वाचक लिहितात

वाचक
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

पर्यायी ऊर्जास्रोत फायद्याचे
‘सकाळ साप्ताहिक’च्या २२ सप्टेंबर अंकातील ‘पर्यावरणशुद्धीचा पर्याय’ हा श्रीनिवास शारंगपाणी यांचा लेख वाचला. त्यांनी ऊर्जास्रोत म्हणून अमोनियम नायट्रेटचा उपयोग करण्याचे सुचवले आहे, ते योग्यच आहे. १९८० ते ९० या काळात एआरडीई, पाषाण येथे तोफेत वापरण्यासाठी विस्फोटक म्हणून liquid propellant -LP चा उपयोग करण्यावर बरेच संशोधन केले होते, आणि त्या वेळी पाणी व अमोनियम नायट्रेटचे मिश्रण वाहनांसाठी इंधन म्हणून वापरता येईल, असा आमचा विचार होता. हे मिश्रण वापरण्यास फार निर्धोक आहे असे आम्हाला आढळले. कारण त्यावर मोठा दाब दिल्याशिवाय त्याचा विस्फोट होऊ शकत नाही हे  दिसून आले. त्यामुळे शारंगपाणी यांची ऊर्जास्रोत म्हणून अमोनियम नायट्रेटचा उपयोग करण्याची कल्पना अंमलात आणण्यास योग्य आहे.   
- सुधीर नाईक (ईमेलवरून)


दर्जेदार लेखांची परंपरा
सकाळ साप्ताहिकचा (२१ नोव्हेंबर २०१८) ‘भारतीय मसाले’ या विषयावरचा अंक अत्यंत वाचनीय आणि माहितीपूर्ण होता. भारतात पिकणारे मसाले ही भारताची जगभरातील ऐतिहासिक ओळख आहे. या मसाल्याच्या पदार्थांचा उपयोग करून घरोघरी अनेक प्रकारचे घरगुती मसाले तयार केले जातात. काळाच्या ओघात घरच्या घरी मसाले तयार करण्याची पद्धत आता कमी होत आहे. तेव्हा साप्ताहिकाच्या अंकात दिलेल्या घरगुती मसाल्यांच्या पाककृतीमुळे स्वयंपाक करताना मोठी मदत मिळणार आहे. अंकातील डॉ. अनिल लचके यांचा हवाई बेटावरचा लेख तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचनांची शास्त्रीय माहिती देणारा होता. साप्ताहिक सकाळमधील ‘आडवळणावर’ हे सदर माझ्या विशेष आवडीचे आहे. या सदरातून आडवाटेवरच्या ठिकाणांची माहिती आम्हा वाचकांना कायम मिळत असते. अंकातील कवितादेखील वाचनीय होत्या. सकाळ साप्ताहिकाने दर्जेदार लेखांची परंपरा कायम राखली आहे.
- विनिता वाघमोडे, औरंगाबाद


जंगलतोडीसाठी कडक कायदा गरजेचा
सकाळ साप्ताहिकाच्या (१ डिसेंबर २०१८) अंकातील डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या ‘तापमानवाढीचे वास्तव’ या लेखामध्ये भारताने कार्बनमुक्त जग करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी माहिती दिली आहे. त्यासाठी भारतीयांच्या मानसिकतेमध्ये बदल होणे आवश्‍यक आहे आणि हा बदल तेव्हाच शक्‍य होईल जेव्हा माणसाच्या अचेतन मनामध्ये तापमानवाढीचे दुष्परिणाम आणि त्याच्या उपाययोजना समाविष्ट होतील. त्यानंतर कोणतेही अभियान चालवण्याची गरज नाही. प्रत्येक माणसाने स्वतः:च्या नावाने एक जरी झाड़ लावले, तरी पुरेसा बदल घडून येईल. हा बदल यशस्वी होण्याकरिता जंगलतोडीसाठी अतिशय कडक कायदा आणि त्याची कडक अंमलबजावणी करणे जरुरी आहे.
- अंशुमन पेमगिरीकर ( संगमनेर, नगर)
 

संबंधित बातम्या