वाळवणं - एक उत्सव!

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 15 एप्रिल 2019

उन्हाळी वाळवणं
 

उन्हाळ्यातली कामे; विशेषतः वाळवणं म्हणजे एक उत्सव असायचा. कधी काय करायचे याचे प्लॅनिंग गावांमधील घरोघरी तयार असायचे. सांडगे, उडदाचे, मुगाचे, पोह्यांचे, बटाट्याचे, ज्वारीचे, तांदळाचे पापड, गव्हाच्या, तांदुळाच्या कुर्डया, खारोड्या, मुगोड्या, सांड्या, सांडगी मिरच्या, बटाट्याचा कीस, फिंगर्स, साबुदाण्याच्या पापड्या, चकल्या, चकल्या, कैरीचा कीस, आंब्याच्या खुला, साटे घालणे, वेगवेगळ्या म्हणजे फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर, कांदे यासारख्या भाज्या सुकवणे, धान्ये सुकवणे अशा कामात उन्हाळ्यात घरोघरी गृहिणीच नाही, तर मुलेमुलीही आनंदाने सहभागी व्हायची. परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या असायच्या; मग सकाळी उन्हे वाढायच्या आधी आईच्या हाताखाली अंगणात किंवा गच्चीत खाटांवर स्वच्छ साडीवर अथवा प्लास्टिकवर पापड्या घालणे, बटाट्याचा कीस करणे, साबुदाण्याच्या चकल्या पाडणे वगैरे कामे भावंडांबरोबर अहमहमिकेने केली जायची. दुपारी राखण करण्याच्या निमित्ताने उत्साहाने उन्हात जाऊन पापड्या उलटून येताना त्यातल्या कोणाच्या लक्षात येणार नाही या बेताने पळवून गट्टम केलेल्या त्या अर्धओल्या पापड/पापड्यांची चव दुसऱ्या कशालाच येऊ शकत नाही. 

उन्हाळा म्हणजे वाळवणं, आंबे, आते-मामे-मावस-चुलत भावंडं, पाहुणे, दुपारी रंगलेले पत्त्यांचे डाव, कॅरम, सापशिडी, ल्युडो, वाळ्याचा वास, नवीन माठातले/रांजणातले मातीचा सुगंध असलेलं पाणी, आंब्याची लोणची, तक्कू, चोरून खाल्लेले आंबे आणि त्याचे बॉडीफ्रॉक, बनियनवर पडलेले डाग, गाद्यांच्या राशी आणि त्या खुंदून घातलेला धुडगूस, उसाचा रस, पन्हे, वाळ्याच्या ताट्यांवर पाणी मारल्यावर येणारा सुवास.. उन्हाळा म्हणजे रात्री गच्चीवर अंथरुणावर झोपून पाहिलेले चंद्र-तारे, सप्तर्षी आणि आकाश, घाबरगुंडी उडवणाऱ्या केलेल्या भुताखेतांच्या गोष्टी! काय आणि किती सांगावे? सुखाची परिसीमा असायची उन्हाळा म्हणजे! 

संस्कृती संस्कृती म्हणजे तरी वेगळे काय असते? या एकत्र येण्यातून, एकमेकांच्या सहाय्याने पार पाडलेल्या कामांतून जे सहजीवन निर्माण होते, आनंद निर्माण होतो ती संस्कृती! शेवया करायला, पापड लाटायला आजूबाजूच्या शेजारणी यायच्या. आज हिच्या घरचे, उद्या तिच्या घरचे असे करत करत मनमोकळ्या गप्पा होत व कामंही सप्पाटून होत. 
यामुळे प्रत्येकानेच आपल्या घरी थोडीतरी वाळवणं चुकतमाकत का होईना, जरूर करून पाहावी आणि मुलांना त्यात सहभागी करून घेऊन हा आनंदाचा अनुभव, वारसा आणि संस्कृतीचा ठेवा त्यांना जरूर द्यावा.

