वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 28 जून 2018

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

संग्राह्य अंक 
सकाळ साप्ताहिकचा २३ जूनचा ’वेध शैक्षणिक बदलांचा...’ अंक हातात पडताच विलक्षण आनंद झाला. अंकाचे मुखपृष्ठ अत्यंत सुंदर आहे. या अंकातील हेरंब कुलकर्णी यांचा रेस्ट year बेस्ट year हा लेख आवडला. पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक आवडीविषयी त्यांच्याबरोबर संवाद साधणे आवश्‍यक आहे. दहावी-बारावीनंतरचा अभ्यासक्रम पूर्ण करताना आरोग्य, मैदानी खेळ याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करून पुस्तकी वाचनाकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे हेरंब कुलकर्णी यांनी दिलेले सल्ले योग्य वाटले. त्यामुळे पालकांनी हा अंक संग्राह्य ठेवावा असाच आहे. तसेच सायली काळे यांच्या स्पर्धा परीक्षांचा गेटवे या सदरामधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींची चांगली माहिती मिळते. हे सदर विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे.
समीर सतीश कुलकर्णी, कोल्हापूर

 

आरोग्याविषयी चांगली माहिती
आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि विविध आजारांना कसे सामोरे जावे, हे सांगणारा आरोग्य विशेष हा अंक प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच आहे. भारतीयांचे आरोग्य सुधारले?, हाड व सांध्याचे विकार, सदोष आहार, साथीचे आजार टाळताना, कॅन्सरचा धोका टाळा, बदलत्या जीवनशैलीचा भाग हे सर्वच लेख माहितीपूर्ण आहेत. कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, असे सांगणारा कॅन्सरचा धोका टाळा हा डॉ.चेतन देशमुख यांचा लेख सकारात्मक ऊर्जा देतो, तर सर्व आजारांचे मूळ हे आहारात असते. आहार योग्य नसेल तर अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे संतुलित आहार घेऊन आजार कसे टाळावेत हे सांगणार डॉ. मेधा पटवर्धन यांचा लेख तरुणांनी जरूर वाचावा. कारण फास्टफूडमुळे गंभीर आजारांना आपण आमंत्रण देतो आहोत, हे त्यांच्या लक्ष्यात येईल.
सुवर्णा पवार, आसू, फलटण

 

नवीन तंत्रज्ञानाविषयी रंजक माहिती
सकाळ साप्ताहिकमध्ये वैभव पुराणिक यांचे ‘टेक्‍नोसॅव्ही’ हे सदर प्रसिद्ध होते. यात तंत्रज्ञान क्षेत्रातील ताज्या घडामोडींची माहिती मिळते. १९ मे २०१८ या अंकात प्रसिद्ध झालेला ’फेसबुकची दुसरी बाजू’ हा लेख माहितीपूर्ण होता.
सतीश पिंपळे, ई-मेलवरून

 

पालकांचे गैरसमज दूर करणारा लेख
सकाळ साप्ताहिकाचा करिअर विशेषांक (९ जून २०१८) अत्यंत वाचनीय होता. या अंकात डॉ. श्रीराम गीत यांचे ’करिअरच्या वाटेतील धोके’ आणि ’पालकत्वाची जबाबदारी’ हे दोन्ही लेख सर्वच पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे करिअरविषयी अनेक प्रकारचे गैरसमज असतात. या अज्ञानाचा फायदा घेऊन काही व्यावसायिक मंडळी कोट्यवधी रुपये कमावतात. करिअरसंबंधीचे हे गैरसमज दूर करण्यासाठी श्रीराम गीत यांचे लेख महत्त्वाचे ठरतात.
प्रशांत कुर्ये, ई-मेलवरून

संबंधित बातम्या