कोल्हापुरी कुरकुरीत चव

मंजिरी कपडेकर
सोमवार, 15 एप्रिल 2019

उन्हाळी वाळवणं
 

शाबू, बटाट्याच्या पापड्या
साहित्य : एक किलो शाबू, १ किलो बटाटे, १ चमचा जिरे, मीठ.
कृती : शाबू रात्रभर भिजवून ठेवावा. बटाट्याची साले काढून बटाटे किसून घ्यावेत. बटाट्याचा कीस पाण्यात घालून धुऊन घ्यावा. नंतर त्यात तुरटी, मीठ घालून थोडा वेळ ठेवावे. शाबूच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळावे. त्यात मीठ, शाबू, जिरे घालून शिजवावे. त्यामध्ये बटाट्याचा कीस घालावा. चांगले शिजवावे. नंतर प्लॅस्टिक पेपर उन्हात अंथरून घ्यावा व त्यावर पळीने या मिश्रणाच्या पापड्या घालाव्यात. उन्हात चांगल्या वाळवाव्यात. पूर्ण वाळल्यावर पापड्या प्लॅस्टिक पेपरवरून काढून पुन्हा उन्हात वाळवाव्यात. या पापड्या तळल्यानंतर खूपच छान दिसतात, शिवाय शाबू-बटाट्यामुळे चवीला छान लागतात.

नाचणीचे पापड
साहित्य : अर्धा किलो नाचणी, १५ ग्रॅम पापडखार, एक चमचा (अंदाजे १० ग्रॅम)  मीठ, १ चमचा जिरे, १ चमचा तीळ, हवे असल्यास १ चमचा तिखट, गरजेनुसार तेल.
कृती : नाचणी दोन तास पाण्यात भिजवून ठेवावी. नंतर सावलीत वाळवावी. नाचणीचे पीठ करून आणावे. जेवढे पीठ असेल तेवढे पाणी उकळून त्यात पापडखार, मीठ, जिरे, तीळ, तिखट घालावे. उकळी आल्यावर त्यात पीठ घालावे. एकसारखे हलवत राहावे, चांगले एकजीव करावे. वाफ येऊ द्यावी. नंतर चांगले मळून तेलाच्या हाताने गोळे करावेत. पोळपाटावर प्लॅस्टिक पेपर ठेवून पापड लाटावेत व उन्हात वाळवावेत. हे पापड चवीला छान लागतात. उन्हाळ्यात खायला जास्त छान आहेत. नाचणीमुळे शरीराला थंडावा मिळतो.

तांदळाची चकली
साहित्य : एक किलो जाड तांदूळ, ५० ग्रॅम पापडखार, ५० ग्रॅम मीठ, २ चमचे जिरे.
कृती : तांदूळ चोवीस तास भिजवावा. नंतर धुऊन निथळून सावलीत वाळवावा. त्याचे नंतर पीठ करून आणावे. जेवढे पीठ आहे, त्याच्या अडीचपट पाणी तापवावे. त्यात मीठ, पापडखार, जिरे घालावे. पाण्याला उकळी आल्यावर पीठ घालून छान एकजीव करून घ्यावे. चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर चकलीच्या सोऱ्यात घालून चकल्या कराव्यात. चांगल्या वाळवून घ्याव्यात. तळल्यानंतर छान फुलतात.

उपवासाची चकली
साहित्य : एक किलो बटाटे, १ किलो शाबू, १० ते १२ हिरव्या मिरच्या, २ चमचे मिरची पूड, २ चमचे जिरे, शिजवलेली वरी किंवा वरीचे पीठ, मीठ.
कृती : गरम पाण्यात शाबू रात्रभर भिजवत ठेवावा. बटाटे उकडून छान कुस्करून घ्यावेत. हिरव्या मिरच्यांची पेस्ट करावी.
    उकडलेले बटाटे, शाबू, वरी, मिरची पूड, मीठ, जिरे सर्व एकत्र करून छान एकजीव करावे. चकलीच्या सोऱ्यात हे मिश्रण घालून प्लॅस्टिकच्या कागदावर चकल्या घालाव्यात. उन्हात चांगल्या वाळवून डब्यात भरून ठेवाव्यात. उपवासाला खाता येतात. चकली तळल्यानंतर शाबू चांगले फुलतात, त्यामुळे ही चकली दिसायला छान दिसते.

