बिचारा केन्स!

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 18 जुलै 2022

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचे सर्वक्षेत्रिय सामर्थ्य सर्वज्ञात झालेले असले तरी ब्रिटिश लोकांनी येन केन प्रकारेण आपले प्रभुत्व टिकवून धरण्यात यश मिळवले होते. त्याचे एक कारण कदाचित अमेरिकेचे अलिप्ततेचे धोरण हेही असू शकते. मात्र अमेरिकेला आता आपल्या सामर्थ्याची यथार्थ जाणीव झाली होती, तिचा आत्मविश्वास वाढत होता आणि यापुढील काळ आपल्या वर्चस्वाचा असेल हेही तिच्या लक्षात आले होते. थोडक्यात सांगायचे झाले तर अमेरिका आता इंग्लंडची जागा घ्यायला सिद्ध झाली होती.

आधुनिक जगाच्या इतिहासात ब्रेट्टन वूड्स परिषदेस अनन्यसाधारण महत्त्व आहे, याविषयी कोणाचे दुमत व्हायचा संभव नाही. महायुद्धामुळे विस्कटलेली घडी बसवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता व ही घडी विशेष करून आर्थिक घडी होती, याबद्दलही वाद नाही. मात्र या प्रक्रियेत ज्या राष्ट्राची भूमिका मध्यवर्ती असेल, ते राष्ट्र राजकीय टप्प्यातही केंद्रस्थानी येणार हेसुद्धा तितकेच निश्चित होते आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे राष्ट्र अमेरिका होते. खरे तर ब्रेट्टन वूड्समध्ये एका अर्थाने ही दोन राष्ट्रांमधील वर्चस्वाची लढाई होती. यापूर्वीचे वर्चस्व राष्ट्र अर्थातच इंग्लंड होते. ते महायुद्धामुळे जर्जर झाले असले तरी त्याची खुमखुमी पूर्णतः संपली होती असे नाही. जगभर पसरलेल्या आपल्या साम्राज्याचा डोलारा अजूनही सावरता येईल अशी आशा चर्चिलसारख्या मुत्सद्याने अजूनही सोडली नव्हती. आपल्या विस्तीर्ण साम्राज्याचा व ते आधारित होते त्या सागरी प्रभुत्वाचा अस्त त्याला उघड्या डोळ्यांनी बघावा लागत होता. ही एक ऐतिहासिक अपरिहार्यताच होती. 

दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या प्रभुत्वाच्या कल्पनेत एक राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रांचा भूभाग गिळंकृत करून आपल्या राज्यात सामील करून घेणे याला महत्त्व होते. युद्धोत्तर काळात ही कल्पना मागे पडून इतर राष्ट्रांच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवीत त्यांना आपल्यावर अवलंबून राहायला लावणे महत्त्वाचे ठरते. कोणत्याही देशाचा भूभाग न बळकावता अमेरिकेने जगावर वर्चस्व गाजवले ते याच पद्धतीने. एका मर्यादेत ती जागतिकीकरणाची सुरुवात होती, असे म्हटले तरी चालेल. नव्या आर्थिक संस्था व यंत्रणा उभ्या करून त्यांच्यावर ताबा ठेवीत अमेरिकेने हे साध्य केले. अमेरिकेला अभिप्रेत असलेली राजकीय व्यवस्था या आर्थिक व्यवस्थेशी सुसंगत व तिला पूरक असणे ही अमेरिकेची गरज होती. रशिया आणि अर्थातच रशियाचे साम्यवादी तत्त्वज्ञान हा तिच्या मार्गातील अडथळा होता. म्हणून तर या दोन महासत्ता परस्परविरोधात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. हेच तथाकथित शीतयुद्धाचे मूळ होय. 

