मुद्दा भारताचा आहे!

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 28 मार्च 2022

विश्‍वाचे आर्त

आज विश्‍वाची स्थिती आहे तिची लगतपूर्व स्थिती म्हणजे सोव्हिएत रशिया कोसळण्यापूर्वीची, शीतयुद्ध जारी असतानाची स्थिती. या काळात दोन विचारसरणीच्या दोन गटांचे अग्रेसर असलेली राष्ट्रे म्हणजे अर्थातच सोव्हिएत संघ आणि अमेरिका. मात्र या काळातही यापैकी कोणत्याच गटात सामील न होता तिसऱ्याच एका अलिप्ततावादी विचारप्रणालीचा पुरस्कार करणाऱ्या अलिप्ततावादी राष्ट्रांचा एक गट होता. त्याचे नेतृत्व भारताकडे होते.

आजचे विश्‍व कसे आहे व ते तसेच का आहे हे समजून घेण्यासाठी त्याचा इतिहास ज्ञात करून घ्यावा लागतो. त्याचे कारण स्पष्ट आहे; आजचे विश्‍व हे काही आभाळातून पडलेले नाही. ते आपल्या पूर्वजांनी घडवलेले आहे. त्याचा आणि पूर्वकालीन घटनांचा काहीएक संबंध आहे. 
आता आजचे विश्‍व जसे आहे तसेच कायम करण्यात, टिकवण्यात काही लोकांचा स्वार्थ असतो. त्यात त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. तेव्हा त्यांचे प्रयत्न ‘जैसे थे’साठी असतात. त्यासाठीच ते विविध कृती करीत असतात. याउलट जे विश्‍वाच्या आजच्या स्थितीविषयी असमाधानी असतात ते तिला बदलण्यासाठी प्रयत्नशील असतात, कृती करीत असतात. अशा कृतीला प्रतिबंध करण्यासाठी ‘जैसे थे’वाले लोक अधिक धडपड करू लागतात. 

यापूर्वी आपण महाव्यवस्था आणि व्यवस्था या संकल्पना चर्चेत दाखल केल्या आहेतच. महाव्यवस्थेचे स्वरूप त्रिकोणाच्या आकृतीच्या साहाय्याने दाखवता येईल. 

महाव्यवस्था हा एक त्रिकोण असून, आर्थिक व्यवस्था (‘अब’), राजकीय व्यवस्था (‘बक’) आणि सामाजिक/ सांस्कृतिक व्यवस्था (‘अक’) या त्याच्या तीन बाजू आहेत. विश्‍वातील वेगवेगळ्या देशांमधील महाव्यवस्थांचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. पूर्वी देशांतर्गत होणारे संघर्ष हे सहसा राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी होत असत आणि तो बदलही मर्यादित स्वरूपाचा एक घराणे जाऊन त्याची जागा दुसरे घराणे सत्ताधारी होण्यापुरता मर्यादित असे. आर्थिक व सामाजिक व्यवस्थांमध्ये फारसे परिवर्तन होत नसे. नव्याने सत्ताधीश झालेल्यांनी करात वगैरे वाढ करणे हा काही आर्थिक व्यवस्थेतील मूल गुणात्मक बदल नसून परिमाणात्मक बदल झाला. 

बलाढ्य देशाने कमकुवत देशावर आक्रमण करून त्याला आपल्या राज्यात विलीन करून टाकणे किंवा त्याला मांडलिक देशाचा दर्जा देऊन त्याचे अस्तित्व तसेच ठेवणे हे प्रकार सर्रास चालायचे, असे देशा-देशांतील संघर्षाचा विचार करताना दिसते. अशा वेळी जेत्या राष्ट्राने जित राष्ट्रावर आपल्या व्यवस्था पूर्णतः किंवा अंशतः लादणे हा प्रकारही ओघाने यायचा. विशेषतः एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रसाराचे ध्येय घेऊन एका राष्ट्राने दुसरे राष्ट्र जिंकून तेथील प्रजेवर आपला धर्म लादणे तर नित्याचीच बाब होती. 

धर्मप्रसाराचा हेतू असो अथवा नसो, एका राज्याने इतर राज्यांचा घास घेऊन आपले साम्राज्य बनवण्याची प्रक्रिया स्वाभाविक व समर्थनीय मानली जात असे. ‘बळी तो कान पिळी’ हा न्याय निसर्गाप्रमाणे मानवी व्यवहारातही लागू होतो अशीच धारणा असे. कौटिल्याने ‘अर्थशास्त्र’ लिहिताना प्रत्येक राजा हा विजिगिषू असतो असे गृहीत धरून ग्रंथरचना केली आहे. असे गृहीत धरले, की शेजारची राज्ये आपोआपच स्वाभाविक शत्रू ठरतात. त्यांच्या पलीकडील सीमांवरील राज्ये त्यांचे शत्रू म्हणजे विजिगिषू राजाचे मित्र ठरतात. 

