वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 20 मे 2019

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

मोठ्यांनीही वाचावे असे सदर
मकरंद केतकर यांचा ‘निसर्ग कट्टा’ सह्याद्री आणि तिथल्या जीवसृष्टीची सफर घडवतो. मी हे सदर अगदी सुरुवातीपासून वाचतो आहे. निसर्गाशी कसा संवाद साधावा हे यातून उत्तमरीत्या कळते. घराच्या आसपासही एवढी जीवसृष्टी असू शकते, हेच माहीत नव्हते. जीवसृष्टीची उत्क्रांती, जीवाश्‍म, वनस्पती, किडे, पक्षी अशा विविध घटकांची खूप छान माहिती यामध्ये दिलेली आहे. वाचताना मजा येते आणि निसर्गाविषयी कुतूहल निर्माण होते. हे सदर मुलांसाठी असले, तरी मोठ्यांनीही जरूर वाचावे असे आहे. खूपच नवीन माहिती मिळते. 
- रमाकांत चौधरी, सांगली


किड्यांची माहिती फारच रंजक
हल्ली येता-जाता किडे बघायची सवय लागली आहे. याचे कारण म्हणजे गेले काही दिवस ‘सकाळ साप्ताहिक’मधील ‘निसर्ग कट्टा’ वाचते आहे. किड्यांविषयी अशी उत्सुकता निर्माण होईल असे वाटले नव्हते. किड्यांचे निसर्गाच्या जीवनचक्रातील स्थान, महत्त्व अशा अनेक गोष्टींचा उलगडा या सदरामधून होतो. यामध्ये खंडोबाचा घोडा, फुलपाखरे, पतंग, मध्यान्हीचा जागल्या अशा कीटकांची फारच रंजक माहिती दिलेली आहे. एका लेखामध्ये संधीपादांविषयीची सखोल माहिती दिलेली आहे, जी खूपच उपयुक्त आहे.
- नीलिमा थोरात, पिंपरी


सोपं विज्ञान
डॉ. बाळ फोंडकेंचं ‘कुतूहल’ सदर नियमित वाचते आणि पाचवीतल्या मुलालाही वाचायला लावते. डॉ. फोंडके विज्ञान खूप सोप्या पद्धतीनं समजावून सांगतात. बऱ्याच जणांचा विज्ञान नावडता विषय असतो. पण रात्री आकाश काळं का दिसतं, पृथ्वीच्या आरपार बोगदा खणता येईल का, पुरी का फुगते या अवघड वाटणाऱ्या प्रश्‍नांची नानांनी अगदी सोपी उत्तरं दिली आहेत. अशा सोप्या पद्धतीनं विज्ञान समजावून सांगितलं, तर विज्ञान हा नक्कीच मुलांचा आवडता विषय होईल. आर्किमिडीज, मादाम क्‍यूरी, न्यूटन अशा शास्त्रज्ञांचाही आवर्जून उल्लेख केलेला असतो. त्यामुळे मुलांना त्यांचीही तोंडओळख होते. 
- निर्मला कुलकर्णी, पुणे


गंमतशीर ‘साराची डायरी’
‘साराची डायरी’ वाचताना मजा येते. फक्त दहा वर्षांची मुलं काय काय विचार करत असतात, त्यांच्या डोक्‍यात काय चाललेलं असतं, हे या सदरातून समजतं. त्यांचा जगाकडं बघण्याचा दृष्टिकोनच किती वेगळा असतो. साराने तिच्या घरातल्या सगळ्यांना दिलेली टोपणनावं फारच मजेशीर आहेत. ही नावं देण्यामागं तिचं स्वतःचं वेगळं लॉजिक आहे, उगाचच नावं दिलेली नाहीत. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड या गोष्टी आता किती कॉमन आहेत आणि एवढ्या लहान मुलांनाही त्या कळतात, हे वाचून नवल वाटतं. साराची डायरी कधी भावुक करते, तर कधी खूप हसवते. संमिश्र भावनांची ही ‘साराची डायरी’ गंमत आणते आणि म्हणूनच मी मोठी असूनही वाचायला मजा येते. 
- सागरिका फडणवीस, पुणे