ब्रेट्टन वूड्स परिषदेचा वृत्तांत जितका उद्‍बोधक तितकाच मनोरंजकही आहे. कर्ट शूलर (Kurt Schuler) आणि मार्क बर्नकॉप्फ (Mark Bernkopf) यांनी या बाबतचे सखोल संशोधन करून ‘हू वॉज ॲट ब्रेट्टन वूड्स?’ हा निबंध ‘सेंटर फॉर फायनान्शियल स्टॅबिलिटी’साठी प्रसिद्ध केला (१ जुलै २०१४) आहे. त्यात परिषदेत भाग घेणाऱ्या सर्वच देशांचा त्यांच्या प्रतिनिधींच्या नावांसह तपशिल पुरवला आहे. त्यातील भारताचा तपशील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. भारत त्यावेळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता. सर (अब्राहम) जर्मी रेजमन हे भारतीय शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते. ते तेव्हा भारताचे अर्थमंत्री होते म्हटले तरी चालेल. भारत सरकारचे आर्थिक सल्लागार सर थिआडॉर ग्रेगरी, सर रामस्वामी चेट्टी, अर्देशीर दोराबशा श्रॉफ, सर डेव्हिड मिक आणि मुख्य म्हणजे सर चिंतामणराव ऊर्फ सी.डी. देशमुख हे भारतीय शिष्टमंडळातील अन्य सदस्य होते. 

महाराष्ट्रातील लोकांना चिंतामणरावांबद्दल आदर वाटतो तो मुख्यतः संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. वस्तुतः चिंतामणरावांचे कर्तृत्व फार मोठे आहे. रिझर्व्ह बॅंकेचे पहिले गर्व्हनर जनरल, विद्यापीठ अनुदान मंडळाचे पहिले अध्यक्ष या नात्याने त्यांनी दिलेले योगदान हे देशाच्या पातळीवरील होते. मात्र त्यांनी ब्रेट्टन वूड्स परिषदेत केलेली कामगिरीही तितकीच मोलाची आहे. सुदैवाने चिंतामणरावांनी लिहिलेले ‘द कोर्स ऑफ माय लाइफ’ हे आत्मवृत्त उपलब्ध आहे. भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीच्या अर्थबोधपत्रिकेमध्ये प्रा. नीळकंठ रथ यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद संपादक अभय टिळक यांनी प्रसिद्ध केला आहे. (जून २०२१) ‘स्मरण, चिंतामणरावांचे...’ या लेखात चिंतामणरावांच्या ब्रेट्टन वूड्समधील योगदानाची चांगली चर्चा प्रा. रथांनी केली आहे. 

बाल कृष्ण मदन यांनी भारतीय शिष्टमंडळाचे सचिव म्हणून काम पाहिले.     

रशिया आणि चीन या देशांची प्रतिनिधी मंडळेही परिषदेत सामील होती. चीनमधील लाल क्रांतीला अद्याप अवकाश होता; तेथे चॅंग कै शेकची सत्ता होती. 

परिषदेतील प्रमुख खेळाडू अर्थातच अमेरिका आणि इंग्लंड ही दोन राष्ट्रे होती. अमेरिकी कोषागाराचे सचिव हेन्‍री मॉग्रेनथाऊ (धाकटे) अमेरिकी शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते. हॅरी डेक्स्टर व्हाइट कोषागाराचा उपसचिव असला तरी वाटाघाटीत त्याची भूमिका निर्णायक ठरली, हे येथेच नोंदवून ठेवतो. मुळात प्राध्यापक असलेल्या व्हाइटने युद्धापूर्वी आणि युद्धकाळातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावल्या होत्या. सैद्धांतिक स्तरावर फारशी ग्रांथिक मांडणी न केलेल्या या महाशयांकडे व्यावहारिक चातुर्य मात्र विशेष होते. 

परिषदेच्या खेळातील दुसरा प्रमुख भिडू म्हणजे इंग्लंड. सर जॉन केन्स हे जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ इंग्लंडच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते. केन्सला विसाव्या शतकातील अर्थात प्रभावी अर्थशास्त्रज्ञ मानले जाते, एवढे सांगितले तरी पुरे. 

