विश्‍वव्यवस्‍थेचे आजचे पर्याय...

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 4 एप्रिल 2022

विश्‍वाचे आर्त

‘विश्‍वाचे आर्त’मध्ये भारताचा मुद्दा केव्हा ना केव्‍हा डोकावणे अटळच होते. मात्र हे डोकावणे केवळ भारत हा विश्‍वाचाच एक हिस्सा आहे या कारणामुळे नव्हे. विश्‍वाचा हिस्सा तर तो आहेच. व तसा असल्‍यामुळे विश्‍वाशी तो एकत्र अतूट नात्‍याने बांधत गेला आहे. विश्‍वात ज्या काही बऱ्यावाईट गोष्टी घडतात, त्‍यांचा परिणाम भारतावर तो विश्‍वाचा भाग असल्‍यामुळे होतच असतो व होणारही आहे. भारताचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो तो, भारत विश्‍वावर, म्‍हणजे विश्‍वातील घडामोडींवर; विश्‍वाच्या जडणघडणीवर काही परिणाम करू शकतो का या मुद्द्यामुळे. 

या घडीला किंवा या टप्प्यावर हा मुद्दा उपस्‍थित होण्याचे कारण म्‍ह‍णजे अर्थातच रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेले युद्ध. युक्रेनचे भारतामधील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी भारताच्या पंतप्रधानांना हस्‍तक्षेप करून युद्ध थांबविण्याची विनंती केली. ही विनंती करताना पोलिखा यांच्या समोर भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे राजनैतिक संबंध असणार यात शंका नाही. मात्र त्‍यांनी महाभारताचा संदर्भ दिला ही बाब अधिक महत्त्‍वाची आहे. महाभारत हे कौरव आणि पांडव यांच्यातील महायुद्ध होते आणि त्‍यात फार मोठी हानी झाली हे सर्वच जाणतात. हे युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्णाने अखेरच्या क्षणापर्यंत निकराचे प्रयत्‍न केले. स्‍वतःचा जीव धोक्‍यात घालून तो कौरवांच्या दरबारात गेला. नाना प्रकारचे युक्‍तिवाद करून त्‍याने दुर्योधनाला या युद्धापासून परावृत्त करायचा प्रयत्‍न केला. तथापि दुर्योधनाने त्‍याला दाद दिली नाही. इतकेच नव्‍हे तर स्‍वतः कृष्णालाच बंदिवान करायचा प्रयत्‍न त्‍याने केला. श्रीकृष्णाच्या दक्षतेमुळे तो प्रयत्‍न फसला, ही वेगळी बाब. पण कृष्णाने युद्ध टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्‍न केले, हे निश्‍चित. महाभारताचा व कृष्णाचा वारसदार या नात्‍याने भारताने तसेच करावे अशी युक्रेनच्या राजदूताची अपेक्षा.

संकटात सापडलेल्‍या राजदूताने भारताला असे साकडे घालणे स्‍वाभाविकच आहे. तथापि याच संदर्भात प्रसिद्ध विचारवंत युवाल नोह हरारी यांचे बाबतीत तसे म्‍हणता येत नाही. ‘सेपियन्सः अ ब्रीफ हिस्टरी ऑफ ह्यूमनकाईंड’ या नावाचे त्‍यांचे एकूणच मानवजातीच्या इतिहासावरील पुस्‍तक किती गाजले हे सर्वज्ञातच आहे. इतकेच नव्‍हे तर त्‍याच्या पुढचा म्‍हणजे मानवाचा भविष्यकालीन इतिहास रेखाटणारा ‘होमो डेऊसः अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टुमॉरो’ हा गाजलेला ग्रंथही त्‍यांच्या नावावर आहे. या प्रकाराच्या ग्रंथांना ‘मॅक्रो हिस्ट्री’, ‘अन्थ्रोपोलॉजिकल हिस्ट्री’ असेही म्‍हणता येते. मानवजात ही गोष्टीच्या आधारे जगणारी जात असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे. भांडवलशाही, फासीवाद, साम्यवाद ही एक प्रकारची मिथके म्‍हणता येतील, अशा गोष्टीच होत.  

फार काय पैसा नावाच्या वस्‍तूला तर महामिथक म्‍हणता येईल. 

