चीनला नेमके काय हवे आहे?

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 7 मार्च 2022

विश्‍वाचे आर्त

माओच्या मृत्यूनंतर पुढे आलेल्या चिनी नेतृत्वाने देशाचा बंदिस्तपणा कमी करून जागतिक पातळीवरील भांडवलशाहीशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे माओने सोडचिठ्ठी दिलेला देशाचा प्राचीन इतिहासही आपलासा करायचा ठरवले. इतकेच नव्हे, तर माओ ज्याला गाडून टाकायला पाहत होता त्या कन्फ्युशियसच्या विचारांना आपला राष्ट्रीय विचार मानून त्याला आधुनिक विचारांशी जोडून घ्यायचे ठरवले. चीनच्या वर्तमानाची व्याप्ती आता प्राचीन साम्राज्यापर्यंत विस्तारली व कन्फ्युशियस चीनच्या वैचारिकतेचा हिस्सा बनला. आताचा चिनी विचार म्हणजे कन्फ्युशियस, मार्क्‍स आणि माओ यांची भांडवली व्यवस्थेशी घालण्यात आलेली सांगड असे म्हणावे का?

कोणत्याही समूहाला आपल्या वर्तमानाच्या सीमा निश्‍चित करताना भूतकाळात किती मागे जायचे किंवा भविष्यकाळात किती पुढे जायचे हे ठरवायचा हक्क नाकारायचे काही कारण नाही. तो त्याच्या स्वतःच्या निजात्मतेचा (Identity) मुद्दा तर असतोच, पण त्यावरून त्याच्या भविष्यातील उद्दिष्टाची दिशा व ते गाठण्यासाठी अवलंबण्याचा कृतीमार्गही ठरत असतो. त्यानुसार चीनने ‘अवमानशतकाला’ म्हणजे १९व्या, २०व्या शतकांना व चालू २१व्या शतकातील अर्धशतकाला आपल्या वर्तमानात सामावून घेऊन त्यानुसार योजना आखायला वा कृती करायला हरकत कशाला घ्यायची? 

पण मुद्दा अडीच शतकांपुरता मर्यादित नाही. ‘अवमानशतक’ हा शब्दप्रयोगच त्यापूर्वीच्या कालखंडाकडे निर्देश करणारा आहे. चीनचे साम्राज्य हे जगातील सर्वांत प्राचीन, विस्तीर्ण आणि काही सहस्रके टिकलेले साम्राज्य होते. त्याचे सम्राट स्वतःला ईश्‍वराचे प्रतिनिधी व विश्‍वाचे स्वामी समजत. त्यांच्या प्राचीन राजकीय सिद्धांतानुसार परिसरातील सर्व राज्ये त्यांचे स्वामित्व मान्य करून त्यांना खंडणी वगैरे देत असत. त्यांचे जगातील स्थान अव्वल असल्याचा त्यांचा दावा असे. 

चिनी लोकांच्या या दाव्यात अतिशयोक्ती असली तरी तो पूर्णपणे असत्य आहे, असेही म्हणता येत नाही. एक काळ असा होता, की तेव्हा चीन हा अनेक दृष्टींनी बलाढ्य देश होता. त्याचा विस्तार, त्याचे लष्करी सामर्थ्य, त्याचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) यांच्याशी बरोबरी करणे कोणालाही शक्‍य नव्हते. बंदुकीची दारू, मुद्रणतंत्र अशा कितीतरी गोष्टी त्याने पश्‍चिमेच्या अगोदर शोधून काढल्या होत्या. त्याच्याइतके आरमार कोणाकडेच नव्हते. त्याची प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सक्षम व सुनियंत्रित होती. प्रशासकीय सेवेसाठी परीक्षा घेऊन नेमणुका करण्याची पद्धत चीननेच शोधून काढली होती. याहीपुढे जाऊन चीनने स्वतःला सुसंस्कृत राष्ट्र समजावे अशीही परिस्थिती होतीच. चीनने कन्फ्युशियस, लाओ त्से आणि बुद्ध यांचे तत्त्वज्ञान पचवून एक वेगळी वैचारिक व्यवस्था निर्माण केली होती. आपल्याला कोणाकडून काही शिकायची किंवा घेण्याची गरज नाही, अशीच त्याची धारणा होती. किंबहुना आपल्या प्रभावक्षेत्राच्या बाहेरील जगातील इतर राष्ट्रे असंस्कृत असल्याचाही त्याचा समज होता. त्यामुळे परराष्ट्रातील राजसत्तेकडून एखादे शिष्टमंडळ वगैरे आलेच तर त्याला भेटायचे सौजन्य दाखवायलाही चिनी सम्राट राजी नसत आणि झालेच तर अशा शिष्टमंडळाला तुच्छतेची वागणूक मिळायची. 

आणखीही एका मुद्द्याचा उल्लेख करायला हवा. चिनी लोकांना इतिहासाची विलक्षण जाणीव आहे. चिनी सम्राटांच्या काळात दरबारच्या वृत्ताचे लेखन केले जाई व ते दस्त जतन करून ठेवले जात. 

