच निष्कर्षापर्यंत आला होता. 

ते काहीही असो, हेगेलने मांडलेला एक महत्त्वाचा मुद्दा युरोपीय विचारविश्‍वात खूपच परिणाम ठरला, यात शंका नाही. तो म्हणजे इतिहासाला उद्दिष्ट असते व अर्थातच त्याअनुषंगाने दिशासुद्धा. त्याचे हे मत मार्क्‍सला अर्थातच मान्य होते; परंतु या एकूणच इतिहासाचा कर्ता किंवा महानायक म्हणून हेगेलने गृहीत धरलेले विश्‍वचैतन्य त्याने नाकारले. इतिहासाचा नायक इतिहासाच्या पलीकडील किंवा इतिहासाच्या बाहेर असण्याची गरज नाही आणि तो तसा नसतानाही इतिहासाच्या नियमबद्धतेची किंवा ऐतिहासिक नियतीची व्यवस्था लावता येते किंवा या प्रक्रियेलाच नायक समजले तरी चालेल. आधुनिक युगात श्रमिक कामगार वर्ग हा या प्रक्रियेचा वहनकर्ता (Agent) असून, तो क्रांतीच्या माध्यमातून भांडवलशाही व्यवस्था उलथून टाकून वर्गविहिन साम्यवादी समाज अस्तित्वात आणील, हा मार्क्‍सचा सिद्धांत. त्यानुसार मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. हेगेलप्रमाणे अमूर्त विचारप्रक्रिया ही इतिहासाची यंत्रणा (Mechanism) नसून भौतिक उत्पादनप्रक्रिया इतिहास घडवते. या प्रक्रियेतील उत्पादनसाधनांची मालकी ज्याच्या हाती आहे तो वर्ग, अशी मालकी नसणाऱ्या श्रमिकांचे शोषण करतो. भांडवलशाही व्यवस्थेत या शोषणाचा कडेलोट होऊन श्रमिकांना क्रांतीशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. हेगेल आणि मार्क्‍स यांच्यातील एक महत्त्वाचा साम्यबिंदू येथे दृगोच्चर होते. जसा आणि जितका हेगेल ऐतिहासिक, अपरिहार्यतेच्या, नियततेचा पुरस्कार करतो तसा आणि तितका मार्क्‍सही करतो. इतिहासाचे उद्दिष्ट, दिशा आणि गती पूर्वनियोजित असते हे हेगेलला मान्य होते, तसेच ते मार्क्‍सलाही मान्य दिसते. भांडवलशाहीकडून होणारे शोषण असह्य होऊन श्रमिक वर्ग क्रांती करील. मात्र ही क्रांती म्हणजे या वर्गाने जाणीवपूर्वक, विचारपूर्वक केलेली कृती असण्याऐवजी ऐतिहासिक अपरिहार्यतेची अटळ निष्पत्ती म्हणायची का? 

प्रश्‍न असा उपस्थित होतो, की मग मार्क्‍स, मार्क्‍सवाद, कामगार संघटना यांची गरजच काय? इतिहास तर अपरिहार्यपणे आपली वाटचाल करणारच आहे. 

अशा प्रकारच्या क्रांतीसाठी श्रमिकांना शोषणाची जाणीव करून द्यायची व त्यांच्यात वर्गजाणीव निर्माण करायची गरज आहे. त्यासाठीच कामगार संघटना, पक्ष वगैरे. दुसरे असे, की अशा हस्तक्षेपाअभावी भांडवलदार वर्ग क्रांती थोपवण्याचा, लांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार; तो रोखला पाहिजे. 

थोडक्‍यात क्रांती ही ऐतिहासिक अपरिहार्यता असली, तरी तिच्यासाठी वहनकर्ता (Agency) असायला हवा व या वहनकर्त्याची तयारी करून घेणेही आवश्‍यक आहे. प्रसूती सुकर करणे हे सुइणीचे काम, तसेच हे आहे. 

मार्क्‍सच्या विचारात अंतर्गत ताण आहे हे नाकारता येणार नाही हे मात्र खरे. त्यामुळे त्याच्या परस्परविरोधी अन्वयार्थींना वाव मिळाला असणार. रशियाचा वेगळा आणि चीनचा वेगळा भाकपचे एक, माकपचे दुसरे आणि माओवाद्यांचे तिसरेच! 

तिकडे रशियाच्या आश्रयाला असलेल्या पूर्व व मध्य युरोपीय राष्ट्रांना मॉस्कोप्रणीत अन्वयार्थ खरा मानावा लागणार हे उघड आहे. तरीही युगोस्लाव्हियाच्या मार्शल टिटोने वेगळा सूर लावलाच. फ्रान्स, हंगेरी आणि इटली येथील कम्युनिस्टांनीही आपापले अर्थ पुढे केले. 

मानव (वंश)शास्त्रातील संशोधनाच्या आधारे मार्क्‍सचा सहकारी फ्रेडरिक एंगल्स मार्क्‍सवाद बळकट करू पाहत होता; पण आपल्या इथे कॉ. शरद पाटलांनी या संशोधनाच्या व भारतविद्येच्या तसेच व्युत्पत्तीशास्त्राच्या आधारे स्त्रीराज्याची वेगळीच मांडणी केली!

संबंधित बातम्या