बुडत्याला  काडीचा आधार

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 14 मार्च 2022

विश्‍वाचे आर्त

रशिया काय किंवा चीन काय दोन्हीही कम्युनिस्ट देशांना आपल्या आग्रही मार्क्‍सवादी पोथीनिष्ठेचा त्याग करून आपल्यात पुन्हा एकदा बदल घडवून आणावा लागला. दोन्हीही देशांना दुसऱ्या क्रांतीचा अवलंब करावा लागला. मुद्दा जग बदलण्याचा होता, असे म्हणण्यापेक्षा पुन्हा एकदा जग बदलण्याचा होता, असे म्हणावे लागते. पण तरीही रशिया आणि चीन यांच्या जग दुसऱ्यांदा बदलण्याच्या प्रक्रियेत जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे लक्षात येईल.

जगाची पुनर्रचना करण्याचा संकल्प आणि इतकेच नव्हे, तर त्यासाठी आवश्‍यक ती कृती, खरे तर क्रांतीच करण्याचा प्रकार कम्युनिस्ट चळवळीसाठी नवा नाही. या चळवळीचा जन्मच मुळी अशा परिवर्तनाच्या प्रेरणेतून झाला आहे. स्वतः कार्ल मार्क्‍स यांनीच तत्त्ववेत्त्यांनी जगाचा अन्वयार्थ लावला; पण मुद्दा जग बदलण्याचा आहे असे सांगून या कार्यक्रमाचा पाया घातला. त्याला अनुसरून युरोपात कम्युनिस्टांच्या प्रगट वा भूमिगत चळवळी उभ्या राहिल्या. प्रचलित भांडवलशाही रचना संपुष्टात आणून समाजवादी रचना घडविणे हे या चळवळींचे उद्दिष्ट होते. पण म्हणजेच जग बदलणे. अर्थात यासाठी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून राजकीय सत्ता हस्तगत करणे, सत्तेच्या साहाय्याने उत्पादन साधनांची मालकी श्रमिकांकडे (अर्थात श्रमिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारकडे) सुपूर्त करणे, नंतरही खासगी संपत्ती नावाची संस्थाच नष्ट करणे. 

अशा प्रकारची पहिली क्रांती रशियात झाली आणि साहजिकच आहे, की त्यातून रशियन सत्ताधाऱ्यांनी बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मार्क्‍सचे विचार मान्य असलेल्या देशांसाठी कार्यकर्त्यांसाठी व नेत्यांसाठी रशिया हे पथदर्शक आदर्श उदाहरणच ठरते. बघता-बघता रशियाचे नेतृत्व मानणाऱ्या देशांचा एक ‘ब्लॉक’ म्हणजे गट तयार झाला. 

या गटाची गाठ अर्थातच प्रबळ अशा भांडवलशाही देशांच्या गटाशी होती, ज्यांचे नेतृत्व अमेरिका करीत होती. बाह्य आणि अंतर्गत कारणे काहीही असोत, ही टक्कर रशियाला परवडेनाशी झाली व त्याचे पर्यवसान रशियाचे राष्ट्रप्रमुख मिखाईल गोर्बाचोव्ह यांनी मार्क्‍सवादाला धरून केलेली रचना मोडीत काढून देशाची पुनर्रचना करायचा निर्णय घेतला. अशा प्रकारच्या आर्थिक पुनर्रचनेचा (पेरेस्रोइका) कार्यक्रम राबवायचा झाल्यास त्यासाठी राजकीय, सामाजिक व्यवस्थेतील आजवरचा बंदिस्तपणा सोडून ती खुली करण्याची (ग्लासनोस्त) आवश्‍यकता असते ही त्यांचीही समजूत होती. म्हणून त्यांनी तेही करण्याचा निर्णय घेतला. 

एक राष्ट्र या नात्याने रशियाला हाही प्रयोग परवडला नाही. त्यानंतर रशियाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. आज परिस्थिती अशी आहे, की रशियाला ना भांडवली लोकशाही राष्ट्रांच्या पंगतीत  नीटपणे बसता येते, ना मागे वळून पूर्ववत कम्युनिस्ट प्रणालीचा अंगीकार करता येतो. अशा प्रकाराला आपल्याकडे तुकोबांचा आश्रय घेऊन ‘गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले’ असे म्हणता येते. 