मुलांची चौकस वृत्ती दाबू नका
‘सकाळ साप्ताहिक’मधील डॉ. बाळ फोंडके यांचे ‘कुतूहल’ सदर खूपच सुंदर आहे. चिंगी आणि कंपूच्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्यांना ज्याप्रमाणे नाना भेटले, त्याप्रमाणे प्रत्येक चौकस मुलाला त्याच्या प्रश्‍नांची उत्तरे देणारे नाना भेटणे आवश्‍यक आहे. मुलांना खरोखरच खूप भन्नाट प्रश्‍न पडतात, हा माझाही अनुभव आहे. मुलांची चौकस बुद्धी फार वेगाने धावते. त्यांना त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली नाहीत, तर ते प्रश्‍न विचारणे सोडून देतील, त्यांना प्रश्‍नच पडेनासे होतील आणि ती विचार करणेच सोडून देतील. त्यामुळे मुलांच्या चौकस वृत्तीला दाबून न टाकता खतपाणी घालणे आवश्‍यक आहे. 
- ओंकार चव्हाण, नगर


‘गणितभेट’मुळं गणित सुधारलं
गणित फारच किचकट आणि अवघड विषय असतो, असं मला आतापर्यंत वाटत होतं. पण ‘सकाळ साप्ताहिक’मधील ‘गणितभेट’ हे सदर वाचायला लागल्यापासून हा गैरसमज दूर झाला आहे. आम्हाला गणित एवढं इंटरेस्टिंग करून कोणी शिकवलंच नाही, कदाचित त्यामुळं मनात गणिताविषयी भीती बसली. डॉ. मंगला नारळीकर यांनी दिलेली गणिती कोडी एकदम छान असतात, मोठ्यांनीही सोडवावीत अशी. बुद्धीला चांगलं खाद्य मिळतं. ‘गणितभेट’मुळं माझं गणित सुधारतं आहे.
- सतीश रामटेके, कोल्हापूर


अशा रेसिपीज म्हणजे पर्वणीच!
मी इंजिनिअर आहे. कामानिमित्त पुण्यात असतो. मी मूळचा सोलापूरचा आहे. सकाळ साप्ताहिकाला पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे आमच्या रूममध्ये घडलेला एक आश्‍चर्याचा किस्सा. आम्ही ४ मित्र एकत्र राहतो. आमच्यात तसा फारसा स्वयंपाक कोणालाच येत नाही. त्यामुळे आमच्याकडे कामासाठी एक मावशी येतात. शनिवारची सायंकाळची वेळ असेल. नेहमीप्रमाणे मावशी आल्या. सुटी असल्यामुळं आम्ही त्यांना नेहमीची पोळी-भाजी न करता वेगळं काहीतरी करा म्हणून सांगितलं. त्यानंतर त्यांनी ‘मिश्र भाजीचा कुर्मा’ आणि ‘पालक पुरी’चा बेत केला. त्यांनी केलेला तो कुर्मा अतिशय स्वादिष्ट झाला होता. एखाद्या हॉटेलमध्ये जेवतोय, की काय असंच वाटत होतं. मी मावशींना विचारल कुठून शिकलात हे? तर त्या म्हणाल्या, ‘सकाळ साप्ताहिक’मधून! मला खूप आश्‍चर्य वाटलं. या आधी पण एक-दोन वेळा असंच वाटल होतं, पण तेव्हा मी त्यांना विचारायच टाळलं होतं. यावेळी राहावलं नाही, म्हणून विचारलंच. नंतर मी काही अंक चाळले, तर त्यात अत्यंत सोप्या भाषेत रेसिपीज दिल्या होत्या. कुकिंग-बिकिंग आणि फुडपॉइंटमध्ये तर रेसिपीज असतात, पण पोटपूजामध्ये देश-विदेशातील खाद्यसंस्कृतीचा ओघवता इतिहास पण मांडलेला असतो. आमचा एक मित्र करंट अफेअर्स आणि इतर घडामोडी वाचण्यासाठी साप्ताहिकचा अंक आणतो, पण त्याचा आम्हाला असा पण उपयोग होत असेल, हे माहिती नव्हतं. अाता मावशींना प्रत्येक विकेण्डला वेगळा पदार्थ करण्याची फर्माईश करतो... आमच्यासारख्यांसाठी अशा रेसिपीज म्हणजे पर्वणीच.
- सतीश गोळे, पुणे   


