समृद्ध सांस्कृतिक ठेवा 

आशिष तागडे 
सोमवार, 15 एप्रिल 2019

उन्हाळी वाळवणं
होळीनंतर ऊन जसजसे तापायला लागते, तसतशी घराघरांतून चर्चा सुरू होते ती वाळवणाची! शहरी भागात याचे प्रमाण कमी झाले असले, तरी निमशहरी आणि ग्रामीण भागात आजही वाळवणं मोठ्या उत्साहाने आणि तितक्‍याच आपुलकीने केली जातात.

‘शोले’मधील गब्बर ज्या प्रमाणे ‘होळी’ची चातकाप्रमाणे वाट पाहतो, त्याचप्रमाणे पूर्वी अनेक वाड्यांतील मुलेही वाट पाहत असत (घाबरू नका... मुलांना कोठे ठाकूरशी लढायलाही जायचे नसायचे); मुलांना वेध लागले असायचे ते वाळवणाचे! गब्बरला रामपूरवाल्यांवर, तर मुलांना वाळवणावर तुटून पडायचे असते. अर्थात विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर आजही निमशहरी, ग्रामीण भागात वाळवणं करणे हा मोठा उत्सव असतो. त्याला आपण ‘सांस्कृतिक ठेवा’ म्हणू शकतो. होळी झाली, की काही दिवसांत घरात एका मोठ्या भांड्यात हरभऱ्याची डाळ भिजायला घातली, की आम्हाला हायसे वाटायचे. कारण दोन दिवसांत घरात वाळवणं सुरू होण्याची ती चाहूल असायची. घराघरांतून आजीबाईंनाही हुरूप आलेला असायचा. आपल्या अनुभवी हातातून एक-एक वाळवण होत असे. तर मुद्दा असा आहे, की डाळ भिजल्यावर पूर्वी ती पाट्यावर वाटायला लागायची. कालांतराने पुरणयंत्रे आणि आता मिक्‍सरवर ती वाटली जाते. वाळवणाची सुरुवात सांडग्यांपासून व्हायची. याची ती पूर्व तयारी असायची. कोणत्याही निरोपाविना वाड्यातील सर्व महिला एकत्र येतात काय आणि सांडगे घालायला सुरुवातही करतात काय, हे खरोखरच न उलगडणारे कोडेच होते. अर्थात त्यामुळेच मुलांच्या जिवात जीव यायचा. आता उद्यापासून कोणाच्या न्‌ कोणाच्या घरी वाळवण सुरू होणार याचे ते द्योतक असायचे. 

साधारणतः ८०च्या दशकात (म्हणजे त्यावेळी प्लास्टिकचा विषय नव्हताच) आजी आणि आईची वाळवणांसाठी सकाळपासूनच लगबग सुरु व्हायची. त्यावेळी नऊवार साडीवर वाळवणं घातले जायचे. सांडगे मात्र पाटावर घातले जात. सांडगे झाल्यावर काही दिवसांत नंबर लागायचा तो ज्वारीच्या पापड्यांचा. ज्वारीच्या पापड्यांसाठी सारे सोपस्कार दोन दिवस आधी सुरू होत. ज्वारी भिजत घालणे, त्याची भरड काढणे (पारंपरिक भाषेत त्याला वाटणे किंवा सडून घेणेही म्हणतात) इत्यादी प्रकार होत. सकाळी सकाळी भरड काढलेली ज्वारी मोठ्या पातेल्यात शिजवायला घेतली जायची. दुसरीकडे मुलांची गच्चीवर टाकण्यासाठी धांदल उडायची. कारण ओल्या पापड्या किंवा कुरडया खाण्यात जी मजा आहे, ती कशात नाही. परंतु, पूर्वी ओल्या कुरडया किंवा पापड्या खाण्यासाठी खूप अडचण येत असे. कारण सुती कापडावर पापड्या, कुरडया घालत. कापडावर घातल्याने ओल्या पापड्या काढताना खूप त्रास व्हायचा. कधी-कधी ते कापडही फाटायचे. त्यामुळे पापड्या वाळेपर्यंत वाट पाहावी लागायची. पापड्या वाळल्या की कापडाच्या एका बाजूला पाणी लावून दुसऱ्या बाजूने पापड्या अलगद निघायच्या आणि दोन पापड्या निघाल्या की तिसरी अलगद तोंडात जायची. आईशप्पथ... खरं सांगतो... ती चव अफलातूनच...! ज्वारीनंतर अर्थातच नंबर लागायचा तो तांदळाच्या, नाचणीच्या पापड्यांचा. त्याच्यासाठीही हा उपक्रम राबविला जायचा.