ही परिषद म्हणजे सरळ साधे निरागस चर्चासत्र नव्हते, हे अलीकडे बेन स्टेल (Benn Steil) याने लिहिलेल्या ग्रंथावरून लक्षात येते. स्टेलच्या ग्रंथाचे नावच पुरेसे बोलके आहेः ‘The Battle of Bretton Woods: John Maynard Keynes, Harry Dexter White, and the Making of a New World Order’. स्टेलच्या ग्रंथाच्या अगोदर लिहिले गेलेले व स्वतः इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाने प्रसिद्ध केलेले जेम्स बोरटॉन या संशोधकाचे शोधनिबंधही या संदर्भात महत्त्वाचे आहेत. त्यातील एक निबंध ‘Why White, not Keynes? Investing the Postwar International Monetary System’ या शीर्षकाचा आहे. 

परिषदेमध्ये लॉर्ड केन्ससारखा ख्यातकीर्त आणि प्रभावी अर्थशास्त्रज्ञ इंग्लंडचे प्रतिनिधित्व करीत असताना अमेरिकेच्या हॅरी व्हाइटला एवढे महत्त्व का प्राप्त व्हावे, ही शंका मी प्रारंभीच व्यक्त केली होती. बेन स्टेल आदी लेखकांच्या लिखाणातून तिचे उत्तर मिळते. महायुद्धात अमेरिका ब्रिटनच्या मदतीला धावली असा सार्वत्रिक समज असला आणि या दोन्ही राष्ट्रांची तात्त्विक भूमिका सारखी दिसत असली, तरी पडद्याआड काही तरी वेगळेच घडत होते. अमेरिकेचे सर्वक्षेत्रिय सामर्थ्य आजपर्यंत सर्वज्ञात झालेले असले तरी ब्रिटिश लोकांनी येन केन प्रकारेण आपले प्रभुत्व टिकवून धरण्यात यश मिळवले होते. त्याचे एक कारण कदाचित अमेरिकेचे आजवरचे अलिप्ततेचे धोरण हेही असू शकते. आता मात्र अमेरिकेला आपल्या सामर्थ्याची यथार्थ जाणीव झाली होती, तिच्या आत्मविश्वास वाढत होता आणि यापुढील काळ आपल्या वर्चस्वाचा असेल हेही तिच्या लक्षात आले होते. थोडक्यात सांगायचे झाले तर अमेरिका आता इंग्लंडची जागा घ्यायला सिद्ध झाली होती. तिचा दुसरा प्रतिस्पर्धी अर्थातच रशिया होता. मात्र तरीही रशियाची पुरेशी तयारी झाली नव्हती. तेव्हा अमेरिकेने उलट रशियाला झुकते माप देऊन इंग्लंडला मागे रेटायचे ठरवले होते, असे उपलब्ध पुराव्यावरून म्हणायला जागा आहे. आर्थिक संदर्भात सांगायचे झाले तर आंतरराष्ट्रीय चलनव्यवस्थेत इंग्लंडला आपल्या स्टर्लिंग पौंडाचे महत्त्व अबाधित ठेवायचे होते तर ही जागा डॉलरने घ्यावी अशी अमेरिकेची इच्छा होती. हे शक्य झाले तर तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले आर्थिक अधिराज्य प्रस्थापित करणे शक्य होणार होते. आर्थिक वर्चस्व हा राजकीय वर्चस्वाचा पाया असतो, याची खूणगाठ अमेरिकेने बांधली होती. अर्थप्राधान्यतेचा सिद्धांत मार्क्सवाद आणि भांडवलशाही या दोहोंना मान्य आहे, तो असा!! 