आरोग्यम्‌ धनसंपदा!
 ‘साप्ताहिक’चा पूर्ण अंक माहिती आणि अभ्यासपूर्ण असतो. डॉ. भोंडवे लिखित ‘आरोग्याचा मूलमंत्र’ या सदराची वाचकांना नक्कीच खूप मदत होत असणार आहे. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आपल्याला बरेच आजार माहिती असतात, पण त्यांची सविस्तर माहिती नसते. जसे की, व्यवसायजन्य आजार, पाय दुखीचा त्रास, सिझेरियन बद्दलचे समज, गैरसमज. खास उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी ‘शरीरातला पाण्याचा दुष्काळ’ हा महत्त्वाचा लेख आहे. असे लेख सर्वांनी वाचणे आणि आपले आरोग्य उत्तम राखणे गरजेचे आहे. हितगूज आणि माध्यम व मानसशास्त्र या सदरांतूनदेखील मानसिक आजार आणि स्वास्थ्याविषयी भरपूर माहिती मिळते. 
- लक्ष्मण वाघमारे, सातारा


‘कट्टा’ आवडते राजकीय सदर!
 आपल्या अंकात ‘कट्टा’ हे सदर कोण लिहितं हे माहिती नाही, पण माझ्या भावना त्या व्यक्तींपर्यंत तुमच्यामार्फत पोचाव्यात म्हणून हा पत्र प्रपंच करतोय. कट्टा हे माझ्या आवडीचे राजकीय सदर आहे. हे बऱ्याचदा अतिशय खुमासदार शैलीमध्ये, तर काही वेळा सडेतोड लिहिलेले असते. त्यामुळे आपणही राजकीय घडामोडींचा वेगळ्या अँगलने विचार करू लागतो. काही मोठ्या नेत्यांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण करताना त्यांना दिलेली ‘विष्णुअवतारी ब्रम्हांड नायक’ अशी लांबलचक ओळख शोभून दिसते. वाचलेल्या गोष्टींवर आम्ही आमच्या कट्ट्यावर पण बोलतो बरं! त्यामुळे गप्पांना तर रंगत येतेच, पण आपण वेगळे मुद्दे मांडल्याचे आश्‍चर्य इतरांच्या डोळ्यात दिसते. त्यामुळे मला कट्टा नेहमी वाचायला आवडेल.  
- सदाशिव म्हस्के, नगर


माझं भटकंतीचं खूळ आणखी वाढणार!
माझी आई ‘सकाळ साप्ताहिक’ची नियमित वाचक असल्याने प्रत्येक अंक घरी येतोच. त्यामुळे वेळ मिळेल, तसा मीदेखील अंक वाचत असतो. ‘साप्ताहिक’मधील सर्वच सदरे छान असतात, पण मला स्वत:ला भटकंती करायला खूप आवडतं. त्यामुळं काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘ट्रेककथा’, ‘आडवळणावर’, ‘पर्यटन’, ‘किल्ले भ्रमंती’ ही सदरं मी आवर्जून वाचतो. ‘ट्रेककथा’ वाचून, आपण ट्रेकिंगला जाताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या वस्तू सोबत ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे हे लक्षात येते. ट्रेककथेतले भन्नाट अनुभव नेहमी लक्षात राहतील असे आहेत. लेख वाचत असताना आपण स्वत:च गड चढतोय, असा फील येतो आणि समोर सह्याद्रीतील गडकिल्ले उभे दिसू लागतात. ‘आडवळणावर’ या सदरातून देशातील, जगातील रम्य आणि सुंदर अशा पण आपल्या पर्यटन डायरीत नसणाऱ्या अनेक ठिकाणांची रंजक माहिती मिळते. मीही काही छोटे-मोठे ट्रेक केले आहेत, पण हे वाचून माझं भटकंतीच खूळ आणखी वाढणार हे नक्कीच!
- रोहन मोरे, आळंदी

संबंधित बातम्या