कृष्ण आणि किसिंजर
विश्वाचे आर्त
देशांच्या संदर्भातील मुद्दा निकालात काढला तरी व्यक्तींच्या बाबतीत आक्षेप येऊ शकतो. कृष्ण आणि कन्फ्युशियस ही व्यक्तित्त्वे अतिप्राचीन, इसवी सनापूर्वीच्या काळातील किसिंजर अलीकडचा, नव्हे समकालीन. त्यांचा विचार एकमेकांच्या संदर्भात करणे हा एक प्रकारचा ऐतिहासिक कोटी प्रमाद (Category Mistake) नव्हे काय, याचे एक उत्तर, किसिंजर हे एकूणच युरोपीय परंपरेचे प्रातिनिधिक चिन्ह किंवा संकेत असे आहे.
सद्यकालीन राजकीय पेचप्रसंगांची चर्चा करताना मी प्राचीन भारतीय राजकीय विचारांचा आणि त्यातही परत कृष्णाचा संदर्भ देत असल्याचे पाहून काहींच्या भिवया उंचावण्याचा संभव आहे. अर्थात, मी ते स्वाभाविक मानतो. पुष्कळदा आपल्याला आपल्याजवळील व्यक्तींची, वस्तूची किंमत कळत नसते. हा कदाचित अतिपरिचयाचाही परिणाम असू शकतो. अशा वेळी कोणत्या तरी बाहेरच्या माणसाने येऊन आपले कान टोचण्याची गरज असते.
अर्थात, या संदर्भातील हा बाहेरचा माणूस म्हणजे कोणी अलबत्या-गलबत्या नाही. त्याचे नाव आहे यान क्ष्वारांग. यान क्ष्वारांग हे आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations -IR) विषयातील अधिकारी चिनी अभ्यासक म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय संबंध विषयामधील वास्तववाद या विचारसरणीचे ते पुरस्कर्ते मानले जातात. एका मुलाखतकाराने त्यांना आयआर ज्ञानशाखेत तरबेज होण्यासाठी अभ्यासकाने काय करायला हवे? असा प्रश्न विचारला असता क्ष्वारांग यांनी उत्तर दिले, की त्यांनी काही भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास भारताच्याच प्राचीन इतिहासाच्या दृष्टिकोनातून करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. ते असेही सांगतात, की भारताला राजकीय विचारांची मजबूत अशी पूर्वपरंपरा आहे. मात्र आजकाल प्रभावी आयआर सिद्धांतन पाश्चात्त्य संस्कृतीवरच आधारलेले असते.
मी जेव्हा चीनचा कन्फ्युशियस, भारताचा कृष्ण आणि अमेरिकेचा किसिंजर म्हणतो तेव्हा एखाद्याला हा दोन भिन्न कालखंडांचाही संकर वाटू शकतो; पण ते बरोबर नाही. भारत आणि चीन या देशांना खूप प्राचीन असा इतिहास व परंपरा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. अमेरिका हे राष्ट्रच नवे असले, तरी भूमीच्या दृष्टिकोनातून अमेरिकन वैचारिकता हा प्लेटो-अरिस्टॉटलपासूनच्या विचारांच्या उत्क्रांतीचा म्हणा, मंथनाचा म्हणा निष्कर्ष आहे. ग्रीक, रोमन, मध्ययुगीन ख्रिस्ती आणि प्रबोधन अशी स्थित्यंतरे पचवत उभ्या राहिलेल्या आधुनिकता नावाच्या प्रकरणाचा तो आविष्कार आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य संघर्षाच्या संदर्भात किसिंजरसारखे विचारवंत ज्या वास्तववादी उपपत्तीच्या संदर्भात विचार करतात ती ‘थुसिडायडसचा सापळा’ (Thucydides Trap) या नावाने प्रसिद्ध आहे. आता हा सद्गृहस्थ ग्रीक इतिहासकार असून, त्याने ही मांडणी स्पार्टा आणि अथेन्स या दोन ग्रीक राज्यांच्या संघर्षाचे स्पष्टीकरण करण्यासाठी मांडली. स्पार्टा ही प्रस्थापित प्रभुसत्ता तर, अथेन्स तिला आव्हान देणारी उगवती प्रभुसत्ता होती. मुद्दा एवढाच आहे, की युरोप आणि अमेरिका या देशातील सिद्धातन -त्यांच्या प्राचीन इतिहासाच्या व संस्कृतीच्या परंपरेत होत गेले आणि अमेरिका तर युरोपचेच ‘एक्स्टेन्शन काऊंटर’ आहे, असे निदान वैचारिक इतिहास सांगतो. हाच न्याय ग्रीकांइतका किंबहुना त्यापेक्षाही प्राचीन इतिहास लाभलेल्या चिनी विचारांना का लागू करू नये? असा सूचक सवाल चिनी विचारवंत करतात. तो सवाल भारतीय विचारांना, जे चीनएवढे किंबहुना त्यापेक्षाही अधिक प्राचीन आहेत व ज्यांनी चीनवरही प्रभाव पाडला होता, लागू होऊ नयेत हा त्याच सवालाचा तार्किक विस्तार होय.
