धूमकेतूचा उदय? 

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

 विश्‍वाचे आर्त

शीतयुद्धाची परिसमाप्ती कोणाच्या जयापराजयाने झाली नाही. रशियाने एकतर्फी माघार घेतली आणि इतिहासाच्या नाटकामधील एका तणावग्रस्त अंकावर पडदा पडला. प्रतिस्पर्ध्याच्या अंगाला भिडून डावपेच न करता केवळ खडाखडीतच त्याला दमवून आखाडा सोडायला भाग पाडणाऱ्या पहिलवानाप्रमाणे अमेरिकेचा हा विजय होता; पण हा रशियाचाही पराभव नसून माघार होती. यशस्वी माघार म्हणता येईल की नाही यावरही चर्चा होऊ शकेल.

भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन परस्परविरोधी तात्त्विक आणि आर्थिक विचारधारांमुळे झालेला संघर्ष केवळ रशिया आणि अमेरिका या दोन राष्ट्रांपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण जगाचीच संघर्ष करणाऱ्या दोन गटांमध्ये विभागणी झाली. इतिहासात यापूर्वीच्या काळात जे संघर्ष झाले, रक्तपाती लढाया झाल्या त्या आपापल्या सीमांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रांमध्ये. आधुनिक काळात असा संघर्ष करणारी राष्ट्रे ही सहसा भांडवलशाही विचार मान्य असणारीच होती. निदान विरोधी म्हणता येईल असे कोणी नव्हते. 

मात्र आधुनिक काळातून थोडे मागे मध्ययुगात गेलो तर तेथे मात्र दोन गट संघर्षशील झाल्याचे दिसून येते. ही विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती. एका बाजूला ख्रिश्‍चन राष्ट्रे आणि दुसऱ्या बाजूला इस्लामी राष्ट्रे अशा दोन गटांमधील हा संघर्ष असल्याने त्यांनी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे (Crusade) असे म्हटले जाते. एरवी मुस्लिम धर्मियांच्या ताब्यात असलेले जेरुसलेम हे शहर ख्रिस्ती धर्मियांसाठीही पवित्र धर्मक्षेत्रच होते. त्याचा ताबा घेण्यासाठी युरोपातील ख्रिस्ती राष्ट्रांनी या लढाया लढल्या. 

अमेरिका आणि रशिया यांच्या गटांमधील युद्ध हे अशा प्रकारचे प्रत्यक्ष म्हणजे खरोखरच लढले गेलेले युद्ध नव्हते. खरोखरचे युद्ध झाले तर दोन्ही बाजू अण्वस्त्रसज्ज असल्याने सर्वनाश होईल याची कल्पना दोन्ही बाजूंना होती. त्यामुळे, ‘होऊनच जाऊ द्या एकदाचा काय तो सोक्षमोक्ष’ अशी भूमिका घ्यायला कोणीच धजत नव्हते. आपली युद्धसज्जता जास्तीत जास्त वाढवणे, इतकी की दुसऱ्याची आपल्यावर हल्ला करण्याची हिंमतच होऊ नये, ही भूमिका घेऊन दोघांनीही आपापल्या राष्ट्रीय संपत्तीचा अतोनात अपव्यय केला. या युद्धासाठी ‘शीतयुद्ध’ (Cold War) हा शब्द नव्याने घडवावा लागला! 

हे युद्ध धार्मिक नसून आर्थिक तर होतेच; पण त्याच्यामागील प्रेरणा पाहिली तर ती विरोधी विचारप्रणालींची (Ideology) होती. या अर्थाने त्याला विचारप्रणालींचा संघर्ष (Ideological War) असेही म्हणता येईल. त्यात कार्यरत असणाऱ्या निष्ठा आणि प्रेरणा धार्मिक निष्ठा आणि प्रेरणांइतक्‍याच प्रबळ असल्यामुळे त्याला ‘वैचारिक धर्मयुद्ध’ (Ideological Crusade) असे म्हणायला हरकत नाही, तसेच त्या प्रेरणांचे स्वरूप आर्थिक असल्याने ‘अर्थयुद्ध’ असेही म्हणता येईल. 

धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती जगताला अपेक्षित यश मिळाले असे म्हणता येणार नाही. मात्र यानिमित्ताने त्याचा पूर्वेकडील विश्‍वाशी संबंध आला, संपर्क वाढला. दरम्यानच्या काळात अरबांनी अनुवादित करून ठेवलेल्या ॲरिस्टॉटलप्रभृती ग्रीक विचारवंतांच्या ग्रंथांकडे त्यांचे लक्ष गेले. ते ग्रंथ अरबी भाषेतून लॅटिनमध्ये अनुवादित होऊ लागले. या प्रक्रियेचे पर्यवसान युरोपातील प्रबोधनामध्ये झाले. प्रबोधनातून व्यक्तिस्वातंत्र्य व विज्ञान, विज्ञानातून औद्योगिक क्रांती हा विकास लोकशाही नावाच्या व्यवस्थेला कारणीभूत ठरला, असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. 