आधुनिक काळात असा साम्राज्यवाद संपुष्टात आला, असे मात्र नाही. आता साम्राज्य विस्ताराच्या समर्थनाचे नवे मुद्दे पुढे करण्यात येऊ लागले. पूर्वेकडील राष्ट्रे ही असंस्कृत आहेत, सबब त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी त्यांना जिंकून त्यांच्यावर राज्य करणे जरुरीचे आहे. ते आमचे ‘सिव्हिलायझिंग मिशन’, मतलब कर्तव्यच आहे हा पश्‍चिमी राष्ट्रांचा दावा यातूनच पुढे आला. 

पूर्वी, विशेषतः मध्ययुगात, धर्म हेही विस्तारवादाचे एक समर्थन मानले जायचे. इतर देशांना जिंकून तेथील लोकांना आपला धर्म स्वीकारायला लावणे हे राजाचे कर्तव्यच असून, तो पुण्यप्राप्तीचा मार्ग असल्याचा तत्कालीन समज होता. धर्माच्या नावाने झालेला हिंसाचार व रक्तपात भोवळ आणणारा आहे. 

आधुनिक काळात धर्माची जागा विचारप्रणालीने (Ideology) घेतल्याचे दिसून येते. भांडवलशाही राष्ट्रे आणि साम्यवादी राष्ट्रे यांच्यातील शीतयुद्धासह जे-जे संघर्ष झाले ते विचारप्रणालीच्या मुद्द्यावरून झाले, हे वेगळे सांगायचे कारण नाही. मात्र विचारप्रणालीवरून होणाऱ्या संघर्षाचे स्वरूप एका अथवा दुसऱ्या राष्ट्राचा विस्तारवाद असे नसून विशिष्ट विचारप्रणालीचा अंगीकार संपूर्ण विश्‍वाने करावा यासाठीच्या धडपडीचे होते. त्यातून विश्‍वाची विभागणी ‘युरोअमेरिकन’ भांडवलशाही जग आणि ‘रुसोचिनी’ साम्यवादी जग यांच्यात कशी झाली याची चर्चा आपण केलीच आहे. 

उपरोक्त दोन विचारप्रणालींमधून दोन भिन्न महाव्यवस्था उभ्या राहिल्या व त्यांनी संपूर्ण विश्‍वाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. या अशा व इतरही महाव्यवस्था व त्यांच्या अंतर्गत व्यवस्थांचे आणखी विश्‍लेषण केले तर त्यांचे स्थूलमानाने तीन घटक दिसून येतात. व्यक्ती (Individuals), संकल्पना (Ideas) आणि संस्था (Institutions). 

स्वातंत्र्य, समता, सार्वभौमत्व, न्याय अशा संकल्पना (Concepts) आपल्याला चांगल्याच परिचित आहेत. अलेक्‍झांडर, ॲरिस्टॉटल, सीझर, हेगेल, नेपोलियन, मार्क्‍स, न्यूटन, आइन्स्टाइन, वॉशिंग्टन, चर्चिल अशी बुद्धिमान, पराक्रमी, मुत्सद्दी मंडळींची नावे आपण नेहमीच ऐकत असतो. अशा मंडळींना आपण इतिहासाचे नायक मानतो व तीच मंडळी इतिहास घडवीत असतात असेही समजतो. अर्थात काही विचारवंतांना अशी व्यक्तिकेंद्रितता मान्य नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम आदमीच (समाजच) इतिहास घडवीत असतो; पण काय करणार, ‘लडे सिपाही, नाम सरदारका!’

येथे आपल्याला आणखी एक त्रिकोण दिसतो. 

‘अब’ ही बाजू संकल्पनांची. ‘बक’ ही बाजू व्यक्तींची आणि  ‘अक’ संस्थांची. 

संकल्पना शेवटी व्यक्तींनाच सुचतात, त्या आर्थिक, सामाजिक वा राजकीय स्वरूपाच्या असतात व व्यक्तीच संस्थांची निर्मिती करून आर्थिक, सामाजिक व राजकीय व्यवस्था घडवीत असतात. 

