तत्त्वज्ञ किसिंजर

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 9 मे 2022

विश्‍वाचे आर्त

अठराव्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियनने केलेल्या युद्धांमुळे युरोपची राजकीय घडी पार विस्कटून गेली. युरोपला एक राजकीय चौकट देऊन तिच्या अंतर्गत शांतता प्रस्थापित करायचे काम टॉयनबी, स्पेंग्लर, कांट आदी मुत्सद्द्यांनी कसे केले, याचे विवेचन किसिंजर त्यांच्या प्रबंधांत करतात. त्यांच्या पहिल्या प्रबंधातील विषय पूर्णतः तात्त्विक स्वरूपाचा असून दुसऱ्या प्रबंधाचा संबंध प्रत्यक्ष राजकीय व्यवस्थापनाच्या कृतिशील ध्येयाशी येतो. सिद्धांत आणि व्यवहार असे शब्द या संदर्भात वापरता येतील.

इतिहासाच्या आधुनिक कालखंडात पूर्व आणि पश्चिम या पृथ्वीच्या गोलार्धांची तुलना केली तर पूर्वेकडील राष्ट्रांमध्ये काही विशेष घडते आहे, असे दिसले नाही. इंग्रजीत ज्याला इनिशिएटिव्ह, म्हणजे पुढाकार, घेणे म्हणतात तो घेऊन त्यानुसार कृती करणे या गोष्टी पश्चिमेतील राष्ट्रे जितक्या हिरिरीने करीत होती, तितक्या हिरिरीने व तडफेने पौर्वात्य राष्ट्रांनी केलेल्या नाहीत. मध्ययुगात अरबांनी पाश्चिमात्यांशी स्पर्धा करून पाहिली. काही बाबतीत ते तुल्यबळ तर काही बाबतीत वरचढ ठरण्याचा पराक्रमही त्यांनी केला. पण नंतर ते मागे पडले व पाश्चात्त्य म्हणजे अर्थातच युरोपीय राष्ट्रे पुढे गेली. त्यातही इंग्लंडच्या क्रमांक पहिला ठरला. युरोपीय आणि ब्रिटिश संस्कृती घेऊन अमेरिकेत गेलेल्या उठावगिरांनी तेथे आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. या राष्ट्राने सुरवातीच्या काळात स्वतःला युरोपातील सत्तास्पर्धेपासून अलिप्त ठेवले. त्याच्याकडील संसाधनांच्या वैपुल्यामुळे त्या राष्ट्राची भरभराट झाली आणि त्याचबरोबर युरोपातून आणलेल्या वैचारिकतेचा व संकल्पनांचा विकास करीत त्याने यथावकाश पश्चिमेचे प्रभुत्व व नेतृत्व संपादन केले. दोन महायुद्धांमुळे जर्जर झालेल्या युरोपातील राष्ट्रांकडे आता असे सामर्थ्य राहिले नव्हते. त्यांनी आशिया व आफ्रिका खंडांत स्थापिलेल्या साम्राज्याचा लय तर झालाच शिवाय सोविएत रशिया नामक कम्युनिझम नावाच्या पर्यायी व्यवस्थेला शह देण्याची शक्तीही त्यांच्यात उरली नव्हती. साहजिक दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगात ही सारी राष्ट्रे नाटो व इतर आर्थिक राजकीय संस्थांच्या माध्यमातून अमेरिकेची अंकित झाली. नव्या जगाला कोणी आणि कसा आकार द्यायचा या प्रश्नाचे उत्तर आता उदारव्यवस्थावादी अमेरिका व कम्युनिस्ट रशिया यांच्यातील स्पर्धेतून मिळणार होते. कम्युनिझमचा स्वीकार केलेल्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या देशाने म्हणजे चीनने मात्र रशियाचे नेतृत्व स्वीकारायला नकार दिला, इतकेच नव्हे तर त्याच्याशी शत्रुत्व पत्करले. आणि या स्पर्धेत अखेर रशियाला माघार घ्यावी लागली. या शत्रुत्वाचा फायदा घेऊन रशियाला एकाकी  पाडण्याची व्यूहरचना आखण्यात व तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात हेन्री किसिंजरचा मोठा वाटा असल्यामुळे त्याला युरोअमेरिकन विशेषतः अँग्लोअमेरिकन विश्वाचा प्रतिनिधी मानायला हवे, अशी मांडणी मी केली. तथापि, किसिंजर हा केवळ राजकीय डावपेच रचणारा, खेळ्या करणारा मुत्सद्दी नव्हता. त्याच्या अशा प्रकारच्या वृत्तींना एक तात्त्विक अधिष्ठान होते. म्हणूनच त्याला एकीकडे कृष्ण आणि दुसरीकडे कन्फ्युशियस अशा थोरांच्या बरोबरीने चर्चेत घ्यावे लागते. 

