कृष्णः एक राजकीय विचारवंत

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 25 एप्रिल 2022

विश्‍वाचे आर्त

महाभारत हा विश्‍वकोशसदृश ग्रंथ असला तरी त्याचे मूळ कथानक राजकीय आहे, सत्तासंघर्षाचे आहे आणि बहुतेक उपकथानकांमध्येही हा धागा सुटल्याचे दिसत नाही. त्या अनुषंगाने महाभारतात अनेक राजकीय विचारवंतांची मते अवतीर्ण होतात, त्यांची साधकबाधक चर्चाही होते. महाभारतकालीन राजकीय विचारवंतांच्या विचारांचे संदर्भ उत्तरकालीन कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’पासून कामन्दकाच्या ‘नीतिसारा’पर्यंतच्या अनेक ग्रंथांमधून वारंवार आढळतात.मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाभारतातील कृष्ण हा एक राजकीय विचारवंत, मुत्सद्दी आणि राजकीय कर्ता या नात्यांनी वावरताना दिसतो.

एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला कोणती कौटुंबिक व कौलिक पार्श्‍वभूमी यावी हे काही तिच्या हातात नसते; पण जी काही येते तिचा परिणाम तिच्या जडणघडणीवर होतो. मला स्वतःला वारकरी संप्रदायाची पार्श्‍वभूमी लाभली. त्यामुळे वारकऱ्यांचा आद्य प्रमाणग्रंथ असलेल्या ज्ञानेश्‍वरीचा परिचय लहानपणीच झाला. याच वयात ज्ञानेश्‍वरीवर प्रवचन करण्याची धृष्टताही केली. 

सांप्रदायिक पार्श्‍वभूमी हा वेगळा मुद्दा. माझे वडील श्रीधरअण्णा हे व्यासंगी अभ्यासक होते. त्यांचा ग्रंथसंग्रहही मोठा होता. शिवाय त्यांच्याकडे चर्चेसाठी देश-विदेशातून अभ्यासक, संशोधकही येत असत. त्यांची दृष्टी अर्थातच संप्रदायाच्या पलीकडे जाऊन पाहणारी होती. ज्ञानेश्‍वरी हे भगवद्‌गीतेवरील भाष्य आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी संस्कृतमधील आचार्यांची ‘गीताभाष्ये’, वामन पंडितांची ‘यथार्थदीपिका’, गद्रे यांची ‘समश्‍लोकी’, विनोबांची ‘गीताई’, ‘स्थितप्रज्ञ दर्शन’, ‘गीताई-चिंतनिका’ आणि अर्थातच लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’, ज.स. करंदीकरांची ‘गीतार्थ मंजरी’, महादेवभाई देसाईंचे ‘द गीता अकॉर्डिंग टू गांधी’ अशी किती तरी पुस्तके पैदा केली. यथावकाश त्यात आचार्य रजनीश (नंतरचे ओशो) यांच्या प्रवचनांचीही भर पडली. 

यातील जमतील तितकी पुस्तके मी शाळा-कॉलेजच्या वयातच वाचून टाकली. बी.ए., एम.ए. करताना अभ्यासक्रमानुसार भारतीय व पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाचा अधिकृतपणे परिचय झाला. एम.ए.ला असताना प्राध्यापक मोरेश्‍वर मराठे यांनी आम्हा काही जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुटीत गीतेवर व्याख्याने दिली होती. या सर्व घटकांचा एकत्रित परिपाक म्हणजे गीतेवर संशोधन करायची इच्छा. त्यानुसार मराठे सरांच्याच मार्गदर्शनाखाली पीएच.डी.साठी नाव नोंदविले. यथावकाश म्हणजे १९८२मध्ये पदवी प्राप्त केली. या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक प्रस्थानत्रयी या संकल्पनेची चिकित्सा. गीता हा परमेश्‍वरावतार श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश. त्याची गणना उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे या वेदांनी ग्रंथांबरोबर करण्यात येऊन त्याच्यासह या तीन प्रस्थानांची कल्पना पुढे आली. हे तिन्ही ग्रंथ वेदांताचे ग्रंथ असून, त्यांच्यात जीव आणि ब्रह्म यांच्या संबंधाचे प्रतिपादन असून, त्यांच्याआधारे मोक्षप्राप्ती करता येते ही समजूत रूढ झाली. 