मनुष्य हा शहाणा प्राणी असल्‍यामुळे त्‍याने प्राणिसृष्टीत आघाडी घेतली. विज्ञान, तंत्रज्ञानातील त्‍याची प्रगती आश्‍चर्यकारक म्‍हणावी लागेल, अशी आहे. परंतु तिला नैतिक शहाणपणाची जोड मिळाली नाही तर सर्वनाशी आत्‍मघात अटळ आहे, असेही हरारी सुचवतात. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्‍स अशा अत्‍याधुनिक बाबींची मीमांसा ते करतात. त्‍यातून निष्पन्न होणाऱ्या साधनांच्या आधारे महासाथी आटोक्‍यात आणून मानवाला जणू काही दैवी स्‍वरूपाकडे वाटचाल करता येईल, असेही ते सुचवतात. पण अशा साधनांच्या उपयोग कशासाठी करायचा त्‍याचा निर्णय अंतिमतः राजकारणी घेत असतात. मोक्‍याच्या वेळी सत्तेसाठी हे राजकारणी चुकीचा निर्णय घेऊन वैज्ञानिकांच्या परिश्रमावर पाणी फिरवून मानवजातीच्या विनाश घडवून आणू शकतात, असेही हरारींना वाटते. पण त्‍यासाठी नैतिकतेला प्राधान्य द्यायला हवे. राजकारण्यांचे लक्ष हितसंबंधाकडे (Interests) असल्‍याने समस्या निर्माण होतात. 

रशियाच्या पुतिनने युक्रेनवर आक्रमण केले. या घटनेच्या संदर्भात हरारी यांनी प्रतिक्रिया देणे अपेक्षितच होती. या युद्धात पुतिनला विजय मिळाला तर काय होईल, याची चर्चा करताना ते त्‍यामुळे साधारण १९४५पासून तत्त्वतः सर्वमान्य असलेल्‍या अनाक्रमणाच्या तत्‍वाला धोका पोहचेल असे ते निदर्शनास आणतात. शस्‍त्रसज्जतेसाठी करण्यात यंत्रणाच्या खर्चात सर्वच राष्ट्रांना वाढ करावी लागेल. विकासाचे, आरोग्याचे प्रकल्‍प मागे पडतील अशी त्‍यांची भीती आहे. ती अनाठायी नाही. 

रशिया-युक्रेनच्या युद्धात भारताने हस्‍तक्षेप करावा व ते थांबवावे अशी हरारींना अपेक्षा आहे. स्‍वतः ज्‍यू असूनही इस्राईलकडून ते फार अपेक्षा करीत नाहीत. भारत हा हितसंबंधावर मात करू शकणाऱ्या नैतिकतेचा पुरस्‍कार करणारा देश असल्‍याचे ते निदर्शनास आणतात. तो विश्‍वगुरू (World Guru) असण्याचा उच्चार त्‍यांनी केला आहे, तो महत्त्‍वाचा आहे. भारत आता काय करीत आहे किंवा नंतरही काय करील हा प्रश्‍न बाजूला ठेऊन हरारींचं म्‍हणजे समजून घ्यायला हवे. त्‍यावर चर्चा करायला हवी. 

या चर्चेसाठी आणखी एका त्रिकोणी प्रारूपाला दाखल करून घ्यायला हवे. 

हरारींचे इस्राईल हे विश्‍वपटलावरील एक महत्त्‍वाचे राष्ट्र आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. हजारो वर्षे हद्दपार होऊन जगभर भटकणाऱ्या यहुद्यांनी आपल्या निजात्‍मतेची (Identity) खूण जपली व विखुरलेला समाज म्‍हणून आपले अस्तित्वही टिकवून ठेवले. तपशिलात न जाता एवढे सांगणे पुरेसे होईल की यांच्या या तपश्‍चर्येचे फळ त्‍यांना शेवटी मिळाले. विसाव्या शतकाच्या मध्यावर त्‍यांचे स्‍वतंत्र राष्ट्र निर्माण होऊन त्‍यांच्या प्रेषितांचे भाकीत खरे ठरले. मात्र या राष्ट्राचे अस्‍तित्‍व त्‍यांच्या शेजारी अरब राष्ट्रांना मान्य नसल्‍यामुळे त्यांनी त्‍याला सुरुंग लावायचे प्रयत्‍न केले. इस्राईल त्‍यांना पुरून उरला. अर्थात तरीही जगाच्या पातळीवर एक परिपूर्ण समग्र व्यवस्‍था होऊन जगाने महासत्ता म्‍हणून ती स्‍वीकारावी, निदान जगावर प्रभाव पडावा अशी स्‍थिती इस्राईलला अद्याप गाठता आली नाही व येण्याची शक्‍यताही नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्‍हणजे त्‍याचा लहान आकार आणि कमी लोकसंख्या.  आता इस्राईलचाच काय पण कोणत्‍याही राष्ट्राच्या तुलनेत रशियाला अल्‍प विस्‍ताराचे किंवा अल्‍प संख्येचे राष्ट्र म्‍हणता येणार नाही. दोन खंडांमध्ये पसरलेला हा देश अवाढव्य आहे व मनुष्यबळातही त्‍याला कमी प्रतीचा म्‍हणता येणार नाही. एके काळी तर तो साम्राज्‍यविस्‍ताराच्या स्‍पर्धेतही होता. आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटनचे परराष्ट्रधोरण रशियाची दखल घेतच सिद्ध केले गेले होते. विशेषतः अफगाणिस्‍तानच्या बाबतीतील ब्रिटिश धोरणावर पूर्णपणे रशियाची छाप होती असे विल्‍यम दालरिम्पल या विद्वानाने ‘रिटर्न ऑफ द किंग’ या ग्रंथात दाखवून दिले आहे. झारची साम्राज्‍यशाही नष्ट करून सत्तारूढ झालेल्‍या क्रांतिकारक कम्‍युनिस्‍टांच्या राजवटीत तर रशियाचा दबदबा व दरारा किती वाढला होता, हे नव्याने सांगायची गरजही नाही. त्‍यांच्या पुढाकाराने डाव्या साम्यवादी विचारांच्या राष्ट्रांचा एक गट निर्माण झाला. काही दशके जागतिक राजकारणाचा एक ध्रुव म्‍हणून रशिया वावरला व त्‍याने महासत्ता असलेल्‍या अमेरिकेशी स्‍पर्धा केली हे सर्वज्ञातच आहे. अशा परिस्‍थितीत रशियाला वैचारिक व वास्‍तविक प्रभूता परत का भोगता येऊ नये? 

