कोकण विशेष 

प्रज्ञा राजेश मोंडकर, सावंतवाडी 
सोमवार, 15 एप्रिल 2019

उन्हाळी वाळवणं
कोकणातील वाळवणं म्हणजे माशांशी संबंधित असतील असा समज होणे स्वाभाविक आहे. त्यात फार वावगेही नाही. पण हे ‘सुक्कट’ मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक कारणासाठी होते. मग त्याचे चटणी, भाजी वगैरे आवडते पदार्थ होतात. पण कोकणात इतरही वाळवणं होत असतात, त्याची ओळख.

कोहळा सांगडे 
साहित्य : एक मध्यम आकाराचा कोहळा, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी चणाडाळ (दोन्ही धुऊन सुकवून घ्याव्यात), अर्धा चमचा हिंग, ५-६ चमचे तिखट, १ चमचा हळद, ५-६ चमचे धने, ७-८ हिरव्या मिरच्या व अंदाजे मीठ. 
कृती : मध्यम आकाराचा कोहळा स्वच्छ धुऊन कोरडा करून घ्यावा. कोहळा फोडून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे (हातात मावेल एवढा आकार) करावेत. आतील बिया काढून टाकाव्यात. हे तुकडे विळीवर चोचवून बारीक चिरून घ्यावेत. नंतर एका टोपलीत किंवा चाळणीत चिरलेला कोहळा ठेवावा. म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल. मिक्‍सरमध्ये उडीद डाळ व चणाडाळ भरडून घ्यावी. त्यामध्ये हिंग, हळद, तिखट, धने, जिरे, मीठ घालून पुन्हा मिक्‍सरला लावावे. वरील सर्व मिश्रण व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एकत्र कराव्यात. नंतर कोहळा एका पातेल्यात घेऊन वरील मिश्रणात एकजीव करून रात्रभर ठेवून द्यावा. सकाळी स्वच्छ प्लास्टिकवर लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करून सांडगे घालावेत. सहा-सात दिवस कडक उन्हात वाळवल्यावर ते सुपारीच्या आकाराचे होतात. आवडत असल्यास मिश्रणात एक वाटी भाताच्या लाद्या घालाव्यात. पूर्ण सुकल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

सांडगी मिरची 
साहित्य : अर्धा किलो बोटभर लांबीच्या हिरव्या मिरच्या, २ वाटी धने, १ वाटी मेथी, पाव वाटी मोहरी, १ चमचा हिंग, १ चमचा हळद, अर्धी वाटी मीठ, ३ वाट्या दही. 
कृती : मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या करून घ्याव्यात. त्यानंतर सुरीने सर्व मिरच्यांना चीर पाडून आतील सर्व बिया काढाव्यात. दह्याखेरीज सर्व साहित्य मिक्‍सरमध्ये जाडसर वाटावे. पातेल्यात हे मिश्रण व दही एकत्र करून सर्व मिरच्यांमध्ये भरून घ्यावे. भरलेल्या मिरच्या ७-८ दिवस कडक उन्हात वाळवल्यावर देठ मोडून अंदाज घ्यावा. देठ चटकन मोडल्यास मिरच्या छान सुकल्या असे समजावे. उन्हातील मिरच्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.     भात, वरण भात, दहीभाताबरोबर मिरच्या तळून खाल्ल्यास जेवणात रंगत येते.

साबुदाणा फेण्या (सांडगे) 
साहित्य : अर्धा किलो साबुदाणा, १ मोठ्या आकाराचा बटाटा, मीठ, जिरे. 
कृती : फेण्या करायच्या आदल्या रात्री साबुदाणा स्वच्छ धुऊन घ्यावा. एका टोपात साबुदाणा पूर्ण भिजेल एवढे पाणी घालावे. सकाळी साबुदाणा मोजून घ्यावा. त्याच्या अडीचपट पाणी उकळत ठेवावे. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यावर त्यात अंदाजे मीठ व भिजवलेला साबुदाणा घालावा. मोठ्या आचेवर दहा मिनिटे तो शिजू द्यावा. बटाट्याच्या साली काढून टाकत कीस करावा. हा कीस साबुदाण्यात घालून पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावा. गॅस बंद करून अर्धा चमचा जिरे टाकावे. नंतर स्वच्छ प्लास्टिकवर मध्यम आकाराच्या फेण्या घालाव्यात. तीन ते चार दिवस उन्हात वाळल्यावर प्लास्टिक पिशवीत अथवा डब्यात बंद करून ठेवाव्यात. या फेण्या उपासालाही चालतात.

तांदळाची कुर्डई 
साहित्य : अर्धा किलो जाडसर तांदूळ, हिंग, मीठ. 
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व पाणी काढून टाकून तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. मिक्‍सरमध्ये थोडे-थोडे पाणी घालून डोशाच्या पिठाएवढे तांदूळ जाडसर वाटून घ्यावेत. तयार पीठ स्वच्छ पातेल्यात झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी चिकाच्या वर आलेले जास्तीचे पाणी अलगद काढून टाकावे. त्यानंतर चीक तळापासून हलवून घ्यावा. 
चिकासाठी जेवढे भांडे घेतले असेल तेवढ्याच भांड्यात पाणी उकळून घ्यावे. त्यामध्ये अंदाजे मीठ व थोडासा हिंग घालावा. मोठ्या आचेवर उकळत्या पाण्यात एका हाताने चीक हळूहळू ओतावा व दुसऱ्या हाताने ढवळत राहावे. म्हणजे गुठळ्या होत नाहीत. पीठ शिजून जाडसर झाल्यावर गॅस बारीक करावा. झाकण ठेवून दोन वाफा काढाव्यात. 
    शेवपात्रात वरील मिश्रण गरम असतानाच घालून प्लास्टिकवर मध्यम आकाराच्या कुरडया पाडाव्यात. दोन-तीन दिवस उन्हात सुकू द्याव्यात.

संबंधित बातम्या