बटाटा कीस 
साहित्य : एक किलो मोठे बटाटे. 
कृती : बटाटे धुऊन कुकरमध्ये ५-६ वाट्या पाणी घालून दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवावेत. लगेच गॅस बंद करून वाफ गेल्यावर बटाटे थंड पाण्यात घालून साले काढून घ्यावीत. थेट प्लास्टिकच्या कागदावरच मग हा कीस विरळपणे किसावा. एका जागी फार कीस पडू देऊ नये. नाहीतर गोळे होतील. कीस दिवसभर वाळला, की उलटावा. असे तीन-चार दिवस रोज उन्हात दिवसभर वाळवले, की कीस तयार होईल; तो हवाबंद डब्यात ठेवावा. बटाट्याचा उपासाचा चिवडा करण्यासाठी याचा उपयोग होतो.

टरबुजाच्या पाठीचे सांडगे 
साहित्य : एका मध्यम आकाराच्या टरबुजाची हिरवी साल व सालीजवळचा पांढरा भाग (साधारण ४ वाट्या), ४-५ तिखट मिरच्या, २-३ वाट्या कोथिंबिरीच्या काड्या, १-२ टोमॅटो, ७-८ भेंड्या, २ गाजरं, २ टेबलस्पून धनेपूड, १ चहाचा चमचा हळद, १ टेबलस्पून तिखट, २ टीस्पून मीठ, अर्धी वाटी तीळ. 
कृती : टरबूज, गाजरं, मिरच्या, भेंड्या, टोमॅटो, कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्यावी. टरबुजाचा आतील लाल भाग खाण्यासाठी कापून घ्यावा व छायाचित्रात दाखवल्यासारखी साले घेऊन ती प्रोसेसरमध्ये वा किसणीवर किसून घ्यावीत. गाजरंही किसून घ्यावीत. भोपळी मिरची असेल, तर तीही बारीक चिरून घ्यावी. हिरव्या मिरच्या व भेंड्या मिक्‍सरमधून ओबडधोबड वाटून घ्याव्यात. कोथिंबीर काड्यांसह अथवा नुसत्या कोथिंबिरीच्या काड्या जरड असतील, तर मिक्‍सरमधून बारीक व कोवळ्या असतील, तर चिरून वा मिक्‍सरमधून ओबडधोबड वाटून घ्याव्यात. टरबुजाच्या पाठींचा कीस हातांनी पिळून ते पाणी सूपमध्ये घालण्यासाठी बाजूला ठेवावे वा झाडांना घालावे. हा कीस साधारण चार वाट्या होईल. त्यात दोन गाजरांचा कीस (साधारण २ वाट्या), वाटलेल्या भेंड्या व मिरच्या, दोन चिरलेले टोमॅटो, अर्धी वाटी तीळ, एक चमचा हळद, १ टेबलस्पून तिखट, २ टेबलस्पून धनेपूड, दोन टीस्पून मीठ असे सगळे साहित्य कालवून घ्यावे. भेंडीमुळे चिकटपणा येईल व त्यानं सांडगे तुटणार नाहीत. कालवून झाल्यावर प्लास्टिकच्या कागदावर हातानं साधारणपणे बोटाच्या दोन पेराएवढ्या व्यासाचे सांडगे घालावेत. सांडगे घालताना जरा चपटे घालावेत. 
टीपा : १. वाळवणं उन्हाच्या आधी घालावीत म्हणजे संपूर्ण दिवसाचं ऊन मिळतं व वाळवण घालताना उन्हाचा त्रास होत नाही. २. सांडगे घालायच्या आधी चव जरूर पाहावी. मीठ नेहमीपेक्षा थोडं कमी पुरते कारण वाळल्यानंतर आकार लहान होतो व खारट लागू शकतात. ३. एक दिवस वाळल्यानंतर सांडगे काढून उलटावे म्हणजे दुसऱ्या बाजूनंही व्यवस्थित वाळतील. साधारण कडकडीत उन्हात दिवसभर ठेवले, तर सांडगे पूर्ण वाळायला तीन ते चार दिवस लागतील. खडखडीत वाळले, की सांडगे हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. जेवताना तेलात लालसर कुरकुरीत होईपर्यंत तळावेत. पटकन लाल होतात त्यामुळे मध्यम आचेवर तळावेत. ४. तुरीच्या डाळीची साधी हळद-हिंग-मीठ घातलेली खिचडी, लसणाची फोडणी, पिठले याबरोबर तोंडी लावायला हे तळलेले सांडगे व पापड हा अप्रतिम बेत होऊ शकतो. ५. इतर कुठल्याही भाज्यांचे सांडगे असेच करता येतील. ६. वरील साहित्याचे साधारण ८०-९० सांडगे होतील. 

