वाचक लिहितात...

वाचक    
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. 
पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. ई-मेल ः saptahiksakal@esakal.com 

‘भय इथले संपत नाही’...
सकाळ साप्ताहिकाच्या २१ एप्रिलच्या अंकातील ‘भय इथले संपत नाही’ हे संपादकीय वाचले. एकट्या राहणाऱ्या वृद्धांचा मृत्यू झाल्याचे लवकर न समजल्याची दोन उदाहरणे यात दिली आहेत. त्यामुळे बंद दाराआड राहणाऱ्या वृद्धांचे बरेच प्रश्न परस्परांच्या सहवासातूनच सुटतील हे लक्षात आले.
एकट्यादुकट्या राहणाऱ्या वृद्धांचे प्रश्न सोडविणारी ‘माया केअर’ नावाची एक संस्था पुण्यात कार्यरत आहे. शारीरिक किंवा मानसिक दुर्बल, विकलांग वृद्धांना मदत, तसेच एकटेदुकटे राहणारे जे वृद्ध आहेत त्यांना मदत करणारी ही संस्था आहे. २००९ मध्ये मंजिरी गोखले (जोशी) यांनी  ही संस्था स्थापन केली. या संस्थेचा संपूर्ण आर्थिक भार मंजिरी व त्यांचे पती अभय जोशी उचलतात. या संस्थेच्या सर्व सेवा संपूर्णपणे मोफत आहेत.
या संस्थेचे स्वयंसेवक वृद्धांना डॉक्‍टरांकडे घेऊन जाणे, हॉस्पिटलमध्ये सोबत करणे, रेल्वे स्टेशन व विमानतळ येथे पोचविणे, अथवा घरी पोचविणे, फिरायला घेऊन जाणे, औषधे, किराणा माल वगैरे आणून देणे, त्यांच्या बॅंकांची कामे करणे ही कामे करतात. या संस्थेचे एकंदर ४० स्वयंसेवक पुणे शहरात आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड येथील वृद्धांची बरीच कामे ते करतात. मुंबईतसुद्धा ही संस्था काम करते. तथापि पुण्याच्या तुलनेत मुंबईत स्वयंसेवक व कामे बरीच कमी आहेत. पुण्यात कोथरूडमधील पौड रोड भागात ७५ वर्षांचे एक अंध गृहस्थ आहेत. त्यांना पुस्तक वाचून दाखविणे, वृत्तपत्र वाचून दाखविणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे ही कामे या संस्थेचे स्वयंसेवक करतात. कर्वेनगर येथे एक डॉक्‍टर आहेत, त्यांना पार्किन्सन झालेला आहे संस्थेचा एक स्वयंसेवक आठवड्यातील तीन दिवस त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळतो. निवारा या वृद्धाश्रमात संस्थेचे दोन स्वयंसेवक आठवड्यातील तीन दिवस जाऊन तेथील रुग्ण वृद्धांची सेवा करतात. याबाबत संस्थेची एक वेबसाइट आहे http://mayacare.com/ या साइटवर गेल्यास सर्व माहिती मिळेल. पुण्यातील वृद्धांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर ९५५२५१०४०० किंवा ९५५२५१०४११  या फोन नंबरवर चौकशी करावी. जे वृद्ध, गृहिणी किंवा तरुण विद्यार्थी या संस्थेचे स्वयंसेवक होऊ इच्छितात, त्यांनीसुद्धा या क्रमांकांवर संपर्क साधावा. 
विद्याधर जोशी, पुणे

आंबा विशेषांक
सकाळ साप्ताहिकाचा ’आंबा विशेषांक’ (२१ एप्रिल २०१८) अत्यंत वाचनीय होता. फळांच्या या राजाला अगदी परदेशातूनही मागणी असते. लहानपणी आंब्याची अढी माजघरात घातली जायची. त्या सुवासानेच तोंडाला पाणी सुटायचे मग काय तिन्ही त्रिकाळ नुसता आंबा. आंमरस म्हटले, की घरातील स्त्रियांना दुप्पट कणीक भिजवावी लागत असे. कारण फक्त रस आणि पोळी, जोडीला तळण किंवा बटाटा भाजी! हापूस आंब्यापेक्षा रायवळ, पायरी हे आंबे जास्त खाल्ले जात. आता या प्रकारचे आंबे थोडे मागे पडू लागले आहेत. ‘खाद्ययात्रा आंब्याची’मधील सर्व पाककृती एकदम मस्त आहेत. ‘चटकदार लोणची’ एकदम तोंडाला पाणी सुटणारी आहेत. आम्ही अगदी पोहे, उपमा, धिरडे, थालिपीठ याबरोबरसुद्धा चवीने लोणची खायचो. इतर प्रांतातील लोणच्यांच्या पाककृतीपण झकास आहेत. जेवणाची लज्जत वाढविणारी ही लोणची तितक्‍याच चवीने खाणारी मंडळी अजूनही आहेत. वेगळ्या जातींच्या आंब्यांची आपापली खासियत असते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या सुमारास येणाऱ्या गोटी आंब्यापर्यंत सर्व प्रकारचे आंबे खायला हवेत. आंबा विशेषांकातील आंबा हा आरोग्याला पोषक व उपयुक्त आहे हे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे 
क्षमा उमाकांत एरंडे, पुणे

छायाचित्रणाविषयी उपयुक्त माहिती
सकाळ साप्ताहिकाच्या (१४ एप्रिल २०१८) अंकातील सतीश पाकणीकर यांचे ‘डिजिटलाय’ हे सदर अत्यंत वाचनीय आहे. या सदरात छायाचित्रणाच्या मूलभूत संकल्पना मोजक्या शब्दांत समजावून सांगितल्या आहेत. कॅमेरा, लेन्सेस वगैरे उपकरणे कशी हाताळावीत याबद्दलची तंत्रे याविषयी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची माहिती या सदरातून मिळते.
नचिकेत महाजन, पुणे
 

संबंधित बातम्या