खरे तर ज्या युरोपीय संस्कृतीच्या उत्क्रांतीचा अमेरिका हा समारोप आहे, तिचे उगमस्थान असलेले ग्रीस आणि रोम या दोन देशांची आज काय अवस्था आहे, हे आपण आजच्या ग्रीस व इटली यांच्यावरून समजू शकतो. तसा प्रकार चीन आणि भारत यांच्याबाबत झाला नाही याचीही नोंद घ्यायला हरकत नसावी.
देशांच्या संदर्भातील मुद्दा निकालात काढला तरी व्यक्तींच्या बाबतीत आक्षेप येऊ शकतो. कृष्ण आणि कन्फ्युशियस ही व्यक्तित्त्वे अतिप्राचीन, इसवी सनापूर्वीच्या काळातील किसिंजर अलीकडचा, नव्हे समकालीन. त्यांचा विचार एकमेकांच्या संदर्भात करणे हा एक प्रकारचा ऐतिहासिक कोटी प्रमाद (Category Mistake) नव्हे काय, याचे एक उत्तर, किसिंजर हे एकूणच युरोपीय परंपरेचे प्रातिनिधिक चिन्ह किंवा संकेत असे आहे.
अशाच प्रकारचा प्रश्न अर्जुनाने कृष्णाच्या संदर्भात उपस्थित केला होता. गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या शेवटी कृष्णाकडून मनु, विवस्वान, राजर्षी यांचे उल्लेख येऊ लागले. तेव्हा अर्जुनाने काळाचा प्रश्न उपस्थित केला. ‘‘हे लोक फार पूर्वीच्या काळातील, तू तर सांप्रतचा,’’ असा त्याचा आक्षेप होता. तो कृष्णाने पूर्वजन्मांच्या सिद्धांतांच्या आधारे परिहारिला. त्याच्या आधारे म्हणता येईल, की किसिंजर हा ग्रीकांपासूनच्या युरोपीय परंपरेचा सद्यकालीन वैचारिक पुनर्जन्म अथवा अवतारच नव्हे काय? पाश्चात्त्य तत्त्ववैचारिक परंपरेतील सर्व संप्रदाय, वादविवाद हे किसिंजरच्या रूपात प्रतिकात्मतेने प्रातिनिधिकपणे अवतरले आहेत, ही माझी समजूत एक पद्धतिशास्त्रीय उपकरण आहे. या प्रातिनिधिक प्रतिकाच्या माध्यमातून मी त्या परंपरेतील इतर कोणत्याही विचारवंतापर्यंत जायला मोकळा आहे. किसिंजर हा माझा ‘व्हँटेज पॉइंट’ आहे. पाश्चात्त्य परंपरेचा टेहळणीचा बुरूज आहे. तिथून मी किसिंजरचे कठोर टीकाकारही न्याहाळू शकतो.
भारत आणि चीनच्या बाबतीतला प्रकार नेमका उलट आहे. तिकडे मला समकालीन किसिंजरपासून मागे जावे लागते. येथे पूर्वकालीन कृष्ण किंवा कन्फ्युशियसकडून मी वर्तमानात उतरतो. ग्रीक आणि रोमन या संस्कृतींप्रमाणे चिनी आणि भारतीय संस्कृती आज नामशेष नाहीत आणि ॲरिस्टॉटल किंवा सिनेकाप्रमाणे कृष्ण आणि कन्फ्युशियस इतिहासजमा नाहीत. त्यांच्या-त्यांच्या देशासाठी ते आजही विद्यमान मानले जातात. ग्रीसमध्ये, इटलीमध्ये (अर्थात अमेरिकेतही) प्लेटो, ॲरिस्टॉटल किंवा सिनेका यांचे जन्मोत्सव कोणी साजरे करतात? भारतात आणि चीनमध्ये कृष्ण आणि कन्फ्युशियस यांच्याबाबतीत काय घडते याचा विचार करावा.
कन्फ्युशियसला ऋषी (Sage) मानले जाते आणि कृष्ण तर ईश्वरी अवतार. त्यांच्या पंक्तीत किसिंजरला बसवणे फारच झाले, असेही कोणी म्हणू शकेल.