परधर्माशी युद्ध संपुष्टात आले तरी युरोपीय राष्ट्रांची खुमखुमी संपली असे झाले नाही. खुद्द ख्रिश्‍चन धर्मातील पंथवाद उसळून वर आला. कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथांनी तीसएक वर्षे संघर्ष केला! 

थोडक्‍यात सांगायचे झाल्यास युरोपातील लढायांची प्रेरणा धर्मवाद व नंतर राष्ट्रवाद अशी दुहेरी होती. नव्या मनूतील शीतयुद्ध तात्त्विक आणि आर्थिक स्वरूपाचे होते. 

पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे या युद्धाची परिसमाप्ती कोणाच्या जयापराजयाने झाली नाही. रशियाने एकतर्फी माघार घेतली आणि इतिहासाच्या नाटकामधील एक तणावग्रस्त अंकावर पडदा पडला. प्रतिस्पर्ध्याच्या अंगाला भिडून डावपेच न करता केवळ खडाखडीतच त्याला दमवून आखाडा सोडायला भाग पाडणाऱ्या पहिलवानाप्रमाणे अमेरिकेचा हा विजय होता; पण हा रशियाचाही पराभव नसून माघार होती. यशस्वी माघार म्हणता येईल की नाही यावरही चर्चा होऊ शकेल. 

शीतयुद्धामधील रशियाची एकतर्फी माघार सर्वांनाच अनपेक्षित आणि आश्‍चर्याचा धक्का देणारी ठरली असल्यास नवल नाही. रशियाने इतिहासालाच चकवा दिला, असे म्हणता येईल. खरे तर भांडवलशाही तिच्यातील अंतर्गत विरोधांमुळेच (Internal Contradictions) कोसळेल हा साम्यवाद्यांचा एक लाडका सिद्धांत होता. मात्र येथे घडले ते विपरीतच होते. एक धुरीण साम्यवादी राष्ट्र अंतर्गत विरोधांमुळे कोसळते व त्याचे पडसाद इतरही साम्यवादी राष्ट्रांमध्ये उमटून तेही या व्यवस्थेला सोडचिठ्ठी देतात, हा प्रकारच राजकीय पंडितांना कोड्यात टाकणारा ठरला. 

सोव्हिएत संघाने साम्यवादी विचारधारेचा त्याग करून केलेला खुल्या अर्थव्यवस्थेचा व लोकशाही राज्यप्रणालीचा स्वीकार व त्याचे विघटन यामुळे जगाच्या राजकीय रचनेत मोठे परिवर्तन होणार हे उघड होते. येथपर्यंत जगाची राजकीय रचना द्विध्रुवात्मक होती. अमेरिका आणि रशिया हे ते दोन ध्रुव किंवा केंद्रबिंदू. यातील रशिया हा ध्रुव अचानक अस्तंगत झाला. अढळ ध्रुवाचा ढळला तारा. आता यानंतरचे जग कसे असेल, इतिहास नेमके काय वळण घेईल याची चर्चा सुरू झाली. 

झालेला प्रकार हा भांडवली लोकशाहीचा विजय की साम्यवादी विचारांचा व व्यवस्थेचा पराजय? अनेक उत्साही अभ्यासक, तज्ज्ञ, विचारवंत, पत्रकार पुढे सरसावले. त्यांनी आपापली मते मांडली. 

नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी सोव्हिएत व्यवस्थेचे पतन झाले तेव्हा अमेरिकेला आव्हान द्यायला कोणी उरले नाही. संस्कृतच्या भाषाभांडारातील अभिव्यक्तीच्या आधारे सांगायचे झाल्यास ‘निर्विर्यम्‌ उर्वीतलम्‌’ अशी अवस्था अमेरिकेची झाली! जगाच्या राजकीय व आर्थिक व्यवस्थेचे द्विध्रुवत्व संपुष्टात येऊन एकध्रुवीय व्यवस्था आल्यात जमा आहे, अशी अनेकांची खात्री झाली आणि साहजिकच आहे. 