युरोप अमेरिकेतील अभ्यासकांनी जे निष्कर्ष काढले त्यांच्याशी देशमुखांच्या लेखनाशी मेळ बसतो का, हे पाहता येईल. देशमुख अगोदर भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. १९४३ साली ते तिचे काळजीवाहू गव्हर्नर बनले आणि त्याच वर्षी ते रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. याच काळात भारतातून ब्रिटनात निर्यात झालेल्या मालाच्या ब्रिटिश सरकारकडे पौंडांच्या चलनातील देय शिल्लक ठेवींच्या विषय ऐरणीवर आला. या संदर्भातील केन्स यांचा बॅन्कोर (Bancor) योजनेचा आराखडा आणि अमेरिकेने तयार केलेला म्हणजेच व्हाइट यांचा मसुदा चिंतामणरावांना टेलर यांच्या सौजन्याने प्राप्त झाले. केन्सची बॅन्कोर योजना देशमुखांना वरवरची वाटली. ती चलन फुगवट्यास कारण होईल असाही त्यांचा समज झाला. तसे त्यांनी टेलरला कळवले. त्यावरही टेलरचा प्रतिसाद म्हणजे, “I agree with you about Keynes, a monetary quack, for preferring monetary panacea of the worst inflationary type for what is an international political problem,” असे चिंतामणराव सांगतात. येथे टेलर चिंतामणरावांच्या ज्या मताशी आपण सहमत असल्याचे सांगतो ते मत चिंतामणरावांनी टेलरच्या सिद्धांत मांडले असेल किंवा नसेलही. एकाच औषधाची योजना सर्व रोगांवर करणाऱ्याशी केन्ससारख्या जगप्रसिद्ध व सुप्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञाची तुलना करण्याचे धाडस वाखाणण्यासारखे आहे. मग ते टेलरचे असे किंवा सी.डीं.चे. आपण हे पत्र जुहूला जाऊन निवांत वाचू आणि त्याला पोलाइट उत्तर लिहू, असे चिंतामणरावांनी ठरवले. हा पत्रव्यवहार उपलब्ध झाला असता तर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडला असता. 

चिंतामणराव सांगतात त्याप्रमाणे अमेरिकेत केन्सची बॅन्कोर योजना पसंत पडली नाही. व्हाइट याने तयार केलेली पर्यायी योजना बाजी मारून गेली. देशमुखांच्या मतानुसार, The White Plan was less explicit about the fundamentals than the Keynes Plan, but went more meticulously into details in regard to the constitution, management and working of the Fund. 

परिषदेच्यावेळी जर्मी रेजमनने खबर दिली की भारतासाठी पुरेशा कोट्याची तरतूद करण्यात आलेली नाही. (याला कारण अर्थातच इंग्लंड आणि केन्स) शिष्टमंडळासाठी हा एक धक्काच होता. चिंतामणरावांची यावरील प्रतिक्रिया फारच तीव्र होती. त्यांनी सरळ सरळ परिषदेतून काढता पाय घेण्याचा उपाय सुचवला. (असाच पवित्रा चिंतामणरावांनी संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देताना घेतला होता. त्यामुळे ते महाराष्ट्राचे महानायक झाले होते.) त्याला चेट्टी आणि श्रॉफ यांनी पाठिंबा दिला. रेजमन सुरुवातीला चिडला. तुम्ही भारतीय नाही तरी असहकारवादीच असता असा शेलका शेराही त्याने मारला. अर्थात मग त्यालाही आपली चूक उमगली व त्याने सहमती दाखवली. अखेर शेवटी भारताच्या मागणीला पुरेसा अनुकूल प्रतिसाद मिळवण्यात चिंतामणराव यशस्वी झाले. आंतरराष्ट्रीय गंगाजळीत भारताच्या वाटा मान्य झाला. 

या संदर्भात आणखीही एका गोष्टीची नोंद प्रा. रथ यांनी केली आहे. (बहुधा देशमुखांच्या सूचनेनुसार) धनंजयराव गाडगीळ यांनी केन्स आणि व्हाइट यांच्या योजनांवर एक टिपण तयार केले होते व देशमुखांनी ते रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर या नात्याने बॅंकेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाच्या सदस्यांमध्ये वितरित केले होते. 

देशमुखांचे केन्सबद्दलचे मत जे काही होते ते असो. असे सांगण्यात येते की स्वतः केन्स देशमुखांच्या मांडणीमुळे इतका प्रभावित झाला होता की त्याने देशमुखांना जागतिक बॅंकेचे कार्यकारी संचालक नेमण्याची सूचना केली होती. अर्थात ही सूचना अमेरिकेला मंजूर होणे दुरापास्तच होते, हा भाग वेगळा!  