किसिंजरच्या भूमिकेला सहसा राजकीय वास्तववाद (Political Realism) असे म्हटले जाते. वास्तववादी राजनीतिज्ञ केवळ व्यवहार पाहणारा, क्रूर नसला तरी कठोर, मूल्यांची तमा न बाळगणारा असतो असा गैरसमज होऊ शकतो. स्वतः किसिंजरवर तशी टीकाही झाली असल्याने मी सांगितले आहेच. मात्र याच्या अगदी उलट भूमिका प्रसिद्ध अभ्यासक नील फर्ग्युसन याने घेतली आहे. त्याने किसिंजरच्या चरित्राचा जो पूर्वार्ध लिहिला त्याचे नावच ‘Kissinger 1923 -1968 The Idealist’ असे आहे. स्वतः फर्ग्युसनने, विशेषतः अमेरिका व चीन यांच्या संबंधांविषयी जे लेखन केले आहे ते किसिंजरच्या प्रेरणेतून केले आहे. किंबहुना ते लिखाण म्हणजे किसिंजरच्या विचारांचा फर्ग्युसनने आपल्या मतानुसार केलेला विस्तार समजायलाही हरकत नसावी. किसिंजरबरोबरच फर्ग्युसनही आज चीनविषयी काय म्हणतात त्याची चर्चा आपल्याला करायची आहेच. प्रस्तुत मुद्दा असा आहे की केवळ आदर्शवादाच्या आहारी जाऊन केलेली राजकीय कृती आत्मघातकी ठरू शकते व वास्तववाद म्हणजे मूल्यहीन व्यवहारवाद समजून केलेली कृती ही मनुष्यत्वाच्या संकल्पनेच्या विरोधात जाते, अनैतिक ठरते. आदर्शाधारित किंवा मूल्याधिष्ठित वास्तववाद या प्रणालीचा अंगीकार करून केलेल्या कृतीचे समर्थन करता येते. स्वतः कृष्णाचे (आणि अलीकडच्या काळात लोकमान्य टिळकांचे) राजकीय तत्त्वज्ञान मूल्याधिष्ठित वास्तववादी असल्याचे लक्षात आल्यामुळेच कृष्ण आणि किसिंजर यांचा विचार एकत्रित करता येतो, हे लक्षात घ्यावे.

किसिंजरच्या एकूण धोरणाची मांडणी संक्षिप्तपणे करण्याची झाल्यास असे म्हणता येईल की त्याच्या मते अमेरिकेची, विशेषतः पहिल्या महायुद्धाच्यावेळी अध्यक्ष असलेल्या वुड्रो विल्सनची, भूमिका आदर्शवादी होती. याउलट युरोपमधील राष्ट्रे वास्तववादी भूमिकेतून राजकीय व्यवहार करीत असत. अमेरिकेला विल्सोनियन धोरणात दुरुस्ती करून युरोपमधील राष्ट्रांकडून काही शिकावे लागेल. 

युरोपातील राष्ट्रांच्या अशा वास्तववादी भूमिकेचा पाया निकोलोय मॅकिव्हेली या १५व्या-१६व्या शतकातील प्रसिद्ध राजकीय विचारवंताने घातला, हे सर्वश्रुत आहे. त्याचा ‘The Prince’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. (त्याची सविस्तर चर्चा योग्य वेळी होईलच, येथे फक्त उल्लेख) किसिंजर म्हणजे आधुनिक मॅकिव्हेली नव्हे एवढे सांगणे येथे पुरेसे होईल. 