मधल्या काळात जपान आणि जर्मनी यांच्या अर्थव्यवस्थांनी गती पकडली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेच्या अणुबॉंबमुळे होरपळून निघालेला जपान आता केवळ चांगला सावरला नव्हता, तर आश्रयदात्या संरक्षक अमेरिकेलाच आव्हान द्यायच्या अवस्थेपर्यंत पोचला होता. अकिओ मोइत्रा आणि शिंतारो इशिहरा यांनी १९८९मध्ये लिहिलेला ‘द जपान दॅट कॅन से नो’ हा ग्रंथ या आव्हानाचे प्रतीक समजायला हवे. जर्मनीनेही आर्थिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली असली तरी दरम्यान पूर्व व पश्‍चिम जर्मनीचे एकीकरण झाल्याने पश्‍चिम जर्मनीला काही काळ तरी (म्हणजे पूर्व जर्मनीचा विकास एक विशिष्ट पातळीपर्यंत होईपर्यंत) पूर्व जर्मनीचे ओझे घेऊनच पुढचा प्रवास करावा लागणे भाग होते व त्यामुळे त्याची गती कमी होण्याची शक्‍यताच अधिक होती. (जपानकडूनच धडा घेऊन व त्याच्या पावलावर पाऊल टाकून थोड्याच दिवसांनी चिनी विचारवंतांनी, ‘द चायना कॅन से नो’ असा आत्मविश्‍वास व्यक्त केला.) दरम्यान, पूर्व आशियातून सिंगापूरसारखे नवे आर्थिक व्याघ्र उदयाला येत होते; पण त्या राष्ट्रांचे आकारमान आणि लोकसंख्या यांचा विचार केला तर कोणीही अमेरिकेला पर्याय देत स्वतंत्र केंद्र बनून द्विध्रुवात्मक जगाची पुनःस्थापना करणे शक्‍य नव्हते. 

या संदर्भात आणखी एका गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे. जगातील राष्ट्रांची विभागणी दोन गटांत झाली हे जरी खरे असले, तरी भारत नावाच्या नवस्वतंत्र देशाने या विभागणीला बळी पडायचे नाकारून दोन्ही गटांना समान अंतरावर ठेवण्याचे म्हणजेच अलिप्ततावादाचे धोरण पत्करले होते. त्याचे श्रेय अर्थातच तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे जाते, हे वेगळे सांगायची गरज नाही. विशेषतः नवस्वतंत्र विकसनशील राष्ट्रांना आपले धोरण विकासकेंद्रित ठेवायचे असल्याने त्यांनी बड्यांच्या लठ्ठालठ्ठीत पडू नये, असा एक व्यावहारिक विचार यामागे असला, तरी त्यातून पंचशील वगैरे उच्च पातळीवरील गोष्टीही पुढे आल्या. भारताचा स्पर्धक व शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानने मात्र पहिल्यापासूनच अमेरिकेची कास धरल्यामुळे भारताला राजकीय डावपेच म्हणून रशियाशी मैत्री ठेवणे भाग पडले. रशियाही मैत्रीला जागला. काश्‍मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रसंघात आला, की रशियाने व्हेटो वापरून पाकिस्तान - अमेरिकेचा डाव उधळून लावायचा हे जणू ठरूनच गेले होते. भारतीय औद्योगिक प्रगतीलाही रशियाने हातभार लावला. मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारताने भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यात सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केला याचाही उल्लेख करायला हवा. 

नव्वदीमधील रशियाच्या पतनापर्यंत भारतात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या होत्या. त्यांच्या तपशिलात न जाता मुख्य मुद्दा सांगायचा तो हा, की भारत आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. या काळात पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवले हे खरे असले, तरी भारताकडे रशियाला पर्याय म्हणून कोणी पाहू शकत नव्हते हा मुद्दा आहे. 

अशा परिस्थितीत रशियाचे विघटन जसे अनपेक्षित होते तितकेच चीनने आर्थिक मुसंडी मारणेही अनपेक्षित होते. नव्याने वाहू लागलेल्या जागतिकीकरणाच्या वाऱ्यात भारताला शिरावे लागले होते. त्या दशकातच भारत जागतिक व्यापारी संघटनेच्या (WTO) सदस्य झाला. चीनच्या आधी. खरे तर चीनला जागतिक इतिहासाच्या मुख्य प्रवाहात आणले ते अमेरिकेने आणि तेही रशियाला शह देण्यासाठी. हा शह देऊन झाल्यावर चीनच रशियाची जागा घेऊन जगाला द्विध्रुवीय करायचा प्रयत्न करेल हे कोणालाही स्वप्नातही वाटले नसेल. 

पण तसे झाले खरे. एखाद्या उपटसुंभ धूमकेतूसारखा चीन जागतिक क्षितिजावर अवतीर्ण झाला आणि त्याने ते अवकाशच व्यापून टाकले.

 

संबंधित बातम्या