ओळख रशियाची आणि चीनची

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 21 मार्च 2022

विश्‍वाचे आर्त

रशियाने अमेरिकानियंत्रित महाव्यवस्थेचे आख्खे पॅकेज स्वीकारायचे ठरवले व तशी पावलेही उचलली. खरे तर रशियात गोर्बाचोव्ह यांनी हा परिवर्तनाचा प्रयोग सुरू करण्याच्या आधीच चीनने तो प्रयोग सुरू केला होता.

‘विश्‍वाचे आर्त’ ही लेखमाला ‘सकाळ साप्ताहिक’मधून किती योग्य वेळी सुरू झाली आहे हे आता स्वतंत्रपणे सांगायची गरजच नाही. रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध छेडले आहे. या युद्धात नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत पाश्‍चात्त्य राष्ट्रे अजूनही गोंधळलेलीच दिसतात. 

मात्र रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाकडे एक सुटी, अलग घटना म्हणून पाहता येत नाही, तसेच त्याच्या वैश्‍विक परिणामांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. ‘‘जाऊ द्या ना, एक छोटासा देश तर (किंवा त्याचा काही भाग) गिळंकृत केलाय रशियाने तर करू द्या,’’ अशा सांत्वनाचा हा प्रकार नाही. येथे म्हातारी मेल्याचे दुःख नाही; काळ सोकावतो आहे ही भीती आहे. युक्रेनचा घास रशियाला पचवता आला तर तैवानचा ताबा घेण्यासाठी टपून बसलेला चीन आज ना उद्या ती संधी साधल्याशिवाय राहणार नाही याची कल्पना पाश्‍चात्त्य मुत्सद्द्यांना नक्कीच आहे. 

पाश्‍चात्त्य पद्धतीची सामाजिक, राजकीय व आर्थिक महाव्यवस्था काही शतके उत्क्रांत होती. तिचा पाया कोणी घातला हा प्रश्‍न बाजूला ठेवला तरी कळस अमेरिकेने चढवला याबाबत दुमत व्हायचे कारण नाही. व्यक्तिवादी लोकतांत्रिक भांडवली महाव्यवस्था असे तिचे वर्णन करता येईल. हीच पाश्‍चात्त्य इतिहासाची पराकाष्ठा होय, परिणती होय. तिला आव्हान देणाऱ्या फॅसिझम आणि कम्युनिझम या दोन विचारप्रणाली अस्तित्वात आल्या. दुसऱ्या महायुद्धात फॅसिझमचा नायनाट झाला मात्र कम्युनिझम नुसता शिल्लक राहिला असे नसून त्याने पर्यायी महाव्यवस्था म्हणून पाश्‍चात्त्य महाव्यवस्थेला आव्हान दिले. ‘समूहवादी पक्षतांत्रिक’, ‘नियंत्रित महाव्यवस्था’ असे शब्दप्रयोग केले तर त्यांच्यातील फरक लक्षात येईल. पक्ष म्हणजे अर्थातच कम्युनिस्ट पक्ष. 

हिटलरप्रणित फॅसिझम हे जसे उत्क्रांत पाश्‍चात्त्य महाव्यवस्थेला आव्हान होते, तसेच ते कम्युनिस्ट महाव्यवस्थेलाही आव्हानच होते. त्यामुळे तिचा मुकाबला करण्यासाठी अन्य दोन व्यवस्थांनी हातमिळवणी करून एकत्र येणे अगदीच स्वाभाविक होते. या द्वंद्वात फॅसिझमचा पराभव झाला हे योग्यच झाले. आता प्रश्‍न असा उरला, की भांडवलशाही व साम्यवाद या दोन महाव्यवस्थांचे एकमेकांशी नाते काय असणार? दरम्यान, आशिया खंडातील चीन या देशात साम्यवादी क्रांती होऊन चीनने रशियाच्या मार्गाने जायचे ठरवले. त्यामुळे साम्यवादी महाव्यवस्था अधिक बळकट झाली. इकडे दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या विशिष्ट परिस्थितीचा लाभ उठवून रशियाने काही देश सोव्हिएत संघात सामील करून घेतले आणि ज्यांना असे सामील करून घेता आले नाही त्यांना येन केन प्रकारेण साम्यवादाची दीक्षा देऊन आपल्यासारखे बनवले. म्हणजे एकीकडे ब्रिटन, फ्रान्स इत्यादी पारंपरिक साम्राज्यांचे विघटन होऊन त्यांची अंकित राष्ट्रे स्वतंत्र होत असताना रशियाचे एक नवसाम्राज्य निर्माण झाले हा इतिहासातील एक विरोधाभासच म्हणावा लागतो. 