प्रश्न अगदीच उचित आहे. अमेरिकेने केलेल्या अनेक भल्याबुऱ्या कृत्यांबद्दल किसिंजरला जबाबदार धरण्यात येते. त्यासाठी त्याच्यावर पराकोटीची टीकाही केली जाते. त्याला युद्ध गुन्हेगार ठरवले जाण्यापर्यंत मजल मारली जाते. नैतिक आरोपांचे जाऊ द्या; पण आज अमेरिकेची अशी एकूणच जगाची जी स्थिती आहे, जिचा उल्लेख आपण ‘आर्त’ असा करतो, जिच्यात आज चीन अमेरिकेला आव्हान देत आहे, त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे किसिंजरची राजनीतीच कारणीभूत आहे. रशियाबरोबरच्या शीतयुद्धात रशियावर मात करण्यासाठी चीनला मदत करायची योजना आखण्यात सिंहाचा वाटा किसिंजरचाच होता. ही योजना यशस्वी होण्यासाठी ज्या काही लटपटी-खटपटी करायच्या होत्या, त्या सर्व त्याने बिनबोभाटपणे केल्या. चीनला गुप्त भेट देऊन तेथील सर्वोच्च नेत्यांशी वाटाघाटी करून ही योजना त्यांच्या गळी उतरविण्याचे दुर्घट काम अर्थातच किसिंजरचे! पुढे योजना फलद्रूप झाली; पण इकडे रशियाचे विघटन होता-होता तिकडे अमेरिकेच्या पाठिंब्याने व मदतीने चीन बघता-बघता आर्थिक महासत्ता बनला. आर्थिक बळामुळे त्याचे लष्करी सामर्थ्यही वाढले व आज तो भस्मासूर होऊन अमेरिकेचीच जागा घेण्याच्या अवस्थेपर्यंत आला आहे. याला जबाबदार कोण?
हे आक्षेप सहजासहजी उडवून लावावेत असे नाहीत. त्यांची चर्चाही करावी लागेल; पण एक गोष्ट लक्षात घ्या. अशाच प्रकारचे आरोप स्वतः कृष्णावरही त्याचे समकालीन करीत असत. वैयक्तिक स्वरूपाचे काही आरोप शिशुपाल नावाच्या त्याच्याच आतेभावाने केले होते आणि तेही राजसूय यज्ञाच्या भर मंडपात!
महाभारताचे युद्ध होऊन गेल्यावर त्यासाठी तोच जबाबदार असल्याचा आरोप दुर्योधन, गांधारी इतकेच काय पण उत्तंक नावाचा ऋषी अशा अनेकांनी केले होते.
कृष्णावरील आरोपांचे हे सत्र आजही पूर्णतः थांबले आहे असे समजायचे कारण नाही. महाभारतावर वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधून संशोधन करणारे अभ्यासक या आरोपांची री ओढतच असतात. नवे आरोपही करीत असतात. डाव्या मंडळींकडून कृष्णाचा निष्काम कर्मयोग, फलाशा न धरता कर्म करण्याचा उपदेश हा भांडवलदारांनी श्रमिकांना पुरेसा मोबदला न देता त्यांचे शोषण करण्याचे समर्थन, असे म्हटले गेले आहे, तर गीतेतील ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं’ या श्लोकाचा हवाला देत कृष्ण विषमतेचा पुरस्कर्ता असल्याचेही म्हटले जाते.
या आक्षेपांची चर्चा करावी लागेलच. येथे मुद्दा असा आहे, की किसिंजर व कृष्ण या दोघांच्याही वाट्याला निंदा आणि टीका येत राहिली आहे. या दोघांमधील आणखी एका साम्यस्थळाकडे कोणाचे लक्ष गेले नाही. किसिंजर हा जन्माने ज्यू. त्यातही हिटलरच्या सत्तेखालील जर्मनीचा. हिटलरी अत्याचारांचा वरवंटा फिरल्यामुळे इतर अनेक ज्यूंप्रमाणे त्यालाही अगदी लहान असताना देशांतर करावे लागले.
कृष्णाच्या वाट्याला असे स्थलांतर जन्मतःच आले. मथुरेत वसुदेव-देवकीच्या पोटी कारावासात जन्मलेल्या कृष्णाला सुरक्षिततेच्या कारणासाठी वसुदेवाने यमुना नदी ओलांडून गुप्तपणे नंद-यशोदेच्या स्वाधीन केले.
नंतरही कंसाचा वध करून मथुरेचे राज्य ताब्यात आल्यावर कंसाचा सासरा मगधाधिपती जरासंध याने सूड घेण्यासाठी सतरा वेळा मथुरेवर हल्ले केले. ते परतवून शेवटी आपले स्वतःचे राज्य त्यागून पश्चिम किनाऱ्यावरील अधिक सुरक्षित अशा द्वारकेत जाऊन वसायची वेळ कृष्णावर आली, हे जाणकारांना ठाऊक आहेच. उल्लेख करायला हरकत नाही. अशाच प्रकारची भटकंती कन्फ्युशियसच्याही वाट्याला आली होती.
हे मुद्दे आनुषंगिक आहेत. आपल्याला चर्चा करायची आहे ती किसिंजरच्या वैचारिक जडणघडणीची. त्याच्या वैश्विक व्यवस्थेविषयीच्या मतांची.