साबुदाणा पापड्या 
साहित्य : दोन वाट्या भिजवून फुगलेला साबुदाणा, १ चमचा मीठ, १ चमचा जिरे, हव्या असल्या तर २ मिरच्या किंवा १ चमचा तिखट. 
कृती : भिजवून फुगलेल्या दोन वाटी साबुदाण्यात तीन ते चार वाट्या पाणी टाकून कढईत शिजायला ठेवावे. त्यात एक चमचा मीठ, एक चमचा जिरे व हवे असल्यास तिखट किंवा वाटलेली मिरची घालून सतत ढवळत साबुदाणा ट्रान्स्परंट होऊन मिश्रण इडली पिठाइतपत घट्टसर होईल असे शिजवावे. गॅस बंद करुन पाच-सात मिनिटे थंड होऊ द्यावे. तोपर्यंत प्लास्टिकच्या कागदावर हाताने पुसट तेल/तूप लावून घ्यावे. मग त्यावर मिश्रण गरम असतानाच पळीने बांगडीच्या आकाराच्या लहान लहान पापड्या घालाव्यात. हे सगळे सकाळी लवकर गच्चीत अथवा अंगणात ऊन यायच्या आधी करावे म्हणजे सुखाने करता येते. संध्याकाळी पापड्या प्लॅस्टिकवरून काढून उलटाव्यात. असे सलग तीन-चार दिवस केले, की पापड्या पूर्णपणे वाळतील. मग त्या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

साबुदाण्याच्या चकल्या 
साहित्य : एक वाटी साबुदाणा, २ मध्यम बटाटे, अर्धी वाटी वरीचे तांदूळ, १ चमचा मीठ, १ चमचा जिरे, १ चमचा तिखट अथवा २-३ हिरव्या मिरच्या. 
कृती : रात्री वाटीभर साबुदाणा धुऊन पाणी काढून टाकावे. साबुदाण्यात दोन वाट्या पाणी घालून झाकून ठेवावा. सकाळी कुकरमध्ये दोन बटाटे उकडून त्यांची सालं काढून मॅश करावे अथवा किसून घ्यावे. अर्धी वाटी वरीच्या तांदळात एक वाटी पाणी घालून तेही बटाट्याबरोबरच मऊ शिजवून घ्यावे. उपासासाठी करायचे असतील, तर मिरच्या धुऊन वाटून घ्याव्यात, नाहीतर एक चमचा तिखट त्यात घालावे. एक चमचा जिरे पूड करून त्यात घालावे. सगळे साहित्य म्हणजेच भिजलेला साबुदाणा, बटाट्याचा किसलेला गोळा, शिजवलेले वरीचे तांदूळ, मीठ, जिरे, तिखट वा वाटलेली हिरवी मिरची एका परातीत घेऊन हातानं मळून छान गोळा करून घ्यावा. चकलीच्या साच्याला आतून किंचित तेल अथवा तूप लावून घ्यावे म्हणजे गोळा चिकटणार नाही. वरील गोळ्याचे दोन लांबट रोल करून साच्यात भरावे. स्टीलच्या ताटाला वा प्लास्टिकला किंचित तुपाचा वा तेलाचा हात लावून त्यात गोळा भरावा व त्यावर चकल्या पाडाव्यात. चकल्या तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात वाळवाव्यात. चकल्या रोज उलटाव्यात म्हणजे आतपर्यंत खडखडीत वाळतील. वाळल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. उपयोगात आणतेवेळी कढईत तेल अथवा तूप घेऊन ते चांगले कडकडीत गरम झाल्यावर त्यात चकल्या टाकाव्यात. नंतर मध्यम गॅसवर तळाव्यात. छान फुलल्या, की झाऱ्याने उलटून दुसऱ्या बाजूनंही कुरकुरीत तळून घ्याव्यात. वरील साहित्यात साधारण २५ ते ३० चकल्या होतील.