त्यानंतर दोन-तीन दिवसांची विश्रांती घेऊन कुरडयांचा घाट घातला जायचा. गहू तीन दिवस भिजत ठेवायचे (अर्थात रोज पाणी बदलले जायचे) ते चांगले भिजले की ग्राइंडरवर वाटले जात. दुसऱ्या दिवशी अख्खा वाडा गव्हाचा चीक खाण्यासाठी आतुर झालेला असायचा. कोणी चीक खायला आले नाही तर त्याला खास डिशमध्ये चीक दिला जायचा. गरमागरम चीक खाण्यात खरोखरच स्वर्गसुखाचा अनुभव येतो. अर्थात हा पहिला हप्ता असायचा. एकदा कुरडया घालून झाल्या, की जिरे घालून पुन्हा केवळ खाण्यासाठी चीक शिजवला जायचा. हा मोठा सोहळाच असायचा. प्रत्येक घरातील कोणी न्‌ कोणी या सोहळ्यात आवर्जून हजर असायचाच. नव्हे तो शिरस्ताच होता. प्रत्येक घरांतूनच हा सोहळा ‘मनमुराद’ पद्धतीने साजरा व्हायचा. यावर वरकडी म्हणजे साधा चीक थोडा गार झाल्यावर त्यावर कोणी दूध, कोणी साजूक तूप घालून खायचे. म्हणजे मुळात चीक आधीच पौष्टिक आणि त्यावर पुन्हा पौष्टिक घटक मिसळल्यावर तो ‘डबल’ धमाका व्हायचा. त्यावेळी असे पौष्टिक पदार्थ अगदी सहजतेने खाल्ले जायचे. त्यामुळे तब्येतीच्या कोणत्याही तक्रारी नसायच्या. 

सकाळी ऊन तापायच्या आत कुरडया घालून झाल्यावर दुपारी अर्धवट वाळलेल्या कुरडया खाण्यासारखा दुसरा आनंद नाही. एकतर घरातल्यांची नजर चुकवून गच्चीत जायचे. उन्हामुळे गच्ची तापलेली असायची. तळपाय कमालीचे पोळत असताना त्याकडे दुर्लक्ष करत ओल्या कुरडया खायचा आनंद घेण्यासारखे समाधान नाही. आजच्या भाषेत सांगायचे, तर कुरडया म्हणजे ‘नूडल्स’च की (या खरोखरच खूप पौष्टिक असतात, हा भाग वेगळा). हा झाला सकाळच्या टप्प्यातील पहिला भाग. यातील आणखी एक पौष्टिक भाग म्हणजे गहू वाटल्यानंतर जो भाग राहतो, त्याला ‘भुस्सा’ म्हणतात. (यालाही गावनिहाय वेगळी नावे आहेत बरे का. काही ठिकाणी कोंडाही म्हणतात!) त्या भुश्‍श्‍यामध्ये तिखट, तीळ घालून मस्त शिजविले जायचे. त्याच्या थापून पापड्या घालतात. यालाच ‘भुश्श्‍याच्या पापड्या’ म्हणून ओळखले जाते. या ओल्या आणि वाळलेल्या खाण्यात खरोखरच ‘सात्त्विक’ समाधान मिळते. गव्हातील सर्व सत्त्व यामध्ये असते. त्यामुळे वर उल्लेख केल्याप्रमाणे पुन्हा ‘सात्त्विक’ खाद्य मिळायचे. या वाळलेल्या पापड्यांबरोबर शेंगदाणे म्हणजे ‘सोने पे सुहागा’. हा विषय इथेच संपत नाही. समजा कोणाला पापड्या करायच्या नसतील, तर त्यापासून दुपारच्या किंवा सायंकाळच्या जेवणासाठी या भुश्‍श्‍यात कांदा, ज्वारीचे पीठ, तिखट घालून खास थालीपीठही करता येते. तेही खमंग लागते. फक्त तोपर्यंत भुश्‍श्‍याचा आंबूस वास सहन करण्याची तयारी हवी. 

