वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 21 जून 2018

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

करिअरला दिशा देणार अंक
तेवीस जूनचा ’वेध शैक्षणिक बदलांचा...’ हा अंक वाचनीय झाला आहे. डॉ. श्रीराम गीत सरांनी दहावीनंतर  शाखा निवडताना लोक जो सल्ला देतात त्याचा कसा विचार करायचा, या विषयी केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे. हेरंब कुलकर्णीचा ’रेस्ट year बेस्ट year’ हा लेख विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावा असाच आहे, कारण अकरावी म्हणजे केवळ आराम असा अनेक विद्यार्थ्यांचा समज असतो. कुलकर्णी सरांच्या लेखातून त्यांनी दहावी आणि बारावीनंतरच्या वर्षाचे नियोजन कसे करायचे त्यातून भविष्यात तुमच्या करिअरला कशी दिशा मिळू शकते, स्पष्ट केले आहे. मुलांसोबत त्यांच्या पालकांनी ही अंक अवश्‍य वाचवा त्यातून आपल्या मुलाच्या करिअरला आपण कोणती दिशा देऊ शकतो, हे त्यांना स्पष्ट होईल.
सुरेश खंडागळे, सोलापूर

बारकावे टिपणारा लेख 
‘आडवळणावर’ हे सदर मी आवडीने वाचते. त्यातील ‘महाराष्ट्राचे क्वीन्सटाऊन’ हा लेख विशेष आवडला. लेखक उदय ठाकूरदेसाई यांची लेखनशैली खूप छान आहे. निसर्गातील बारकावे त्यांनी छान टिपले आहेत. ग्लाईडिंगचा अनुभव असो, ट्रेकिंगचा अनुभव असो, स्थानिक ठिकाणांची माहिती असो; त्यांनी खूप चांगली माहिती दिली आहे. विशेषतः ‘खुराड्यातून कोंबड्या आळसावत बाहेर पडल्या’ हा त्यांनी केलेला उल्लेख मस्त आहे. मलाही कोंबड्या अशाच दिसतात. त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट आपणही अुनभवत आहोत असे वाटले. दमदार लेखन.. 
पूजा संत, बोरिवली, मुंबई 

दृश्‍यात्मक लेखनशैली 
‘आडवळणावर’ सदर फार छान आहे. लेखनशैली अप्रतिम आहे. वर्णन केलेली सगळी दृश्‍ये डोळ्यासमोर उभी राहतात. 
राजन गाडगीळ, भांडूप, मुंबई 

उद्‌बोधक लेख 
डॉ. अ. ल. देशमुख यांनी सांगितलेले ‘बौद्धिक सामर्थ्य’ मनोमन पटले. बौद्धिक सामर्थ्याबद्दल लिहिताना महाराष्ट्रातील सद्यःस्थिती, शिक्षण प्रक्रिया यावरील त्यांचे विवेचन विचार करण्यासारखे आहे. तसेच नव्वद टक्‍क्‍यांचे पुढे काय होते? याबद्दल त्यांनी दिलेली माहिती उद्‌बोधक आहे. एकूणच शिक्षणविषयक सर्वच लेख पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत. 
सुषमा पेठे, पुणे

मार्गदर्शक लेख 
‘लोक काय सांगतात’ हा डॉ. श्रीराम गीत 
यांचा लेख खूप मार्गदर्शक आहे. खरोखरच, शिक्षण असो किंवा इतर कोणतीही गोष्ट; ‘लोक काय म्हणतील किंवा म्हणतात..’ या गोष्टीला आपण फार महत्त्व देत असतो. त्यापेक्षा परिस्थितीचा आपण अभ्यास करावा, आपण आढावा घ्यावा - माहिती घ्यावी, तज्ज्ञांशी बोलावे आणि निर्णय स्वतः घ्यावा, हे उत्तम! याच लेखात पंतप्रधान कौशल्यविकास योजनेची चांगली माहिती दिली आहे. विद्यार्थी व पालकांनी या योजनेचा विचार करायला हवा. 
वनिता गोखले, अमरावती 
 

संबंधित बातम्या