वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

घरांच्या किमतींचाही विचार करावा
सकाळ साप्ताहिकच्या प्रॉपर्टी विशेषांकातील संजय देशपांडे यांचा ‘रेरा’नंतरचा बांधकाम व्यवसाय’ हा लेख त्यांची व्यावसायिकता अधोरेखित करतो. त्यांनी लेखामध्ये दोन प्रमुख मुद्दे चर्चेत घेतले नाहीत. ते म्हणजे सुरक्षा व झोपडपट्टीवासीयांना परवडणारी किंमत. सुरक्षेसाठी वाडा अथवा आयताकृती चाळ प्रकारचे बांधकाम जास्त उपयोगी. फ्लॅट किंवा सदनिकांची किंमत तीन गोष्टींवर अवलंबून असते. त्या म्हणजे जमिनीची किंमत + बांधकाम खर्च + विकसकाचा मोबदला. या तीनही गोष्टींमध्ये शासन मदत करू शकेल. शासन जर अनधिकृत बांधकामांना अधिकृत करत असेल तर  अधिकृत कामाकरिता मदत करणार नाही का? शिवाय सुरक्षेसाठी लागणारे व्हरांडे/गॅलरी/जिने/झोपडपट्टीवासीयांच्या सदनिका याकरिता लागणाऱ्या जागेचा विचार एफएसआयमध्ये केल्यास या त्रुटीवर मात करता येईल, हा मुद्दाही विस्ताराने मांडायला हवा होता.
 माधवराव बामणे (ईमेलवरुन)

भाजपचा विजय निश्‍चित
‘सकाळ साप्ताहिक’चा ‘२०१९ आव्हाने व संधी’ ही कव्हर स्टोरी असणारा ६ ऑक्‍टोबरचा अंक वाचला. या अंकात केलेल्या विश्‍लेषणाप्रमाणे भाजपला ही निवडणूक नक्कीच सोपी नाही; पण तरीही जनतेसमोर पर्यायी पक्ष आहे का? आपण एकूण जागांचे विश्‍लेषण करताना काही राज्यांमध्ये भाजपला जागा मिळणार नाहीत हे सांगितले आहे. पण त्या राज्यांमध्ये काँग्रेसला तरी जागा मिळतील का? काँग्रेसने महाआघाडी केली तरीही घटक पक्ष आपल्या राज्यात काँग्रेसला किती जागा देतील? घटक पक्षांना ज्या जागा जिंकणे शक्‍य नाही त्या जागा काँग्रेसला दिल्या जातील. अशा जागांवर काँग्रेस किती यशस्वी होणार? ममता बॅनर्जींपासून सगळेच विरोधी नेते स्वतः पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहत आहेत. ते काँग्रेसला वरचढ कसे होऊ देतील? राहुल गांधी पंतप्रधान म्हणून किती पक्षांना मान्य आहेत? या सगळ्या प्रश्‍नांचा विचार करता काँग्रेसने २०१४ लोकसभा निवडणुकीत जेवढ्या  जागा जिंकल्या होत्या तेवढ्यादेखील या वेळी जिंकणे त्यांना शक्‍य होणार नाही. भाजपविषयी नाराजी असल्याचे चित्र माध्यमांमध्ये वारंवार रंगवूनही ग्रामपंचायतीपासून सर्वच निवडणुकांमध्ये भाजपची सरशी झालेली आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा  जिंकेल हे नक्की.
डॉ. अनिल सोहोनी, दोंडाईचा, धुळे

...तर घरसुद्धा रिकामे वाटेल
सकाळ साप्ताहिकच्या प्रॉपर्टी विशेषांकातील अमृता देसर्डा यांचे शब्दांची सावली हे सदर वाचले. या सदरातील लेखामध्ये लेखिकेने घराच्या अस्तिवाविषयी उपस्थित केलेले सर्वच मुद्दे योग्य वाटले. तरीदेखील वाटते, की एखाद्या घरात खूप माणसे असतात...पण तरी त्या घरातील एखादी व्यक्ती घरी नसली, की घरातल्या बाकीच्यांना मोकळेपणा वाटण्याऐवजी त्या व्यक्तीची कमतरता भासू लागते. असे का होते? कारण घरात माणसे किती यापेक्षा त्या माणसांमध्ये संवाद किती यावर घर अवलंबून असते. संवाद नसला, की घरातील माणसे गर्दी वाटू लागतात. माणसांनी भरलेल्या खोल्या खूप पाहिल्या आहेत, पण माणसांनी भरलेले घर क्वचितच दिसते. 
राज मोहोरे, तिवसा, अमरावती

‘फराळ विशेष’ आवडला
‘सकाळ साप्ताहिक’चा ‘फराळ विशेष’ हा अंक आवडला. अंकाचे मुखपृष्ठ जितके आकर्षक होते तेवढेच या अंकातील लेख वाचनीय होते. विशेष म्हणजे या अंकात शेफ्सनी दिलेल्या पाककृती फारच आवडल्या. यातील काही पाककृती मी घरीदेखील करून पाहणार आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच हा अंक आहे.
अर्चना कडू, धनकवडी, पुणे

 

संबंधित बातम्या