अशा एका ऐतिहासिकतेने भारलेल्या देशात माओने साम्यवादी क्रांती केली, जिच्यामागे कार्ल मार्क्‍सचा विचार व प्रेरणा होती, तसेच अगोदर क्रांती केलेल्या रशियाची प्रेरणाही होती. 

मार्क्‍सच्या विचारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे इतिहासासंबंधीचा वेगळा सिद्धांत. या सिद्धांतानुसार इतिहासलेखनाचे एकक राष्ट्र नसून वर्ग हे असते. इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचा वृत्तांत. हा सिद्धांत राष्ट्रातीत आहे. क्रांतीसाठी जगातील सर्व कामगारांनी एकत्र यावे व प्रचलित भांडवलशाही सत्ता उलथून टाकावी, असे मार्क्‍सवाद सांगतो; पण याचा अर्थ असाही होतो, की खरोखरच अशी क्रांती होऊन भांडवलशाहीचे वर्चस्व संपुष्टात आले म्हणजे पर्यायाने ‘राष्ट्र’ नावाची एकके (Units) निरर्थक व अनावश्‍यक ठरतात. सर्व जग हेच एक कामगारांचे राष्ट्र (हा शब्द नाइलाजाने वापरावा लागतो.) होईल. त्यात राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्षाचे कारणच उरणार नाही. 

अर्थात अशा प्रकारची क्रांती संपूर्ण जगात एकाच वेळी होऊन सर्वत्र कामगारांचे राज्य, खरे तर वर्गविहीन समाज अस्तित्वात येणे ही काही सहजासहजी घडणारी गोष्टच नव्हती. त्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना व्हायला हवी, कामगार संघटनांचे जाळे पसरायला हवे. अर्थात, या क्षणापर्यंत थांबायची स्वतः मार्क्‍सचीही तयारी नसावी. म्हणून तर त्याने पहिली क्रांती प्रगत भांडवलशाही देशात होईल व तो देश अर्थातच इंग्लंड असेल, असे भाकीत केले. त्याचा पुढचा भाग असा असणार, की या पहिल्या साम्यवादी देशाने जगातील सर्व साम्यवादी चळवळीचे नेतृत्व करावे, देशा-देशांमधील कम्युनिस्टांच्या चळवळींचे नेतृत्व करावे, त्यांना मार्गदर्शन करावे व त्या-त्या ठिकाणी क्रांती घडवून आणून तेथे कम्युनिस्टांचे सरकार आणावे. 

काही विचारवंतांच्या मते अशा प्रकारची क्रांती संपूर्ण जगात एकाच वेळी व्हायला हवी होती. अर्थात, एवढे थांबायची कोणाचीच तयारी नव्हती. आधी म्हटले तशी  स्वतः मार्क्‍सचीही नसावी. खरे तर आधी इंग्लंडमध्ये क्रांती होऊ द्यावी; तोपर्यंत थांबावे, असे कोणाला वाटले नाही. शेवटी तो मान रशियाने मिळवला व तेथील झारची घराणेशाही संपुष्टात येऊन लेनिनच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आले. 

आता रशियासारख्या अर्धप्रगत देशात, जेथे भांडवलशाहीच अवतरली नव्हती, क्रांती होऊ शकते तर चीनसारख्या त्यावेळच्या अप्रगत देशातही ती व्हायला काय हरकत असणार? तेथे ती माओने घडवून आणली व शेतकऱ्यांच्या बळावर कम्युनिस्ट पक्षाचे राज्य स्थापन केले. खरे तर या दोन्ही देशांनी अभिजात मार्क्‍सवादी सिद्धांतालाच बाध आणून एका अर्थाने त्याचे खंडन केले होते; पण तो मुद्दा वेगळा. 

येथे मुद्दा हा आहे, की कम्युनिस्टांची क्रांती एखाद्या दुसऱ्या देशात स्वतंत्रपणे होवो किंवा जगभर एकसमयावच्छेदेकरून होवो, राष्ट्रवाद नावाचे तत्त्वज्ञान किंवा संप्रदाय कम्युनिझमशी सुसंगत नाही. आता ती जगभर एका वेळी करणे व्यावहारिक कारणांमुळे शक्‍य होणार नाही म्हणून ती एखाद्या राष्ट्रात (मग भले ते भांडवलशाही नसो!) होऊ द्या, असे ना हरकत प्रमाणपत्र विचारवंतांनी प्रसृत केले तरी त्या राष्ट्राने पारंपरिक राष्ट्रवादी राष्ट्रासारखे मिरवायचे नसते वा वावरायचेही नसते. त्याने सर्व जगातील कम्युनिस्ट पक्षांचा अग्रेसर किंवा अग्रदूत (Vanguard) होऊन त्यांना मार्गदर्शन व मदत करून त्यांच्या-त्यांच्या देशात क्रांती घडवून आणायची असते. तसे झाले म्हणजेच या प्रक्रियेच्या शेवटी अखेरच्या राष्ट्रात क्रांती होऊन तेथेही साम्यवादी शासन येईल व मग त्या अग्रेसर राष्ट्रासह सर्वच राष्ट्रांमध्ये कम्युनिस्टांचे साम्यवादी शासन येऊन राष्ट्र व राष्ट्रवाद यांचाही लय होईल. वेगळ्याच प्रकारे सांगायचे झाले तर मार्क्‍सवादाला फक्त राज्यसंस्थेने विरघळून जाणे (Withering away of the state) अभिप्रेत नसून राष्ट्राचेही विरघळणे, विलय होणे (Withering away of the nation) अभिप्रेत आहे. 