मार्क्‍सवादाला अनुसरून आणखी एक क्रांती चीनमध्ये झाली. रशियन क्रांतीचे नेतृत्व लेनिनने केले होते; चीनमध्ये माओ झेडॉंगने. जग बदलणे हा नंतरचा मुद्दा. दोन्ही नेत्यांनी आपापले देश बदलण्याचे काम केले हे निःसंशय. वेगवेगळ्या ऐतिहासिक वा वर्तमान कारणांमुळे आपल्या देशाच्या बाहेर जाऊन जग बदलण्याचा प्रयत्न सोव्हिएत रशियाने केला. तो पहिलाच समाजवादी देश असल्याने त्याच्याकडे ही संधी चालत येणेही स्वाभाविक होते. मार्क्‍सवाद मानणाऱ्या अन्य देशांप्रमाणे चीननेही आपले नेतृत्व मान्य करून आपले अनुकरण करावे, असे रशियाला वाटणे स्वाभाविकच होते; पण तसे घडायचे नव्हते. उलट मार्क्‍सवादाच्या अन्वयार्थाच्या मूलभूत मुद्द्यावरूनच माओने स्टॅलिनोत्तर रशियाला आव्हान दिले. इतकेच नव्हे, तर यथावकाश रशियाचा व अर्थातच एकूणच कम्युनिस्ट ‘ब्लॉक’चा शत्रू असलेल्या अमेरिकेशी हातमिळवणी केली. 

दरम्यान, जगाची नसली तरी देशाची पुनर्रचना करण्याचा, तो बदलण्याचा प्रयत्न चीनने करून पाहिला; पण रशियाप्रमाणे त्यालाही त्यात यश मिळाले नाही. मुख्य म्हणजे देशातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवता आले नाहीत. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. रशियाबरोबरचा सरहद्दीचा वाद हे कारण अमेरिकेबरोबर दोस्ती करण्यासाठी पुरेसे नव्हते असे नाही; पण देशाची आर्थिक व्यवस्था सावरण्यासाठीही त्याला अमेरिकेशी सहकार्य करणे गरजेचे वाटले. जागतिक भांडवली व्यवस्थेशी जोडून-जुळवून घ्यायचे असेल, तर ते अमेरिकेच्या मदतीनेच शक्‍य होईल हे चिनी नेतृत्वाच्या ध्यानात आले. या प्रक्रियेची सुरुवात माओ हयात असतानाच झाली. माओनंतर तिला अधिकच गती आली. 

मुद्दा असा आहे, की रशिया काय किंवा चीन काय दोन्हीही कम्युनिस्ट देशांना आपल्या आग्रही मार्क्‍सवादी पोथीनिष्ठेचा त्याग करून आपल्यात पुन्हा एकदा बदल घडवून आणावा लागला. दोन्हीही देशांना दुसऱ्या क्रांतीचा अवलंब करावा लागला. मुद्दा जग बदलण्याचा होता असे म्हणण्यापेक्षा ‘पुन्हा एकदा जग बदलण्याचा होता’, असे म्हणावे लागते. 

पण तरीही रशिया आणि चीन यांच्या जग दुसऱ्यांदा बदलण्याच्या प्रक्रियेत जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे लक्षात येईल. रशियाने भांडवली व्यवस्थेपुढे सपशेल शरणागती पत्करली. आपल्यावर अवलंबून असलेल्या आपल्या ‘ब्लॉक’मधील, प्रभावक्षेत्रातील देशांना वाऱ्यावर सोडले. इतकेच काय, तर आपले स्वतःचेच विघटन होऊ देत पूर्वी आपल्यात समाविष्ट करून घेतलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य देण्याची वेळ त्याने ओढवून घेतली. यातील बहुतेक राष्ट्रांनी अमेरिकेचीच कास धरली. त्यांच्या मार्गाने जाणे रशियाला शक्‍य नव्हते. आजही रशिया अण्वस्त्रसज्जतेच्या बळावर आणि इतरही काही कारणांमुळे अमेरिकेला विशेषतः युक्रेनच्या प्रकरणात आव्हान देतो आहे; पण त्यात पूर्वीसारखा विचारसरणीच्या भेदाचा मुद्दा नाही. रशिया ना स्वतःच्या अशा वेगळ्या विचारसरणीची मांडणी करू शकत ना कम्युनिस्ट म्हणून उजळ माथ्याने मिरवू शकत. 