वस्तुतः गीता हा अन्य दोन प्रस्थानांप्रमाणे स्वतंत्र ग्रंथ नाही. त्याला महाभारताची व्यापक संदर्भचौकट लाभली आहे. महाभारत हा एका महायुद्धाचा इतिहास आहे. गीतेत अर्जुनाला पडलेला प्रश्‍न जीव, ब्रह्म, मोक्ष यांच्या बाबतीतील नसून युद्धासंबंधी आहे. येऊ घातलेल्या युद्धाच्या समर्थनीयतेचा आहे. म्हणजेच तो मुख्यत्वे सामाजिक, राजकीय तत्त्वज्ञानाचा प्रश्‍न आहे. कृष्णाने केलेले विवेचन हे अर्जुनाच्या त्या प्रश्‍नाचे उत्तर आहे. हे विवेचन करताना निश्‍चितपणे काही आध्यात्मिक, सत्ताशास्त्रीय मुद्दे उपस्थित झाले असणार; पण तो त्याचा मुख्य प्रतिपाद्य विषय नाही. गीतेचा अर्थ महाभारताच्या संदर्भात व प्रकाशातच लावला पाहिजे. तो तसा लावायचा प्रयत्न केला तर गीता हे कर्मसिद्धांताचे विवेचन ठरते. कर्माची उत्पत्ती आणि कर्माचे समर्थन हा त्याचा विषय ठरतो. माझ्या प्रबंधाचे नाव ‘द गीताः अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन’. 

मी फार काही नवे केले, असा माझा दावा नाही. लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्या’तून गीतेचा कर्मयोग जेथपर्यंत नेला त्याच्यापुढे काही पावले टाकायचा माझा प्रयत्न होता. ही वाटचाल मला प्रा. मराठे यांच्यामुळे करता आली. 

खरे तर पीएच.डी. मिळाल्यामुळे माझी व्यावसायिक गरज पूर्ण झाली होती; पण मी समाधानी नव्हतो. एक प्रश्‍न मला सतत सतावू लागला. गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले कर्माचे तत्त्वज्ञान होय आणि अर्जुनाने ते मान्य झाल्याची कबुली स्वतःच दिली आहे; परंतु स्वतः कृष्णाने ते आपल्या स्वतःच्या आयुष्यात किती प्रमाणात आचरले होते? त्याचे विचार आणि आचार यांच्यात संगती ताळमेळ होता की नव्हता? की असेच आपले ‘परोपदेशे पांडित्यम्‌’? 

या प्रश्‍नाला तडीस न्यायचे असेल तर कृष्णाच्या चरित्राचा अभ्यास करायला हवा. त्यासाठी साधने व साधन चिकित्सासुद्धा. खरे तर महाभारत हेच कृष्णचरित्राचे आद्य व अस्सल साधन होय; पण याचा अर्थ असाही झाला, की आधी ज्याप्रमाणे महाभारताच्या चौकटीत गीतेचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करून एक कर्माचे तत्त्वज्ञान सिद्ध केले होते त्याप्रमाणे आता याच कर्माच्या तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर कृष्णचरित्राची छाननी करायची. 

प्रा. मराठे यांच्याशी विचारविनिमय करून मी पोस्ट-डॉक्टरल संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाकडे प्रस्ताव पाठवला. तो मान्य झाला. या संशोधनाचे फलित म्हणजे ‘कृष्णः द मॅन ॲण्ड हिज मिशन’ हा प्रबंध. त्याचा मराठी अनुवादही ‘या सम हा’ या नावाने उपलब्ध आहे. 

सुदैवाने संशोधनातून मला पडलेल्या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी मिळाले. कृष्णाचे तत्त्वज्ञान आणि चरित्र यांच्यातील संगती मी दाखवू शकलो. 