प्रश्‍न महत्त्‍वाचा आहे. इतकेच काय पण स्‍वतः रशियालाही चीनप्रमाणे आपले गेलेले स्‍थान परत मिळवून पुन्हा एकदा विश्‍वाच्या केंद्रस्‍थानी यावे, असे वाटत आहे असे म्‍हणायला जागा आहे. 

रशियाने गेल्‍या शतकातील काही दशके जे वैचारिक आणि वास्‍तविक अधिराज्‍य केले त्‍याच्या पाया खरे तर युरोपात निर्माण झालेली एक विचारसरणी होती. जिचे नाव मार्क्सवाद. रशिया या राष्ट्राकडे त्‍याची स्‍वतःची म्‍हणता येईल, अशी विचारधारा, असे तत्त्‍वज्ञान नाही. विचारप्रणाली ही सुद्धा एक सत्ता असते. भले तिला मृदू सत्ता (Soft Power) म्‍हणा. रशियाच्या काही भागाने मार्क्सवादाच्या आधी ऑर्थोडॉक्स चर्चच्या ख्रिस्‍ती धर्मतत्त्वांचा अंगीकार केला होता व काही भागाने कॅथॉलिक चर्चच्या धर्मतत्त्वांचा. त्‍यात रशियाचे स्‍वतःचे असे काहीच नव्‍हते. खरे तर रशिया स्‍वतःच एका निजात्‍मतेच्या तिढ्यात (Identity Crisis) सापडला असल्‍याचे यापूर्वीच सांगितले आहे. 

रशियाकडे स्‍वतःची विचारसरणी नाही. व स्‍वतःचा असा प्रभावी विचारवंतही रशियात होऊन गेल्‍याचे ऐकिवात नाही, की त्‍याने सर्व जगाचे लक्ष आपल्‍याकडे वेधून घेऊन जगावर प्रभाव पाडला आहे. 

उलट संभाव्य नव्या विश्‍वव्यवस्‍थेच्या स्‍पर्धेत चीन बसतो याचे एक कारण चीनला इतिहास काळात अशा निजात्‍मतेच्या पेचाला सामोरे जावे लागले नाही. याच्याकडे ‘बौद्ध’ व ‘ताओ’ असे विचारप्रवाह असले तरी सर्वांवर प्रभाव पाडणारा एक विचारवंत होऊन गेला. त्‍याचे नाव कन्फ्युशियस. कन्फ्युशियसला उखडून टाकण्याचा प्रयत्‍न गेल्‍या शतकात कम्‍युनिस्‍टांनी केला खरा, पण त्‍याला यश आले नाही. आज चीन उलट कन्फ्युशियसचाच आधार घेऊन आपली निजात्‍मता मिरवीत आहे. कन्फ्युशियस ही त्‍याची वैचारिक-सांस्‍कृतिक ‘सॉफ्‍ट पॉवर’ बनली आहे. कन्फ्युशियचे विचार भांडवलशाहीस व्यवस्‍थेला पर्याय होऊ शकतात, असा चिनी विचारवंतांचा दावा आहे. 

इगोर पोलिखा आणि युवाल हरारी नेमके हेच सुचवत आहेत. 

या संदर्भात कळत न कळत त्‍यांच्याकडून महाभारत आणि कृष्ण यांचे उल्‍लेखही येऊन गेले. 

‘समझानेवालेको ज़िक्र (उल्‍लेख) काफी है।’ असं समजायला हरकत नाही. स्‍पष्ट मात्र करायला हवे.

 

संबंधित बातम्या