ज्वारीच्या पापड्या, कुरडया, तांदळाच्या पापड्या, खिचे असे सकाळच्या टप्प्यातील विषय झाले, की दुपारच्या टप्प्यातील विविध प्रकारचे पापड खुणावतात. पूर्वी आतासारखे कोणत्याच पापडाचे तयार पीठ मिळत नव्हते. सर्व डाळी दळून आणून घरातील अनुभवी बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने पीठ मळले जायचे. यामध्ये ‘सहकारा’चा कानमंत्र अगदी सहजतेने दिलेला असायचा. वाड्यात एकावेळी एकाच घरी पापड होत. ज्यांच्या घरी पापडाचा कार्यक्रम असायचा त्यांच्या घरी दुपारी सर्व महिला एकत्र यायच्या आणि पीठ मळायला घ्यायच्या. मुलांच्या नजरा अर्थातच त्याकडेच असायच्या. सुटीत कोणताही खेळ सुरू असो, पीठ मळल्याची ‘हाक’ अचूक वेळी यायचीच. सर्व जण खेळ सोडून पापडाच्या ‘लाट्यां’वर स्वार व्हायला तयार असायचे. मनसोक्त लाट्या खाऊन मन तृप्त झाले, की पुन्हा खेळाकडे जायला सर्वजण तयार व्हायचे. बरे पापडही अनेक प्रकारचे. सुरुवातीच्या टप्प्यात उडदाचे, नंतर पोह्याचे त्यानंतर उपासासाठी बटाट्याचे पापड (त्यातही अनेक प्रकार असायचे) असा साग्रसंगीत सोहळा असायचा. पापडाच्या दोन लाट्या जास्त मिळाव्यात म्हणूनही अनेक युक्‍त्या मुले करत असत. अगदी कोणी काकू डाळ दळायला निघालेल्या दिसल्यावर हे बहाद्दर ‘काकू, तुम्ही राहू द्या. मी आणतो डाळ दळून’ असे म्हणत काकूंच्या हातातून दळणाचा डबा घेत. काकूही ‘का कू’ न करता डबा द्यायच्या. हा का दळण आणून देणार यामागचे कारण काकूंना चांगलेच माहीत असायचे. 

वाळवणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा विशिष्ट क्रम ठरलेला असतो. आधी घरात कष्टाची वाळवणं घातली जातात. कारण सुरुवातीच्या टप्प्यात हुरूप असतो ना! प्रत्येक वाळवणासाठी भरपूर कष्ट असतात हा भाग वेगळा (अगदी खाण्यातही). नेहमीची वाळवणं झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात उपासासाठीची वाळवणं सुरू व्हायची. याची सुरुवात अर्थातच साबुदाण्याच्या पापड्यांपासून होत असे. पहिल्या दिवशी साध्या म्हणजे फक्त मीठ घालून केलेल्या, दोन दिवसांनी बटाटा किसून किंवा शिजवून तसेच मिरच्या वाटून घालून साबुदाण्याच्या तिखटाच्या पापड्या, पुढच्या टप्प्यात फक्त साबुदाणा वाफवून केलेल्या पापड्या असे प्रकार होत. त्यानंतर क्रमांक लागतो तो बटाट्याचे वेफर्स, कीस करण्याचा. त्यातही दोन-तीन प्रकारे केलेले असतात. त्याच क्रमाने पापडांचेही असते. आधी नेहमीचे पापड आणि सर्वांत शेवटी बटाट्याचे पापड केले जातात. अशा पद्धतीने महिनाभरात सर्व वाळवणाची सुफळ सांगता व्हायची. या काळात अर्ध्या कच्च्या वाळवणावर मारलेल्या तावाची चव मात्र पुढील वाळवणापर्यंत जिभेवर सहजतेने रेंगाळत राहायची. 

वाळवणातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वजण एकोप्याने काम करत, एकमेकांना मदत करत. त्यामुळे कितीही वाळवण असले तरी त्याचा ताण कधीच यायचा नाही. एकदा वाळवण झाले, की वानोळा द्यायची पद्धत सुरू व्हायची. कुरडया, पापड्या, पापड असे प्रकार चवीसाठी खास दुसऱ्यांना दिले जायचे आणि घरोघरी ‘वाळवणा’ची देवाणघेवाण होई. 

नव्वदच्या दशकात सुती कापडावरून वाळवण प्लास्टिकच्या कागदावर आल्यावर खऱ्या अर्थाने हा सोहळा रंगतदार व्हायला लागला. कारण अर्धवट ओल्या पापड्या प्लॅस्टिकच्या कागदावरून सहज निघत. त्यामुळे ते खाण्यासाठी खास ‘वेळ’ राखीव ठेवला जायचा. अर्थात हा सारा मामला चोरीछुपे व्हायचा. कोणाला कळू न देता ओल्या पापड्या खाण्यासारखे दुसरे सुख नाही. यातील गमतीचा आणखी एक भाग म्हणजे, ज्यांच्याकडे वाळवण असायचे त्या घरातील मुलाबरोबर त्या दिवशी वाड्यातील अन्य मुले खास दोस्ती करायचे. कारण कच्चे वाळवण खाण्यात त्याला ‘भागीदार’ करून घेता यायचे. त्यामुळे आपली चोरीही उघड होत नसे. वाळवण हे यामुळेच खऱ्या अर्थाने ‘समृद्ध सांस्कृतिक ठेवा’ आहे. 

महिलांसाठी ‘स्ट्रेस बस्टर’ 
पापड, कुरडया करणे हा एका अर्थाने सांघिक कार्यक्रम असायचा. महिला एकत्र येऊन सहज शे-दोनशे पापड दिवसभरात लाटत. ते करत असताना शिळोप्याच्या गप्पांतून आपल्या भावभावनांना वाट करून दिली जात असे. त्यामुळे साहजिकच ताण हलका व्हायचा. एकमेकींची सुखदुःखे वाटून घेतली जात होती. त्यामुळे वाळवण करणे हा महिलांसाठी एक प्रकारचा ‘स्ट्रेस बस्टर’च मानायला हवा.

कुरडयाची भाजी 
साहित्य : चार ते पाच गव्हाच्या कुरडया, १ कांदा, तिखट, मीठ. 
कृती : एका भांड्यात सर्व कुरडया भिजवून घ्याव्यात (पोहे भिजवतो त्याप्रमाणे). एका कढईत फोडणी करून त्यामध्ये चिरलेला कांदा परतावा. कांदा तांबूस झाल्यावर त्यामध्ये भिजलेल्या कुरडया घालाव्यात. चवीनुसार तिखट, मीठ घालून चांगले परतावे. पुरेशी वाफ आणावी. मस्त चवदार भाजी तयार. 
(ही भाजी नुडल्ससारखी दिसत असल्याने मुलांना नुसतीही खायला देता येईल. या भाजीत पौष्टिकता असते.)

संबंधित बातम्या