अशा प्रकारे जगाची नव्याने जडणघडण होत असताना एका गटाचे नेतृत्व अमेरिकेकडे व दुसऱ्याचे रशियाकडे जाणेही स्वाभाविकच होते. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स अशी बलाढ्य राष्ट्रे महायुद्धामुळे क्षीण झाली असताना अमेरिकेने मात्र आपले सामर्थ्य सिद्ध केले होते. रशिया तर पहिले बलाढ्य साम्यवादी राष्ट्र त्यामुळे विचारसरणीवर आधारित नव्या राजकीय रचनाबंधाचे पुढारपण त्याच्याकडे आपसूकच आले. 

विश्‍वाची ही विभागणी मुख्यतः विचारसरणीवर आधारित होती. आपलीच विचारसरणी श्रेष्ठ व म्हणून संपूर्ण जगाने तिचाच स्वीकार केला पाहिजे, असा अमेरिका आणि रशिया दोन्ही गटनायकांचा आग्रह. त्यांच्यात जो संघर्ष झाला त्याला ‘शीतयुद्ध’ असे म्हटले जाते याचा उल्लेख अगोदर झालेलाच आहे. 

या शीतयुद्धात शेवटी रशियाला माघार घ्यावी लागल्याचे सर्वज्ञात आहे. त्याच्या काही कारणांची थोडी चर्चाही आपण केली आहे. मात्र त्याचे सर्वांत प्रभावी कारण बहुधा रशिया आणि चीन यांच्यातील संघर्षच मानावे लागते. या दोन कम्युनिस्ट राष्ट्रांची सरहद्द हे या संघर्षाचे मूळ मानता येईल; पण आणखी एक मूळ वैचारिक आहे. चिनी नेता माओच्या मते, रशियाने अस्सल मार्क्‍सवादी विचारांचा त्याग करून अप्रत्यक्षपणे भांडवली विचारांची कास धरली होती. विशेषतः क्रुश्‍चेव्हच्या काळापासून. 

या भूमिकेतून माओने रशियन नेत्यांवर टीकास्त्र सोडणे समजून घेता येते; पण या संघर्षाची अंतिम परिणती चीनने सरळसरळ अमेरिकेशी मैत्री करणे हे जरा जास्तच झाले. 

ते काहीही असो, अमेरिकेसारखी ताकद चीनमागे उभी असल्याने सरहद्दीच्या वादात आता रशिया चीनविरुद्ध शस्त्रबळाचा उपयोग करणार नाही याची निश्‍चिती ही चीन-अमेरिका जवळिकेची एक निष्पत्ती झाली; पण प्रकरण तेथेच थांबत नाही. चीनने अमेरिकेच्या मार्गदर्शनाने व मदतीने भांडवली विचारांची कास धरून साम्यवादाची मूलभूत तत्त्वे त्यागून महाव्यवस्थेतील अर्थव्यवस्थेतच बदल घडवून आणले. मार्क्‍सवादासाठी अर्थव्यवस्था ही एकूण व्यवस्थेचा पाया असते हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. म्हणजे चीनने साम्यवादाचा पायाच खचू दिला, असे म्हणावे लागते. 

पण थांबा! असे म्हणायची जरुरी नाही. ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम्‌ त्यजति पंडितः’ या संस्कृत सुभाषितामधील पांडित्य येथे चीन दाखवतो, जे रशियाला दाखवता आले नाही. चीनने भांडवली वळणाची खुली अर्थव्यवस्था स्वीकारण्याची आवई उठवली, त्या दिशेने काही पावले उचलली की जेणेकरून त्याची अफाट आर्थिक प्रगती होऊ शकली. मात्र या मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेच्या पायावर जे बांधकाम होण्याची अमेरिकेची व युरोपातील भांडवलवादी राष्ट्रांची अपेक्षा होती, ते त्याने केलेच नाही. ना त्याने समूहवादाचा त्याग करून व्यक्तिवादाचा (अनुषंगाने व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वगैरे) स्वीकार केला, ना एकपक्षीय राज्यव्यवस्थेचा त्याग करून बहुपक्षीय राज्यव्यवस्थेचा अंगीकार केला. चीनच्या या वागण्यात उपयुक्ततावादाचा वास येत असला, तरी त्याने त्या वागण्याला सांस्कृतिक सापेक्षतावाद, परंपरा, इतिहास यांचा बेमालूम मुलामा दिला. 

वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास रशियाने अमेरिकानियंत्रित महाव्यवस्थेचे आख्खे पॅकेज स्वीकारायचे ठरवले व तशी पावलेही उचलली. खरे तर रशियात गोर्बाचोव्ह यांनी हा परिवर्तनाचा प्रयोग सुरू करण्याच्या आधीच चीनने तो प्रयोग सुरू केला होता. किसिंजर आणि निक्‍सन यांच्या चीनवाऱ्या, तसेच चीनचे अध्यक्ष डेंग झाव पिंग यांच्या अमेरिकावाऱ्या होऊन गेल्या होत्या. चीनला जागतिक अर्थव्यवस्थेत सामावून कसे घेता येईल याची उभयपक्षी वाटाघाट चालू होती. हेन्‍री किसिंजरसारखा नाणावलेला मुत्सद्दी मध्यस्थी करीत होता. दोन्ही पक्ष एकमेकांना जोखत, अजमावत सावध पावले टाकत होते. रशियाच्या बाबतीत असे काही घडलेले दिसत नाही. साम्यवादी महाव्यवस्थेचा फोलपणा गोर्बाचोव्ह यांना स्वतःलाच उमगला व त्यांनी सर्वच बाबतीत पाश्‍चात्त्य महाव्यवस्थेचे अनुकरण करून तिच्यात प्रवेश करायचे ठरवले. आपण असा निर्णय घ्यायचीच काय ती खोटी आहे, आपले अंतःकरणपूर्वक स्वागत करून पाश्‍चात्त्य विश्‍व आपल्याला या महाव्यवस्थेत सामावून घेऊन रशियाची अर्थव्यवस्था वगैरे सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करील, असा त्यांचा समज असावा. 

गोर्बाचोव्हच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, अंदाज चुकले असेच इतिहास सांगतो. अमेरिका केंद्रित व अमेरिकानियंत्रित महाव्यवस्था आपल्याला परवडणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्यापश्‍चात रशियाची उलट वाटचाल सुरू झाल्याचे लक्षात येते. ही प्रक्रिया पुतीन यांनी पूर्णतेला नेली. 

या संदर्भातील चीन आणि रशिया यांच्या भूमिकांमधील आणखी एका भेदाची चर्चा करायला हवी. चीन देश आशिया खंडात मोडतो. त्यामुळे त्याच्या निजात्मतेत (Identity) एक निःसंदिग्धपणा आहे. स्वतःला आशियायी देश असे तो अभिमानाने म्हणू शकतो व म्हणत असतो. पौर्वात्य आणि पाश्‍चात्त्य या ऐतिहासिक द्वंद्वाचा आधार घेऊन पाश्‍चात्त्य देशांनी आम्हाला कसा त्रास दिला, आमचे कसे शोषण केले याचे पाढे तो वाचू शकतो. अमेरिकानियंत्रित महाव्यवस्था ही आशियाच्या कामाची नाही, अशी भूमिका घेऊ शकतो. 

रशियाचे तसे नाही. रशियाचा अर्धा भाग युरोपात, तर अर्धा आशियात अशी स्थिती आहे. साहजिकच आशियायी युरोपियन, पौर्वात्य की पाश्‍चात्त्य असा निजात्मतेचाच प्रश्‍न उपस्थित होतो. एका मानसिक द्वंद्वाला तोंड द्यावे लागते. आपण नेमके कोण याचा निवाडा न करता येणे हे काही चांगले लक्षण नव्हे. पीटर दि ग्रेटपासून रशियाने आपली पौर्वात्य ओळख बाजूला ठेऊन पाश्‍चिमात्य युरोपीय ओळख अंगी बिंबवण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग काय? ‘ना घरका ना घाटका’ अशी त्याची स्थिती झाली. 

इतिहास या विषयात मानवाला जे स्वारस्य (किंवा रुची) असते ते वर्तमान समजून घेण्यासाठी वर्तमान समजून घेणे याचा अर्थ वर्तमानातील समस्या समजून घेणे आणि त्या समजून घ्याव्या लागतात कारण त्याशिवाय त्या सोडवता येत नाहीत आणि त्या सोडवल्या नाहीत तर भविष्य घडवता येत नाही. ‘विश्‍वाचे आर्त’ म्हणजे विश्‍वातील वर्तमान समस्या आणि त्या सोडवण्यासाठी चाललेली मानवजातीची धडपड. इतिहासाचे आकलन हासुद्धा त्या धडपडीचाच एक भाग आहे. 

थोडक्‍यात आपण जे प्रत्यक्ष अनुभवत आहोत ते जग कसे आहे व ते तसेच का आहे याचा धांडोळा आपल्याला घ्यावा लागतो. त्यासाठी इतिहासात प्रवेश करावा लागतो. एकदा हे समजले, की भविष्यातील अपेक्षित अस्तित्वात येण्यासाठी आवश्‍यक ती कृतीही करण्याची शक्‍यता निर्माण होते.

संबंधित बातम्या