इकडे माझा असा उद्योग चालला असताना तिकडे चीन देशात कन्फ्युशियसच्या तत्त्वज्ञानाची फेरमांडणी करायचे प्रयत्न सुरू झाले होते. सुरुवातीच्या काळात असे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या कमी होती. विशेषतः माओच्या काळात तर या मंडळींना चीनच्या बाहेर हॉंगकॉंग, तैवान किंवा थेट अमेरिका यांचा आश्रय घ्यावा लागे. पुढे माओचा प्रभाव कमी होऊन वैचारिक स्वातंत्र्याच्या वाऱ्याच्या झुळका येऊ लागल्या. त्यामुळे ही मंडळी अधिक मुखर झाली. कन्फ्युशियसला आध्यात्मिक (आणि मानसिक) वलयातून बाहेर काढून त्याच्या विचारांतील सामाजिक -राजकीय आशयाला भिडून त्याचा चीनच्या पुनर्रचनेसाठी उपयोग करून घेता येईल का याची चर्चा सुरू झाली. अगोदर वैयक्तिक अभ्यासाच्या पातळीवर रेंगाळलेल्या या प्रयत्नांना संस्थात्मक स्वरूप येऊ लागले. लोकांचा पाठिंबा मिळू लागला आणि मुख्य म्हणजे मार्क्‍सवादी विचारांची पीछेहाट झाल्यावर आपल्या अस्तित्वासाठी नव्या वैचारिक समर्थनाची गरज असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षानेही कन्फ्युशियसचे वारे आपल्या शिडात भरून घेण्याचे ठरवले. शासनाच्या आर्थिक सहाय्यातून जगभर कन्फ्युशियसच्या नावाने संस्था उभारण्यात येऊ लागल्या. साहजिकच चीनमध्ये आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संदर्भात जे काही घडत आहे ते समजून घेण्यासाठी कन्फ्युशियस व त्याच्या विचारांचे विविध अन्वयार्थ समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. 

परत एकदा कृष्ण आणि अर्थातच महाभारत यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला तर काय दिसते? ‘दशोपनिषदे’, त्यांचे सार असलेली बादरायणांची ‘ब्रह्मसूत्रे’ आणि ‘गीता’ या प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहून शंकराचार्यांनी आपल्या वेदांत तत्त्वज्ञानाची मांडणी केल्यानंतर उत्तरकालीन प्रत्येक वेदांनी आचार्याला तसे करणे जणू अपरिहार्य झाले. साहजिक गीतेतील राजकीय -सामाजिक आशय तिच्या आध्यात्मिक आशयाखाली जणू दबला गेला. तरीही महाभारताचे स्थान अबाधित राहिले. महाभारत हा विश्‍वकोशसदृश ग्रंथ असला तरी त्याचे मूळ कथानक हे राजकीय आहे, सत्तासंघर्षाचे आहे आणि बहुतेक उपकथानकांमध्येही हा धागा सुटल्याचे दिसत नाही. साहजिकच त्या अनुषंगाने महाभारतात अनेक राजकीय विचारवंतांची मते अवतीर्ण होतात, त्यांची साधकबाधक चर्चाही होते. व्यास, भीष्म, विदुर, उद्धव हे महाभारतकालीन राजकीय विचारवंत होते. त्यांच्या विचारांचे संदर्भ उत्तरकालीन कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’पासून कामन्दकाच्या ‘नीतिसारा’पर्यंतच्या अनेक ग्रंथांमधून वारंवार आढळतात. इतकेच नव्हे, तर महाभारतातही पूर्वकालीन अनेक विचारवंतांची मते उद्‌धृत केली गेली आहेत. 

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाभारतातील कृष्ण हा एक राजकीय विचारवंत, मुत्सद्दी आणि राजकीय कर्ता या नात्यांनी वावरताना दिसतो. खरे तर महाभारताच्या कथानकाचा सूत्रधार कृष्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. हे कथानक कृष्णाच्या हस्तक्षेपामुळेच पुढे सरकते, मग हा हस्तक्षेप विचाराच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष कृतीच्या. 