साबुदाणा-बटाट्याचे पापड 
साहित्य : एक वाटी साबुदाणा, २ मध्यम मोठे बटाटे, २ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा जिरे. 
कृती : एक वाटी साबुदाणा रात्री धुऊन दोन वाट्या पाणी घालून झाकून ठेवावा. सकाळपर्यंत छान फुलेल. मग तो प्रोसेसरमध्ये ओबडधोबड बारीक होईपर्यंत फिरवून घ्यावा. दोन बटाटे कुकरमध्ये दोन शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्यावे व कुकर थंड झाला, की बटाट्याची साले काढून बटाटे किसून घ्यावेत. जिरे व मिरच्याही वाटून घ्याव्यात. तिखट आवडत असेल, तर मिरच्यांऐवजी तिखट घालावे. त्यानंतर बटाटे, साबुदाणा, जिरे, मीठ, मिरची एकत्र करून छान गोळा मळून घ्यावा. त्याचे १४-१५ लहान गोळे करावेत. 
    एका ट्रेला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्यावा. एकेक गोळा प्लास्टिकवर किंवा त्या ट्रेवर ठेवून त्यावर छोटा प्लास्टिकचा कागद ठेवून बोटांनी, तळहाताने किंवा वाटीने दाब देऊन पापड करावा. साधारण बांगडीएवढा आकार होईल. मग ट्रे कडक उन्हात ठेवून पापडांवर एखादी पातळ साडी, ओढणीसारखे कापड घालावे. ४-५ तासांनी पापड उलटे करून पुन्हा सुकू द्यावे. ३-४ दिवस रोज उन्हात खडखडीत वाळवून मग हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. खायच्यावेळी तूप अगर तेल कडकडीत गरम झाल्यावर गॅस मध्यम करून त्यात पापड तळावेत.

मुगोरे, मूगवडे अथवा मुगवड्या 
साहित्य : एक वाटी मुगाची डाळ, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा मीठ, २ चमचे धनेजिरेपूड, अर्धा चमचा हिंग. 
कृती : मुगाची डाळ धुऊन २-३ वाट्या पाण्यात भिजत घालावी. साधारण ४-५ तास भिजल्यावर मोठ्या गाळणीत घालून पाणी काढून टाकावे. मग त्यात धनेजिरे पूड, हिरव्या मिरच्या, मीठ, हिंग घालून मिक्‍सरमधून जरा जाडेभरडे वाटावे. नंतर ४-५ मिनिटे हाताने खूप फेटावे म्हणजे मिश्रण हलके होईल. वाटीत पाणी घेऊन त्यात छोटा गोळा टाकून पाहावा. तरंगला की फेटणे थांबवावे. मग एखाद्या प्लास्टिकवर हाताने लहान लिंबाएवढ्या वड्या घालाव्यात. या वड्या कडकडीत उन्हात वाळत ठेवाव्यात. रोज उलटपालट करून चार-पाच दिवसांत वाळवल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. या वड्या घालून चिंच-गूळ घालून केलेली दोडक्‍याची भाजी फार छान लागते. सांडग्यासारख्या तळूनही कुरुमकुरुम खायला छान लागतात.