उडीद-मूग डाळीचे पापड
उडदाचे पापड थोडे चिकट होतात. तोंडात, दाताला चिकटतात. मूग डाळ घातल्यामुळे त्याची चवपण छान येते.
साहित्य : एक किलो उडीद डाळ, १ किलो मूगडाळ, १०० ग्रॅम पापडखार, २० ग्रॅम पांढरे मिरे, २० ग्रॅम काळे मिरे, ५० ग्रॅम हिंग, १ ते दीड वाटी तेल, मीठ.
कृती : उडदाची व मुगाची डाळ एकत्र करून दळून आणावी. एक वाटी पीठ बाजूला ठेवावे. चार वाटी पाणी तापवून त्यात पापडखार, मीठ घालून उकळावे. पिठात मिरे जाडसर पूड करून घाला. त्यातच हिंग, अर्धी वाटी तेल घालून एकत्र करावे. मिश्रणात पाणी घालून पीठ छान घट्ट मळून घ्यावे व रात्रभर ठेवावे. सकाळी तेल लावून परत पीठ मळावे. चांगले कुटून घ्यावे. पीठ मऊसर झाले पाहिजे. नंतर पिठाच्या गोळ्या कराव्यात. या गोळ्या पीठ लावून लाटल्या तरी चालतील. नंतर हे पापड सावलीत चांगले वाळवावेत. सुरुवातीलाच छोट्या लाट्या करून ठेवल्यास पूर्ण पापड लाटायला सोपे जाते. लसूण, हिरव्या मिरच्या घालूनही हे पापड करता येतात.

वाळलेली हरभऱ्याची भाजी
साहित्य : एक किलो हरभऱ्याची पालेभाजी.
कृती : या भाजीचा सीझन असतो, तेव्हा ही भाजी कडकडीत उन्हात चार दिवस वाळवावी. नंतर थोडी हाताने चुरडून बरणीत भरून ठेवावी. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात भाज्या खूप कमी येतात, तेव्हा ही वाळलेली भाजी उपयोगाला येते. थोडी भाजी गरम पाण्यात भिजवून नेहमीप्रमाणे भाजी करता येते. अर्धी वाटी भाजी, एक वाटी बेसन घेऊन एकत्र पाण्यात कालवून आमटीप्रमाणे लसणाची फोडणी केल्यास छान आमटी किंवा पिठल्याचा प्रकार तयार होतो.

पोह्यांचे मिरगुंड
साहित्य : एक किलो जाड पोहे, मिरची पूड, मीठ, पापडखार, हिंग.
कृती : पोहे भाजून घ्यावेत किंवा उन्हात वाळवून घ्यावेत व नंतर दळून आणावेत. दळलेल्या पिठातील दोन वाट्या पीठ घ्यावे. जाड बुडाच्या भांड्यात दोन वाट्या पाणी तापवावे. त्या पाण्यात दोन चमचे मिरची पूड, मीठ, अर्धा चमचा हिंग, दीड चमचा पापडखार घालावे. उकळी आल्यावर त्यात पोह्याचे पीठ घालून छान शिजवून एकजीव करावे. झाकून वाफ येऊ द्यावी. नंतर पीठ काढून त्याला तेलाचा हात लावून चांगले मळावे. त्यानंतर खलबत्त्यात पीठ कुटून घ्यावे. पीठ मऊसर झाले पाहिजे. नंतर याचे गोळे करून लाटावेत व उन्हात वाळवावेत. तळल्यानंतर हे मिरगुंड छान फुलतात.

संबंधित बातम्या