गोर्बाचोव्ह यांच्यामुळे रशियन राष्ट्राचे दिवाळे वाजेल आणि त्याची बक्षिसी त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या रूपाने मिळेल, असे भाकीत इतर कोणी नाही, तर आचार्य रजनीश, ‘ओशो’, यांनी केले होते याची अनेकांना कल्पना नसणार. वस्तुतः स्वतः रजनीश भांडवली व्यवस्थेचे मोठे समर्थक व त्यामुळेच अमेरिकेला नंदनवन मानणाऱ्यांपैकी होते. मुक्त भांडवली उपक्रमांचे खच्चीकरण करणाऱ्या गांधीवाद आणि कम्युनिझम या दोन विचारसरणींवर कठोर टीका करणारा त्यांचा ‘अस्वीकृतीमें उठा मेरा हाथ’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. भारतात या दोन्ही विचारसरणींना बरेचसे पाठबळ असल्यामुळे की काय रजनीशांनी नंदनवनात प्रस्थान केले. तेथे आपला आश्रम काढला; पण भांडवली व्यवस्थेची दुसरी बाजू त्यांनी पाहिली नसावी. ती पाहायला मिळाल्यावरच बहुधा त्यांच्या मनात रशियाविषयीच्या सहानुभूतीचा एक हळवा कोपरा निर्माण झाला असावा! 

रजनीशांनी चीनविषयीही काही भाकिते केली होती. चीन आर्थिक प्रगती करणार हे असेच एक भाकीत. पण त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी चीनमध्ये साम्यवाद कसा रुजला याची केलेली मीमांसा. चिनी जनमानसावर ज्या तत्त्ववेत्त्याच्या विचारांचा विलक्षण प्रभाव व पगडा आहे, तो म्हणजे कन्फ्युशियस. कन्फ्युशियसचा विचार सर्वंकष सत्तेचे समर्थन करणारा आहे. कम्युनिझमही तेच करतो. त्यामुळे चीनने कम्युनिझम व माओ सत्ता यांचा सहज स्वीकार केला असे रजनीशांच्या मताचे सार सांगता येईल. पण मग असे असेल तर माओने कन्फ्युशियसला विरोध करून त्याच्या विचारांना हुसकावून द्या असे का सांगितले व माओनंतरच्या काळात ही प्रक्रिया उलट होऊन कन्फ्युशियसचे पुनरुज्जीवन का झाले, हा प्रश्‍न उपस्थित होतो. पहिल्यांदा माओने असे का करावे याचे उत्तर शोधू. या उत्तराचा संबंध सरळसरळ समकालीन  राजकीय सत्तास्पर्धेशी पोचतो. 

माओ जरी सर्वसत्ताधीश असला, तरी अधूनमधून त्यालाही आव्हान देणारे नेते आपले नशीब अजमावत असत. खरे तर लिन बियाओ याच्याकडे माओचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जायचे; पण दरम्यान त्याने कन्फ्युशियसच्या विचारांचे समर्थन करायला सुरुवात केली. दुसरे असे, की चीनने अमेरिकेशी मैत्री करायचे ठरवले. त्यासाठी हेन्‍री किसिंजर गुप्तपणे बीजिंगला येऊन चर्चाही करून गेले. हा प्रकार बियाओला मान्य नसावा. माओने बियानोबरोबर लढण्यासाठी कन्फ्युशियसबरोबर लढण्याचाही आदेश दिला. ‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’ असा हा प्रकार होता. शिवाय कन्फ्युशियस हा सद्यःस्थितीवादी (Status quo) व म्हणून प्रतिक्रांतीवादाचा समर्थक ठरतो हे निमित्तही होतेच. 

सत्तास्पर्धेच्या खेळात बियाओनेच माओची हत्या करण्याचा कट रचल्याची आवईही उठली. इकडे बियाओ म्हणे रशियात पळून चालला होता. त्याचे विमान मंगोलियात कोसळले व बियाओचा त्याच्या कुटुंबासह वर्तमान अपघाती मृत्यू झाला. 

कन्फ्युशियसचा विषय आपोआपच मागे पडला. माओनंतरच्या काळात कन्फ्युशियसला चांगले दिवस आले. रशियाला जे जमले नाही ते चीनने करून दाखवले ते या कन्फ्युशियसमुळेच. बुडत्याला काडीचा आधार पुरतो. येथे तर एक महान दार्शनिक आहे.

संबंधित बातम्या