आपल्या राजकीय नवनीतीची मांडणी करताना किसिंजरला विल्सनच्या धोरणाची कठोर समीक्षा करावी लागणे स्वाभाविक होते. अर्थात विल्सनची बाजू लढवणारे अभ्यासकही कमी नाहीत. मायकेल मँडलबाऊ यांचा ‘The Ideas That Conquered The World’ हा असा अलीकडचा ग्रंथ. खरेतर कोणत्या का कारणाने होईना विल्सनचा प्रतिवाद करणाऱ्या किसिंजरची योग्य ती दखल घेऊन पुढे जाणे मँडलबाऊकडून अपेक्षित होते. मात्र त्यांनी या ग्रंथात किसिंजरचे नावही घेतले नाही. बिचाऱ्या किसिंजरने मात्र, ‘Michael Mandelbaum's new book, The Ideas that Conquered the World, is illuminating and thought-provoking’ असा अभिप्राय दिला व प्रकाशकाने तो ग्रंथाच्या मलपृष्ठावर छापलासुद्धा. अर्थात याला मार्केटिंगचा भाग समजायला हरकत नाही. 

किसिंजर हा मुत्सद्दी कसा मूल्यात्मक म्हणजेच आदर्शवादी भूमिकेचा होता हे दाखवण्यासाठी फर्ग्युसनने हार्वर्ड विद्यापीठात ‘सीनियर ऑनर्स’साठी किसिंजरने लिहिलेल्या प्रबंधाचा आधार घेतला आहे. ‘The Meaing of History - Reflections on Spengler, Toynbee and Kant’ हे १९५० साली दाखल केलेल्या प्रबंधाचे नाव. हा प्रबंध हार्वर्ड विद्यापीठात दाखल झालेल्या प्रबंधामधील ‘सर्वात मोठा प्रबंध’ या तथ्यात्मक तपशिलाची नोंद करणे प्रस्तुत ठरेल. 

किसिंजरचा प्रस्तुत प्रबंध ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ या ज्ञानशाखेत मोडतो. या प्रबंधातून तत्त्वज्ञ किसिंजर व्यक्त होताना आढळतो. इतिहासातील अर्थाचा संबंध किसिंजरने (मानवाचे) स्वातंत्र्य आणि नियतत्‍व (Freedom and Determination) यांच्याशी लावला असून त्याची हाताळणी त्याने अध्यात्म शास्त्रीय (Metaphysical) पद्धतीने केली आहे. नैसर्गिक विज्ञानांप्रमाणे सामाजिक विज्ञानामध्येही अनुभववादी पद्धतीचा आग्रह धरणाऱ्या तार्किक भाववादी (Logical Positivist) विचारवंतांशी त्याने फारकत घेतली आहे. घटना घडून गेल्यावर इतिहास लिहिणाऱ्याला ती अपरिहार्य वाटते; परंतु ती घडवणाऱ्या कर्त्याला संबंधित कृती करण्यास वा न करण्यास आपण स्वतंत्र आहोत, असेच वाटत असते. या विरोधाभासाची संगती कशी लावायची या प्रश्नाला किसिंजर सरळ भिडतो. एका अर्थाने हा प्रश्न ज्ञानमीमांसेचा (Epistemology) प्रश्न आहे. 

टॉयनबी यांच्या बहुखंडी ‘A Study of History’, स्पेंग्लरच्या ‘Decline of the West’ आणि कांटच्या ‘Idea for a Universal History’, ‘Essay on Perpetual Peace’, ‘Critique of Practical Reason’ आणि ‘Critique of Pure Reason’ या महत्त्वाच्या ग्रंथाचा आधार घेऊन, टॉयनबी आणि स्पेंग्लर यांची मानवाच्या स्वातंत्र्याला आपल्या इतिहासाच्या तत्त्वज्ञानात पुरेसे स्थान दिले नाही, असे किसिंजर निदर्शनास आणतो. याच कारणामुळे या तत्त्वज्ञांना इतिहासातील अर्थपूर्णतेचे स्पष्टीकरण नीट करता आले नाही, हेही सांगतो. अर्थात त्याला टॉयनबीपेक्षा स्पेंग्लर सरस वाटला तरी अखेर शेवटी स्पेंग्लरच्या इतिहास मीमांसेतील सांस्कृतिक चक्रवाद नियतत्त्ववादाकडेच नेतो व मानवी स्वातंत्र्याला बाधा आणतो. 

