वाचक लिहितात... 

वाचक
गुरुवार, 26 एप्रिल 2018

वाचक लिहितात... 

निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

उन्हाळी शिबिरांवरील लेख उत्तम 
‘सकाळ साप्ताहिक’चा (ता. २८ एप्रिल) उन्हाळी शिबिरांवरील अंक विशेष आवडला. अंकाचे मुखपृष्ठ अत्यंत सुंदर आहे. उन्हाळी शिबिरांवरील दोन्ही लेख चांगले आहेत. मात्र ‘आवश्‍यकता उन्हाळी शिबिरांची’ हा डॉ. श्रुती पानसे यांचा लेख अधिक आवडला. 
विद्यार्थ्यांनी, पालकांनी सुटीचा सदुपयोग कसा करावा, याबद्दल चांगली माहिती लेखात दिली आहे. वैज्ञानिक उपक्रम, कौशल्ये कशी विकसित करावीत याचीही चांगली माहिती मिळाली. एकूणच ‘सकाळ साप्ताहिका’तून नेहमीच शैक्षणिक, सामाजिक घडामोडी, पाककृती वगैरे माहिती चांगली मिळते. 
- समीर सतीश कुलकर्णी, कोल्हापूर 

थीमप्रमाणे पाककृती 
आपल्या अंकातील ‘फूड पॉइंट’, ‘कुकिंग बिकींग’ ही पापकृतींविषयीची सदरे मी आवडीने वाचते. त्यातील काही पदार्थही उत्साहाने करते. अनेक अंक पाककृती देत असतात, पण आपले वेगळेपण मला जाणवले ते लिहावेसे वाटले. 
आपल्या पाककृती कधीही द्यायच्या म्हणून दिलेल्या नसतात, तर त्याला थीम असते. अलीकडचे उदाहरण द्यायचे तरी ‘आंबा विशेषांका’त आपण आंब्यापासून करता येतील अशा रेसिपीज दिल्या. तसेच कैरीच्या लोणच्यांच्याही पाककृती दिल्या. उन्हाळा म्हणून सरबत, स्मूदी वगैरेंच्या रेसिपीज दिल्या. अतिशय चोखंदळपणे अंकातील विषय निवडल्याचे जाणवते. आपल्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. 
- शालिनी देशपांडे, ठाणे

आरोग्य चांगले असावे
सकाळ साप्ताहिकाच्या अंकातील (३१ मार्च २०१८) ‘आरोग्यमय चाळिशीत पदार्पण’ हा डॉ. अविनाश भोंडवे यांचा लेख खूप आवडला. लेखातून आहार कसा घ्यावा याची उत्कृष्ट माहिती मिळाली. आरोग्य टिकवण्यासाठीच्या टिप्स मिळाल्या. मानसिक स्वास्थ्याबद्दल योग्य माहिती मिळाली. सकाळ साप्ताहिकमधील ‘आरोग्याचा मूलमंत्र’ हे सदर माहितीपूर्ण आहे.
समीर सतीश कुलकर्णी, कोल्हापूर

अवर्णनीय बांफ 
कॅनडातील बांफ या आडवळणावरील पर्यटनस्थळाचे वर्णन वाचून अवाक झाले. त्या स्वप्नवत प्रवासाचे वर्णन लेखकाने फार सुंदर केले आहे. ते वाचून माझ्या यादीत हे ठिकाण मी लिहून ठेवले आहे. संधी मिळाली की नक्की जाऊन येणार. आपल्या ‘साप्ताहिका’तील एकूणच प्रवासवर्णने छान असतात. 
- सीमा आपटे, मुंबई 

शेअरबाजाराविषयी अभ्यासू अंदाज
सकाळ साप्ताहिकमध्ये प्रसिद्ध होणारे ‘अर्थनीती’ हे सदर अत्यंत वाचनीय आणि माहितीपूर्ण असते. शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी डॉ. वसंत पटवर्धन यांनी दिलेल्या टिप्स आणि त्यांचे अचूक अंदाज यांचा गुंतवणूक करण्यासाठी वेळोवेळी फायदा झाला आहे.
- रमेश चिंतवार, (ई-मेलद्वारे)

संबंधित बातम्या