सी.डीं.चे उपाख्यान येथे सोडून आपण परत परिषदेकडे वळू. परिषदेत हॅरी व्हाईटच्या मताला एवढे वजन प्राप्त होण्याचे एक कारण म्हणजे त्याला खुद्द राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट आणि कोषागाराचे सचिव मॉर्गेन्थाऊ यांचा पाठिंबा होता. त्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे ब्रिटनने केन्सला ज्या अपेक्षेने परिषदेस पाठवले होते तिला केन्स उतरू शकला नाही. ब्रिटनवरील अमेरिकेच्या युद्धकर्जाची परतफेड ब्रिटनच्या मागणीनुसार होण्याची शक्यता मालवली. पौंडाच्यापेक्षा डॉलर वरचढ ठरला.  ब्रेट्टन वूड्स परिषद भरली असताना लॉर्ड व्हिस्काउंट हॅलिफॅक्स हा अमेरिकेतील ब्रिटिश राजदूत होता. (हा पूर्वी लॉर्ड इर्विन या नावाने भारताच्या गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होता. भारताबद्दल विशेष सहानुभूती असलेल्या इर्विनने गांधींजींबरोबर करार करून स्वातंत्र्याच्या लढ्यात शुभशकून दिला होता. इतकेच नव्हे तर अमेरिकेत राजदूत असताना त्याने युद्ध समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य दिले जाईल, अशी घोषणा परस्परच करून एकच खळबळ माजवली होती. त्याच्या या निवेदनाने चर्चिल फारच अस्वस्थ झाला होता.) त्याचे आणि केन्सचे वॉशिंग्टन मुक्कामी ब्रेट्टन वूडसंबंधी बोलणे झाले होते. त्याचा आधार घेऊन कोणीतरी केलेली छोटी कविता रिचर्ड गार्डनरने उद्धृत केली आहे ती अशी - 

‘‘In Washington Lord Halifax 

once whispered to Lord Keynes,

“It’s true that they have the money bags 

but we have all the brains.’’

गार्डनरला ही कविता प्रिन्सेटनमधील व्हाईटच्या दप्तरात एका पिवळ्या पडलेल्या कागदावर लिहिलेली सापडली. ती कोणी लिहिली याचा निर्देश कागदावर नाही. मात्र बॉग्टनच्या मते ती डेनिस रॉबर्टसनची असावी. बॉग्टन म्हणतो त्याप्रमाणे युद्धानंतर आंतरराष्ट्रीय चलनव्यवस्थेला आकार देणाऱ्या संख्या कशा उभारायच्या याविषयीच्या सुयोग्य कल्पना केन्सकडे होत्या. तथापि, अमेरिकेकडे आर्थिक सत्ता होती आणि तिने या सत्तेचा वापर करून परिषदेच्या निष्कर्षावर नियंत्रण ठेवले. केन्स ब्रिटिशांचे हितसंबंध जपण्याचा प्रयास करीत होता तर व्हाइटला अमेरिकेचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध सांभाळायचे होते. थोडक्यात ‘रगेल तो तगेल’ हा डार्विनचा सिद्धांत येथेही खरा ठरल्याचे दिसून येते. अमेरिकेची घोडदौड ही मुक्त व्यापार आणि मुक्त व्यवस्थेच्या बहुमितीय आणि बहुराष्ट्रीय अंमलावर अवलंबून असल्याचे व्हाइट जाणून होता तर इंग्लंडची भरभराट साम्राज्यव्यवस्थेवर अवलंबून होती. 

जेम्स बॉग्टनने व्हाइटच्या यशाची चांगली मीमांसा केली आहे तो लिहितो, “Keynes was determined to preserve that system, but White was as determined to build a more open multilateral system.” 

थोडक्यात काय तर चिंतामणरावानी हेरल्याप्रमाणे मुख्य मुद्दा राजकीय होता. पण तो धसाला लावण्यासाठी आर्थिक व्यवस्थेत बदल करून ती अमेरिकेच्या ताब्यात आणण्यासाठी खरी धडपड चालू होती. ‘बिचारा केन्स!’ या पलीकडे आपण काय म्हणू शकतो?

संबंधित बातम्या