वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com
वाचक

मुलींचे भावविश्‍व उलगडून दाखवणारे सदर 
‘साराची डायरी’ या सदरात विभावरी देशपांडे यांनी १०-११ वर्षांच्या मुलींचे भावविश्‍व अचूकपणे उलगडून दाखवले आहे. या वयातील मुलींना आवडणाऱ्या, त्यांच्याच मनातल्या गोष्टी त्यांनी सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. माझी मुलगी ऋद्धी १४ डिसेंबरला ११ वर्षांची झाली. ती दर आठवड्याला ‘साराची डायरी’ची वाट पाहायची. शाळेतून आल्याआल्या लगेच ती साराची डायरी वाचून काढायची. या वेळेस साराने डायरीत काय लिहिले आहे याची तिला उत्सुकता असायची. वाचून झाले की ती मला त्यात काय लिहिले आहे ते सांगायची. आम्हा मोठ्यांनाही या सदराची उत्सुकता असायची. या वयात मुलींमध्ये मानसिक बदल होत असतात. आपण त्यांना अजून लहान समजत असतो. पण वयाच्या १०-११ व्या वर्षात, आपल्या नकळत त्यांचे बालपण संपू लागते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल होतात. हा बदल पालकांच्या लक्षात येत नाही. कारण अजून ते मुलीच्या बालपणातच रमलेले असतात. त्यामुळे या वयातल्या मुलींशी कसे वागावे ते त्यांना समजत नाही. लेखिकेने हे सर्व बदल अचूकपणे हेरून साराच्या डायरीत मांडले आहेत. शिवाय मुलांच्या वाढीच्या वयात आजी-आजोबांचे त्यांच्याजवळ असणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव सदर वाचताना होते. ‘साराची डायरी’ हे सदर संपत आहे हे कळल्यावर मला व ऋद्धीला वाईट वाटले.

- रेणुका दर्शने, पुणे


मुलगी नको ही भावना मनात नकोच
‘साप्ताहिक सकाळ’मधील (ता. ४ जानेवारी) ‘मुली 
इतक्या नकोशा का?’ हे संपादकीय वाचून मनाला खूप 
धक्का बसला! आश्‍चर्यही वाटले! पूर्वीच्या काळी मुलगी नको ही संकल्पना फार रुजली होती. पण आता ही कल्पना फार जुनी आणि बुरसटलेली आहे. मुली स्वतःच्या कतृत्वाने आकाशाला गवसणी घालतात, तेव्हा मुलगी होणे याचा प्रत्येकानेच अभिमान बाळगला पाहिजे व या गोष्टीला मायेने आपलेसे केले पाहिजे. मुलगी नको ही भावनासुद्धा मनात कोणी आणू नये. 
- निलिमा कुलकर्णी, पुणे


प्रत्येकाला स्पेस हवीच
‘सकाळ साप्ताहिक’मधील (ता. २५ जानेवारी) ‘सहजच’ या सदरातील ‘माझे अवकाश मला दे’ हा स्पेसबद्दलचा लेख उत्तमच आहे. लेख वाचला आणि काही गोष्टी एकदम आठवल्या. काही दिवसांपूर्वीच सुमित्रा भावेंचा कासव चित्रपट पाहिला. त्यातही प्रत्येक व्यक्तीला स्वतःची स्पेस हवी असते. ज्यात त्यात कोणी लुडबुडायला नको असते, पण आजूबाजूला माणसे हवी असतात. माणसांची रक्ताची, मैत्रीची नातीही हवी असतात. त्यातून बंधने निर्माण होतात, वाद  होतात. स्पेस मिळत नसल्याची चिडचिड होते आणि तो बॅलन्स जमला नाही, तर घोळ. मानसिक ओढाताण, ताण हीच थीम कासवमध्ये आहे. आत्ताच्या परिस्थितीत किती खरे आहे सगळे. एकमेकांत समजूतदार नाती असली, प्रत्येकाची अवकाशाची गरज समजून घेतली तरच ‘अवकाश’ मिळवणे सोपे होते. जगणे आनंदाचे होते. हे तुम्ही लेखातून खूप छान पोचवले आहे. लेख वाचून अमृता प्रितमचा चौथा कमराही आठवला. घरातल्या मुलांना, नवऱ्‍याला, अगदी येणाऱ्या पाहुण्यालाही ‘कमरा’ असतो. पण त्या घरच्या बाईला तिचा असा कमरा घरात नसतो. तिलाही चौथा स्वतंत्र कमरा लागतो. खूप दिवसांनी असे लिखाण वाचले.
- सीमंतिनी नूलकर, सातारा


परत भेटू, सरस्वती!
विभावरी देशपांडे यांनी अतिशय सुंदर लेखमाला लिहिली. प्रत्येक आठवड्याचा ‘सकाळ साप्ताहिक’ आला, की सर्वांत आधी ‘साराची डायरी’ वाचून काढण्याची वर्षभराची सवय आता मोडायला लागणार आहे. माझ्यासारख्या ६० वर्षांच्या व्यक्तीला एवढी ओढ लावणारी ही लेखमाला वयाच्या सर्व स्तरांवरील वाचकांना आवडत असेलच, हा माझा विश्‍वास आहे. ही लेखमाला वाचता येणार नाही याचे वाईट नक्की वाटेल, पण लेखमालेच्या शेवटी ‘नंतर कधीतरी भेटू,’ या उल्लेखावरून, आशा जिवंत राहील. तेव्हा नंतर कधीतरी ‘नक्कीच’ भेटू, सरस्वती.
- शिरीष परब


अभ्यासपूर्ण मांडणी
‘सकाळ साप्ताहिक’च्या १८ जानेवारीच्या अंकातील कव्हरस्टोरी ‘अग्नितांडव’ हा इरावती बारसोडे यांचा आॉस्ट्रेलियात लागलेल्या  जंगल वणव्यांचा लेख फारच अप्रतिम आहे. संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने विषय लिहिला आहे. कारणे व धोके फार अभ्यासपूर्ण मांडली आहेत.
- श्रीधर करंदीकर, पुणे

 

संबंधित बातम्या