वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

’पाऊसधारा’ मनात भरल्या 
११ ऑगस्टचा ’सकाळ साप्ताहिक’चा ’पाऊसधारा’ हा विशेषांक अतिशय आवडला. अंकाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर होते. ’विहंगम’ ‘नयनमनोहर’ अशी एक से बढकर एक पाऊसदृश्‍ये पाहून अक्षरशः ’मनमोराचा कसा पिसारा फुलला..!‘ अशीच भावमुग्ध अवस्था झाली. रोहित हरीप यांचा ’पाऊस वाटा’ हा लेख व त्यामधील पावसाची छायाचित्रे इतकी सुंदर वाटली, की ती माझ्या छायाचित्रांच्या वहीत मी चिटकवूनच टाकली! पाऊस विशेषांक असल्याने सारेच लेख पावसाच्या विषयांवर असणे स्वाभाविकच होते. त्यातही अंजोर पंचवाडकर यांचा ’मौसम है आशकाना’ हा लेख खासम खास वाटला. त्यांच्या लेखातील पाऊस संदर्भ अगदी झक्कास!  
- अशोक वा. कोर्टीकर, पंढरपूर 

‘पाऊसधारा’त मन चिंब चिंब झालं 
सकाळ साप्ताहिकचा ’पाऊसधारा’ हा सर्वांगसुंदर अंक वाचून घरातच चिंबचिंब भिजले. अंक खूप आवडला. वाचायला हातात घेतला तो पूर्ण करूनच खाली ठेवला. त्यातले काही लेख विशेष भावले. पैकी रोशन मोरे यांचा ’न थांबणारा पाऊस’, रोहित हरीप यांचा ’पाऊस वाटा’ प्राजक्ता ढेकळे यांचा ’बदाबदा कोसळणारा पाऊस’, डॉ. मंदार दातार यांचा ’रानभाज्यांचा ऋतू’ गणेश कोरे यांचा ’पावसाळी ट्रेकचा श्रीगणेशा’ आशा साठे यांच्या ’मनातल्या पाऊसकथा’ हे लेख इतके आवडले, की कितीतरी वेळा ते पुन्हा पुन्हा वाचले. उदय ठाकूरदेसाईंचा ’चोर्लाने चोरले मन’ वाचून चोर्लाला मानसिक फेरफटका मारला तर प्राजक्ता ढेकळे यांच्या बदाबदा पडणाऱ्या पावसात बालपण आठवत नाचले. पाऊसकथा वाचताना मन भरुन आलं. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या पाऊसधारात मन चिंब चिंब झालं. पावसाचं एवढं कौतुक एकत्र अनुभवायला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 
- निर्मला सु. देशपांडे, पुणे 

’अर्थनीती’ आर्थिक फायदा देणारी 
मी सकाळ साप्ताहिक मधील डॉ. वसंत पटवर्धन यांचे अर्थनीती हे सदर नियमित वाचतो. या लेखांत त्यांनी केलेले आर्थिक घडामोडींचे विश्‍लेषण व लेखाच्या शेवटी शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या टिप्सचा वापर करून मी चांगले पैसे कमविले आहेत. माझ्या शिफारशीवरून माझ्या मुंबईतील सात-आठ मित्रांनीही अंक नियमित घेऊन स्वतःचा भरपूर फायदा करून घेतला आहे. माझ्या मित्रांकडून व माझ्याकडून डॉ. वसंत पटवर्धन यांचे आभार. याशिवाय सकाळ साप्ताहिकमधील विद्याधर बापट यांचे हितगूज, डॉ. अविनाश भोंडवे यांचे ’आरोग्याचा मूलमंत्र’, मंदार दातार यांचे ’टेस्टी गोष्टी’ व किशोर पेटकर यांचे ’क्रीडांगण’ ही सदरे वाचनीय असतात. 
- दिलीप ह. आमडेकर, डोंबिवली 

मनाचा ठाव घेणारा लेख
प्राजक्ता ढेकळे यांचा ’बदाबदा कोसळणारा पाऊस’ हा लेख अतिशय आवडला. माणदेशातील कधीतरी बदाबदा पडणारा पाऊस लेखिकेने चांगलाच पाडला आहे! अगदी पावसाची वाट पाहण्यापासून पावसात भिजण्यापर्यंत साऱ्याच गोष्टी मनाचा ठाव घेतात.  
- शिरीषकुमार धायगुडे, पुणे .

 

संबंधित बातम्या