उत्तर भागाची वैशिष्ट्ये

 नाशिक - खानदेश
सोमवार, 15 एप्रिल 2019

उन्हाळी वाळवणं
उन्हाळ्याची चाहूल लागली, की गृहिणींच्या मनात वाळवणाचे विचार येऊ लागतात. यावर्षी कोणती वाळवणं करायची याचे बेत ठरतात. त्यांना थोडी मदत व्हावी म्हणून नाशिक - खानदेशातील काही स्पेशल वाळवणं... 

 

जिगीशा अहिरराव, नाशिक
गव्हाचे पापड 
साहित्य : अर्धा किलो गहू, १ वाटी (छोटी) हिरव्या मिरचीचा ठेचा (ऐच्छिक), चवीनुसार मीठ. 
कृती : गहू तीन दिवस पाण्यात भिजत घालावेत. त्यानंतर कुरडयांप्रमाणे चीक काढून जेवढा चीक मिळेल त्याच्या तीनपट पाणी घेऊन शिजवावे. चमक आली, की शिजले असे समजायचे. त्यात मीठ, बारीक वाटलेली मिरची घालावी. पातळ पीठ पळीने अंथरत पापड करावेत. कडक उन्हात ते वाळवून घ्यावेत. तळल्यावर त्यावर लाल तिखट, चाट मसाला टाकून खायला द्यावेत. 
टीप - चिकाला पाणी कमी वाटल्यास पाणी गरम करून त्यात घालावे. 


नंदिनी पाटील, नाशिक
नागलीचे वडे 
साहित्य : अर्धा किलो नागली, अर्धा किलो बाजरी, पाव किलो ज्वारी, १०० ग्रॅम लसूण, अर्धा किलो हिरवी मिरची, ५० ग्रॅम जिरे-धने, चवीनुसार मीठ. 
कृती : नागली, ज्वारी, बाजरी रात्रभर पाण्यात भिजत घालावी. दुसऱ्या दिवशी कपड्यात बांधून ठेवावे. नंतर वाटून घ्यावे. मिक्‍सरमध्ये वाटले तरी चालेल. अधिक बारीक वाटायचे नाही. मग हिरवी मिरची, लसूण वाटून त्यात घालावे. त्यात मीठ, जिरे, धने पूड घालून एकजीव करावे. ताटात अथवा पाटावर हाताने वडे तोडावेत (घालावेत). कडक उन्हात वाळवावे.


उज्ज्वला पिसोळकर, नाशिक
आवळा कॅंडी 
साहित्य : दोन किलो आवळा, १ किलो साखर (पिठी करून). 
कृती : आवळे स्वच्छ धुऊन - पुसून एका पिशवीत भरावेत. त्यानंतर तीन दिवस फ्रिजरमध्ये ठेवावेत. तीन दिवसांनंतर बाहेर काढून त्याच्या फोडी वेगळ्या कराव्यात. त्यातील बी काढून टाकावे. त्यात पिठीसाखर घालून मिक्‍स करून घ्यावे. ते २४ तास झाकून ठेवावेत. सावलीत वाळवले तरी चालेल. त्यामुळे ते पांढरे शुभ्र दिसतील. उन्हात वाळवल्यास रंग गडद होईल. उन्हात चार दिवस वाळवल्यावर पुन्हा त्यावर थोडी पिठीसाखर टाकावी. पाव किलो पिठीसाखर लागते. पिठीसाखर आणि फोडी मिक्‍स कराव्यात. ही आवळा कॅंडी वर्षभर टिकते. आवश्‍यक वाटल्यास काळे मीठ घालावे. 


श्‍वेतांबरी अहिरराव, नाशिक
बाजरीचे वडे 
साहित्य : एक किलो बाजरी, ५० ग्रॅम जिरे, चवीनुसार मीठ. 
कृती : बाजरी तीन दिवस भिजत घालावी. दररोज पाणी बदलावे. तिसऱ्या दिवशी ती चाळणीतून काढून घ्यावी. ही बाजरी वाटून घ्यावी. अधिक दळायची नाही. त्याचा चीक काढून फडक्‍यातून तीन वेळा गाळून घ्यावे. रात्रभर चीक तसाच ठेवावा. त्यानंतर सकाळी घट्ट चीक जेवढा असेल त्याच्या दीडपट पाणी उकळून घ्यावे. त्यात जिरे, मीठ टाकून परत उकळावे. त्यात थोडा, थोडा चीक टाकून हलवावे. एकसारखा हलवत राहावा, गाठी होऊ देऊ नयेत. त्यावर ताट आणि कापड ठेवून शिजवून घ्यावे. झाऱ्याने वडे करावेत. त्यासाठी मोठ्या छिद्राचा झारा मिळतो. उन्हात वाळवून घ्यावे. आंबूस अशी चव येते. पांढरे शुभ्र वडे दिसतात.


वसुधा अक्कलवार, नाशिक
खानदेशी वडे 
साहित्य : अर्धा किलो मठाची डाळ, अर्धा किलो मुगाची डाळ, पाव किलो मटकीची डाळ, २ जुड्या कोथिंबीर, १ छोटी वाटी आले - लसूण, १ छोटी वाटी बडीशेप पावडर, चवीनुसार जिरे, धने, ओवा, तिखट, मीठ. 
कृती : सगळ्या डाळी चार ते पाच तास भिजवून घ्याव्यात. बारीक वाटून घ्याव्यात. त्यात जिरे, धने, ओवा, बडीशेप पावडर, मीठ, तिखट, धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घालावी. आले-लसणाची पेस्ट घालावी. सर्व व्यवस्थित कालवून चाळणी अथवा झाऱ्याने वडे करावेत. कडक उन्हात वाळवावेत. 
टीप - सर्व डाळी पाणी न घालता वाटाव्यात.


चंद्रकला साबळे, नाशिक
आवळा कॅंडी 
साहित्य : दोन किलो आवळा, १ किलो साखर (पिठी करून). 
कृती : आवळे स्वच्छ धुऊन - पुसून एका पिशवीत भरावेत. त्यानंतर तीन दिवस फ्रिजरमध्ये ठेवावेत. तीन दिवसांनंतर बाहेर काढून त्याच्या फोडी वेगळ्या कराव्यात. त्यातील बी काढून टाकावे. त्यात पिठीसाखर घालून मिक्‍स करून घ्यावे. ते २४ तास झाकून ठेवावेत. सावलीत वाळवले तरी चालेल. त्यामुळे ते पांढरे शुभ्र दिसतील. उन्हात वाळवल्यास रंग गडद होईल. उन्हात चार दिवस वाळवल्यावर पुन्हा त्यावर थोडी पिठीसाखर टाकावी. पाव किलो पिठीसाखर लागते. पिठीसाखर आणि फोडी मिक्‍स कराव्यात. ही आवळा कॅंडी वर्षभर टिकते. आवश्‍यक वाटल्यास काळे मीठ घालावे. 


प्राप्ती माने, नाशिक
उपासाची साबुदाणा चकली 
साहित्य : एक किलो साबुदाणा, ३ किलो बटाटे. 
कृती : साबुदाणा रात्रभर कोमट पाण्यात भिजवावा. बटाटे उकडून घ्यावेत. बटाटे किसणीने किसून साबुदाणे व बटाटे एकत्र करावेत. त्यात चवीप्रमाणे तिखट, मिरची दळून घालावी. जिरे, मीठ चवीप्रमाणे टाकावे. त्यानंतर हातसोऱ्याने चकली तयार करावी. कडक उन्हात ती वाळवावी.

संबंधित बातम्या