टॉयनबी आणि स्पेंग्लर यांच्या नियतत्ववादाचा उतारा किसिंजरला जर्मन तत्त्वज्ञ कांटच्या तत्त्वज्ञानात शोधता येतो. 

किसिंजरने उपस्थित केलेला प्रश्न त्याच्या प्रबंधाचे मार्गदर्शक सूत्रच समजायला हवे. ‘The desire to reconcile our experience of freedom with a determined environment is the lament of poetry and the dilemma of philosophy - what is the causality that accomplishes itself under the mode of freedom?’

जर्मन महाकवी गटेच्या प्रभावामुळे स्पेंग्लरच्या लेखनात एक प्रकारची काव्यात्मकता अवतरली आहे, तसे अर्थातच टॉयनबीच्या बाबतीत असण्याचा संभव नाही.

किसिंजरने सिनिअर ऑनर्ससाठी लिहिलेल्या उपरोक्त प्रबंधाची त्याने पीएच.डी.साठी लिहिलेल्या (नंतर, A World Restored: Metternich, Castlereagh and the Problems of Peace 1812-1822 या नावाने प्रकाशित झालेल्या) प्रबंधाशी तुलना करून त्यांच्यातील अंतःसंबंध शोधणे हा स्वतंत्र विषय आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियनने केलेल्या युद्धांमुळे युरोपची राजकीय घडी पार विस्कटून गेली. युरोपला एक राजकीय चौकट देऊन तिच्या अंतर्गत शांतता प्रस्थापित करायचे काम उपरोक्त मुत्सद्द्यांनी कसे केले, याचे विवेचन किसिंजर या प्रबंधात करतात. पहिल्या प्रबंधातील विषय पूर्णतः तात्त्विक स्वरूपाचा असून दुसऱ्या प्रबंधाचा संबंध प्रत्यक्ष राजकीय व्यवस्थापनाच्या कृतिशील ध्येयाशी येतो. सिद्धांत आणि व्यवहार असे शब्द या संदर्भात वापरता येतील. या प्रबंधातील किसिंजर वास्तववादी वाटणे अगदीच स्वाभाविक आहे, आणि दोन प्रबंधांचा अंतःसंबंध तपासायचाच झाला तर पहिल्यातील कांटच्या ‘शाश्वत शांतते’चा (Perpetual Peace) संबंध कोठेतरी नेपोलियनोत्तर युरोपात प्रस्थापित झालेल्या शांततेशी लावता येईल. फार काय, स्वतः किसिंजरने आंतरराष्ट्रीय स्तरावरील शीतयुद्ध संपुष्टात आणून वेगळी विश्वव्यवस्था आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अंतिम उद्दिष्ट शांतता हेच असणार हे उघड आहे. किसिंजर या ऐतिहासिक कर्त्याने त्यासाठी जे काही केले ते आपण स्वतंत्र अभिकर्ता (Free Agent/ Actor) आहोत, आपल्याप्रमाणे निक्सन, माओ किंवा झाऊ हेसुद्धा असेच स्वतंत्र कर्ते आहेत हे गृहित धरूनच केले जाणार हे उघड आहे. इतकेच काय पण निक्सन, माओ, झाऊ यांचीही तीच धारणा असणार हे उघड आहे.

यानंतर अर्धशतक उलटून गेल्यावर आज त्या कृतींचा इतिहास लिहिताना, खरोखरच हे कर्ते तेव्हा स्वतंत्र होते का? असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे किसिंजरच्या पहिल्या प्रबंधाची पडताळणी ठरेल. आणि मुख्य म्हणजे हा सर्व ऐतिहासिक खटाटोप करताना त्याचे भविष्यकालीन परिणाम काय होतील या विषयी त्यांचे काय अंदाज, आडाखे होते? ते फलद्रूप झाले की अनपेक्षित असे काही निष्पन्न झाले?

हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांची उत्तरे शोधताना आपल्याला कृष्णाने दिलेल्या ‘टिप्स’ उपयुक्त ठरतील का?
ते काहीही असे त्याने तत्त्वज्ञ किसिंजर बाद होत नाही.

संबंधित बातम्या