सांडगी मिरच्या 
साहित्य : वीस-पंचवीस जरा जाडसर हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी साबुदाणा, १ चमचा भाजलेल्या मेथीची जाडसर पूड, अर्धी वाटी दही, २ टेबलस्पून धनेपावडर, १ टेबलस्पून जिरे पावडर, २ टेबलस्पून तीळ, अर्धा चमचा हिंगपावडर, अर्धा चहाचा चमचा हळद, मिरच्या तिखट नसल्यास २ चमचे तिखट. 
कृती : साबुदाणा धुऊन पाणी काढून टाकावे व मग त्यात एक वाटी पाणी घालून सात-आठ तास अथवा रात्रभर भिजवून झाकून ठेवावा. सकाळी मिक्‍सरमधून साबुदाणा, धने-जिरेपूड, मीठ, तिखट हे मिक्‍सर थांबून थांबून चालवत एकत्र करून घ्यावे व हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात तीळ, दही, हिंग, मेथी वगैरे घालून छान मिसळून घ्यावे. 
    मिरच्या धुऊन त्यांना सुरीने देठापासून टोकापर्यंत उभा छेद द्यावा. सगळ्या मिरच्यांमध्ये, त्या छेदातून तयार केलेला मसाला भरावा व एखाद्या ताटात ठेवून कडक उन्हात तीन-चार दिवस खडखडीत वाळवून घ्याव्या. वाढायला घेताना छान खरपूस तळून घ्याव्यात. खिचडी पिठल्याबरोबर या सांडगी मिरच्या अप्रतिम लागतात. तसेच, आंब्याच्या डाळीतही या तळलेल्या सांडगी मिरच्या घालतात. तुरीच्या साध्या खिचडीत वरून जी हिंग-मोहोरीची लसूण, तिखट, मीठ घातलेली फोडणी करतात, त्यातच ही मिरची शेवटी घालून खमंग तळतात. अशीच फोडणी व तळलेली सांडगी मिरची अंबाडीच्या भाजीवर अथवा पातळ भाजीवर घेतात. अप्रतिम लागते.

दह्यातल्या मिरच्या 
साहित्य : पंचवीस-तीस लांब हिरव्या मिरच्या, २-३ वाट्या घट्ट आंबट दही, १ चमचा मीठ, १ चमचा जिरेपूड. 
कृती : हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन त्यांची देठे काढून टाकावीत. मिरच्यांना उभा छेद देऊन घ्यावा. पसरट भांड्यात दही घेऊन दह्यात मीठ व जिरेपूड घालून छान मिसळून घ्यावे. त्यात यातल्या थोड्या थोड्या मिरच्या घालाव्यात व हाताने कालवून घ्यावे. ताटावर अगर ट्रेवर प्लास्टिकच्या कागदावर यातली एक एक मिरची सुटी सुटी अंतरा-अंतरावर घालून मग ट्रे उन्हात नेऊन ठेवावा. दही उरल्यास फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरावे. दुसऱ्या दिवशी दह्याचे असेच मिश्रण करून त्यात या मिरच्या बुडवून आदल्या दिवशीप्रमाणेच पसरून उन्हात ठेवाव्यात. अशी तीन पुटे (थर) दिल्यावर या मिरच्या आणखी दोन दिवस खडखडीत वाळवून मग हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. पापडासारख्याच या मिरच्या तळून तोंडीलावणे म्हणून खातात. मिरच्या आवडीप्रमाणे तिखट वा कमी तिखट आणाव्यात. खूप छान लागतात. याचप्रमाणे लाल भोपळ्याच्या सालांच्या पट्ट्या कापून दह्यातली भोपळ्याची साले करता येतील. चांगली लागतात.

दह्यातल्या गवारीच्या शेंगा 
साहित्य : एक पावभर गवारीच्या शेंगा, २-३ वाट्या घट्ट आंबट दही, १ चमचा मीठ, १ चमचा जिरेपूड. 
कृती : गवारीच्या शेंगा स्वच्छ धुऊन त्यांची दोन्हीकडची टोके काढून टाकावीत. पसरट भांड्यात दही घेऊन दह्यात मीठ व जिरेपूड घालून छान मिसळून घ्यावे. त्यात थोड्या थोड्या शेंगा घालाव्यात व हाताने कालवून घ्यावे. ताटावर अगर ट्रेवर प्लास्टिकच्या कागदावर यातली एक एक शेंग सुटी सुटी अंतरा-अंतरावर घालून मग ट्रे उन्हात ठेवावा. दही उरल्यास फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरावे. 
    दुसऱ्या दिवशी दह्याचे असेच मिश्रण करून त्यात या शेंगा बुडवून आदल्या दिवशीप्रमाणेच पसरून उन्हात ठेवाव्यात. अशी तीन पुटे (थर) दिल्यावर या शेंगा आणखी दोन दिवस खडखडीत वाळवून मग हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. पापडासारख्याच या शेंगा तळून तोंडीलावणे म्हणून खातात. खूप छान लागतात.

संबंधित बातम्या