या संदर्भात कार्ल थॉपरप्रभृतींनी गाजवलेले व्यक्तिवाद (Individulism) व समूहवाद (Collectivism किंवा Holism) यांच्यातील वादाचा फक्त उल्लेख करतो. 

वर्तमानासह कोणत्याही ऐतिहासिक कालखंडामधील घटनांची संगती आपण अशा प्रकारच्या त्रिकोणी चौकटींच्या (Frame या अर्थाने) प्रारूपांच्या सहाय्याने लावू शकतो. आज विश्‍वाची स्थिती आहे तिची लगतपूर्व स्थिती म्हणजे सोव्हिएत रशिया कोसळण्यापूर्वीची, शीतयुद्ध जारी असतानाची स्थिती. या काळात दोन विचारसरणीच्या दोन गटांचे अग्रेसर असलेली राष्ट्रे म्हणजे अर्थातच सोव्हिएत संघ आणि अमेरिका. मात्र या काळातही यापैकी कोणत्याच गटात सामील न होता तिसऱ्याच एका अलिप्ततावादी विचारप्रणालीचा पुरस्कार करणाऱ्या अलिप्ततावादी राष्ट्रांचा एक गट होता. त्याचे नेतृत्व भारताकडे होते. आता येथेही त्रिकोणाच्या प्रारूपाचा अवलंब करायचा झाला तर निष्पन्न होणाऱ्या आकृतीच्या बाजू म्हणजे - 

‘अब’ = भारत 

‘बक’ = अमेरिका 

‘अक’ = रशिया 

या संदर्भात एका गोष्टीची नोंद करायला हवी. चीन जरी उघडउघड साम्यवादी देश असला, तरी आपण आशिया-आफ्रिका खंडांमधील अनेक देशांप्रमाणे विकसनशील देश आहोत हे त्याला मान्य होते. खरे तर ‘Third World’ हा शब्द माओ झेडॉंगनीच प्रचलित केला होता. (त्याचा हा दावा आजही अधूनमधून डोके वर काढीत असतो.) म्हणून तर त्याने बांडुंग येथे भरलेल्या राष्ट्रांच्या परिषदेत सक्रिय भाग घेतला होता. याच परिषदेतील विचारमंथनातून राजकीय पंचशील निघाले. आजच्या जगाच्या संदर्भात जर त्रिकोणाचे प्रारूप सिद्ध करायचे ठरवले तर त्यात अमेरिकेचे स्थान अबाधित असेल, यात शंका नाही. रशिया व रशियाप्रणित गटाची मोडतोड झाल्याने ‘अक’ ही बाजू रशियाची असणार नाही, तसेच दोन गटांचे अस्तित्व संपुष्टात आल्यामुळे अलिप्ततेलाही फारसा अर्थ उरला नाही. म्हणून ‘अब’ म्हणजे भारत हे समीकरणही बिघडते. 

अर्थात, तरीही अमेरिकेला आव्हान देणाऱ्या रशियाची जागा आता चीनने घेतली असल्यामुळे ‘अक’ ही भुजा चीनची असणार हे मान्य करावे लागते. 

मुद्दा ‘अब’ या भुजेचा उरतो. खरेतर मधल्या काळात वेगाने पुढे आलेल्या एखाद्या मूलतत्त्ववादी इस्लामी राष्ट्राचे नाव तेथे घालायचा मोह होतो; परंतु चीन व अमेरिका यांच्याशी स्पर्धा करू शकेल असे इस्लामी राष्ट्र दृष्टोत्पत्तीस येत नाही. मधल्या काळात तुर्कस्तानने आघाडी मारली होती; पण ती पाश्‍चात्त्य वळणाचे राष्ट्र या नात्याने. आता त्याने ‘यू’ टर्न घेऊन पारंपरिक इस्लामशी जवळीक साधली आहे हा वेगळा मुद्दा; पण अजून तो इस्लामी राष्ट्रांचा नेता होऊ शकला नाही. इराणची अवस्थाही थोडीफार तशीच आहे. 

इस्लाम ही एक पर्यायी महाव्यवस्था असल्याचा कट्टरपंथीयांचा समज असला, तरी कोणतेही इस्लामी राष्ट्र ती जबाबदारी घ्यायला तयार नाही. चीनने मात्र अमेरिकेची जागा घेण्याची तयारी दाखवली आहे. 

भारताचे स्थान काय असेल? तो ‘अब’ची भुजा राखू शकेल काय? पण मग त्यातील महाव्यवस्था काय असू शकेल. ती विश्‍वाला पर्याय देऊ शकेल काय? मुद्दा भारताचा आहे!

संबंधित बातम्या