आता राष्ट्र आणि राष्ट्रवाद नाकारायचा झाल्यास राष्ट्राच्या इतिहासालाही तसा काही अर्थ राहत नाही. उरतो तो फक्त त्या-त्या राष्ट्रामधील वर्गसंघर्षाचा इतिहास. राष्ट्रातील पूर्वी होऊन गेलेले राजे, महाराजे, सम्राट हे शोषक वर्गाचे प्रतिनिधी किंवा नेते असल्यामुळे वर्तमानकाळातील लोकांनी त्यांचा अभिमान बाळगावा असे काहीच नसते. 

राजकीय सत्ता उपभोगणाऱ्या राजे-महाराजांचे जाऊ द्या, त्या काळातील तत्त्वचिंतक, धर्माचार्य यांच्यासंदर्भात काय भूमिका घ्यावी लागणार असे विचारले, तर त्याचेही उत्तर असे येते, की या महनीयांचे विचार त्यांच्या काळातील प्रस्थापितांचाच भाग असून, प्रस्थापित शोषणाधिष्ठित व्यवस्थेचे समर्थन करायचे व ती टिकवायचेच काम त्यांनी केले आहे. कम्युनिस्ट क्रांती ही सर्वंकष असायला हवी. केवळ भांडवली व्यवस्था मोडून, उत्पादनसाधने श्रमिकांच्या मालकीची करून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली म्हणजे संपूर्ण क्रांती झाली असे नव्हे. या व्यवस्थेचा भाग असलेले व तिचे समर्थन-संरक्षण करणारे वैचारिक बुरूजही उद्‌ध्वस्त केले पाहिजेत. वेगळ्या शब्दांत सांगायचे म्हणजे पारंपरिक म्हणून जे-जे काही असेल, मग तो धर्म असेल, तत्त्वज्ञान असेल, साहित्य असेल, कला असेल क्रांतीच्या कुंडात भस्मसात करून टाकायला हवे. असे करता आले तरच प्रतिक्रांतीची शक्‍यता संपुष्टात येईल. 

क्रांतीचा अग्रदूत असलेल्या रशियाने एवढी मजल मारली असेल किंवा नसेल मात्र माओ झेडॉंगने मात्र ती मारण्याचा प्रयत्न केला. माओच्या सांस्कृतिक क्रांतीचे हेच उद्दिष्ट होते. चीनमध्ये लोकप्रिय असणारे, चिनी जनमानसात खोलवर रुजलेले कन्फ्युशियसचे विचार हद्दपार करणे हा या सांस्कृतिक क्रांतीच्या अखेरच्या टप्प्यातील एक कार्यक्रम होता. कन्फ्युशियसच्या तत्त्वज्ञानाबरोबर लढा हे एक आदेशवजा घोषवाक्‍यच होते. 

कारणे काहीही असोत, माओच्या मृत्यूनंतर पुढे आलेल्या चिनी नेतृत्वाने देशाचा बंदिस्तपणा कमी करून जागतिक पातळीवरील भांडवलशाहीशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे माओने सोडचिठ्ठी दिलेला देशाचा प्राचीन इतिहासही आपलासा करायचा 

ठरवले. इतकेच नव्हे, तर माओ ज्याला गाडून टाकायला पाहत होता त्या कन्फ्युशियसच्या विचारांना आपला राष्ट्रीय विचार मानून त्याला आधुनिक विचारांशी जोडून घ्यायचे ठरवले. चीनच्या वर्तमानाची व्याप्ती आता प्राचीन साम्राज्यापर्यंत विस्तारली व कन्फ्युशियस चीनच्या वैचारिकतेचा हिस्सा बनली. आताचा चिनी विचार म्हणजे कन्फ्युशियस, मार्क्‍स आणि माओ यांची भांडवली व्यवस्थेशी घालण्यात आलेली सांगड असे म्हणावे का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे जगभरच्या कम्युनिस्ट चळवळीची वाताहत झाल्याने अग्रेसर होऊन इतर संभाव्य कम्युनिस्ट राष्ट्रांचे अग्रेसरत्व घेण्याची शक्‍यताच संपल्यामुळे प्राचीन साम्राज्याच्या ‘मॉडेल’बरहुकूम आधुनिक जगाची पुनर्रचना करून त्याचे नेतृत्व करण्याचा त्याचा इरादा आहे का? चीनला नेमके काय हवे आहे?

संबंधित बातम्या