वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 2 डिसेंबर 2019

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

सौरऊर्जेचा वापर वाढवायला हवा
सौरऊर्जेवर आधारित विशेषांकामधील (ता. १६ नोव्हेंबर) सर्व लेख वाचले, आवडले आणि समजले की खरेच भविष्यात सौरऊर्जाच आपली तारणहार असणार आहे. आजची ऊर्जेची गरज खूप मोठी आहे. त्यामुळे खनिज इंधनांचे साठे संपण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून आपण सौरऊर्जेचा वापर वाढवायला पाहिजे. त्यातूनच डॉ. नितान्त माटे यांनी सांगितल्याप्रमाणे खरा शाश्‍वत विकास होईल. पवन करपे यांच्या लेखातून सौरऊर्जा क्षेत्रात करता येतील अशा काही व्यवसायांची माहिती मिळाली. 
- अरविंद पाटील, इंदापूर


धार्मिक मुद्द्यावरून राजकारण नकोच
‘उजळली अयोध्या’ (ता. २३ नोव्हेंबर) अंकातील अनंत बागाईतकर यांचा ‘मध्यममार्गी व्यावहारिक निर्णय’ या लेखामध्ये न्यायालयाचे काम किती अवघड होते हे स्पष्ट होते. हा वर्षानुवर्षे चिघळलेला धार्मिक मुद्दा होता. हा निर्णय सरकारी पातळीवर नाही झाला हेच बरे झाले. अजूनही आपल्या देशात न्यायव्यवस्थेला मान आहे आणि आदरही आहे. त्यामुळे लेखात म्हटल्याप्रमाणे न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागतच करावे लागेल. मंगेश कोळपकर यांच्या ‘तणावानंतर उजळली अयोध्या’ या लेखातून अयोध्येतील खरी परिस्थिती कळते. अयोध्या प्रकरणात धार्मिक मुद्द्यावर खूप वाद-प्रतिवाद झाले, राजकारण झाले. पुन्हा भारतात अशा धार्मिक आणि भावनिक मुद्द्यावरून राजकारण होऊ नये, हीच अपेक्षा!
- घनश्‍याम कुलकर्णी, डोंबिवली


कव्हरस्टोरीचे विषय महत्त्वपूर्ण
‘सकाळ साप्ताहिक’चे विशेषांक छानच असतात, परंतु कव्हर स्टोरीसाठी  घेतलेले विषयदेखील महत्त्वपूर्ण असतात. मागच्याच अंकात (ता. ३० नोव्हेंबर) दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर केलेली कव्हरस्टोरी आवडली. वाढत्या प्रदूषणाची समस्या नक्कीच भेडसावणारी आहे. यावर  डॉ. श्रीकांत कार्लेकरांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. तक्त्यांच्या स्वरूपात शहरातील प्रदूषणाचे प्रमाण दिल्याने त्याची तीव्रता लगेच लक्षात येते. याच अंकात 'पुनर्जन्म झालेला गुन्हेगार' हा वेगळाच विषय वाचायला मिळाला. असेच विविध विषय घेत चला...    
- सावित्री जगताप, ठाणे


सौरऊर्जेच्या शेतीचा विचार व्हावा
  अभिजित कबुले (ता. १६ नोव्हेंबर) यांचा सौरऊर्जेवर आधारित शेती आणि पवन करपे यांचा सौरऊर्जा क्षेत्रातील संधी हे लेख वाचले. सध्या शेतीला या ना त्या संकटाला तोड द्यावे लागत आहे. अशात शेतकरी बांधव आणखी पिचला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊर्जेची भविष्यातील गरज आणि शेतीला आलेले वाईट दिवस लक्षात घेऊन सौरऊर्जेच्या शेतीचा विचार करायला पाहिजे. प्रियदर्शिनी कर्वे आणि डॉ. नितान्त माटे यांच्या लेखातून सौरऊर्जेचे महत्त्व पटते...
- महेंद्र शिंगाडे, नागपूर


घुसमट थांबायला हवी
‘शहरांची असह्य घुसमट’ हा श्रीकांत कार्लेकर यांचा ३० नोव्हेंबरच्या अंकातील लेख झोप उडवणारा आहे. सर्वांना प्रदूषण जाणवते पण कोणीही गांभीर्याने याचा विचार करीत नाही. दिल्लीप्रमाणेच आपल्या शहरांमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. दिल्लीच्या निमित्ताने या विषयावर दर वर्षी फक्त चर्चा होते, पण ठोस उपाययोजना होत नाहीत. प्रशासनाचे यावर ठोस उपाययोजना करून घुसमट थांबवायला हवी. नागरिकांनीही प्रत्येक ठिकाणी स्वतःची गाडी घेऊन न जाता सार्वजनिक वाहतूक, कार पुलिंग यांसारखे पर्याय वापरायला हवेत. जवळच्या ठिकाणी तर चालतच जावे, असे मला वाटते.
- रणजीत पाटील, पुणे


चर्चात्मक लेख...
काही दिवसांपूर्वी अयोध्येतील रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. यावर आधारित ‘मध्यममार्गी व्यावहारिक निर्णय’ या अनंत बागाईतकर यांच्या लेखात (ता. २३ नोव्हेंबर) सर्व बाजूंनी चर्चा झाल्याने अनेक मुद्दे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर सर्वांनी समाधान व्यक्त केले असले, तरी बाबरी मशिदीला कुठे जागा मिळेल हे समजल्यानंतरच खरे समाधान झाले आहे की नाही ते कळेल. परंतु, या मुद्द्यावर पुन्हा कोणत्या पक्षाने राजकीय पोळी भाजण्यासाठी नवा मुद्दा उपस्थित करू नये म्हणजे झाले.  
- अमोल दळवी, सांगली
 

संबंधित बातम्या