वाचक लिहितात

वाचक लिहितात
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

ई-उपक्रम आवडला
मी एक निवृत्त शिक्षक आहे. आपला अंक मला घरपोच मिळतो. ‘सकाळ साप्ताहिक’ची ई-आवृत्ती या टाळेबंदी काळात घरबसल्या वाचायला मिळत होती. माझी वाचनाची भूक मिटली. माझ्या सर्व शिक्षक मित्रांना, हितचिंतकांना व वाचनसंस्कृतीप्रेमींना आपला हा ई-उपक्रम आवडला आहे. आपण नेहमीच नवनवे उपक्रम राबवता.
 

- श्रीराम शिंदे, बाळे (खंडोबाचे), जि. सोलापूर

छापील अंकामध्ये खंड न पडो
जवळपास दोन-अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘सकाळ साप्ताहिक’चा अंक प्रत्यक्ष हाती मिळाला. त्यासाठी खूप आभार मानते. ई-अंक वाचून प्रत्यक्ष वाचल्याचे समाधान मिळत नाही, असे माझे मत आहे. प्रत्यक्ष अंक हाती असला, की वेळेनुसार वाचन करता येते. त्यासाठी मग नेट नाही मिळाले तरी अडत नाही. आता यात खंड न पडो. पुन्हा नेहमीप्रमाणे अंक मिळावा. इथून पुढच्या प्रत्येक शनिवारी येणाऱ्या अंकाच्या प्रतीक्षेत राहीन.
 

- सुजाता आ. लेले

व्यक्तिगत टीकेचा अतिरेक नको
‘सकाळ साप्ताहिका’तील ‘कट्टा’ हे सदर त्यावरच म्हटल्याप्रमाणे ‘राजकारणातल्या गमती जमती’ सांगणारे आहे. कलंदर ही व्यक्ती कोण आहे याचे मला नेहेमीच कुतूहल वाटत आलेले आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये ‘कट्टा’मध्ये येत असलेल्या लिखाणाविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी हे लिहीत आहे. सत्ताधारी पक्ष व त्याचे नेते यांच्यावरील बोचक टीका मी समजू शकतो. परंतु, अलीकडे व्यक्तिगत टीकेचा अतिरेक होत आहे असे वाटते. तसेच अनेकदा भाषेचा दर्जा खेद वाटावा असा असतो. विशेषतः २० ऑगस्टच्या अंकात मोदी यांच्या ‘वेष आणि पेहराव’ याविषयी लिहिताना अधिक संयमित व सुसंस्कृत भाषेत तेच म्हणणे मांडणे शक्य होते. ‘कट्टा’ हे सदर सुरू राहावे असेच मला वाटते. 

- सुभाष काळे

लोकाची मानसिकता कधी सुधारणार?
‘सकाळ साप्ताहिका’च्या ८ ऑगस्टच्या अंकातील ‘‘कोरोना’चा धडा’ या संपादकीय लेखामधील लोकांच्या मानसिकतेचा ऊहापोह यथार्थ वाटला. देश कितीही सुधारला, प्रगत झाला तरी काही लोकांची मानसिकता कधी सुधारणार हा मला नेहमीच पडलेला प्रश्‍न! हा आपलाच देश आहे, त्याला स्वच्छ, निरोगी ठेवण्यासाठी जबाबदारी सर्वप्रथम माझीच, ही भावना कधी अंगीकारली जाईल कोणास ठाऊक. एकीकडे कोरोनाला घाबरायचे नाही, तो बरा होऊ शकतो, या गोष्टीवर चर्चा करायची. तर, दुसरीकडे आपल्या आजूबाजूला कोणी कोविड पॉझिटिव्ह आढळले तर त्या माणसाला, त्याच्या कुटुंबाला तुच्छतेची वागणूक द्यायची या मानसिकेतबद्दलही ऊहापोह व्हायला हवा.

- शालू पाटील

चांगली अभिनेत्री गेली.. 
‘सकाळ साप्ताहिक’मधला ‘कुमकुम गेली...’ (ता. १५ ऑगस्ट) हा लेख छान आहे. साधारणतः दहा वर्षांपूर्वी मीही कुमकुमबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या काही मित्रांनी तिची थोडीशी माहिती मिळवली होती. सज्जाद खान या वितरकाबरोबर तिने लग्न केले आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. तिचे जुने चित्रपट मीही पाहिले आहेत. ‘घरसंसार’मध्ये ती राजेंद्रकुमारची नायिका होती. चित्रपटात नर्गिस-बलराज सहानी असूनही कुमकुम थोड्याशा निगेटिव्ह रोलमुळे भाव खाऊन गेली होती. साधारणतः सत्तरच्या दशकातील तिचे चित्रपट पाहता तिच्या दिसण्यात फरक पडला होता. ‘मिस्टर एक्स...’वरून कल्पना येईल. नृत्यकौशल्य असूनही ‘कोहिनूर’ वगळता तिच्या नृत्याचा म्हणावा तसा (शास्त्रीय नृत्य) वापर झाला नाही, ही तिचीही खंत होती. ‘शरारत’मध्ये ती किशोरकुमारची सहनायिका होती. ‘तेरा तीर ओबे पीर दिल के आरपार है...’ या गाण्यावर ती सुंदर थिरकली आहे... एक चांगली अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली... ‘साप्ताहिका’मधील लेखामुळे माझ्याही स्मृतीला थोडा उजाळा मिळाला.. 
- जगदीश जोशी, कोल्हापूर

संबंधित बातम्या