चीनमध्ये कन्फ्युशियसच्या विचारांबरोबरच ताओ आणि बौद्ध विचारही प्रचलित होते. प्रभावीही होते. त्यांच्यात परस्पर आंतरक्रिया होती, देवाणघेवाणही होती. कन्फ्युशियसचे आजचे भाष्यकारही या विचारांची दखल घेऊनच कन्फ्युशियसचा नव्याने अर्थ लावत असतात. 

भारतातही कृष्णाच्या विचारांबरोबर बुद्ध आणि महावीर यांचे विचार प्रचलित होते. त्यांची देवाणघेवाण, सरमिसळ होत होती. बुद्ध, महावीर यांना श्रमण परंपरेतील मानण्यात येते, तर कृष्णाला वैदिक परंपरेचा प्रतिनिधी समजले जाते. या परंपरांमध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषार्थ सिद्धांत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ते पुरुषार्थ होत. 

चार पुरुषार्थांची चर्चा हा महाभारतातील महत्त्वाचा भाग आहे. ही चर्चा अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या संदर्भात येते ती खरे तर एकूण मानवी जीवनाच्याच तत्त्वज्ञानाची चर्चा आहे. राजकारण हे मानवी जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे याची जाणीव महाभारताला अर्थातच आहे. 

महाभारतात अनेक राजकीय विचारवंतांच्या मतमतांतरांचा ऊहापोह असल्याचे सांगितले आहेच. या विचारवंतांमधील बाप माणूस म्हणजे अर्थातच कृष्ण. 

माझे कृष्णावरील संशोधन पूर्ण झाल्यावर मी महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला. ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘गर्जा महाराष्ट्र’ आणि ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ या माझ्या लेखमाला ‘सकाळ साप्ताहिक’मधून प्रसिद्ध झाल्या. महाराष्ट्राचा तुकारामकेंद्रित सांस्कृतिक इतिहास लिहून झाल्यावर ‘लोकमान्य ते महात्मा’ म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना माझ्या असे लक्षात आले, की या वेळी महाराष्ट्राचा इतिहास द्विकेंद्रकी लंबवर्तुळासारखा झाला आहे. लोकमान्य टिळक हे त्या वर्तुळाचे एक केंद्रक आणि महात्मा गांधी हे दुसरे; पण या दोघांच्या राजकारणावर छाप होती ती गीतेच्या तत्त्वज्ञानाची. टिळकांचे ‘गीतारहस्य’ आणि गांधींचे ‘अनासक्तियोग’ ही पुस्तके केवळ गीतेवरील भाष्ये नाहीत, तर त्यांच्यातील गीतार्थानुसार त्यांच्या लेखकांनी राजकारण करण्याचा व जीवन जगण्याचा प्रयत्न केला होता. १९१९मध्ये अमृतसर येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात टिळक आणि गांधी यांच्यातील वाद कृष्णापर्यंत व मुख्य म्हणजे बुद्धापर्यंत पोचला. या वादाचे पडसाद महाराष्ट्रात बराच काळपर्यंत उमटत राहिले. स्वा. सावरकर आणि आचार्य शंकरराव जावडेकर हे या महाचर्चेतील शेवटचे चर्चक. टिळकांनी १९१९च्या वादात गांधींना श्रमण परंपरेत ढकलले होते; पण गांधी गीतेचा आधार सोडायला तयार नव्हते. 

खरे तर बुद्धविचारांचा कृष्णविचारांशी मेळ घालायचा प्रयत्न हजार-अकराशे वर्षांपूर्वी काश्‍मिरी महापंडित क्षेमेंद्र याने केला होता. त्याविषयी नंतर. 

महाराष्ट्राचा आणि पर्यायाने निदान टिळक-गांधींमुळे भारताचा इतिहास लिहून झाल्यावर आता जगाकडे वळताना द्विकेंद्रकी वर्तुळाचे प्रारूप पुरत नाही म्हणून त्रिभुज त्रिकोणाचा आश्रय करावा लागतो. त्यातील एक भुजा कृष्ण असणार ती यामुळेच.

संबंधित बातम्या